Login

आवाज.... भाग - ९

तिला ऐकू येणाऱ्या आवाजांचे रहस्य
आवाज.... भाग - ९

आरशांच्या त्या अंधाऱ्या मार्गातून सिया चालत राहिली.
प्रत्येक पावलागणिक हवा थंड होत होती, आणि तिच्या आजूबाजूला कुजबुज वाढत होती

“परत जा... नाहीतर तू सुद्धा आमच्यात सामील होशील...” असे आवाज तिच्या कानावर पडत होते पण ती आवाजांकडे दुर्लक्ष करत पुढे सरकली.
धुक्यातून एक छोटं दार दिसलं. दारावर कोरलेलं होतं. “आठवणींचं घर.” ते वाचून सियाचं हृदय धडधडत होते.
तेच होतं तिचं जुनं घर, जिथे ती लहानपणी राहत होती.
जणू आरशाच्या जगात त्याचं प्रतिबिंब उभं केलं गेलं होतं.

ती आत गेली. तिच्यासाठी ते सगळं ओळखीचं होतं पण तरीही विचित्र वाटत होतं. भिंतीवर तिच्या लहानपणीचे फोटो होते. पण प्रत्येक फोटोत ती हसत नव्हती, तर तिच्या चेहऱ्यावर रिकामे आणि निर्जीव भाव दिसत होते.

ती हळूच त्या खोलीत शिरली, जिथे पहिला आरसा होता.
तो आरसा मोठा, चौकटीवर फुलांच्या कोरीव आकृती, पण आत फक्त काळोख दिसत होता.

“हा तोच आहे…” ती मनातल्या मनात पुटपुटली. पण त्याचवेळी आरशातून अचानक आवाज आला.

“तू का आलीस परत?” त्या आवाजाने सियाचे डोळे मोठे झाले. त्या आरशात तिच्या लहानपणीचं रूप दिसू लागलं. तिच्यासमोर आता लहान सिया होती

सियाला बघून ती लहान सिया हसली.
“तू मोठी झालीस… पण मी अजून इथेच आहे.” ती लहान सिया म्हणाली.

“तू कोण? माझं प्रतिबिंब आहेस का?” सियाने घाबरत विचारलं तेव्हा ती हसली आणि म्हणाली.

“मी तुझं खरं रूप आहे. जे तू जगाला दाखवत नाहीस भीती, राग, अपराध, हे सगळं मी आहे.” ते ऐकून सिया मागे सरकली,
“मला बाहेर जायचं आहे.” सिया म्हणाली.

“बाहेर जाण्यासाठी तुला तुझी भीती गिळावी लागेल.” लहान सिया म्हणाली.

तेवढ्यात खोली थरथरू लागली आणि भिंतींवरचे फोटो जिवंत झाले. त्यातल्या प्रत्येक चेहऱ्याने ओरडायला सुरुवात केली.

“तूच कारण आहेस! तूच!” ते वाक्य ऐकून सियाने कानावर हात ठेवला आणि ओरडली.

“थांबा! मी काही केलं नाही!” सिया ओरडली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो आवाज वाढत गेला.
त्यात एक आवाज स्पष्ट ऐकू आला तो म्हणजे तिच्या आईचा.
“सिया… तू त्या रात्री आरशाकडे पाहिलंस… आणि काहीतरी बाहेर आलं…” तिची आई म्हणाली. ते ऐकून सिया घाबरली.

“आई? हे तू काय म्हणतेस?” सिया म्हणाली तसं तिच्या आईचा चेहरा धूसर होत गेला,

“हो... त्या दिवसापासून तू दोन भागात विभागली गेलीस.
एक जगलीस तू… दुसरी इथेच अडकली आहे.” तिची आई म्हणाली. तसं लहान सिया पुढे आली.
“म्हणूनच मी इथे आहे मी तुझी सावली आहे.” लहान सिया म्हणाली. ते ऐकून सिया श्वास रोखून बघू लागली.

“मग आता मला काय करावं लागेल?” सिया म्हणाली.

“मला स्वीकार." लहान सिया म्हणाली.

"म्हणजे?" सिया.

"म्हणजे, तू मला नाकारत जोपर्यंत राहशील, तोपर्यंत तू मुक्त होणार नाहीस.” लहान सिया म्हणाली त्या क्षणी दोघींचे डोळे एकमेकांत भिडले.
सियाला जाणवलं तिच्या आतूनच एक तेज बाहेर पडत आहे.
आरशाच्या आतला अंधार प्रकाशात विरघळत होता.

एका क्षणात आरसा चमकला आणि दुसऱ्या क्षणात सियाचं शरीर हवेत तरंगलं. तेव्हा ती जोराने किंचाळली "

"माया!" इकडे ती किंचाळली तसं दुसऱ्या बाजूला, खऱ्या जगात, माया तिच्या स्वप्नातून दचकून उठली.
तिच्या आरशात… सियाचा चेहरा दिसत होता.
तो म्हणाला. “मी परत येते आहे…”

आता सिया आरशातून बाहेर येणार आहे…
पण तिच्यासोबत कोण येतंय, हे तिलाही माहीत नाही.