आयत्या पिठावर रेघोट्या भाग एक

काही लोकांना इतरांना नाव ठेवायची खोडच असते

आयत्या पिठावर रेघोट्या भाग एक


“सुनबाई झाली का ग पूजेची सगळी तयारी?” सासुबाई सुन गौरीला विचारत होत्या. आज शनि प्रदोष त्यामुळे त्यांना महादेवाला अभिषेक करायचा होता. स्वच्छ धुतलेली पांढरी साडी घालून, त्या घाईघाईने देवघरात आल्या. देवघरात पूजेचे सर्व साहित्य व्यवस्थित मांडलेलं पाहून त्यांना समाधान वाटेल असं सुनेला कुठेतरी मनात वाटत होतं, पण नेहमीप्रमाणेच सासुबाईंचा वैतागलेला आवाज परत सुनेच्या कानावर आला.

“अगं चंदन उगाळायची सहान कुठे आहे?” सासूबाईंच्या चिडचिडीचा श्री गणेशा झाला अभिषेक करण्यासाठी पंचामृत, आचमनाची पळी, देवाचं ताम्हण, तांब्याच्या गडव्यात पाणी, पांढरी फुलं, नंदादीपा करिता तेलवात आणि आरती करता निरांजनात फुलवात घातलीस का? निरांजनात नुसती फुलवात घालू नको तर साजूक तूप घाल, पाच कुंकवाची बोट लाव त्याला. सुपारीच्या गणपती करिता विड्याची पान आणि सुपारी कुठे आहे? शिवाय एकवीस दूर्वा, लाल फुलं, खडीसाखर, महादेवाला वाहण्यासाठी एकशे आठ बेल, पांढरी फुलं सगळं व्यवस्थित ठेवलं आहेस ना? सासुबाई सुनेची उलट तपासणी घेत होत्या.

“हो आई पूजेची सगळी तयारी करून ठेवली आहे. तुम्ही एकदा बघून घ्या काही कमी जास्त असेल तर मला आवाज द्या. उद्या पीहुची तोंडी परीक्षा आहे, त्यामुळे मी आता पटकन स्वयंपाकावरून, तिचा अभ्यास घेणार आहे.” सुनेने सासूला शांतपणे सांगितले. पण तेवढ्यानेच सासूचा पारा चढला.

“हो यांना बरी कारण मिळतात, इकडे तिकडे तोंड लपवायला. पायवाटा तर इतक्या शोधून ठेवल्या आहेत की एखाद्या संगणकाला नाहीतर रोबोटला पण सुचणार नाहीत. गेली तीस वर्ष मी शनि प्रदोषाची पूजा करते आहे. आता होत नाही माझ्याच्याने, आणि सुनबाईंना जबाबदारी घ्यायची नाही म्हणून काय घराण्याची परंपरा मोडू?” सासुबाई ची चिडचिड सुरू झाली होती.

खरंतर शनी प्रदोषाची पूजा ही त्यांची स्वतःची होती. लग्नाला पाच वर्ष झाली तरीही त्यांची कुस उजवली नव्हती, म्हणून कोणीतरी सांगितलं की शनी प्रदोषाचं पूजा आणि उपवास केल्याने महादेव प्रसन्न होऊन स्त्रीला मातृत्व प्राप्त होतं. तेव्हापासून सासूबाई एकही शनी प्रदोष चुकवीत नव्हत्या.

महादेवाची कृपा म्हणा किंवा त्यांच्या मनातला भक्ती भाव किंवा आणखीन काही पण शनी प्रदोषाचे व्रत सुरू करून झाल्यावर अवघ्या सहा महिन्यात सासूबाईंना दिवस गेले, आणि रुद्रचा जन्म झाला.

सुरुवातीला केवळ स्नान करून तिन्ही सांजेला महादेवाला अभिषेक करून, श्वेत सुमन वाहून त्या शनि प्रदोषाचे व्रत करत होत्या. रुद्र पाठोपाठ वरदचा जन्म झाल्याने त्या संसारात, मुला बाळांचे करण्यात आणखीनच गुंतल्या. पण शनी प्रदोषाचे व्रत मात्र नित्यनेमाने सुरू होते. हळूहळू मुलं मोठी झाली. कर्तुत्ववान निघाली आणि सासूबाईंच्या घरी सून गौरी आली.

सासूबाईंच्या मनातला भाव म्हणा किंवा महादेवाची कृपा. रुद्रचा संसार बहरला आणि पिहूचा जन्म झाला. इतकी वर्ष त्या स्वतः शनी प्रदोषाची संपूर्ण तयारी करायच्या, पण आता त्यांचंही वय झालं होतं. धाकटा वरद परगावी नोकरी करत होता, तर रुद्र त्याच्या नोकरीत बढती मिळवून, वरच्या हुद्द्यावर गेला होता. सहाजिकच घरची संपूर्ण जबाबदारी आता गौरीवर आली होती.

गौरी ही सगळ्यांचं अगदी मनापासून करत होती पण एवढं असूनही सासूबाईंच्या मनात काहीतरी खटकत होतं. त्यांना ते समजत नव्हतं आणि गौरीला उमजत नव्हतं.

पिहू पण आता शाळेत जायला लागली होती. त्यामुळे गौरीला थोडा जास्त वेळ पिहूला द्यावा लागे. पण त्यामुळे सासूबाईंची चिडचिड मात्र दिवसेंदिवस वाढतच होती.

“बालवाडीतली पोरं ती? किती म्हणून त्या येवढूश्या जीवाकडून अभ्यास करून घ्यावा? खाण्याचे तरी किती लाड? सगळ्यांसाठी जे केलं ते वरण-भात भाजी पोळीचं जेवण दिल तर चालणार नाही आमच्या सुनबाईंना! आम्ही काय मुलं मोठी केली नाहीत का? पण यांचं सगळं वेगळंच! स्वतः देवाचं काही करत नाही. मी करते तर मला जरा सुद्धा मदतीला कोणी येत नाही.

देवघरात नंदादीप उजळताना सासूबाईंची चिडचिड सुरू होती.

©® राखी भावसार भांडेकर नागपूर.

सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कुणाशी कसलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून, लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 

🎭 Series Post

View all