Login

आयुष्याचा जोडीदार भाग २

Life Partner
आयुष्याचा जोडीदार भाग २


राधाचे त्याच्याकडे अगदी सहज लक्ष गेले. तो जेमतेम तीस एक वर्षाचा रुबाबदार तरुण होता. त्याचे व्यक्तिमत्व आकर्षित करणारे होते. तब्येत फार नसली तरी उंची साजेशी होती. ब्लु जीन्स वर त्याने व्हाईट टीशर्ट घातला होता. आजच्या मुलांच्या फॅशनसारखी दाढी मात्र त्याने वाढवली होती. पण ती त्याला चांगली दिसत होती.


दाढी पाहून काही क्षण तिला राम असल्यासारखा भास झाला तिने पुन्हा एकदा त्याच्याकडे निरखून पाहिलं, राधाला त्यांचा चेहरा एकदम राम सारखा वाटला.असे वाटले की, तो रामचं आहे. राधाचा प्रिय राम. रामला दाढी ठेवायला खूप आवडत असे पण तिला दाढी आवडत नसे म्हणून तो दाढी ठेवत नसे.

त्यावरून त्यांच्यात कितीतरी वेळा वादही झाले होते. रामला जाऊन आता पाच वर्षे होऊन गेली होती पण त्याच्या आठवणी मात्र अजून राधाच्या मनात तशाच जिवंत होत्या. लिफ्टचा दरवाजा उघडला तशी ती भानावर आली आणि पटापट ऑफिसच्या दिशेने गेली.


ऑफिसमध्ये पोहचल्यावर तिने सर्वात आधी किरण आला की नाही याची चौकशी केली. तो अजून आलेला नाही पाहून तिने त्याच्या बसण्याची जागा बाकी सगळी सोय व्यवस्थित आहे का ते पाहीले नंतर ती तिच्या केबिनकडे निघाली जाताना तो मगाचचा पार्किंगमधला मुलगा विझिटर्स लॉबीमध्ये दिसला.

" हा इथे काय करतो" मनात विचार करत राधा त्याच्याकडे बघत असताना त्या मुलाचे देखील राधाकडे लक्ष गेले.त्याने अगदी सहज हात हलवत तिला हॅलो केले. राधाने सरळ तिला केबिन मध्ये येण्याचा इशारा केला आणि ती आपल्या केबिनमध्ये निघून गेली.

तो मुलगा तिच्या मागोमाग केबिनमध्ये आला आणि “हॅलो मॅम” म्हणाला.

राधा म्हणाली "हे बघा मिस्टर, तुम्हाला इथे माझ्या सोबत गप्पा मारायला बोलावले नाही. तुम्ही इथे नक्की का आले आहात ते सांगा. मी तुमच्या गाडीचे काही एक नुकसान केलेलं नाही, त्यामुळे उगीच तुम्ही माझ्या मागेमागे करू नका‌. आणि कोणतंही तत्सम कारण सांगून माझ्याकडून पैसे उकळणार असाल तर ते शक्य नाही. त्यामुळे प्लीज माझा पाठलाग करू नका‌, त्याचा काही एक उपयोग होणार नाही." राधा कठोरपणे बोलत होती त्याच्याशी.

त्याने तिच्याकडे मिश्कीलपणे बघत विचारले
"तुम्ही राधा पुराणिक ना?"

“हाय मी किरण परदेशी.” त्याने मिश्किलपणे तिच्याकडे बघत हात मिळवण्यासाठी हात पुढे केला.

राधा बोलली “ हो का”.

“अं .. वेलकम मि.किरण परदेशी किरण सर”


त्याचे नाव ऐकून राधाला कसं रिॲक्ट व्हावे तेच कळत नव्हते. कारण तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून चक्क परदेशी सरांचा मुलगा होता हे कळल्यावर तिला जबरदस्त धक्का बसला. घाबरतच तिने थंड पडलेला स्वतःचा हात त्याच्या हाती दिला.

“सॉरी पण हि अशाप्रकारे आपली भेट होईल ह्याची कल्पना नव्हती”.

असे म्हणत तिने जीभ चावली आणि स्वतःशीच पुटपुटली “अजून तंद्रीत रहा तू राधा!”ती खूप गांगरली होती.

तिची ती गडबड बघून त्याला हसू आले.

“इट्स ओके”, असे म्हणत तो चेअरवर बसला. खरेतर त्याला तिच्यापेक्षा जास्त दडपण आले होते जेव्हा डॅड त्याला म्हणाले होते.

“राधासारखी अनुभवी आणि स्पष्ट, वेळ पडल्यास परखड मत मांडणारी व्यक्ती तुला शोधून सापडणार नाही म्हणून तीच! जबाबदार व्यक्ती कसे बनावे हे कळेल तुला तिच्याबरोबर राहून!” तसा तो वयाने तिच्याच वयाचा होता आणि हुशार असला तरी अजून बरेच काही शिकणे बाकी होते.

त्यामुळे तो थोडा टेन्शन मध्ये होताच त्यात ह्या या अशा व्यक्तीसोबत काम करणे त्याला जरा कठीण वाटत होते. आजच्या अनुभवावरून तर राधा त्याला तिरसट वाटली. भानावर येत तो म्हणाला, “डॅडना आवडले नाही मी इथे इंटर्नशिप म्हणून येण्याची कल्पना पण मी ऐकले नाही. मी पण त्यांचाच मुलगा आहे बत्तीशी दाखवत तो म्हणाला.”

राधा शांतपणे ऐकत होती, आवडले तर तिलाही नव्हती, कारण अशाने ती नाही पण बाकी एम्प्लॉईजनी किरणला गृहीत धरण्याची शक्यता जास्त होती. पण ती काहीच बोलली नाही. मात्र तिने त्याचे मनापासून स्वागत केले त्यात कसलीही कसूर ठेवली नाही.

त्याची बसण्याची सोय आणि बाकी सर्व स्टाफची भेट इथपासून ते त्याची चहा, कॉफी, नाश्ता इ. सोय आणि त्याला काय हवे नको या सगळ्यावर राधाचे लक्ष होते. किरणला तिची धावपळ जाम गंमतशीर वाटत होती. डॅडनी म्हंटल्याप्रमाणे ती खरेच जबाबदार वाटत होती. किरण सगळ्यांना भेटून त्याच्या जागेवर बसला आणि कंपनीचे काही पेपर्स मीराने त्याला वाचण्यासाठी आणून दिले.

“किरण सर तुम्हाला अजून काही हवे असेल तर मला सांगा, इट विल बी माय प्लेजर सर!” असे म्हणून ती तिथेच उभी राहिली.

“नो थॅन्क्स !” आता मी हे वाचून घेतो, मग पुढचे बोलून घेऊ." असे म्हणून तो पेपर्स चाळू लागला, तरी राधा तिथेच उभी होती.