नमस्कार, लेखक तसेच वाचकमंडळी.
मी सौ. नेहा उमेश उजाळे. १७ मे १९६९ ह्या दिवशी मी ह्या जगात आले. अर्धे आयुष्य तर पार पडले. आज आत्मचरित्र लिहण्याच्या निमित्ताने आयुष्यात मागे वळून पाहताना आपल्या आयुष्याची बेरीज, वजाबाकी सगळं पडताळून पाहिलं. काय गमावलं पेक्षा मी काय कमवलं याचा आढावा घेतला.
आत्मचरित्र लिहायला मी खूप मोठी व्यक्ती नाही पण स्पर्धेच्या निमित्ताने मी मला स्वतःला तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते आहे.
माझी आई नोकरी करत असल्याने मी लहानपणापासून आजोळी वाढले. आजी आजोबा, दोन मामा - मामी, मामेभावंडे यांच्या सहवासात माझे बालपण गेले. आजोळी माझे सगळ्यांकडून प्रचंड लाड होत असत. विशेषतः मी आजीची खूप लाडकी होते. माझ्या मोठया मामीने मला आईसारखे सांभाळले त्यामुळे मी तिला आई म्हणते आणि माझ्या जन्मदात्रीला मम्मी.
सगळ्या भावंडांमध्ये मीच मोठी म्हणजे पाच मामेभावंडे आणि दोन सख्खी भावंडे. त्यामुळे साहजिकचं मोठे असल्याने लहानांना समजावून घेण्याचे गुण माझ्यामध्ये प्रकर्षाने आले.
आमच्यावेळी आता मुलांना हवे असते तसे जंकफूड नसायचे. बिस्कीट वगैरे केव्हातरी मिळायचे. अगदी रोजचे घरगुती पदार्थचं नाश्ता आणि जेवणासाठी मिळायचे. मी लहानपणापासूनच अतिशय शांत. ( आता भडकते बरं का ) हट्टी देखील नव्हते. कधी कुठली गोष्ट हट्टाने मागून घेतल्याचे आठवत नाही.
मी पाचवीत असल्यापासून कविता वगैरे लिहू लागले होते पण त्यासाठी घरी, शाळेत कधीच प्रोत्साहन मिळाले नाही. शाळेत असताना निबंध लिहायला खूप आवडत असे. खूप छान कल्पनाशक्ती वापरून मी सुंदर निबंध लिहायचे.
आमच्यावेळी शाळेत असताना मुले - मुली एकमेकांशी बोलत नसू. कोणीही कोणाशी बोललं तर ह्यांचं काहीतरी लफडं आहे अशी वेड्यासारखी मानसिकता होती त्यावेळी. आता खूपचं वेडेपणा वाटतो त्या गोष्टीचा. आम्ही शाळेत असताना मुले वर्गात मस्ती करायची म्हणून दोन मुलांमध्ये एका मुलीला बसवण्याची शिक्षा केली जायची. माझ्या बाजूला कामत आणि रणदिवे हे दोघे बसायचे. कामत खूप मला रडवायचा, मला खूप चिडवायचा. मला त्रास देतो म्हणून रणदिवे त्याला ओरडायचा. मुलांची मस्ती काही केल्या थांबली नाही मग शेवटी शिक्षकांनी मुलांना मुलींमध्ये बसवणे सोडून दिले आणि मी त्या कामतशी बोलणे. आता आठवलं तरी हसायला येतं.
शालेयजीवन संपले आता आम्ही कॉलेजमध्ये जाऊ लागलो. आमच्यावेळी मोबाईल तसेच लँडलाईन फोन नसल्याने आता शाळेच्या मित्रमैत्रिणींशी संपर्क तुटला होता. आमच्याकडे स्मार्टफोन आल्यावर जवळपास बत्तीस वर्षांनी शाळेतल्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप तयार झाला तेव्हा आम्ही एकमेकांना इतक्या वर्षांनी भेटलो.
कॉलेजमध्ये असताना मी मराठी साहित्य घेतले. आता कॉलेजमध्ये मुले - मुली आम्ही खूप मनमोकळेपणाने एकमेकांशी बोलत असू. बारावी झाल्यावर एफ.वाय. बी.ए. ला प्रवेश घेतला. एक मुलगा दुसऱ्या कॉलेजमधून नवीनच प्रवेश घेऊन आमच्या कॉलेजमध्ये आला होता. नुकताच कॉलेजच्या ग्राऊंडवर क्रिकेट खेळून आला होता. क्रिकेटचे व्हाईट कपडे, हातात बॅट आणि त्याचे कपडे मातीमुळे लाल लाल झाले होते. एका मित्राने त्याची माझ्याशी ओळख करून दिली आणि त्याने मला पाहून एक छानशी गोड स्माईल दिली. बस्स ! त्याच्या स्माईलवर मी इतकी फिदा झाले काही विचारायची सोय नाही. एकतर्फी त्याच्यावर प्रेम करू लागले. मैत्रिणी बोलल्या तुझ्या मनातलं त्याला स्पष्टचं सांग ना कशासाठी इतकी झुरते आहेस ?
त्याला डायरेक्ट जाऊन बोलायची हिम्मत तर नव्हती मग एका मित्राला माझ्या भावना त्याच्यापर्यंत पोहचवायला सांगितल्या. दोन चार दिवस उलटले मग मी माझ्या मित्राला विचारले की तू त्याच्याशी बोलला आहेस का ? काय बोलला तो ? तेव्हा मित्र म्हणाला की, " थांब मी अजून नाही बोललो आहे त्याच्याशी."
आठ दिवस वाट पाहिली त्याच्या उत्तराची पण माझा मित्र काही बोलायला तयार नव्हता. पुन्हा शेवटी मी मित्राला विचारले की, " त्याने नकार दिला आहे का ?" तर मित्र बोलला की, " अगदीच नकार असा नाही पण तो म्हणतो आहे की, मी जेव्हा स्वतःच्या पायावर उभा राहीन तेव्हा प्रेमाबिमाचा विचार करेन. आईवडिलांच्या जीवावर मला कुठली मुलगी फिरवायची नाही आणि जिच्यावर प्रेम करेन तिच्याशीच लग्न करायचे आहे त्यामुळे सध्या तरी मी कुठलाच विचार करणार नाही." त्याच्या उत्तराने मला त्याच्याविषयी अजून आदर निर्माण झाला. म्हटलं बघूया त्याची वाट. तो सकाळी सहा वाजता कॉलेजच्या ग्राऊंडवर क्रिकेट खेळायचा नंतर कामासाठी एका ऑफिसमध्ये जायचा त्यामुळे वर्गात केव्हातरी दिसायचा. मी त्याचे नाव धूमकेतू ठेवले होते तो केव्हातरी दर्शन द्यायचा म्हणून.
एके दिवशी खूप खुशीत येऊन त्याने मला सांगितले की त्याला रेल्वेमध्ये पर्मनंट नोकरी लागली आहे आणि त्याच दिवशी तो माझ्यावर प्रेम करतो अशी कबुली देखील दिली. म्हणजे उमेशला चांगली नोकरी मिळाली होती आणि छोकरी तर त्याची वाट पाहतचं होती. उमेशचे आणि माझे प्रेम दिवसेंदिवस फुलू लागले होते. आता आम्हाला लग्न करायचे होते. माझ्या घरी विरोध होता पण त्याच्या घरी कुठलाच विरोध नव्हता. शेवटी माझ्या घरातील विरोध मावळून आमचे लग्न झाले. मी उमेशला स्वतःहून अहो जाहो करू लागले. आमच्या लग्नानंतर माझे पप्पा ह्यांच्याशी बोलत नसत पण ह्यांनी प्रेमाने सासऱ्यांना जिंकले. पप्पांचे नंतर ह्यांच्याशिवाय पान देखील हलत नसे.
सासरी एकत्र कुटुंब. त्यात कामाची सवय अजिबातचं नव्हती. कसेतरी निभावून नेले. तीन नणंदा, एक दिर, आल्या - गेल्यांचे अगत्याने केले. सासूसासरे, चुलतसासरे स्वभावाने खूप चांगले त्यांनी मला समजावून घेतले त्यामुळे सासर सोडून कधी माहेरी जावेसे वाटले नाही. मी माहेरी पूर्णतः शाकाहारी होते पण सासरी आल्यावर मी नॉनव्हेज बनवायला आणि खायला शिकले.
ह्यांचे काका आयुष्यभर आमच्यात राहिले त्यांनी लग्न केले नव्हते. काकांची मी आवडती सून होते. मी देखील त्यांना माझ्या वडिलांच्या जागी मानत असे.
मी मधेमधे केव्हातरी कविता करायचे. संसाराच्या गराड्यात माझे लिखाण थांबलेलेच होते. माझ्या तिन्ही नणंदा मला बोलायच्या की, \" तू तुझे कौशल्य वाया घालवू नकोस. काहीतरी लिहीत राहा.\" मी संसार एके संसार करत बसले पण २०१९ पासून लिखाणाला एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि मग माझी लिखाणाची गाडी सुसाट सुटली. कथा, लघुकथा, दीर्घकथा, चारोळी, कविता, लेख अशा अनेक गोष्टींचे लिखाण माझ्या हातून घडू लागले. पुढे एका मैत्रिणीमुळे ईरा ऍप समजले आणि तिथे स्पर्धेत भाग घेऊ लागले. पहिलंवहिलं सर्टिफिकेट आणि ट्रॉफी मला ईराच्या माध्यमातून मिळाली तेव्हा माझ्या लिखाणाचे मला चीज झाल्यासारखे वाटले.
एकत्र कुटुंबात नाही म्हटलं तरी बऱ्याच प्रमाणात ऍडजस्टमेंट केली. हे वेळोवेळी माझ्या पाठी खंबीरपणे उभे असायचे. ह्यांची मते आणि विचार अतिशय पुढारलेले असल्याने साहजिकच माझ्यात देखील मतपरिवर्तन झाले. ह्यांचे एकचं तत्व ते म्हणजे माणुसकी जपणे. जातपात - धर्म हे मानत नाहीत.
आम्हाला एकचं मूल ठेवायचे असल्याने आम्ही एकचं मुलगी ठेवली. तिच्यावर तू मुलगी आहेस म्हणून तू असे वागले पाहिजे तसे वागले पाहिजे अशा वाक्यांचा भडिमार न करता तिला सक्षम बनवले. कुठल्याही प्रसंगांना तोंड देण्यासाठी तिला खंबीर बनवले.
घरच्यांसाठी, लोकांसाठी आम्ही उभयंता खूप झटलो. जीवापाड प्रेम केले पण आमची कोणी कदर केली नाही. अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि अजूनही पाडतोच आहोत. खूप वाईट अनुभव आले आहेत जवळच्या माणसांचे. मला अशा माणसांच्या वृत्तीचा राग येतो पण हे कायम म्हणतात, \" नेकीं कर और दर्या में डाल.\"
एक आहे की मला माझ्या पतीची साथ खूप चांगली लाभली आहे. माझ्या लेकीने उच्चशिक्षण घेऊन आज ती मोठ्या पदावर जॉब करते आहे. मी माझ्या आयुष्यात अत्यंत समाधानी आहे. अजून काय पाहिजे असते ना आपल्याला आपल्या आयुष्यात ?
सौ. नेहा उजाळे
ठाणे
ठाणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा