Login

अबोल प्रीत

Love story after marriage

अबोल प्रीत....

अवंती आणि अदिती दोघी सख्या जुळ्या बहिणी. लहानपणापासून दोघी एकत्र खेळल्या शिकल्या एकमेकींसोबत तेवीस वर्ष एकत्र होत्या. नुकताच अदिती आणि सौरभ यांचा प्रेम विवाह मोठ्या थाटात पार पडला. अवंतीसाठी देखील वर संशोधन सुरू होते. अनेक चांगली स्थळं तिला सांगून आली, पण अदितीच्या लग्नानंतर, अवांतीच्या मनात सौरभ सारखा जोडीदार हवा अशी जोडीदाराविषयी प्रतिमा नकळत तयार झाली होती. तिने अदिती आणि सौरभ यांचं नातं गेलं एक वर्ष फुलताना,  बहरताना जवळून पाहिलं होतं. तिच्या मनात जोडीदाराविषयी अपेक्षा वाढल्या होत्या.

सौरभ आणि अदिती दोघांचा बडबडा स्वभाव. लग्नाआधी फोनवर दोघे एकमेकांशी तासंतास गप्पा मारत. सौरभ कधी शेरो शायरी करत तर कधी एखाद रोमँटिक गाणं अदितीसाठी गुणगुणत. आपल्याला पण असाच खूप प्रेम करणारा जोडीदार हवा असेच अवंतीला वाटू लागले.

अवंतीसाठी अमोलचे स्थळ सांगून आले. सगळच चांगलं होतं, आई वडील अदिती यांना अमोल पसंत पडला. पण मुख्य होकार तर अवंतीचा होता, जो अजुनही मिळाला नव्हता. खरं तर अमोलला नकरा द्यावा असं काही कारण अवंतीकडे नव्हते. पण एक दोन भेटीमध्ये अमोलचा स्वभाव, गुण दोष, सवयी सगळं जाणून न घेता लग्नाला कसा होकार द्यायचा? हा अवंतीपुढे मोठा प्रश्न होता. तिच्या समोर अदिती सौरभच्या नात्याचे जिवंत उदाहरण होते, तिला देखील तसचं काहीसं चित्र स्वतःसाठी हवं होत. अखेर तिने अमोलशी लग्न करण्यास होकार दिला!


लग्नाची धूमधाम आटोपली तशी घरातली पाहुणे मंडळी स्वघरी परतली. नवं वधू वर हनीमून वरून आले. अवंती खुश दिसत होती पण तिचा थोडा हिरमोड झाला होता. तिला वाटे अमोलने तिच्यासाठी हनिमूनला छान रोमँटिक गाणं म्हणावं, तिच्या सौंदर्याचे कौतुक करणारा मस्त एखादा शेर तिला ऐकवावा. पण असं काहीच झालं नाही. अमोल काही मितभाषी नव्हता पण एकदम प्रेम असं गोड गुलाबी शब्दात व्यक्त करणाऱ्यापैकी देखील नव्हता. 

अमोलचे आई वडील दोघे महिन्याभराने गावाकडील घरी गेले. अवंती अमोल दोघांचा नवीन संसार शहरातील घरात सुरू झाला. दोघे राजा राणी आपल्या अशियानात नवा संसार, नवी स्वप्न रंगवत होते. दिवसभर दोघे नोकरीसाठी घराबाहेर असल्याने एकंदर एकेमकांसाठी वेळ फक्त संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी. ऑफिसवरून घरी परतल्यावर घर काम, स्वयंपाक, आवरा आवरी करण्यात अवंतीची दमछाक होत. तिची धावपळ पाहून अमोल स्वतःहून तिला घरातील छोट्या मोठ्या कामामध्ये मदत करत असे. जेणेकरून तिचं काम लवकर आटपून दोघे काही क्षण निवांत एकत्र घालवतील.

आज अवंती आणि अमोल यांच्या लग्नाला सहा महिने झाले. सहा महिन्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संध्याकाळी अवांतीने खास बेत आखला, दोघांसाठी घरातच सुंदर जेवणाच टेबल सजवल. बेडरूममध्ये सुगंधित फूल धूप पणत्या लावल्या. अवंतीला नेहमी वाटे कधीतरी अमोल तिला एखादा अचानक सुखद धक्का देईल, कधी काही सरप्राईज प्लान करेल, थोड फिल्मी होऊन छान रोमांटिक डायलॉग मारेल. आज नक्कीच तो यातलं काहीतरी करेल अशी तिची वेडी अपेक्षा.

संध्याकाळी ऑफिसमधून घरी येताना अमोलने अवंतीसाठी सुंदर लाल पैठणी आणली सोबत मोग-याचा गजरा देखील होता. घरी येताच अवंतीला शुभेच्छा देत त्याने ते गिफ्ट अवंतीच्या हातात प्रेमाने दिलं.

अवंती: "हे काय? असं गिफ्ट लगेच हातात देतात का? मला वाटलं काहीतरी छान शब्दात व्यक्त होशील, गाणं म्हणत रोमँटिक मूडमध्ये देशील तू मला हे गिफ्ट! श्या... किती अरसिक आहेस तू! मला नको हे गिफ्ट, राहुदे" असं म्हणत तिने ते न उघडताच बॉक्स बाजूला सारला. त्यावरील मोगऱ्याचा गजरा तिथे तसाच टेबलवर रात्रभर आपला मंद मोहक सुगंध देत सुकू लागला!

अवंतीने फटकळपणे दिलेल्या प्रतिक्रियेने अमोलचे मन दुखावले गेले. त्याने दर्शवले नाही पण त्याला तिच्या बोलण्याचे वाईट वाटले. फार ताणून न धरता त्याने विषय सोडून दिला. जेवणाचा आस्वाद घेत दोघांनी उर्वरित संध्याकाळ साजरी केली. अवंतीने केलेल्या जेवणाला मनापासून दाद देत अमोल जेवला. अवंतीने गिफ्ट नाकारले याची सल अजुनही अमोलच्या मनात होतीच. त्याने तसाच तो साडीचा बॉक्स अवंतीच्या कपाटात ठेवून दिला.

काही दिवसांनी अदिती दोन चार दिवसांकरिता अवंतीकडे रहायला आली. सौरभ कामानिम्मित चार दिवस शहराबाहेर गेला असताना तिला काही दिवस आपल्या बहिणीजवळ रहाता येणार होतं. एक दोन दिवस अमोल अवंतीचा सुखी संसार पाहून अदितीला खूप आनंद झाला.

अदिती : "अवंती, खरंच कित्ती नशीबवान आहेस तू, अमोलसारखा प्रेमळ नवरा तुला मिळाला!"

अवंती : "प्रेमळ?? तुला काय माहित ग अदिती? अमोल काही सौरभसारखा नाही ग...."

अदिती: "अगदी बरोबर, अमोल काही सौरभसारखा नाही. खूप चांगला आहे अमोल, तुझी किती घरात मदत करत असतो आणि तेही तू न सांगता तो स्वतःहून करतो. सौरभला तर सांगून सांगून मी दमते. अर्ध्या अधिक वेळा आमची भांडणं घरातील कमांवरून होतात. सौरभ जरादेखील स्वतःहून घर कामाला हातभार लावत नाही. वैताग येतो मला कधी कधी. मला एकटीला सगळं करावं लागतं. इतकी चीड चीड होतें, काय सांगू"

अदितीच हे बोलणं ऐकून अवंती विचारात पडली, खरंच का प्रेम हे व्यक्त करूनच रोमँटिक गाणी, डायलॉग बोलून समोरच्या पर्यंत पोहोचतं? एक अबोल प्रीत आपल्या जोडीदाराविषयी असते जी त्याच्या कृतीतून दिसत असते, जाणवत असते, अमोल कित्येक वेळेला न सांगताच घरातली छोटी-मोठी कामं करून अवंतीला मदत करतो ते केवळ अवंतीवरील प्रेमापोटी. काही वेळेला शब्दांपेक्षा कृती प्रेम व्यक्त करते!

अदिती चार दिवसांचा पाहुणचार घेऊन आपल्या घरी परतली. त्या संध्याकाळी अमोल ऑफिसमधून येण्याआधी अवांतीने घर सुंदर सजवले आणि अमोलच्या आवडीचा खास जेवणाचा बेतही केला. अमोलने ऑफिसमधून घरी परतल्यावर पाहिले अवंतीने त्याने भेट म्हणून आणलेली लाल पैठणी नेसली होती, आणि त्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती. अवंतीने अमोलला मिठी मारली आणि तिच्या हातातला मोगर्‍याचा गजरा त्याच्या हातात देत अमोलकडून गजरा केसात मळून घेतला.....

अमोलची अबोल प्रीत अवंतीला उमगली.

अमोलने धाडस करत, एक गुलाबी कागद अवंतीला दिला.... हे तुझ्यासाठी.... त्यावर अमोलने चार ओळी खास अवंतीसाठी लिहिण्याचा प्रयत्न केला होता....

प्रिय अवंती....

तुझा स्पर्श,
जणू स्वर्ग हर्ष
सांगून जातो नवीन अर्थ
माझे आयुष्य तुजविण व्यर्थ
तुझ्या स्पर्शातला जिव्हाळा
करितो माझा रोम रोम उतावळा
शब्दांत कशी करू व्यक्त?
माझी अबोल प्रीत....

फक्तं तुझाच
अमोल❤️

समाप्त

@तेजल मनिष ताम्हणे


 
 

0