अचानक (भाग १)
जलदकथा लेखन स्पर्धा- ऑक्टोबर
विषय - अकस्मात
“काय रे? चेहरा का पडलाय? काय झालं?” सोहमने घरात पाऊल ठेवताच त्याच्या आईने, सुधाताईने त्याला विचारले. एक शब्दही न बोलता सोहम घरात आला.
त्याच्या हातात असलेली ऑफिसची बॅग गळून पडली होती. पायातले बुटही न काढताच तसाच तो सोफ्यावर जाऊन बसला. सुधाताईंचा आवाज ऐकून प्रभाकररावही बाहेर आले.
जलदकथा लेखन स्पर्धा- ऑक्टोबर
विषय - अकस्मात
“काय रे? चेहरा का पडलाय? काय झालं?” सोहमने घरात पाऊल ठेवताच त्याच्या आईने, सुधाताईने त्याला विचारले. एक शब्दही न बोलता सोहम घरात आला.
त्याच्या हातात असलेली ऑफिसची बॅग गळून पडली होती. पायातले बुटही न काढताच तसाच तो सोफ्यावर जाऊन बसला. सुधाताईंचा आवाज ऐकून प्रभाकररावही बाहेर आले.
“सोहम, ठीक आहेस ना?” प्रभाकरावांनी त्याला विचारले.
“बाबा… नोकरी गेली माझी.” सोहम म्हणाला आणि रडायला लागला.
“काय! अशी अचानक!” सुधाताईही मटकन सोफ्यावर बसल्या.
“कसं काय रे? काही मॅटर झालं का?” प्रभाकरराव त्याच्या जवळ बसले. त्यांच्याही हातापायाला कंप सुटला होता. सोहम मात्र काहीच बोलत नव्हता.
नुतकतेच नव्याने घेतलेले आलिशान घर, मोठी गाडी, ट्रेंडींग फोन्स यांचे हफ्ते फेर धरून जणू सगळ्यांच्या डोळ्यासमोर नाचत होते. म्हणायला प्रभाकरावांची पेन्शन होती पण ह्यातल्या एकाही गोष्टीचा हफ्ता भरण्याइतकी तिची किंमत नव्हती.
“सोहम, अरे बोल काहीतरी. अशी अचानक नोकरी कशी जाऊ शकते?” सुधाताई अगतिकपणे त्याला विचारत होत्या.
“आई, आम्ही आय.टी. वाले… तिथं अमेरिकेत कुणी साधं शिंकलंही ना, तर त्याचा परिणाम इकडं आमच्या नोकरीवर होतो. आता तर काय, तिकडेच हजारोच्या संख्येने नोकऱ्या गेल्यात तर आपल्याकडे जाणारच ना.” सोहम हतबलपणे म्हणाला.
“रीसेशन…” प्रभाकरावांच्या तोंडून निघून गेले.
“हो बाबा, हेच असतं रीसेशन.” सोहम डोक्याला हात लावून बसला होता.
“पण मग, दुसरी नोकरी मिळणार नाही का?” सुधाताई
“माहीत नाही आई.” सोहम
“माझी पेन्शन आहे; पण ह्या घराचे, गाडीचे हफ्ते कसे भरणार? सेविंग आहे का काही? तुला म्हटलं होतं मी की एफ.डी. वगैरे कर म्हणून. तू, करतो असं म्हणाला होतास तेव्हा.” प्रभाकररावांना आता पुढच्या चिंता त्रास देऊ लागल्या होत्या.
“नाही बाबा. मी सगळे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवत होतो… आणि तिथंही मला प्रचंड नुकसान झालं आहे. आई बाबा, माझं सगळंच मी गमावून बसलो आहे. माझ्याजवळ काहीच शिल्लक नाहीये.” सोहम निराशपणे म्हणाला.
“आता? आता काय करायचं मग?” सुधाताई
“काही नाही, हफ्ते भरले नाही तर बँकेची जप्ती येणार.” प्रभाकरराव क्षीण आवाजात म्हणाले.
“काय! जप्ती!” इतके दिवस मुलाच्या कमाईवर स्वतःची टेक मिरवणाऱ्या सुधाताईंना आता मात्र पुढे कसे होईल हा मोठा प्रश्न पडला होता.
“पुढच्या आठवड्यात भिशी आहे माझी, सगळे नवीन पडदे आणि नवीन क्रॉकरी घेणार होते मी. सगळ्या बायकांसाठी इतर बायकांनी दिले त्यापेक्षा चांगले गिफ्ट आणणार होते. आता कसं करणार? सगळ्यांना मी तसं सांगून ठेवलं होतं. किती तोंडघशी पडेल मी.” सुधाताई म्हणाल्या.
“अगं, त्या पोराच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि तुला तुझ्या भीशीचं पडलं आहे.” प्रभाकरराव चिडले होते. सोहमही त्याच्या खोलीत निघून गेला.
‘आता पुढे काय?’ हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.
क्रमशः
©® डॉ. किमया संतोष मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा