अचानक (भाग २)
“तुला दुसरी नोकरी लागणारच नाही का?” दुसऱ्यादिवशी सकाळीच सुधाताई सोहमला म्हणाल्या.
“बाबा, सांगा हो हिला. आहेत तेच लोकं नोकरीवरून काढून टाकणं सुरू आहे. त्यात मला कुठून दुसरी नोकरी लागणार? आणि मिळाली तरी आता लगेचच मिळेल का? पगारही आधीएवढा मिळेल की नाही माहीत नाही.” सोहम त्रागा करत होता.
“म्हणजे आपल्याला हे घर, गाडी सगळं विकावं लागेल?” सुधाताई
“हो, आपण हफ्ते भरले नाही तर बँकच त्याचा लिलाव करेल.” प्रभाकरराव
“यावर काहीच उपाय नाही का?” सुधाताई
“आधीच म्हटलं होतं एवढा अवाढव्य खर्च करू नका. पाच लाखाच्या कारमध्येही पाचच लोकं बसतात आणि ह्या पंचवीस लाखाच्या कारमध्येही पाचच लोकं बसतात. पण आपल्याला सगळं कसं चकचकीत हवं होतं. घरातलं प्रत्येक सामान, वस्तू घेतानाही तसंच.” प्रभाकरराव चिडले होते.
“हो मग, तुमच्या सोबत लग्न झाल्यापासून तुम्ही कोणत्या सुख सोयी दिल्या? माझा मुलगा कमाईला लागला तर लगेचच सुख सगळ्यांनाच खुपलं. अगदी घरात आलेल्या ह्याच्या बायकोलाही. तीही गेली भरलं घर सोडून, मोठी आली स्वाभिमानी.” सुधाताई म्हणाल्या.
“काय चुकलं तिचं, जे मी म्हणत आहे तेच ती म्हणत होती. तिला सद्बुद्धी तरी सुचली घर सोडून जायची. मी तर अडकून पडलोय ना. आता माझी सुटका फक्त एकदाच होणार.” प्रभाकरावही खूप चिडले होते.
“आई, बाबा… विषय कुठल्या कुठं जातोय. प्लिज आधीच प्रॉब्लेम काही कमी नाहीयेत. तुम्ही अजून विनाकारणचे वाढवू नका.” सोहम म्हणाला.
“मी तर म्हणते, तो गावाकडचा वाडा आहे ना आपला, तो विकून टाका आणि शेतीपण.” सुधाताई म्हणाल्या आणि सोहमचे डोळे चमकले.
“अगं तो वडिलोपार्जित वाडा आहे आपला. तो असा विकणार? आणि शेतीही विकायची!” प्रभाकरराव
“मग घेऊन बसा तो वाडाच आणि ती शेती. त्या वाड्याच्या मोहात हे पदरातलं सुख दूर करा. तसंही त्या शेतीतून काही उत्पन्न मिळत नाही.” सुधाताई
“बाबा, आई म्हणतेय तेही काही चूक नाही. तसंही आपण तिथं राहात नाहीत. काय करणार तो वाडा ठेवून. एवढ्या मोठ्या सोसायटीत फ्लॅट घेऊन आपण इकडे राहायला आलो. इतके दिवस ऐटीत जगलो. आता बँकेची जप्ती आली तर सगळीकडे शी-थू होईल ते वेगळंच. प्लिज बाबा, एवढं मोठं कर्ज आहे हो माझ्यावर. मी शेअर मार्केटमध्ये पैसेही अगदी कर्ज काढूनच लावले होते. तेही परत करायचे आहेत. वाडा विकला, शेती विकली तर बरी रक्कम मिळेल. दुसरी नोकरी लागेपर्यंत काही तरी रक्कम हाताशी राहील. काही हफ्ते भरल्या जातील. प्लिज.” सोहम हात जोडत म्हणाला.
प्रभाकरराव विचारात पडले. वडिलोपार्जित वाडा विकावा की नाही हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता.
क्रमशः
©® डॉ. किमया संतोष मुळावकर
©® डॉ. किमया संतोष मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा