अचानक (भाग ३)
“ठीक आहे. उद्याच गावाकडे जातो आणि वाड्याचं बघतो काय करायचं ते.” दुसऱ्यादिवशी प्रभाकरराव म्हणाले.
“मी पण येतो सोबत. एवढा मोठा व्यवहार तुम्ही एकटे कसे करणार ना.” सोहम
“मीच घरी राहून काय करू. मी पण येते. गाडी घेऊनच जाऊ. म्हणजे इम्प्रेशन पडेल.” सुधाताई
“अगं कुणावर इम्प्रेशन पाडायचं आहे तिथं जाऊन? तसंही गावातल्या कुणालातरी तो वाडा विकावा लागेल.” प्रभाकरराव
“तरी, गाडी बघून कुणीही चांगली किंमत तरी देईल ना.” सुधाताई
“बाबा, कागदपत्रं कुठं आहेत वाड्याची, आणि शेतीचा सातबारा वगैरे?” सोहम
“गावातल्या पतसंस्थेमध्ये.” प्रभाकरराव
“ती काय जागा आहे का ठेवायची?” सुधाताई
“सुधा, सोहमचं लग्न होईपर्यंत माझे आईवडील जीवंतच होते म्हटलं. आप्पांजवळ सगळे कागदपत्रं होते. ते दोघे गेले त्यानंतर आपण गेलो का गावाकडे? आप्पांनी मला सांगून ठेवलं होतं त्या कागदपत्रांबद्दल म्हणून मला माहीत झालं.” प्रभाकरराव
“बरं झालं त्यांनी तुम्हाला सांगून तरी ठेवलं आणि अजून एक बरं झालं की तुम्हाला कुणी भाऊ बहिण नाही.” सुधाताई
“ते म्हणतात ना सुंभ जळाला तरी पिळ जात नाही, तसंच आहे तुझं.” प्रभाकरराव म्हणाले. सुधाताईंनी तोंड वाकडे केले.
दुसऱ्यादिवशी सगळे गावाकडं जायला निघाले. साधारण चार वाजण्याच्या सुमारास सगळे गावाकडे पोहोचले. प्रभाकरावांनी सोहमला गाडी मंदिराकडे घ्यायला लावली.
“आत्ता मंदिर कशाला? पटकन कागदपत्रं घेतले असते ना.” सुधाताई
“गिऱ्हाईक खिशातच आहे ना आपल्या? कागदपत्रं घेतली की लगेचच खिशातून काढून वाडा विकायला.” प्रभाकराव चिडले.
“आई, तसंही चार वाजून गेलेत, मला वाटतं ते कागदपत्रं आपण उद्याच घेऊ.” सोहमने गाडी मंदिराकडे वळवली.
“काय प्रभाकरा, बऱ्याच दिवसांनी आलास?” मंदिरचे पुजारी
“हो, इतक्यात येणं जमलंच नाही. गुरुजी कुठं दिसत नाहीत.” प्रभाकरराव
“अरे आता कुठं होतं त्यांच्याने. शंभरी पार केली. तरी रोज मंदिरात येऊन सगळं करायची तयारी आहे त्यांची. पुजारी म्हणाले.
“ठीक आहे. घरीच जाऊन भेट घेतो त्यांची.” प्रभाकराव म्हणाले.
“जायलाच पाहिजे का तिथं?” सुधाताई नाक मुरडतच म्हणाल्या.
“हो, कारण ते मंदिराचे जुने पुजारी आहेत आणि सोबतच आप्पांचे जुने मित्र आणि नावाजलेले ज्योतिष्यी.”प्रभाकरराव म्हणाले आणि सगळे तिथं पोहोचले.
प्रभाकररावांनी वाडा आणि शेती विकण्याबद्दल गुरुजींना सांगितले.
“अरे का विकतोय वाडा?” गुरुजींनी विचारले आणि प्रभाकररावांनी घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या.
“सगळं असं अकस्मात झालंय की आता दुसरा काही पर्याय नाहीये.” प्रभाकरराव.
“अरे हे अकस्मात झालेलं नाहीये. तुमच्या वाड्याला एक शाप आहे किंवा असं म्हण की आशीर्वाद आहे.” गुरुजी म्हणाले.
“म्हणजे?” सोहम
क्रमशः
©® डॉ. किमया संतोष मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा