Login

अचानक (भाग ४)

काही गोष्टी अचानक घडतात
अचानक (भाग ४)


“म्हणजे की तुमच्या वाड्याला हा शाप आहे की जर या घरातली सून घर सोडून गेली तर सगळं डबघाईला लागेल. हा शाप म्हण की आशीर्वाद म्हण किंवा घर जोडलं गेलं पाहिजे म्हणून पूर्वजांनी घालून दिलेला नियम म्हण.” गुरुजी


“काहीही. दोन वर्ष झाले ह्या सोहमची बायको घर सोडून गेली. भरल्या घरात तिला भिकेचे डोहाळे लागले होते.” सुधाताई


“हो; पण तेव्हापासून ह्या चक्राला सुरुवात झाली.” गुरुजी


“हो, बरोबर. तेव्हापासून एकेक अडचणी होत्याच.” सोहम म्हणाला.


“म्हणूनच म्हणते हे शेती, वाडा सगळं विकून टाका. तो शापही नको की आशीर्वादही नको.” सुधाताई

“विकता येणार नाही.” गुरुजी म्हणाले.


“का बरं?” सोहम


“कारण तुमच्या पिढीजात ही सगळी संपत्ती सुनेच्या नावावर होत आली आहे.” गुरुजी


“म्हणजे माझ्या नावावर होती? मला माहीत असतं तर कधीचीच विकली असती सगळी.” सुधाताई


“तरी तू नसती विकू शकली कारण त्यालाच एक शाप जोडलेला आहे, वंशनाशाचा… जर तुम्ही ही संपत्ती विकली तर वंशनाश होणारच. ही संपत्ती तुम्ही विकू नाही शकत मात्र वाढवू शकता.” गुरुजी


“मग ह्यावर उपाय? पण आम्ही तर इथं राहातही नाही, मग कसं?” प्रभाकरराव


“हाच की सुनेला जपा, तिची काळजी घ्या. तिला घराबाहेर काढू नका. हा सोपा उपाय. तुम्ही इथं राहत जरी नसले तरी वास्तू तुमचीच आहे. शेती तुमचीच आहे ना.” गुरुजी


“काहीही… त्या प्रियाने तुम्हाला अशी पट्टी पढवली असणार आहे.” सुधाताई


“मग संपत्ती विकून बघ. ती विकली जाणार नाही. आणि यदाकदाचित विकली गेली तर परिणाम तुला सांगितलाच आहे.” गुरुजी म्हणाले.

“पण माझं शहरातलं घर, गाडी माझ्याच नावावर आहे.” सोहम

“त्यात तुझ्या बायकोचंही नाव असतं तर कदाचित तुझ्यावर ही वेळ आलीच नसती.” गुरुजी

“गुरुजी, खरंच काहीतरी उपाय सांगा. काय करू मी? मी खूप मोठ्या संकटात सापडलो आहे हो.” सोहम


“जी चूक केली, ती दुरुस्त कर. तुझ्या बायकोच्या पायगुणाने तुझ्यावर लक्ष्मी प्रसन्न होती, ती गेली आणि सगळी उतरती कळा लागली.” गुरुजी

“गुरुजी, सोहमच्या भविष्यात त्याची बायको परत येण्याचे योग आहेत का?” प्रभाकरराव


“प्रयत्न करणं हातात आहे त्याच्या.” गुरुजी म्हणाले.

त्यांचा निरोप घेऊन सगळे तिथून निघाले.

“काहीही बोलतोय तो थेरडा. असं कुठं काही असतं का? ते काही नाही, उद्या सगळी कागदपत्रं बघून घ्या.” सुधाताई


“त्यांचा बराच अभ्यास आहे आणि दोन्ही घराणे एकमेकांना कितीतरी पिढ्यांपासून ओळखतात. गुरुजी चुकीचे सांगणार नाहीत.” प्रभाकरराव


“तरी उद्या आपण आपली कागदपत्रं घेऊन घेऊ. खरं खोटं कळेलच.” सोहम म्हणाला.

दुसऱ्यादिवशी प्रभाकरराव आणि सोहमने सगळी कागदपत्रे आणली. ती वाचून दोघेही अचंबित झाले.

क्रमशः