अचानक (भाग ५ अंतिम)
“बाबा, गुरुजींनी सांगितलं ते सगळं खरं आहे की.” सोहम कागदपत्रे बघत म्हणाला. त्या कागदपत्रांत खूप साऱ्या जुन्या नोंदीही होत्या. अगदी पूर्वजांनी लिहून ठेवलेली त्यांची वंशावळ होती.
“काय करायचं मग आता? त्या भिकारडीला परत आणणार का?” सुधाताई
“हो आणणार. खरंतर तुझ्यामुळेच ती हे घर सोडून गेली. प्रेमविवाह होता ना आमचा आणि त्यातल्या त्यात ती गरीब घराण्यातली होती. तू तिला सतत गरीब म्हणून हिणवलं आणि सतत माझ्या डोक्यात श्रीमंती कशी चांगली तेच भरलंस. प्रिया मला किती सांगायची, पैसा जपून वापर. उगीचच मोठेपणा मिरवण्यासाठी लोन घेऊ नकोस; पण मी तुझ्या बोलण्यात येत गेलो. आता मला माझी चूक कळली आहे.” सोहम म्हणाला. त्याचदिवशी सगळे गावावरून परत आले. सोहम सतत प्रियाला फोन करत होता; पण प्रिया त्याला उत्तर देत नव्हती.
सोहम तिच्या ऑफिसमध्ये गेला. एकदा भेटण्यासाठी विनवण्या करून आला. त्यानंतर दोन दिवसांनी प्रिया त्याला भेटायला तयार झाली. सोहमने तिला घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या.
“म्हणजे तुला पैशाची गरज पडली म्हणून मी परत यावं असंच ना?” प्रिया
“तसं नाही प्रिया, मी आईच्या बोलण्याची आलो होतो गं. तिनं माझ्या डोक्यात श्रीमंती दाखवायचं एवढं भरलं होतं ना की त्यापुढं मला काहीच दिसत नव्हतं.” सोहम
“पण ही गोष्ट परत होणार नाही कशावरून?” प्रिया
“नाही होणार परत. माझ्यावर विश्वास ठेव.” सोहम
“तुझ्यावर विश्वास ठेवूनच त्या घरात लग्न करून आले होते ना?” प्रिया
“ठीक आहे. जशी तुझी मर्जी. आयुष्यात जे जे वाढून ठेवलं आहे ते ते स्वीकारणं, आता एवढंच करू शकतो मी.” सोहम म्हणाला आणि तिथून निघून गेला. प्रियाने सोहमच्या बोलण्यावर बराच विचार केला आणि तिने त्याला फोन केला.
“एकदा विश्वास ठेवून फसले होते. पुन्हा असं फसवणार नाहीस ना?” प्रिया
“नाही प्रिया, मुळीच नाही. मला आता चांगलंच कळलंय माझी भाग्यरेखाही तूच आहेस आणि आयुष्यरेखाही तूच आहेस. त्या गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टी कितपत खऱ्या, खोट्या माहीत नाही; पण तुझ्यामुळंच या जीवनाला अर्थ आहे.” सोहम
“मग ये घ्यायला.” प्रिया म्हणाली. सोहम लगेचच तिला घ्यायला गेला.
प्रिया परत घरात आली आणि आठवडाभरातच सोहमला त्याच कंपनीत परत जॉईन होण्यासाठी कॉल आला. आर्थिक मंदीमुळे त्याचा पगार मात्र थोडा कमी झाला होता. घराची विस्कटलेली घडी पुन्हा बसत होती.
काही दिवसांतच सोहमने घर, गाडी प्रियाच्या नावावर करून टाकली. सुधाताईही प्रियासोबत एकदम मायेने नाही; पण आधीपेक्षा बऱ्याच चांगल्या वागू लागल्या.
सोहमच्या आयुष्यात अकस्मात आलेलं एक वादळ त्याला खूप काही शिकवून गेलं होतं.
समाप्त
©® डॉ. किमया संतोष मुळावकर
(प्रस्तुत कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा