Login

अडचण

An elderly couple realizes that their daughter-in-law see them as a burden. With wisdom and dignity, they decide to move back to their native place, choosing peace over conflict.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा लेखन स्पर्धा

अडचण

रघुनाथराव रिटायर होऊन एक महिना झाला होता. वासंती, त्यांची पत्नी आणि ते, दोघेही सार्वजनिक बागेतील बाकड्यावर बसून गप्पा मारत होते.

“आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, आता कुठे आरामाचे दिवस आलेत. आता आयुष्य मजेत घालवायचं. मुलंबाळं, नातवंडांत रमायचं. तू पण संसारासाठी खूप खस्ता खाल्ल्यास. संसाराला हातभार लागावा म्हणून शिवणकामही केलेस. संसार नीटनेटका होण्यात तुझा खूप मोठा वाटा आहे.” रघुनाथराव वासंतीला बोलत होते.


“हो ना. सुरुवातीपासून काटकसर केली म्हणून आपली मुले शिकली सवरली. मोठी मुलगी साक्षीला प्राध्यापक तर मुलगा सचिनला इंजिनिअर करू शकलो. हळूहळू परिस्थिती बदलली. मुले मोठी झाली, नोकरीला लागली. नंतर तर तुमचाही पगार वाढला. आपले दिवस पालटले. हळूहळू सुखाचे दिवस आले.” वासंतीताई बोलल्या.

वासंती आणि रघुनाथराव बराच वेळ जुन्या आठवणीत रमून गेले होते.

हळूहळू अंधार पडू लागला तसे वासंती ताई म्हणाल्या,
“चला आता घरी जाऊया. सचिनची यायची वेळ झाली आहे आणि निताही आपली वाट बघत असेल. छोटा बंटी तिला काही काम करू देत नसेल.”

दोघेही बाकावरून उठले. त्यांनी भाजी व दूध घेतले आणि घराच्या दिशेने निघाले. जवळच्या सोसायटीतच त्यांचा वनबीएचके फ्लॅट होता. लिफ्टने ते चौथ्या मजल्यावर पोहोचले. सचिन घरी आला होता, बाहेर त्याचे बूट त्यांना दिसलेले. ते दाराची बेल वाजवणारच होते; पण तेवढ्यात त्यांच्या कानावर काही शब्द पडले.

त्यांची सून निताचा आवाज होता तो,
“बघा, किती वेळ झाला राजा राणी बाहेर गेले आहेत. अजून घरी आले नाहीत. इकडे बंटी मला कामाचे काही सुचू देत नाही.”

“अगं येतील ते. त्यांना आता एकत्र बाहेर जायला नको का? आणि राजा राणी काय म्हणतेस? रिटायर झालेत ते, त्यांना थोडा निवांतपणा आणि विरंगुळा आता हवाच आहे.”

“आई पण सोबत जाऊ लागल्या आहेत. बंटीला त्यांनी सांभाळले तर मला कामं पटपट उरकता येतात.”

“आल्या आल्या डोकं खाऊ नकोस माझं.” सचिन म्हणाला आणि आत गेला.


सगळा संवाद बाहेर दोघांच्या कानावर पडला. त्यांनी बेल वाजवली आणि आत गेले. वासंतीताईंनी हात-पाय धुवून बंटीला घेतले.

“अरे सचिन, कधी आलास?” बाबा बोलले.

“हे काय, आताच तुमच्या समोर!” म्हणत तो कपडे बदलून बाहेर सोफ्यावर येऊन बसला.

“बाबा तुमचा पण चहा टाकू का?” निता बोलली.

“नको सूनबाई, चहा घेऊनच बाहेर गेलो होतो.” रघुनाथराव म्हणाले.

वासंतीताई बंटीला जवळ बसवून भाजी साफ करू लागल्या आणि ते दोघे बाप लेक टिव्हीवरच्या बातम्या बघत बसले.
त्या दोघांनीही काहीच कानावर पडले नाही असे दाखवले.

असेच दिवस जात होते. सूनबाईंची कुरबुर अधूनमधून कानावर पडत होती. सासरे रघुनाथराव दिवसभर घरीच असत, त्यामुळे तिला अवघडल्यासारखे वाटत होते. तिचा मैत्रिणींचा ग्रुप कुठे कुठे बाहेर फिरायला जायचा; पण तिला जाता येत नव्हते. "मूल लहान आहे अजून. त्याला घेऊन नको जाऊस." असं सासरे बोलले होते त्याचा तिला राग आला होता.

बंटी एक वर्षाचा झाला होता. त्याचा पहिला वाढदिवस म्हणून निताचे आईबाबाही वाढदिवसाला आले होते. वाढदिवस अतिशय आनंदात पार पडला. निताची आई दोन दिवस राहिली होती.

“तुझे सासरे रिटायर झाले ना आता. आता या वयात गावाला जाऊन शेतीभाती बघायची सोडून इथेच रिकामटेकडे राहणार का?” निताची आई म्हणाली.

“होय गं, बघ ना... मी सचिनबरोबर या विषयावर बोलले; पण त्यांना ते आवडले नाही. किती दिवस आम्हाला अडचण बनून राहणार आहेत काय माहिती?”

वासंतीताईंच्या कानावर त्या दोघींचे बोलणे पडले आणि त्यांना धक्काच बसला. तसेही सुनेला त्यांनी अजिबात धाकात ठेवले नव्हते. त्या तिला कामात मदत करू लागत, तिला कसलाच सासुरवास केला नाही. एवढे चांगले वागूनही सूनबाईला आपण अडचण वाटत आहोत म्हणून त्यांना वाईट वाटले.

एक दिवस बागेत गेल्यावर त्यांनी रघुनाथरावांना सगळे सांगितले. तेही हे ऐकून व्यथित झालेले.

आपला एकुलता एक मुलगा. आपण त्याच्याकडेच राहणार ना; पण सूनबाईला आपली अडचण वाटत आहे पाहून त्या दोघांनी गावाला राहायला जाण्याचा विचार केला. गावाला थोडीफार शेती होती. जुने घर होते त्यात दोन भाऊ राहत होते. त्यांनी ठरवले, आपण अजून म्हातारे झालो नाही. आपण आपली कामे करू शकतो. छोटेसे घर बांधू आणि राहू.

रघुनाथराव खाजगी कंपनीत कामाला होते त्यामुळे त्यांना पेन्शन नव्हती; पण प्रॉव्हिडन्ट फंडाचे पैसे चांगले मिळाले होते, ते त्यांनी बॅंकेत ठेवले होते. त्याचे व्याज चांगले येत होते.

काही दिवसांनी त्या दोघांनी मुलगा आणि सुनेला गावाला जाऊन सगळ्यांना भेटून येतो असे सांगितले आणि गावाला गेले. गावी दोन भाऊ वडिलोपार्जित घरात स्वतंत्र राहत होते. तिथेच मोठ्या भावाकडे ते राहिले.
त्यांचा मुक्काम जास्त दिवस लांबला होता. भावालाही आपली अडचण वाटू नये म्हणून त्यांनी आपल्या वाटणीला आलेल्या जमीनीवर छोटेसे घर बांधण्याचा मनोदय बोलून दाखवला. फोनवर सचिनबरोबरही ते बोलले.

सचिन त्यांना बोलला, “गावाला घर बांधण्याची काय आवश्यकता आहे. इकडेच टूबीएचके फ्लॅट घेऊया.”

पण रघुनाथरावांनी गावाला आपले घर असावे हे पटवून दिले आणि चार महिन्यातच नवीन छोटेसे टुमदार घर बांधून तयार झाले.

घराच्या पूजेसाठी सचिन आणि निता गावाला आले होते. सचिनला वाटले आता आईबाबा आपल्याबरोबर मुंबईला येतील; पण त्या दोघांनीही आता आम्ही इकडेच राहणार आहोत हा आपला निर्णय बोलून दाखवला.

सचिनला एकदम धक्का बसला.

“बाबा, तुम्ही दोघे आम्हाला हवे आहात. निदान बंटीचा तरी विचार करा. होय ना गं निता?” तो निताकडे बघून बोलला.

निता हो म्हणाली; पण मनातून तिला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. ती वरकरणी हो म्हणालेली.

आई-बाबा दोघांनी आपला निर्णय पक्का झाला आहे हे सांगितले. अधूनमधून येत जाऊ तुम्ही पण इकडे येत जा असे सांगितले. नाईलाजाने सचिन मुंबईला परतला.

रघुनाथरावांचे आणि वासंतीताईंचे जीवन गावातील घरात आनंदाने सुरू झाले. जवळच्या शहरात असलेली मुलगी अधूनमधून भेटायला येऊ लागली.
दोघेही चांदण्या रात्री अंगणात गप्पा मारत बसले होते. शुध्द, प्रदूषणमुक्त हवेत... आता त्यांची अडचण कोणालाच नव्हती.

समाप्त

©®सौ. सुप्रिया जाधव
( संघ कामिनी )
२३/९/२०२५
0