# #स्वलिखीत
#"आठवणीतील कालनिर्णय:
"राधे, जरा ते दारामागचं 'कालनिर्णय' काढतेस का ग? यंदाचं पान उलटायची वेळ आली." आज्जींनी खिडकीबाहेरच्या धूसर आकाशाकडे बघत साद घातली.
राधाने दारामागच्या खिळ्याला अडकवलेलं ते कॅलेंडर काढलं आणि आज्जींच्या हातात दिलं. आज्जींच्या थरथरत्या बोटांनी डिसेंबरचं पान कुरवाळलं. तिथे एका तारखेला लाल पेनाने मोठा गोल केला होता आणि बाजूला लिहिलं होते ''त्यांना जाऊन पाच वर्षे झाली'.आज्जींच्या डोळ्यांत एकदम पाणी तरळलं.
रामचंद्ररावांच्या फोटोकडे बघत त्या पुटपुटल्या, "राधे, यांना सवय होती ग! नवीन कालनिर्णय घरात आलं की पहिल्याच दिवशी पूर्ण वर्षाचे वाढदिवस, सण आणि आमची खास तारीख नोंदवून ठेवायचे.अक्षर पण सुवाच्य बरका राधे!"
"कधी तरी वेळ मिळाला कि वरच्या माळयावरील बॅग काढून दे मला दाखवेन बघ त्याच्या डायऱ्या आणि त्यांचे अक्षर तुला!"
आज ते नाहीत, पण या तारखा मात्र दरवर्षी न चुकता समोर येतात."बघ जणू काही मनावर कोरल्या गेल्या गत.
राधा शांतपणे ऐकत होती.आज्जीचं ते राधे,राधे तिच्या कानाला खुप गोड वाटायचं.
आज्जी पुढे म्हणाल्या,"पण हे कालनिर्णय आता दारामागे का असतं माहितीये? कारण समोरच्या भिंतीवर आता महागडे पेंटिंग्ज आणि टीव्ही आलेत.
तिथे या कागदी आठवणींना जागा उरली नाही. माणसं भिंतीवरचा शो जपायला शिकली. पण भिंतीच्या आडोशाला बसलेल्या माणसाचं मन वाचायला विसरली!"यावर्षी घरी कॅलेंडर तरी येते कि नाही कोण जाणे!
तेवढ्यात नातवाचा जोरात हसण्याचा आवाज आला. तो शेजारच्या खोलीत कोणाशी तरी फोनवर व्हिडिओ कॉलवर गप्पा मारत होता.सुनेचा आणि मुलाचा लॅपटॉपवर कसलातरी खटाटोप सुरू होता.
सगळे एकाच घरात होते, पण कोणाकडेच आज्जींच्या खोलीत डोकावून "कशी आहेस?" म्हणायला वेळ नव्हता.
"राधे, बघ ना ही मुलं? तासनतास त्या मोबाईलवर जगाशी बोलतात. पण समोर बसलेल्या माझ्याशी बोलायला यांच्याकडे दोन मिनिटं नसतात.
मी विचारलं काही, तर म्हणतात,'आजी, तू नको डोकं लावू, तुला त्यातलं कळणार नाही.' मला तंत्रज्ञान कळत नसेल ग, पण मनं तर कळतात ना?" आज्जींची व्याकूळता शब्दाशब्दांतून सांडत होती.
आज्जींनी पुन्हा त्या कॅलेंडरच्या मागच्या पानावरची एक रेसिपी पाहिली. "यांना हा पदार्थ खूप आवडायचा. मी करायचे तेंव्हा हे कौतुकाने दोन घास जास्त खायचे.
त्यावेळची मजाच न्यारी होती ग! एकमेकांच्या ठराविक पदार्थाची हातची चव दुसऱ्याच्या हाताला नसायची. कोणी एखाद्या पदार्थ शिकून आले कि, आम्ही तो लिहून ठेवायचो. वर्तमानपत्रातील रेसिपी, दिवाळी अंकातील रेसिपी म्हणजे आमच्यातील सुगरणीसाठी दागिणा असायचा.
आता मी तुला एखादा पदार्थ करायला सांगितला तर मुलं म्हणतात, 'आजी, ऑयली नको, डाएटला मिळतेजुळते हवंय!'
कोणासाठी करायचं आणि कोणाला खायला घालायचं? म्हणून मग मी पण गप्प बसते."
ना कोणाकडे जवळ बसायला वेळ आहे ना जेवायला!. हे घरं कसली ग?
बंद कपाटातील तिजोऱ्या नुसत्या. सुबक कलाकृती करून बनवलेली दार आणि खिडक्या.सोन्याचा पिंजराच ग!
राधाने आज्जींचा हात हातात घेतला. "आज्जी, नका ना असं म्हणू. मी आहे ना तुमच्याकडे."
"तू आहेस म्हणून तर हे घर घर वाटतंय ग, नाहीतर हा नुसता सिमेंटचा बंगला आहे.
रामचंद्रराव असते तर या सरत्या वर्षाच्या संध्याकाळी आम्ही गप्पा मारत बसलो असतो. जुन्या आठवणी काढल्या असत्या. आता फक्त भिंतीवरचा फोटो आणि हे दारामागचं कालनिर्णय... हेच माझे सोबती!"
आज्जींनी हळूच पदराने डोळे पुसले. "राधे, वरण-भात वाढ ग आणि ते मुरलेलं लोणचं दे तोंडी लावायला! "
माझंही आयुष्यही आता त्या लोणच्यासारखंच झालंय!...बरणीच्या तळाला लागलेलं. कोणाला हवं असेल तर चव घेतील, नाहीतर कोपऱ्यात तसंच पडून राहील."
नाही आज्जी मुरलेले लोणचं तर हवं असते सर्वांना, डाव्या हाताला असलेले लोणचे तर ताटाची शोभा वाढवते आणि जेवणाची लज्जत.
बाहेर वर्षाचा शेवटचा सूर्य मावळत होता.लेकांने आई तुझं कालनिर्णय म्हणून बॅगेतून कॅलेंडर काढून दिले. झालं का जेवण म्हणून लगबगीने तो खोलीच्या बाहेर गेला. हो नाही हे सुध्दा त्याच्या कानावर पडले नाही.
नवीन कॅलेंडरची जागा घरात नक्की झाली होती.दारामागे खिळा न ठोकता, चिकटवलेल्या हुकात अडकवून ठेवणे. महागड्या दाराची शोभा खराब न करणे.
पण आज्जींच्या मनातल्या रामचंद्ररावांच्या आठवणी आणि नव्या पिढीची ही 'डिजिटल' भिंत'यातला कालनिर्णय मात्र कधीच न सुटणारं कोडे बनून राहिलं होतं.
ते फक्त सोबत करणार होते. रामचंद्ररावांकडचे बोलावणे येत नाही तोपर्यंत.
समाप्त...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा