अधिक , पाखी अँड निवडणूक !

.
संध्याकाळी अधिक थकून घरी आला. दार उघडताच त्याच्या कानावर शिट्टीचा आवाज आला. तो दचकलाच.

" लोकशाही वाचवा , शिट्टी वाजवा !"

" हुकूमशाहीला द्या सोडचिठ्ठी , वाजवा फक्त शिट्टी !"

समोर पांढरी टोपी घातलेली आणि हातात बॅनर घेऊन उभी असलेली पाखी उभी होती. ती जोरजोरात घोषणा देत होती.

" पाखी , आता हे काय नवीन ?"

" नवीन ? उठ अधिक. जागा हो. "

" अग पण मी झोपलोय कुठे. "

" अरे लोकशाही संकटात आहे. जागा हो. आता फक्त शकुंतलाताईच लोकशाही वाचवू शकतात. म्हणून मी त्यांचा प्रचार करणार. " पाखीने जोरात शिट्टी वाजवली.

" अरे देवा , म्हणजे आता महिनाभर शिट्टीच ऐकायला मिळेल घरात. "

" मला वाटलंच तुला प्रॉब्लेम असेल. कारण आम्ही स्त्रियांनी आवाज उठवलेला तुम्हा पुरुषप्रधान समाजात वाढलेल्या पुरुषांना अजिबात चालत नाही. म्हणून आता शिट्टी वाजलीच पाहिजे. फक्त घरात नाही तर संसदेतही शिट्टी वाजलीच पाहिजे. "

" तस नाही पाखू. पण शिट्टी वाजवून वाजवून तुझा घसा बसला तर तू घोषणा कशी देणार ?"

" अरे हो. हा तर विचारच नाही केला. बर तू फ्रेश हो. मी जेवायला वाढते. "

अधिक फ्रेश होऊन आला आणि दोघेही जेवायला बसले.

" आज फोडणीचा भात छान झाला आहे. "

" होणारच. नव्या कुकरमध्ये बनला आहे ना. "

" काय ? नवीन कुकर घेतले तू ? लग्नात जे कुकर तुझ्या आत्याने दिले होते ते खराब झाले का ? वाटलंच मला. तुझी आत्या किती खराब तोंड करत होती लग्नात. नक्कीच सेकंड हॅन्ड कुकर दिला असेल गिफ्ट म्हणून. "

" अधिक , माझ्या आत्याने दिलेले कुकर अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. हे नवीन कुकर तर शकुंतला ताईने दिले मला. सर्व महिला कार्यकर्त्यांना दोन-दोन कुकर वाटले त्यांनी. "

" ओह. या लोकशाही वाचवणार तर. "

" बाय द वे , तुझ्या आत्याने दिलेले मिक्सर बघितले का कसे आहे ? वरून ज्यूस बनवला तर अर्धे ज्यूस खालून सांडते. "

अधिक हसला.

" काय पाखी तू पण लगेच वाईट मानून घेतेस. मी तर मस्करी करत होतो. "

" यही नहीं अभी और सुनो. तुझ्या नागपूरच्या काकांनी तर डेरा गिफ्ट केला होता लग्नात. आठवते ?"

" डेऱ्यात पाणी थंड राहते तसे आपले डोकेही थंड राहावे आणि आपल्यात भांडणे होऊ नयेत अशी त्यांची इच्छा होती. "

" जुने कुकर वापरून ते फुटावे आणि मी मरून तुला नवीन बायको आणता यावी हीच इच्छा आहे ना तुझी ? मी रसिका मॅडमची एक कथा वाचली होती. कुकरने आणली सवत. त्यात नवरा बायकोचा मर्डर करतो कुकरचा वापर करून. मग दुसरी बायको आणतो. "

" तेवढे भाग्य नाही माझे. "

" काय ?"

" काही नाही. शकुंतला ताईबद्दल बोल ना. "

" हा. आज शकुंतला ताई म्हणाल्या की मी इंदिरा गांधीसारखी दिसते. "

अधिकने पाच मिनिटे टक लावून पाखीचे निरीक्षण केले.

" कोणत्या अँगलने ?"

" तुला नाही कळणार ते. सोनारालाच सोन्याची पारख करता येते. ताई म्हणाल्या की जर मी मनावर घेतले तर एक दिवस मुख्यमंत्रीही बनेल. कारण मी इंदिरा गांधीसारखी दिसते. "

" मग तर प्रियंका गांधींनीही पंतप्रधान बनायला हवं."

" काय म्हणालास ?"

" काही नाही. "

" अधिक , मी मतदानादिवशी कोणता ड्रेस घालू ? म्हणजे स्टेटसमध्ये छान दिसली पाहिजे ना. "

" पाखी , अजून खूप दिवस आहेत. तसही शो ऑफ का करायचे ?"

" शो ऑफ नाही. पण आपण मतदान केल्यामुळे इतरांनाही प्रोत्साहन मिळू शकते ना. "

" अच्छा. "

दोघांनीही जेवण केले.

***

दुसऱ्या दिवशी रात्री पाखीचे पाय खूप दुखत होते. अधिक तिचे पाय दाबत होते.

" पाखी , घरकाम तर तू करत नाहीस. मग आज पाय कसे दुखत आहेत ? घरीच रॅम्पवॉकची प्रॅक्टिस करत होतीस का ?"

" नाही रे. शंकुतलाताईचा प्रचार करत करत फिरले. त्यामुळे पाय दुखताय. "

" कशाला त्रास करून घेत आहेस स्वतःला ? तुला सवय नाही या सर्वांची. "

" तू ना रणबीर कपूर आहेस. "

" पाखी , मी हँडसम आहे पण इतकाही नाही. चक्क रणबीर कपूर नको म्हणू. "

" रणबीर कपूर म्हणाला होता की माझ्या घरातल्या नळाला पाणी येते तर मी का बोलू राजकारणाबद्दल. तसाच तू. इथे बिचाऱ्या शकुंतला ताई रात्रंदिवस एक करून लोकशाही वाचवण्यासाठी झिजत आहेत. "

" खरच पाखी , शकुंतला ताईमुळे का होईना तू अगदी जागरूक नागरिक बनली आहेस. "

" थँक्स. तुला माहिती आहे का जर शकुंतला ताई निवडणूक जिंकल्या तर त्या आम्हा सर्व महिला कार्यकर्त्यांना मोबाईल गिफ्ट करणारे. मला तर ब्रँडेड मोबाईल देते म्हणाल्या. म्हणून तर मी इतके कष्ट करत आहे. "

" मी माझे शब्द मागे घेतो. "

***

काही दिवस असेच गेले. एका संध्याकाळी अधिक थकून घरी आला. घरात " शिट्टी " हे निवडणूक चिन्ह असलेले झेंडे अधिकला दिसले नाही. त्या उलट " कप बशी " हे निवडणूक चिन्ह असलेले झेंडे घरात सर्वत्र लावलेले दिसले.

" वेलकम होम अधिक. "

" पाखी , हे नवीन झेंडे ?"

" अरे ते शकुंतलाताईंनी पक्ष बदलला. आधी लोकजागरण पक्षात होत्या आता जनजागरण पक्षात गेल्या आहेत. मग पक्ष बदलल्यावर चिन्हही बदलले. म्हणून हे झेंडे आणले मी. कपबशीचा एक सेटही मिळाला नवीन. "

" पण का पक्ष बदलला ?"

" नेपोटीझम अधिक. शकुंतलाताईच्या काकांनी आपल्या मुलीला म्हणजे चंद्रकलाताईंना तिकीट दिले. बिचाऱ्या शकुंतलाताई खूप रडत होत्या. पण आम्ही कार्यकर्त्यांनी त्यांना खूप धीर दिला. आता आमचे नवीन घोषवाक्य ऐक.

चंद्रकला ताई बॉलिवूडमध्ये अनन्या पांडे जशी
जिंकणार फक्त कपबशी कपबशी कपबशी !"

" अनन्या पांडेचा काय संबंध ?"

" अरे अनन्या पांडेला जस ऍक्टिन्ग येत नाही तरी नेपोकीड असल्यामुळे तिला चान्सेस मिळतात. तसच चंद्रकलाताईला राजकारण समाजकारण काही कळत नाही. तरी त्यांना तिकीट भेटले. फक्त त्या नेत्याची मुलगी असल्यामुळे. "

" ओके. चल मला जेवायला वाढ. खूप भूक लागलीय. "

दोघांनीही जेवण केले.

***

पुढे काही दिवस पाखीने शकुंतलाताईचा प्रचार केला. एकेदिवशी ऑफिसचे काम लवकर आटोपल्यामुळे अधिक लवकरच घरी आला. पाखी डोक्यावर हात लावून बसली होती.

" ओय पाखू , काय झाले ?"

" हे बघ मिक्सर. "

" नवीन घेतले ? छान आहे. "

" चंद्रकलाताईंनी दिले. "

" काय ? त्या तर नेपोकीड सॉरी नेपोवुमन आहेत. तुझी शकू नाराज नाही होणार का ?"

" शकू ?"

" सॉरी. शकुंतलाताई. "

" मी कन्फ्युज आहे. कुणाला सपोर्ट करू ? आज चंद्रकला ताई मिक्सर देऊन गेल्या. मिक्सर की कुकर ?"

" काय पाखी , आता एक मिक्सर किंवा कुकर तुझं मत निर्धारित करणार ?"

पाखीने त्या वाक्यावर खूप विचार केला. त्यानंतर ती म्हणाली ,

" नाही रे. मला अजूनही काही तरी मागायला हवे. जसे की मोबाईल. "

" सिरियसली पाखी. उद्या सर्व पॅकिंग करून ठेव. "

" का ?"

" कारण तुला माहेरी सोडायच आहे. "

" अधिक , मी कार्यकर्ता बनले म्हणून तू मला माहेरी पाठवतोय. खरच म्हणते शकू सॉरी शकुंतला ताई की तुम्ही सर्व पुरुष सारखेच. तुम्हाला स्त्रियांची प्रगती सहनच होत नाही. "

" अग तुझ्या पप्पांचा फोन आला होता. मलाही जावं लागणार आहे. मतदान करायला. "

" पप्पांनी का बोलावलं असेल ?"

" पाखी , तू वोटर आयडी अपडेट केलेस ? म्हणजे त्यावरचा पत्ता बदललास का ?"

" नाही. "

" तेच. मग तुला तुझ्या माहेरातच मतदान करता येईल. "

" अरे हा. तिथे पप्पांचे एक मित्र खासदार आहेत. पूर्ण फॅमिली त्यांनाच मत देते. त्या बदल्यात आम्हाला दहा हजार मिळतात. "

" अच्छा. हे नेत्याकडून पैसे घेण्याचे गुण जेनेटिक्समध्येच आहेत वाटत. "

" काय ?"

" पाखी , मला वाटले होते की या गोष्टी तू स्वतः समजशील. पण तरीही तुला समजत नाहीये. एक कुकर , मिक्सर , फोन किंवा थोडे पैसे घेऊन तुझ्यासारखे कित्येक जण चुकीच्या नेत्याला मतदान करतात. मग हे नेते पाच वर्षे मतदारसंघात फिरकतदेखील नाहीत. मग तुम्हीच ओरडत बसतात की या देशाचे काही होणार नाही. "

" अरे पण एका मताने काय फरक पडणार आहे ?"

" एका मताने सरकार पडू किंवा बनू शकते. जे उमेदवार प्रामाणिक आहेत , ज्यांना समाजात , देशात बदल घडवण्याची खरोखर इच्छा आहे , तळमळ आहे त्यांचा एका मतानेही हुरूप वाढू शकतो. जस काही लेखकांना फार कमी वाचक लाभतात. पण त्या कमी वाचकांचे प्रेम पाहून ते लिहीत राहतात. पाखी , मतदान देण्यापूर्वी तू त्या नेत्याचे बॅकग्राऊंड चेक केले का ? तो नेता संसदेच्या अधिवेशनात किती उपस्थित राहिला , जनतेचे कोणते प्रश्न मांडले , त्याने खासदार निधीचा किती उपयोग केला , मतदारसंघात किती विकास केला , त्या नेत्यावर कोणते आरोप आहेत वगैरे सर्व पडताळून पाहायला हवे. मगच मत द्यायला हवे."

" तुझे म्हणणे बरोबर आहे पण एकतर महाराष्ट्रात इतके पक्ष फुटलेत की कोण कोणासोबत आहे काहीच कळत नाही. पण तरी तू म्हणतो तसे प्रत्येकाचे बॅकग्राऊंड चेक केले आणि सगळेच एकाच माळेचे मणी निघाले तर ?"

" मग " नोटा " चा पर्याय उपलब्ध आहे. " नन ऑफ द अबुव्ह." तू ते बटन दाबू शकते. "

" जर सर्वात जास्त मत नोटाला पडले तर ?"

" तर नोटाहून किंचित कमी मते ज्याला पडली म्हणजे द्वितीय क्रमांक ज्याचा आला तो निवडणूक जिंकेल. "

" मग काय फायदा ?"

" त्या जिंकलेल्या उमेदवारला स्वतःशीच लाज वाटेल आणि तो पाच वर्षे चांगले काम करेल. निवडणूका म्हणजे भारतीय लोकशाहीचा उत्सव. संसद म्हणजे लोकशाहीचे मंदिर. तिथे योग्य उमेदवारच पाठवायला हवेत. "

" सॉरी अधिक. मी ना योग्य उमेदवारलाच मत देईल. थँक्स तू मला गाईड केलेस. आय लव्ह यु. "

इतके बोलून पाखी अधिकच्या मिठीत विसावली.

©® पार्थ धवन

🎭 Series Post

View all