Login

अधीर मन झाले! भाग -१०. अंतिम भाग.

मुसळधार पावसातील एक ओलीचिंब प्रेमकथा!


अधीर मन झाले!
भाग - दहा. (अंतिम भाग )


" डिअर ममुडी, वेट फॉर ओन्ली फोर मन्थ्स. त्यानंतर तुला सगळे सीक्रेट्स सांगेल." तिने आपले डोळे मिचकावले.

"चल जेवण करूया. मी पानं घेतली आहेत. माझ्या हातची चव चाखून बघ तरी." तेजू मेघाला आत घेऊन गेली.

********

तेजस्विनीचे बारावी होऊन पाच वर्षे सरली होती.

'एअरफोर्स कॅडेट इंडियन एअरफोर्स अकॅडमी, हैद्राबाद.'

हैद्राबादच्या या पावन संस्थेत आज तिचा पदवीदान समारोह होता. मेघा, आकाशमामा, नेहामामी,आजी, आजोबा सगळेच या सोहळ्याला उपस्थित होते. मेघाच्या डोळ्यात आनंदघन जमा झाले होते. तिची लेक आज उंच गगनभरारी घेण्यास सज्ज झाली होती.


'एवढेसे माझे पिल्लू इतक्या लवकर मोठे झाले, कळलंही नाही.' तिच्या नयनातील आनंदघन हळूच गालावर उतरू लागले होते.

मेघा नेहमीच तिला म्हणायची,  'तू अगदी बाबासारखी आहेस.आतल्या गाठीची. मनातले कधी कळू देत नाहीस.'

किती खरे होते ते! रवीला एन.डी.ए. ला जायचे आहे हे शेवटच्या क्षणी आकाशला समजले. तेजुनेही तेच केले. मनात एन.डी.ए.चे एक आकर्षण निर्माण झाले होते ते तिने मेघाला कळूच दिले नाही.

ती बारावीला असताना मेघा तिला म्हणाली देखील होती की 'प्रेमात वगैरे पडलीस तर नाही ना?' तिनेही हसून त्याला दुजोरा दिला होता. ती मेघाला म्हणालीही होती, "काहीसे असेच समज." म्हणून, पण स्पष्टपणे कुठे काय बोलली होती? आपली चिमणी इतक्यात कुणाच्या प्रेमात पडेल असे मेघाला तरी कुठे वाटले होते.

"आई ऽऽ" बारावीची मार्कशीट हाती आली तशी गच्च मिठी मारून तेजस्विनीने ती मेघाच्या हाती स्वाधीन केली. तिला मिळालेले नव्वद टक्के गुण बघून मेघाला किती आनंद झाला होता.

'बाबाची लेक, अगदी त्याच्यावर गेलीय.' डोळ्यातील आनंदाश्रुनी तिने लेकीला जवळ घेतले.


"तेजू, खूप आनंदी आहे मी. काय हवे ते माग मला. तुला हवे ते सारे देईन." आनंद आणि उत्साहाच्या भरात मेघा बोलून गेली.


"खरंच आई? जे मागेन ते देशील मला?" तेजूने विचारले.


"हो गं माझे राणी, प्रॉमिस!" मेघा आज एकदम सातव्या आसमानात होती.


"थँक यू!" म्हणून तेजस्विनीने तिच्या हाती तिचा एन.डी.ए.च्या एंट्रन्सचा रिझल्ट ठेवला आणि सातव्या आसमानात गेलेली मेघा एका झटक्यात जमिनीवर आली.

"तेजू काय आहे हे?" तिच्या आवाजात कंप निर्माण झाला होता.


"आई, मला एन.डी.ए. ला जायचंय. बाबासारखं लष्करात ऑफिसर व्हायचे आहे." तेजू तिला समजावत होती.


"हे शक्य नाहीये तेजू." तिच्या डोळ्यात आभाळ दाटलं होते.


"तू प्रॉमिस केलेस आई. मला शब्द दिलास ना की मी मागेन ते देशील म्हणून. मला तुझी परवानगी हवीय गं. आई, प्लीज नाही म्हणू नको ना." तेजू काकूळतीला आली होती.


"मी एकदा माझे प्रेम हरवलेय, आता पुन्हा तुला हरवायचे धारिष्ट्य नाहीये गं बाळा." मेघाचा स्वर भिजला होता.

"आई, बाबा गेला तेव्हा कोलमडून गेले होते मी. त्याच्यासारखेच प्रेमात पाडणाऱ्या पावसाचा राग राग करायचे मी. त्या पावसात माझा हरवलेला हिरो आठवायचा मला पण तू परत नव्याने पावसाशी गट्टी करून दिलीस. मागच्या पावसात नखशिखान्त भिजले ना तेव्हा मला माझा बाबा उमगला गं आणि मी प्रेमात पडले.

तू विचारले होतेस ना, मी प्रेमात आहे का म्हणून? हो खरेच प्रेमात पडले होते मी. स्वतःला, स्वतःच्या माणसांना विसरून देशसेवेचा वसा चालवणाऱ्या बाबासारख्या प्रत्येक सैनिकाच्या प्रेमात पडले होते मी. मनात एकच आस, एकच ध्यास होता, बाबासारखं लष्करात जाण्याचा. तू नेहमीच म्हणतेस ना मी बाबासारखीच आहे? कदाचित त्याच्यासारखी असल्यामुळे देशसेवेचे ब्रीद मनात पेरले असेल, जे आधी जाणवले नव्हते. आई माझे स्वप्न पूर्ण व्हायला तुझा होकार आवश्यक आहे, प्लीज नाही म्हणू नकोस ना गं." तेजू तिच्यासमोर आशेने उभी होती.


"माझ्याशी लग्नाचा विचार करू नकोस मेघा. माझी प्रखरता तुला नाही गं सोसवणार." तेजूचे मागणे ऐकून तिला रवीचे बोलणे आठवत होते. किती सहजतेने तेव्हा तिने त्याला मनवले होते. आज सगळे प्रसंग जसेच्या तसे तिच्या डोळ्यापुढे उभे होते.


चार वर्षांच्या दुराव्यानंतर त्यांची झालेली ती भेट अन तिने त्याला लग्नाबद्दल विचारले तो क्षण. त्याच्या डोळ्यात जाणवणारे तिच्याबद्दलचे अफाट प्रेम अन ओठांनी दिलेला नकार. सारेच तिच्या आठवणीच्या झुल्यावर झोके घेत होते जणू कालच घडल्यासारखे सर्व प्रसंग डोळ्यासमोरून सरकत होते.


"आई बाबा मला तुम्हाला काही सांगायचे आहे." रात्री जेवताना मेघाने सगळ्यांना एकत्र बघून आपल्या मनातील बोलायचे ठरवले.
ते तिच्याकडे बघत होते.

"तुम्ही नेहमी लग्नाबद्दल विचारता ना? मला लग्न करायचे आहे." एक पॉज घेत ती पुढे बोलली. "मला रवीशी लग्न करायचे आहे."

जेवता जेवता रवीला जोरात ठसका लागला.


"अरे हळू, जावई म्हणून आम्हाला आवडशील तू. तसेही मेघाची चॉईस काही वाईट नाही हं." बाबा त्याला म्हणाले.


"काका -काकू, तसे काही नाही हो. मी लग्न नाही करू शकत." आपल्या मतावर तो अजूनही ठाम होता.

"का पण?" मेघा हळवी झाली.

"तुला माहिती आहे मेघा." तो.

"पुरे! आधी जेवण करून घ्या आपण नंतर चर्चा करू." बाबांनी फर्मान सोडले. सगळे जेवायला लागले. मेघाचा तर मूडच गेला होता.


"का नाही लग्न करायचेय सांग ना. आपलं प्रेम आहे एकमेकांवर." ती रडवेली झाली होती.

जेवणानंतर ती त्याच्यासोबत बोलण्यासाठी गच्चीवर आली होती.


"मेघा, प्रेम आहे म्हणजेच सर्व नसतं ना गं." तिचा हात हातात घेत तो म्हणाला.

"हो असतं. प्रेमापेक्षा काहीच श्रेष्ठ नसतं." ती रडत रडतच बोलत होती.


"वेडूबाई, शिक्षिका झालीस तरी मला तुला समजवावे लागते आहे." तिचे अश्रू पुसत तो म्हणाला.
"हा हट्टीपणा सोड मेघा. वेडेपणा करू नकोस. हा चंद्र बघते आहेस ना, त्याच्या शीतल चांदण्यात किती प्रसन्न वाटतेय. तेच सूर्याचे प्रखर ऊन सोसवेल का तुला?
माझ्यासोबत येशील तर या प्रखरतेने कोमेजून जाशील तू मेघा आणि मी तुला तसे नाही बघू शकणार गं." बोलता बोलता तोही हळवा झाला.


"नाही कोमेजणार. हा रवी प्रखर व्हायला लागला की ही मेघा अलगद तुझ्यासमोर येईल, तुला झाकोळून टाकेल. मग कसली प्रखरता आणि कसले ऊन?" त्याच्या खांद्यावर आपले डोके टेकवत ती हळूच म्हणाली.


"माझे बोलणे तुला कळत नाहीये मेघा. अगं आर्मी ऑफिसर आहे मी. 'सर्व्हिस बिफोर सेल्फ' हे आमचे ब्रीदवाक्य असते. केवळ प्रेमापोटी मी स्वार्थी नाही होऊ शकत ना गं? आणि माझ्याशी लग्न करून काय मिळेल तुला? एका सैनिकाचे आयुष्य काय असते गं? आज आहे तर उद्या नाही. माझ्यामुळे तुझे सुंदर जीवन मी कसे विराण करू सांग ना?" तिच्या हातावर हलका दाब देत तो म्हणाला.


"मला नकार देण्याचे हे कारण आहे ना? तुझी मेघा तुला एवढी कमकुवत वाटते का रे? आणि मरण कुणाला चुकलेय. उद्या माझ्याशी काही बरेवाईट झाले, कधी कुठे ॲक्सिडेन्ट झाला, नी मी प्राणास मुकले तर?"  ती.


"मेघाऽ, असे चुकूनही बोलू नको गं."  तिच्या ओठावर त्याने आपले बोट ठेवले.

"तुझ्याशिवाय नाही जगू शकणार मी. तू जीव आहेस माझा. या चार वर्षातील एक दिवस सुद्धा असा गेला नसेल ज्या दिवशी तुझ्या आठवणीने तुझा फोटो मी पाहिला नसेन. खूप प्रेम आहे यार माझं तुझ्यावर." तिला मिठीत घट्ट पकडत तो म्हणाला.


"रवी, हे ऐकायला किती आतूर झाले होते मी. आय लव्ह यू सो मच! बियांड द लिमिट. बियांड एव्हरीथिंग!" त्याच्या मिठीत मुसमूसत ती म्हणाली.

"तुझ्याकडे किमान माझा फोटो तरी होता. मी तर फक्त आठवणीत जगत होते. त्याची पनिशमेंट तुला मिळायला हवी ना? रवी आपण लवकर लग्न करू या ना." त्याच्या हातावरची पकड अधिक घट्ट करत ती म्हणाली.



"मेघा पुन्हा तुझा हट्ट सुरू झालाय का?" रवी.


"हो. आहे ही मेघा हट्टी आणि तिचा हट्ट तूच तेवढा पुरवू शकतोस. नाही म्हणू नकोस ना रे, माझी शपथ आहे तुला."


"मेघा, वेडी आहेस तू."

"फक्त तुझ्याचसाठी."

"हा प्रवास कुठे घेऊन जाईल याची तुला कल्पना नाहीये."


"आता मी मागे हटणार नाही. माझा प्रवास तुझ्यासोबतच सुरू करायचा आहे. भविष्याचा विचार करत क्षणाक्षणाला जळण्यापेक्षा मला वर्तमान जगायचे आहे. तुझ्या प्रेमात नखशिखांत भिजायचे आहे." ती बोलत होती.


"तुझ्यापुढे कोण जिंकेल अगं."  तो हसून म्हणाला.


"मला हरायची सवय नाहीये रवी." ती आनंदून म्हणाली.

"दादाऽऽ, आईऽऽ, बाबाऽऽ.. सगळे लवकर वर या. फायनली नवरदेव लग्नाला तयार झालाय." ती मोठ्याने ओरडली.


"अगं असं कधी म्हणालो मी?"  तो.

"तू जे बोललाहेस त्याचा हाच अर्थ होतो. आता पुन्हा पाठ फिरवलीस तर बघ." ती बोलत असतानाच सगळी मंडळी गच्चीवर आली.


"काँग्रॅच्यूलेशन्स मित्रा, सॉरी हं, जीजू. " आकाशने त्याला मिठी मारली.


"अरे काय हे?" रवीला धड लाजताही येत नव्हते नी हसताही येत नव्हते.


"अरे, सोड त्याला. अतिप्रेमाने गुदमरेल तो." आईने आकाशला एक फटका दिला तसा तो हसत त्याच्यापासून दूर झाला.

"काकूऽ " म्हणून आवेगाने रवी आईच्या मिठीत शिरला. त्याही त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होत्या.


रवीच्या योजना वेगळ्या होत्या. देशसेवेसोबत आपल्या अनाथाश्रमातील मुलांसाठी त्याला काहीतरी करायचे होते. ते त्याने केलेही. हे लग्न वगैरे त्याला नव्हतेच करायचे. पण म्हणतात ना, खऱ्या प्रेमात जी ताकत असते, ती भल्याभल्यांना गारद करते. तसेच काहीसे झाले. दोन महिन्यांनी तो आपल्या पोस्टिंग वर परतला ते एंगेजमेंट करूनच. दोन वर्षात आकाशच्या शेजारीच एक सुंदरसे घर बांधले. 'स्वप्नपूर्ती' त्या घरट्याला सजेसे नावही ठेवले. रवी आणि मेघाचा संसार त्याला तिथेच फुलवायचा होता.

त्यानंतरच्या सुट्टीत तो आला तेव्हा त्यानेच तिच्या डोळ्यात बघत म्हटले, "आता नाही राहवत राणी.आता इथून जाईन ते लगीनगाठ बांधूनच!"

मेघा तर एकदम हवेतच होती. 'एंगेजमेंट झाली म्हणजे हा आता माझ्यापासून दूर माझाच आहे, त्याला वाटेल तेव्हाच लग्न करायचे.' हे मनोमन तिने ठरवले होते.


"शुभमंगल सावधान!" डोक्यावर अक्षता पडल्या आणि आता ऑफिशिअली मेघा रवीची झाली होती.


माप ओलांडून तिने स्वप्नपूर्तीत आपले पहिले पाऊल टाकले. आज खरेच तिची स्वप्नपूर्ती झाली होती.

बाहेर ढगाचा गडगडाट सुरू होता. मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. ती त्याच्या मिठीत विसावली होती.
बाहेर बरसणारा ओलाचिंब पाऊस आणि त्याची ती उबदार मिठी! काय मस्त कॉम्बिनेशन होते.


'अशा वलंस राती
गळा शपथा येती,
साता जन्माची प्रीती
सरलं दिनरात.
हो ऽऽ
नभ उतरू आलं
चिंब थरथरवलं
अंग झिम्माड झालं
हिरव्या बहरात…'

त्याच्या मिठीत ती हळूवार विरघळत होती.

******


टाळयांच्या गजरात एकेक ऑफिसरचे नाव घेणे चालू होते. तेजूचे नाव आले तसे अभिमानाने मेघाचा ऊर दाटून आला. आज तिच्या लेकीचे स्वप्न पुरे झाले होते.


'तिची लेक की त्याची लेक?'
मनात पुन्हा त्याच्या आठवणीचा पाऊस झिम्मा घालू लागला.

तीन महिन्याची पाळी चुकली तशी किती आनंदली होती ती! त्याला कधी सांगू असे तिला झाले होते. तो परत येईपर्यंत तिला हे गुपित ठेवायचे होते पण त्याचा फोन आला तेव्हा त्यालाच तिच्या आवाजातील आनंदावरून अंदाज आला.


'किती मनकवडा होता माझा रवी!' तिच्या ओठावर हसू फुलले.


"मला ना एक छोटूशी गोड परी हवीय. अगदी तुझ्यासारखी. नाजूकशी!" दोन महिन्याच्या सुट्टीत तो घरी आला तेव्हा तिच्या वाढलेल्या पोटाची पापी घेत हळवेपणाने तो म्हणाला होता.



"आणि मुलगा होईल तर?" ती.


"तर तो माझ्यासारखा असेल. शूर बाबाचा शूर शिपाई. त्याला माझ्यासारखा सैन्यात दाखल करू." तिच्या पोटावरचा त्याचा हात तसाच होता.



"आणि मुलीने लष्कराचा मार्ग निवडला तर?" ती.


"ए, नाही हं! ती तुझ्यासारखी नाजूक कळी असेल. तिला नाही झेपवणार हे सगळे. ती मोठी होईल तर तिला तुझ्यासारखी टिचर नाहीतर तिच्या मामासारखी डॉक्टर होऊ दे. आर्मीत नको."
त्याचे बोलणे ऐकून तिला हसू आले होते.



"मी नाजूक नाही रे. तुझ्यासारखीच कणखर आहे. आपल्या बाळाला जे व्हायचेय ते होऊ दे. आपण वाटेत नाही यायचं. फक्त सपोर्ट करायचा." ती अलवारपणे त्याच्या मिठीत शिरली.


जेव्हा तेजू जन्माला आली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिला किती समाधान मिळाले होते. त्याच्या पाणावलेल्या डोळ्यात भरभरून प्रेम करणाऱ्या बाबाची झलक तिला दिसत होती.


"मेघा, ही आपली लेक. तुझ्या रवीचे तेज! तेजस्विनी." बोलता बोलता त्याने तिचे नावही ठेवले.

ती पिटुकली, काळ्याभोर डोळ्यांची लबाड त्याच्याकडे बघून कशी गोड हसली होती. होतीच ती बाबाची लाडकी. त्याची प्रतिकृती. त्याची तेजस्विनी!

लहानपणापासून त्याच्या गोष्टी ऐकून ती बाबाशी जणू एकरूप झाली होती. बाबा म्हणजे तिचा आदर्श. तिचा एकमेव हिरो!
दिसायला अगदी त्याच्यासारखीच. तिच्या सवयी देखील त्याच्याच. त्याला आवडणारा पाऊस तिच्या नसनसात भिनला होता. जन्मापासूनच पाऊस तिचा सोबती होता आणि अचानक एके दिवशी तो पाऊस तिचा वैरी झाला.


तेजू आठवीत होती. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी तो पावसाळ्यात येणार होता. त्याचवेळी युद्धाची घोषणा झाली. 'सर्व्हिस बिफोर सेल्फ!' हे ब्रीद त्याने पाळले होते. त्या भर पावसात त्याच्याऐवजी त्याचे पार्थिव घरी आले.तिरंग्यात लपटलेले त्याचे शरीर बघून तिने फोडलेला हंबरडा आजही मेघाच्या कानात घुमत होता.

त्याला तसे निपचित पडलेले शरीर पाहून मेघा निशब्द झाली होती.

'माझ्यासोबत येशील तर या रवीच्या तेजात होरपळून जाशील. हे तेज तुला सोसवणार नाही मेघा.'
लग्नाच्या आधी कितीदातरी त्याने सांगितलेले शब्द तिच्या कानात फिरत होते.

'नगं लागटं बोलू,
उभं आभाळ झेलू.
गाठ बांधला शालू,
तुझ्याच पदरा.
तुझ्याच पदराऽऽ

हो ऽऽ
नभ उतरू आलं,
चिंब थरथरवलं.
अंग झिम्माड झालं,
हिरव्या बहरात…'

बाहेर कोसळणाऱ्या त्या जीवघेण्या पावसात तिने स्वतःला झोकून दिले.

त्या दिवसापासून तेजूने पावसाला आपल्या आयुष्यातून बाहेर काढले ते आतापर्यंत. बारावीत असताना मेघाने तिला पावसात परत आणले आणि हरवलेला बाबा तिला पुन्हा गवसला. त्याचे स्वप्न आता तिचे झाले होते. तेच आज पुरे होत होते.

******
एन.डी.ए.तील सगळ्या मित्र मैत्रिणीबरोबर टोपी उडवून पदवीदान समारंभाचा आनंद तेजस्विनी साजरा करत होती. दूर एका कोपऱ्यात आर्मी ऑफिसरच्या वेशातील बाबा आपल्याकडे बघून गर्वाने हसतोय असा तिला भास झाला.

'देव होता तू,
दैव होता तू.
खेळमधला माझा खेळ होता तू.
शाणी होते मी, वेडा होता तू.
माझ्यासाठी का रे सारा खर्च केला तू.
आज तू फेडू दे पांग हे मला,
जगण्या रे मला अजूनही तूच हवा.
बाबाऽऽ...'

बाबाला बघून तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. अन तेवढ्यात अचानक आकाशात मेघ दाटून आले. तिला दिसणारा बाबा हळूहळू धुसर होऊ लागला.

अचानक कोसळणाऱ्या जलधारात सर्व न्हाऊन निघाले होते. तेजूने धावत जाऊन आवेगाने मेघाला घट्ट मिठी मारली. पावसाच्या रूपात जणू रवीचा आशीर्वाद तिच्या डोक्यावर पडतोय असे तिला वाटत होते.


मेघाने तेजूच्या माथ्यावर आपले ओठ टेकवले. त्या पावसाच्या थेंबाबरोबरच डोळ्यातील थेंबही तिच्या चेहऱ्यावर ओघळले होते.


आपले दोन्ही हात पसरवून डोळे गच्च मिटून तो पाऊस ती अंगावर झेलू लागली.


'अधीर मन झाले... मधुर घन झाले,
धुक्यातुनी नभातले, सख्या, प्रिया,
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले…'

मेघाच्या मनात श्रेया घोषालचा तोच मंजुळ स्वर रुंजी घालत होता.. पुन्हा एकदा!


           ****** समाप्त *****
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

       

      *साहित्यचोरी गुन्हा आहे.*

🎭 Series Post

View all