Login

अधीर मन झाले! भाग -५

मुसळधार पावसातील एक ओलीचिंब प्रेमकथा!


अधीर मन झाले!
भाग -पाच.


बारावीची परीक्षा आता महिन्याभरावर येऊन ठेपली. मग काय? रात्रभराचे जागरण, कॉफीचे मग, एकमेकांना केलेले सहकार्य आणि वाढवलेला उत्साह यामुळे चौघांच्याही परीक्षा उत्तम गेल्या.

आता वाट होती ती निकालाची. त्याआधी मेघाला तिच्या भावना रवीसमोर मांडायच्या होत्या. पण परीक्षा आटोपल्याबरोबर तो वसतिगृहातून अचानक आपल्या अनाथाश्रमात निघून गेला. त्याच्या अशा जाण्याने ती कोलमडून गेली. 'जाण्यापूर्वी त्याला साधं मला भेटून जावंस देखील कसं वाटलं नाही?' हा प्रश्न तिला छळत होता.

त्याचे असे कोड्यात वागणे मेघाला उलगडत नव्हते. तिच्या मनाचा गुंता वाढतच होता. आकाशला काही विचारावे तर त्यालासुद्धा काही माहिती नव्हते. रवी असा न कळवता कसा काय निघून गेला याचे उत्तर त्याच्याजवळ तरी कुठे होते?


यावर्षीचा निकाल मेघाला चातकासारखी वाट बघायला लावणारा होता. किमान निकालासाठी तरी तिचा रवी परत येईल अशी वेड्या मनाला आस होती.


निकालाची उत्सुकता सर्वांनाच होती. कारण त्यावरच तर सगळ्यांचे भविष्य निर्धारीत होते. आकाशला मेडिकलला जायचे होते. मेघाला डी. एड. करून शिक्षिका व्हायचे होते तर नेहाला पुढे पदवी प्राप्त करून प्रोफेसर व्हायचे होते. रवीच्या भविष्याबद्दल कोणालाच कल्पना नव्हती. त्याचे ध्येय काय आहे यावर कधी बोलणे झालेच नव्हते.


म्हणता म्हणता निकालाचा दिवस उजाडला. मेघाने सकाळीच स्वतःचे आवरून देवापुढे हात जोडले.

'देवा, सर्वांना चांगले भरभरून यश मिळू दे. रवीला आयुष्यात जे हवंय ते त्याच्या पदरी पडू दे.'  सर्वांचे यश चिंतत असताना तिने रवीसाठी स्पेशल मागणे मागितले याचे तिला हसू आले.

'वेडीच आहे मी. त्याच्या आठवणीत काय होऊन जातं माझं मलाच कळत नाही. त्यालाही माझी आठवण येत असेल का?' डोक्यावर हलकी थाप मारत ती स्वतःशी बोलत होती.


"मेघूऽऽ, मेघू, मेघू.."  नेहा धावतच घरात आली.

"अगं काय हे? अशी नाचत का आहेस?"  मेघाच्या आईने तिला विचारले.

"अहो काकू बातमीच तशी आहे. तुम्ही ऐकाल तर तुम्हालासुद्धा नाचावे वाटेल."  ती. चेहऱ्यावरचा उत्साह अजूनही तसाच.


"गधडे!" त्यांनी तिच्या पाठीवर एक फटका दिला. " सांगशील तेव्हाच नाचेन ना? बोल. "

"अहो, आकाश त्यांच्या कॉलेजमध्ये दुसरा आलाय."   नेहा.


"काय? आणि तुला कसे माहिती?"  त्या आश्चर्याने.



" अहो माझे मामा त्याच कॉलेजला आहेत. त्यांनीच संगितलं." ती.


एव्हाना मेघा, आकाश आणि त्याचे बाबा बाहेर आले होते. नेहाने सांगितलेली बातमी ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला.


"आणि पहिले कोण आलंय?" आकाशने कुतूहलाने विचारले. नेहाचा आनंदी चेहरा थोडासा खट्टू झाला.


सगळे तिच्याकडे उत्तराच्या अपेक्षेने बघत होते.

"म्हणजे तू दुसरा आलास त्याचे तुला वाईट वाटतेय का? जे यश मिळाले त्यात तू आनंदी नाही आहेस का? मी किती उत्साहाने आले होते आणि तुला पहिला कोण आलाय, हा प्रश्न पडलाय."   ती नाक फुगवून म्हणाली.


"अगं, तसे नाही गं. एक कुतूहल म्हणून तो विचारतोय. ही साखर घे आणि तोंड गोड कर. देवाजवळ ठेवल्यानंतर पहिला मान तुलाच बरं!" आई नेहाला साखर देत म्हणाली.


मेघा नेहाचे भाव टिपत होती. 'पहिला कोण आलाय?'  या प्रश्नावर तिचा उतरलेला चेहरा मेघाच्या नजरेतून सुटला नव्हता.

" नेहा, खरं खरं सांग, रवी पहिला आलाय ना?"  तिच्याजवळ येत मेघाने हळू स्वरात विचारले.

"काकू, तुमच्या घरची साखर कडू का वाटतेय हो?"   नेहा आईकडे बघून म्हणाली.

"येस! म्हणजे रवी पहिला आलाय!" नेहाचा कडवट चेहरा बघून मेघा जोराने म्हणाली.


"काय? वाटलंच होतं मला. आपला जिगरी खूप पुढे जाणार बरं." आकाश खूष होत म्हणाला.


" हो, पण तो आहे कुठे? आकाश, आज रवीला आपल्या घरी जेवायला आमंत्रित कर आणि नेहा तू सुद्धा इथेच जेवायचंस." आई उल्हासाने म्हणाली.


"हो, कॉलेजला भेटला की त्याला सरळ घरीच घेऊन येतो." आकाश.


"रवीच्या नावाने कशाला चिडचिड करतेस गं?" कॉलेजला जाताना मेघाने नेहाला विचारलेच.

"मला तो आवडत नाही."  नेहा.

"का?"

कारण तुला  माझ्यापेक्षा तो जास्त आवडतो म्हणून."  नाक फुगवून ती.

"वेडीच आहेस तू! तू तर माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना ?"  मेघा.

"आणि तो?"  

" माहीत नाही. " मेघाच्या चेहऱ्यावर किंचित लाजेची छटा उमटली.

"माहीत करून घ्यायच्या फंदात देखील पडू नकोस." नेहा तिच्याकडे पाहत म्हणाली.

बोलता बोलता दोघी कॉलेजमध्ये पोहचल्यादेखील. त्यांच्या आधीच तिथे तोबा गर्दी होती. जो तो निकाल बघण्यात गर्क झाला होता. गर्दीतून वाट काढत त्यांनी निकाल पाहिला.


"मेघू, आपण पास झालोत."  नेहा जवळजवळ ओरडलीच.


"फक्त पासच नाही, तर दोघींनाही डिस्टिंक्शन मिळालेय." मेघा तिला मिठी मारत म्हणाली.


"आता आपली सगळी स्वप्न पूर्ण होतील. मेघू, मी खूप खूष आहे. आता तुझी वहिनी होण्याचा माझा मार्ग मोकळा झालाय." नेहा उड्या मारायला लागली.



"हं?" मेघा तिच्याकडे आश्चर्याने पाहत होती.

"अशी काय बघतेस? आज तुझ्या दादाला मी माझ्या मनातलं बोलणार आहे. अगं, आजचा दिवस किती छान आहे!, तो कॉलेजमधून दुसरा आलाय मलासुद्धा डिस्टिंक्शन मिळालंय." आनंदाने ती.

"रवीसुद्धा पहिला आलाय गं." मेघा त्याचा चेहरा आठवून म्हणाली.

"झालं तुझं रवीपुराण पुन्हा सुरु. तुम्हा दोघा बहीणभावांना त्याने वेड लावलंय."  नेहा.

" त्याचं नाव घेतलं की तुला एवढं इनसिक्युअर का होतं गं?" हसत मेघा.

" माझ्या मैत्रिणीला माझ्यापासून तो हिरावून नेतोय असं वाटतं मला."  नेहाने परत नाक फुगवले.

"तू माझी सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहेस. तुझ्यापासून मला हिरावून न्यायची कुणाची गं बिशाद? "  मेघा हसून म्हणाली. "आणि अशी तू नाक फुगवतेस ना म्हणून दादा तुला नकटी म्हणतो."  नेहाचे तिने नाक ओढले.


"मला आवडते ते."   नेहा हळूच लाजून म्हणाली.

"अवघड आहे बाबा तुझं."  मेघाने डोक्यावर हात मारून घेतला.

********

"आहाहा! काकू काय सुगंध येतोय. जाम भूक लागलीय आता."  नेहा स्वयंपाकघरात येत म्हणाली. तिथून
दरवळणारा गंध थेट त्यांच्या नाकापर्यंत पोहचला होता.


"हो का? चला मग भांडी ठेवायला मदत करा." आई हसून म्हणाली.


"हो, हो." म्हणून नेहा मदतीला आली.

"नेहाकडे बघून तुसुद्धा काही शिक बाई." खुर्चीवर आरामात बसून असलेल्या मेघाला आई म्हणाली.

"अगं आई, मला नको, तिलाच शिकव. तुझी सून व्हायचे वेध लागलेत तिला."  आईला कळणार नाही आणि नेहाला ऐकू येईल अशा आवाजात ती म्हणाली.

तेवढ्यात बाहेर आकाशच्या बाईकचा हॉर्न वाजला. आकाशसोबत रवी नक्की असेल असे मेघाला वाटत होते. तिच्या हृदयाची स्पंदने आपोआप वाढली होती. त्याला बघायला मन अधीर झाले होते.


" हे काय? एकटाच आलास?  रवी कुठे आहे? "  त्याला एकटे बघून आईने विचारले.

"अगं तो कॉलेजला आलाच नव्हता."  खिन्नपणे आकाश.

" काय? " खुर्चीवरून गर्रकन मान वळवून मेघा उठली. "कॉलेजला आला नाही म्हणजे?" काळजीने ती.

"काय माहिती? काही कामानिमित्त तिकडेच अडकला असेल. वसतिगृहावरदेखील आला नाहीये."   आत येत आकाश.


"बरं, चला तुम्ही तरी जेवून घ्या."  पानं वाढत आई म्हणाली.


मुलांचा आनंदाचा दिवस म्हणून आईने जेवणाचा खास घाट घातला होता. मेघाला मात्र ते पंचपक्वान्न नकोसे वाटत होते. ती खुर्चीवरून उठायला गेली तर आकाशने तिचा हात खेचून खाली बसवले.

"मेघू, असे भरल्या ताटावरून उठू नये. आईला काय वाटेल?" तो हळूच तिला म्हणाला. तिची अस्वस्थता त्याला कळत होती. मनातून तोदेखील बैचैन झाला होता.

ती बसली. समोर एवढे सुग्रास भोजन असताना तिचा घास तोंडातच फिरत होता. बळेबळेच तिने चार घास पोटात ढकलले आणि आपल्या खोलीमध्ये गेली. तिच्यापाठोपाठ नेहा आणि काही वेळाने आकाशदेखील आला.



"मेघू, काय झाले?"  तिच्या डोळ्यात जमा होणारे पाणी बघून तो म्हणाला.

"काय व्हायचे बाकी राहिले? त्या रवीने तुम्हा दोघांना पार वेड लावलंय आणि मेघाला तर जास्तच वेड लागलंय."   चिडून नेहा.

" काय म्हणालीस तू?"   आकाश.

" काही नाही. तुझ्या मित्रप्रेमाच्या भरात आम्ही दोघी चांगले डिस्टिंक्शन मिळवून पास झालोय त्याचं कुणाला कौतुकच नाही मुळी."  नेहा हिरमुसली.

"कौतुक नाही असं कोण म्हणालं? ही दोन दोन चॉकलेट्स कोणासाठी आणलीत मग?"  खिशातून चॉकलेट्स काढत आकाश हसून म्हणाला.


नेहाने खूष होऊन त्याच्या हातून चॉकलेट घेतले. "थॅंक यू आकाश. आय लव्ह यू सो मच!" आनंदाच्या भरात नकळत तिच्या तोंडून बाहेर पडले.


"हं?" आकाश.
"हं?" मेघा.
दोघेही तिच्याकडे डोळे विस्फारून बघत होते.

"असे काय बघताय?  'जे पोटात ते ओठात' असं आहे आपलं. खरं आहे तेच बोलले मी. यावर तुला काही बोलायचे आहे का?" नेहा.

" मलाही आवडतेस की तू."  तिच्या नाकाला हलके ओढून आकाश म्हणाला आणि हसून बाहेर गेला.


"हां? मेघा, तुझा दादा काय बोलला ऐकलेस ना. त्याला मी आवडते."  आनंदाने तिने स्वतःला बेडवर झोकून दिले.


"तुझं ते प्रेम आणि माझं काय गं? " मेघा हळवे होत नेहाला विचारत होती.


"तुझं काय? तू कुठे कोणावर प्रेम केलेस? मला तर काही ठाऊक नाही."  नेहा.

"खरंच तुला माहिती नाही?"   मेघा.

"तू सांगितलेस मला?"  नेहा.

"प्रत्येक गोष्ट सांगायची असते का? माझी मैत्रीण आहेस नं, मग तुला माझ्या मनातले कळायला नको?"   लटक्या रागाने मेघा.


"तुझ्या मनातले कळायला मी तुझा प्रियकर नाहीये ना. जसे मी आकाशला बोलले तसे तुही त्याला बोलून टाक."  डोळे बारीक करून नेहा म्हणाली.


"कोणाला?"   मेघा.

" कोणाला काय? तुझ्या रवीला."  स्मित करत नेहा.

"नेहा, तुला राग तर नाही आला ना?"  मेघा.

"आला तर होता. पण आज मी खूप खूष आहे, त्यामुळे माफ करून टाकले."   ती हसली.  "मेघू, रवी चांगला मुलगा आहे गं. फक्त तुझ्या तोंडून मला सत्य ऐकायचे होते म्हणून हे नाटक चालले होते. माझ्यासारखंच तू सुद्धा लवकर त्याला बोलून मोकळी हो. मग आपण चौघे मिळून खूप मजा करू."
नेहाने मेघाला प्रेमाने मिठी मारली.


"नौटंकी, किती छळलेस यार मला. मला तर वाटलं होतं की रवी तुला खरंच आवडत नसेल." मेघा तिला फटका देत म्हणाली. दोघींच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.
.
.
क्रमश :
********
मेघा रवीला आपल्या मनातील भावना सांगू शकेल का? कळण्यासाठी वाचत राहा, कथामालिका.
अधीर मन झाले!

पुढील भाग लवकरच.

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*********

* साहित्यचोरी गुन्हा आहे *


🎭 Series Post

View all