अधीर मन झाले!
भाग -सहा.
नेहाने मेघाला प्रेमाने मिठी मारली.
"नौटंकी, किती छळलेस यार मला. मला तर वाटलं होतं की रवी तुला खरंच आवडत नसेल." मेघा तिला फटका देत म्हणाली. दोघींच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.
******
आज नेहासमोर मन मोकळे करताना किती आनंदी होती ती! आपल्या मनातील गोड भावना कुणाजवळ तरी व्यक्त करत आहे हेच तिच्यासाठी आनंददायी होते. नेहाने म्हटल्याप्रमाणे आता लवकरात लवकर रवीला सांगणे आवश्यक होते.
'तू परत येशील तेव्हाच सांगू शकेल ना मी? का एवढा उशीर करतो आहेस? तुझी कुणीतरी एवढ्या आतुरतेने वाट बघतेय हे तुला कळत नाहीय का रे? ये ना लवकर.' ती डोळे मिटून बसली होती.
'तुझी आठवण झाली की मन भरून बघावं असा साधा एक फोटोही नाहीये माझ्याकडे.'
डोळे मिटून त्याचा चेहरा ती डोळ्यासमोर आणत होती. मन:पटलावर एकच चित्र उमटत होते, बेधुंद बरसणारा पाऊस आणि त्यात भिजलेला तो! पावसासारखाच.. बेधुंद!
एका ओळखीच्या गंधाने तिचा श्वास भरून आला. मिटल्या डोळ्यानेच तिने तो गंध नासिकेत पुन्हा भारून घेतला.
'अरे, हा तर मृदगंध!' तिने खाडकन आपले नयन उघडले. मृगाच्या पहिल्या पावसाच्या स्पर्शाने मोहरलेली धरती आपला गंध सगळीकडे पसरवत होती. मेघा उठून खिडकीत आली. एव्हाना बाहेर पाऊस येतोय हे तिला कळले होते. तिने हात खिडकीबाहेर काढला. रिमझिम वर्षावणारे दोन-चार थेंब तिच्या हातावर येऊन विसावले.
'वेडीच आहे मी. अजून पावसाला सुरुवातही झाली नव्हती आणि त्याच्या आठवणीत उगीचच स्वतःला दाह करून घेत होते. हा दरवळणारा मृदगंध, हे हातावर विसावलेले थेंब लवकरच तो येणार याचा संदेश तर देत नाहीयेत ना?'
"आई, अगं काय हे? परत शिंकते आहेस तू." तेजस्विनी आत येत म्हणाली. हातात वाफाळलेला चहाचा कप होता.
"काय गं आई, अजूनपर्यंत कपडे न बदलता तशीच आहेस तू? तुझ्या अशा हट्टीपणामुळेच तुला त्रास होतो, माहितीये ना?"
चहाचा कप बाजूला ठेऊन तेजुने कपाटातून मेघाचे कपडे काढले. बाजूलाच असलेल्या बाबाची वर्दी बघून काय झाले असेल, ते ती समजली. त्या वर्दीवरून तिने अलवार हात फिरवला.
"बाबा, असा आपल्या माणसांना त्रास नसतो रे द्यायचा." ती हलकेच पुटपुटली.
मेघाचा हात हातात घेऊन ती गॅलरीत आली.आता पाऊस थांबला होता. सगळीकडे एक स्वच्छ वातावरण दिसत होते. तिने मेघाच्या हातात चहाचा कप दिला.
"आई, ही सृष्टी बघ, पावसात न्हाऊन किती स्वच्छ झालीय. सगळे कसे एकदम स्पष्ट दिसते आहे. आपल्या मनाचे तसे का नसते गं? कितीही प्रयत्न केला तरी काही गोष्टी आपला पाठलाग का करत राहतात? त्या आठवणी विसरून स्वच्छ दृष्टीने आपण परत नव्याची सुरुवात का करू शकत नाही?" चहा पीत तिने विचारले.
"करू शकतोच की. का नाही? आपल्या डोळ्यावरच्या चष्म्यावर जमा असेलल्या धुळीमुळे बाहेरचे स्वच्छ वातावरण सुद्धा दूषित दिसतेच ना? तसेच काहीसे आपल्या मनाचेही आहे. आपले मन:चक्षु आधीच पूर्वग्रहाच्या धुळीने माखले असतील तर नवी सुरुवात कशी होईल ना?" तिच्याकडे बघून मेघा म्हणाली.
"कसलं भारी समजावतेस यार. आता ना माझे व्हिजन थोडे थोडे क्लिअर होत आहेत." टेबलवर कप ठेवत तेजस्विनी.
"तेजू, तुझी आई हाडाची शिक्षिका आहे हे विसरलीस का?" मेघाने किंचित हसून विचारले.
"नाही गं आई, तू तर माझी सगळ्यात फेवरेट टिचर होतीस, तुला मी बरे विसरेन?" तिच्या गालाला गाल घासत तेजस्विनी म्हणाली.
"आईला मस्का लावतेस होय. आणि कसल्या व्हिजन बद्दल बोलते आहेस?" तिच्या गालाला हात लावत मेघा.
"माझ्या मन:चक्षुवरची उरलेली जळमटं तर पूर्ण निघू दे. सगळं अगदी क्लिअर झाले की पहिल्यांदा तुलाच सांगेन मी." तेजस्विनी चहाचे रिकामे कप आत घेऊन जात म्हणाली.
'तेजू, अगदी तुझ्या बाबासारखी आहेस गं तू. त्यालाही सगळं कसं परफेक्ट लागायचं. कोणतीही गोष्ट स्वतःच्या मनाशी पक्के केल्याशिवाय तो कोणालाच काही सांगायचा नाही. मलाच काय, त्याच्या जीवाभावाच्या मित्रालासुद्धा सांगायचा नाही. आयुष्याचा तेवढा मोठा निर्णय पक्का झाल्याशिवाय त्याने कुठे दादाला सांगितला होता? हेच नाही तर निकालाच्या दिवशी तो कुठे होता हे तरी कोणाला कुठे माहिती होते?'
"मेघा, अशी रात्रीची खिडकीबाहेर हात काढून काय करतेस?" पावसाचे थेंब हातावर घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या मेघाकडे बघून आकाश विचारत होता.
त्याच्या मनातील रवीचा विचार त्याला खोलीबाहेर घेऊन आला होता नि तेव्हाच मृगाच्या पहिल्या पावसाला सुरुवात झाली होती. नेमकी त्याच वेळी त्याला मेघा खिडकीत दिसली.
"काही नाही रे, सहजच. गुडनाईट!" गोड हसून ती उत्तरली.
दुसऱ्या दिवसापासून आकाशच्या कॉलेजमध्ये रोजच्या फेऱ्या सुरु झाल्या. एकदातरी रवी भेटेल हे मन सांगत होते आणि तिसऱ्या दिवशी खरेच रवी त्याच्या समोर उभा होता.
"काय टॉपर? आम्हाला तर विसरूनच गेलात की? कुठे गहाळ झाला होतात इतके दिवस?" काहीशा उपरोधिक स्वरात त्याने रवीला विचारले.
रवी केवळ हसला. त्याचे ते मंद हसणेही आकाशचा राग शांत करायला पुरेसे होते.
"काही नाही रे मित्रा, होस्टेल सोडले नि परत आपल्या मूळ ठिकाणी गेलो. पण तिथे आता फुकट कसा राहणार ना? मग सकाळी पेपर टाकायला जात होतो. निकालाच्या दिवशी येणारच होतो, की तिथल्या एका छोट्याची तब्येत बिघडली. त्याचा दवाखाना करण्यात दोन दिवस गेले. आमच्या आश्रमात सर्वात मोठा आहे ना मी, मग थोडी तरी जबाबदारी घ्यायला लागेल ना?" तो सांगत होता.
"मित्रा, खरंच ग्रेट आहेस यार तू! आय रिअली प्राऊड ऑफ यू." आकाश ने त्याला मिठी मारली.
"बरं, चल गाडीवर बस. घरी जाऊया." आकाश.
" नको यार, घरी नको. हवे तर बाहेर चहा पिऊया." रवी म्हणाला.
"चहा पीत बोलूया?" रवी.
दोघे जवळच्याच एका छोटेखानी उपहारगृहात गेले.
"म्हणूनच नको म्हणतोय. हे असं वाट पाहणं माझ्या नशिबी नव्हतेच कधी. आताही नको. " तो शांतपणे बोलत होता. त्याच्या मनात काहीतरी गडबड आहे हे आकाशला कळत होते.
"काय बोलतोस तू? तुला कोणी काही म्हणालं का? आई काही बोलली का?" आकाशने विचारले.
"नाही रे. हे मीच स्वतःला ठणकावून सांगितलेय, आता परत तुझ्या घरी नको म्हणून." बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी तरळले.
"प्रकरण काहीतरी गंभीर दिसतेय. मला कळेल असं नीट बोल ना." त्याच्या हातावर हात ठेऊन आकाश.
रवी हसला, खिन्नसा. "आकाश, तू मित्र आहेस माझा. तुझ्याशिवाय माझ्या मनातले कोणाला सांगू? पण हे कसे सांगायचे ते कळत नाहीये. तू चिडणार नाहीस ना?" रवी.
"आता स्पष्ट बोलला नाहीस तर मात्र फटके पडतील हं." काहीसा त्रागून आकाश.
"आकाश, मेघा माझ्यात गुंतलीय रे." एक लांब श्वास घेऊन रवी म्हणाला.
"हात्तीच्या! एवढंच ना. अरे मेघाच काय, मी, आई, बाबा सगळेच तुझ्यात गुंतलोय. फॅमिली मेंबर वाटतोस तू आम्हाला." आकाश हसून.
"होय. माहीत आहे मला. फॅमिली म्हणजे काय असते हे तुमच्याकडे आल्यावरच तर पहिल्यांदा मला समजले. पण तुला कळत नाहीये, मेघाचे माझ्यात गुंतणे वेगळे आहे. ती प्रेमात पडली आहे रे माझ्या."
तो म्हणाला. त्याच्या डोळ्यात झळकणारे भाव सच्चे भासत होते. ते बघून आकाश काही क्षण स्तब्ध झाला.
"काही काय बोलतोस? मला कसे कळले नाही? लहान आहे रे ती. त्या नकट्या नेहासोबत राहून थोडी खोडकर जरूर झालीय. पण हे प्रेमात पडणं वगैरे.. छे! शक्य नाही रे." आकाश.
"तुझी जुळी बहीण आहे ती. लहान नाहीये. नेहाचा विषय निघाला म्हणून बोलतो, नेहाला तू आवडतोस हे तुला कळत होतं ना? तुझ्याही मनात ती आहेच हे ठाऊक आहे मला. आकाश, दोस्ता, माणसांच्या नजरेची पारख आहे रे मला."
रवी बोलत होता. आकाशच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते.
"अच्छा! म्हणजे एकंदरीत तुझं मत आहे की मेघाचे तुझ्यावर प्रेम आहे. मला सांग तुला तिच्याबद्दल काय वाटतं?" आकाश रवीला विचारत होता.
.
.
क्रमश :
********
रवीचे उत्तर काय असेल? मेघाच्या मनातील कळल्यावर आकाश कसा वागेल? ह्या प्रश्नांची उत्तरे कळण्यासाठी वाचत रहा कथामालिका, अधीर मन झाले!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा