Login

अधीर मन झाले! भाग -९

मुसळधार पावसातील ओलीचिंब प्रेमकथा!


अधीर मन झाले!
भाग -नऊ.


आकाश मेघाकडे बघून गालातल्या गालात हसत होता.

"तू का हसतो आहेस?"  ती.


"तू मध्येच कशी आलीस?"   तो.

"सहजच! पण तू का हसतोस ते सांग ना."  ती.

"तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे."  तो.

"कसले?"

"सरप्राईज माझ्या खोलीत आहे, तू आत जाऊन बघ तरी." त्याच्या चेहऱ्यावरचे मिश्किल हसू तसेच होते.


"नकोय तुझे सरप्राईज. आधी आईच्या हातचे गरमागरम पोहे खाऊ दे. सात दिवसानंतर ह्या पोह्यांची चव चाखणार आहे मी."  ती स्वयंपाकघराकडे जात म्हणाली.


"तुझी मर्जी!  मग मात्र म्हणू नकोस की, इतकी वर्ष वाट पाहिल्यानंतर, दादा मला दहादा सांगत असतानाही केवळ एक प्लेटभर पोह्यांच्या मोहापायी आयुष्यातील एका सुखद आश्चर्याच्या क्षणाला मी कायमची मुकले." तो पुन्हा मिश्किल हसला.


"काय म्हणायचे आहे तुला?"  ती साशंकतेने त्याच्याकडे पाहत म्हणाली.

आकाश हसून खांदे उडवत टीव्ही सुरू करून सोफ्यावर बसला.

तिचे स्वयंपाकघराकडे जाणारे पाय आपोआप आकाशच्या खोलीकडे वळले. एका अनामिक ओढीने हृदयी हुरहूर दाटून आली होती.

********

आंघोळीनंतर रवीच्या शरीराला थोडी तरतरी आली होती, मन मात्र अजूनही मेघाच्या आठवणीत झुरत होते. आरशासमोर केस विंचरत तो उभा होता, मनात मेघा ठाण मांडून होती. तेवढ्यात त्याला आरशात तिचे प्रतिबिंब दिसले.


"मेघा, बघ. आता मला तुझे भासदेखील व्हायला लागलेत."  तो खिन्नपणे हसत म्हणाला.


"केव्हा आलास तू?"   तिचा कातर स्वर त्याच्या कानात झिरपत होता.


"वेडू, तुझ्या होणाऱ्या भासासोबतच तुझा आवाजदेखील मला यायला लागलाय गं." त्याचाही स्वर दाटून आला.

ती आता गप्पच होती. तिथल्याच टेबलला रेलून आरशातल्या रवीला डोळे भरून ती साठवू पाहत होती.


तिच्या स्वप्नातील राजकुमार आज तिच्यासमोर होता आणि त्याला मात्र अजूनही तो आभास वाटत होता. नव्याने चढलेल्या तेजाने त्याचे सावळे रूप आणखी खुलून दिसत होते. ती आश्चर्यमिश्रित नजरेने अनिमिषपणे त्याला न्याहाळत होती. हृदयाची ठाव घेणारी त्याची काळीभोर नजर तिच्या नजरेला भिडली अन डोळ्यातील थेंब आपसूकच गालावर ओघळले.


"मेघा, रडू नकोस ना गं प्लीज." आपल्या आभासी जगातून गर्रकन माघारी वळून तो म्हणाला.


"रवी कुठे होतास तू? मला सोडून जाताना एकदाही भेटावंस वाटलं नाही का रे? कुठे होतास इतकी वर्ष? तुझ्याशिवाय मी कशी असेन हा विचारही तुझ्या मनाला शिवला नाही का?" तिच्या डोळ्यातील धारा आता चांगल्याच वाहू लागल्या होत्या.


"मेघा? तू खरेच इथे आहेस?" रवी तिच्याकडे बघतच राहिला. ती पूर्वीची अल्लड, निरागस मेघा जराशी मोठी झाली होती. आधीच सुंदर, आता यौवनात पदार्पण केल्यामुळे अधिकच देखणी दिसत होती.
डोळ्यात जमा झालेले मेघ, तिचा तो मनाला मोहवणारा चेहरा.. बघताच त्याची पुन्हा विकेट पडली. तिच्या गालावर ओघळलेले टपोरे थेंब पुसायला त्याचे हात सरसावले नी लगेच तिचे लग्न झालेय हे आठवले.

"मेघा, तुझ्या नव्या आयुष्यासाठी खूप खूप अभिनंदन! लग्न झालेय ना तुझे? मग एकटीच?" ओठावर उसने हसू आणून त्याने तिला शुभेच्छा दिल्या.


"माझ्या लग्नाचे सोड, आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. कुठे होतास इतकी वर्ष?"
तिचे गौरवर्णी नाक लाल झाले होते.


" मेघा प्लीज, अशी चिडू नकोस ना. अगं, मी एन.डी.ए.ला ऍडमिशन घेतली होती. गेली चार  वर्ष तिथेच होतो."   तो सांगत होता.


"आणि एकदा मला भेटून सांगावं असे सुद्धा तुला नाही वाटले ना? किती रे दुष्ट तू." तिचे स्फुंदणे चालूच होते.
बोलता बोलता तिचा टेबलवरच्या त्याच्या पाकिटाला धक्का लागून त्यातील तिचा फोटो खाली पडला. तिला तो दिसू नये म्हणून शिताफीने त्याने तो उचलला.

"बघू, माझ्यापासून काय लपवतोस ते?" त्याच्या हातून फोटो तिने हिसकावून घेतला.
स्वतःचा फोटो बघून तिच्या ओठावर हसू आणि डोळ्यात परत आसू जमा झाले.

"हे तुझ्याजवळ कुठून आले?"


"तुझी आठवण म्हणून मी जपून ठेवले होते." तो काहीसा चाचरत बोलला. त्याच्या बोलण्याने तिच्या डोळ्यातील थेंब गालावर ओघळले.

"मेघा, अशी सारखी डोळ्यात पाणी नको आणू ना, मला बघवत नाही ते."


"तुला काय फरक पडतो?"  ती.


"फरक पडतो. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक थेंब माझ्यासाठी अनमोल आहे स्टुपिड. तुला नाही कळणार." त्याने तिच्या गालावर ओघळलेले थेंब अलवारपणे पुसले.


"मग सांग ना समजावून, मला कळू तरी दे ना." ती त्याच्या आणखी जवळ येत म्हणाली.

कुठून सुरुवात करावी, काय बोलावे ते त्याला कळेना. इतकी वर्ष त्याला तिला हे कळू द्यायचे नव्हतेच. आत्ताही तो गप्प झाला.

"तुला नसेल काही बोलायचे तरी मला बोलायचे आहे. माझे मन तुझ्यासमोर रिते करायचे आहे." त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली.

"मेघा." त्याच्या मुखातून एक अस्पष्ट हाक आली.

"आज मी जर नाही बोलले ना रवी, तर कदाचित कधीच सांगू शकणार नाही. जेव्हा तुला पहिल्यांदा भेटले तेव्हाच तुझ्या या काळ्याभोर डोळ्यात मी पुरती अडकले रे. त्यानंतरच्या प्रत्येक भेटीत मी आणखीनच तुझ्यात गुंतत गेले. जेव्हा वाटले की आता तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही, त्याच वेळी तू मला न सांगता निघून गेलास." तिचा स्वर भिजला होता.


"मेघा, अगं ते वयच तसे असते. कोणाबद्दलही लगेच आकर्षण वाटून जाते. आता गोष्टी बदलल्यात. तुझे लग्न झालेय." तो मागे सरत म्हणाला.


"लग्न -लग्न काय लावलेस रवी? एकवार नीट बघ तरी माझ्याकडे. मला बघून तुला खरेच असे वाटतेय का की माझे लग्न झालेय?"   ती.

त्याने तिच्याकडे निरखून पाहिले. तिच्या अंगावर लग्नाची एकही खुण दिसत नव्हती. तो जरासा गोंधळला.

" रवी, आपल्या आवडत्या मुलाशी लग्न करण्याचे जवळपास प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. माझेही आहेच. माझ्या स्वप्नातील राजकुमार माझ्यासमोर उभा आहे. आज मी त्याला विचारतेय, करशील माझ्याशी लग्न?" त्याच्या डोळ्यात बघत तिने विचारले.


तिच्या अशा सरळसरळ विचारण्याने काय बोलावे ते त्याला सुचेना. त्याचे ते गप्प असणे मेघाला बोचत होते.



"रवी मला माहितीये की तुलाही माझ्याबद्दल तेच वाटते जे मला तुझ्याबद्दल वाटते. तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतेय ना मला. तू बोलत नसलास तरी तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहचल्यात. मला फक्त तुझे उत्तर हवेय आणि तेसुद्धा आत्ताच."


"मेघा, प्लीज कसलाच गैरसमज करून घेऊ नकोस. मी तुझ्याशी लग्न नाही करू शकणार." तो आपली नजर टाळत म्हणाला.


"आणि तुझ्या नजरेत झळकणारे माझ्याबद्दलचे अफाट प्रेम? हे सुद्धा गैरसमज आहे का?" त्याने मौन धारण केलेले बघून ती जायला वळली.


तिच्या डोळ्यातील मेघ रिते व्हायला सुरुवात झाली होती.


"मेघाऽ, अशी चिडून जाऊ नकोस ना." तिचा हात पकडत तो म्हणाला.

"कोण कुठला अनाथ मुलगा मी. प्रेमाची माणसं कशी असतात हे सुद्धा ठाऊक नव्हते गं मला. तुमच्या कुटुंबाने मला आपल्यात समावलं त्याचे ऋण कसे फेडू हेही मला कळत नाही. जेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम दिसले तेव्हा मला किती आनंद झाला म्हणून सांगू? जी मुलगी मला आवडते तिला मीसुद्धा आवडतो ही फिलिंग किती भारी होती. माझ्या विराण आयुष्यात तुझ्या रूपाने मेघ बरसले आणि मी त्या प्रेमात वाहून गेलो. परिस्थितीने लगेच मला आकाशातून जमिनीवर आणले.
मेघा आपले मार्ग निराळे आहेत. माझ्यासोबत तुझे काहीच भविष्य नाहीये गं."  बोलताना तो हळवा झाला होता.


"ते तू ठरवणारा कोण रे?"  तिने त्याच्या ओठांवर आपले बोट ठेवले. "रवी,तुझे प्रेम आहे माझ्यावर हे ऐकायला केवढी वर्ष वाट पाहायला लावलीस. हे प्रेम पुरेसे आहे रे मला. तुझ्याशिवाय जगण्याची मी कल्पनाही करू शकत नाही." त्याच्या डोळ्यात डोळे घालून ती बोलत होती.


"तेच मी सांगतोय ना मेघा, तू.."

"शू ऽऽ! काही बोलू नकोस ना." त्याच्या मिठीत शिरत ती म्हणाली.

आजवर तो फक्त फोटोतल्याच तिच्याशी बोलत होता. आज प्रत्यक्षात तिच्यासमोर आपल्या भावना त्याने व्यक्त केल्या होत्या. ती त्याच्या एवढया जवळ, त्याच्या मिठीत विसावली होती. त्याने तिच्या केसावरून अलगद हात फिरवत आपले डोळे मिटून घेतले.

'मेघा, नको गं इतकं प्रेम करू. माझी प्रखरता तुला सोसवणार नाही गं.' त्याच्या डोळ्यातील मोत्याचे थेंब तिच्या केसावर विसावले.


"हॅलो लव्हबर्ड्स! मी सुद्धा घरीच आहे म्हटलं. तुमच्याइतकेच माझेही तुमच्यावर प्रेम आहे बरं का." आकाश आत येत त्यांच्या मिठीत शिरत म्हणाला.


"माझं लग्न झालंय हे याला तू बोलला ना?" आकाशला फटका देत मेघा म्हणाली.


"अगं घरी लग्नाचा विषय निघाला की तूच म्हणतेस ना की तुझ्या शाळेशी तुझं लग्न झालंय म्हणून? म्हणून मी त्याला बोललो. आता त्याने मला विचारलेच नाही की कुणाशी लग्न झालेय तर मी काय सांगणार ना?" तो मिश्किल हसत होता.


"आपल्या होणाऱ्या जीजूला असे कोणी छळतो का रे?" त्याचा कान पिळून ती म्हणाली.


"ओये, तसं बोललो नसतो ना तर हा घरी आलाच नसता. हो ना हो जीजू?" रवीची खेचत आकाश म्हणाला.


"तुम्ही दोघे बहीणभाऊ अगदीच टू मच आहात हं." गालात हसत रवी बाहेर निघाला.


"रवी द ग्रेट चक्क लाजतोय? असे मी आजवर तरी बघितले नव्हते हं." आकाश त्याला चिडवत बाहेर आला.


मेघा तिथेच उभी होती. त्याच्या उबदार मिठीतील क्षण परत परत अनुभवावे असे वाटत होते. चेहऱ्यावर फुललेल्या गुलाबाने तिचे गोबरे गाल आणखीनच गुलाबी झाले होते.

*******


"आई ऽ" तेजूच्या आवाजाने मेघा पुन्हा वर्तमानात आली.

"एकटी एकटी काय हसतेस गं? मलाही बाबांच्या गमती सांग ना." ती मेघाच्या जवळ येत म्हणाली.


"तुला कसं कळलं गं बाबाला आठवून हसतेय ते?"  स्मित करून मेघा.


"तुझ्या रवीची तेजा आहे मी. तुझ्या मनात काय चालले ते लगेच ओळखते." मेघाच्या गळ्यत हात टाकून तेजस्विनी उत्तरली.


"हो, बाबासारखीच तर आहेस. सीक्रेटिव्ह. अगदी आतल्या गाठीची."  तिच्या गालाला गाल घासत मेघा म्हणाली.


"आई, अशी गं काय म्हणतेस. तुझीच लेक आहे ना मी."  ती लाडात आली.


"मग तुझ्या मन:चक्षुवरची उरलेली जळमटं निघाली की नाही? तुझ्या मनात काय चाललेय मला कुठे सांगितलेस." लटके रुसून मेघाने गाल फुगवले.


"आई, किती गं गोड रुसतेस! बाबाला तुझा हा लटका राग घालवायला खूप मजा येत असेल ना?"   ती.


"विषयांतर नको हं." मेघा.


"नाही गं आई, विषयांतर नाही. माझी लाडकी आई आहेस तू. माझ्या मनातील सर्वात आधी तुलाच सांगेन ना. फक्त माझी बारावीची एक्झाम आटोपून रिझल्ट तेवढा येऊ दे." तेजूच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती.


"तेजू, कुणाच्या प्रेमात वगैरे पडली नाहीस ना? तुझ्याचएवढी असताना मी प्रेमात पडले होते बरं."  मेघाने प्रतिप्रश्न केला.


"हं, तसेच काहीसे समज." तिच्या गालावर आपल्या ओठांची मोहर उमटवत तेजू गोड हसली.

" डिअर ममुडी, वेट फॉर ओन्ली फोर मन्थ्स. त्यानंतर तुला सगळे सीक्रेट्स सांगेल."  तिने आपले डोळे मिचकावले.

"चल जेवण करूया. मी पानं घेतली आहेत. माझ्या हातची चव चाखून बघ तरी." तेजू मेघाला आत घेऊन गेली.

.
.
क्रमश :
******
काय असेल तेजूचे सीक्रेट? कसा असेल मेघा आणि रवीच्या लग्नाचा प्रवास? कळण्यासाठी वाचा कथामालिकेचा पुढील अंतिम भाग.

******
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )

       *साहित्यचोरी गुन्हा आहे.*

            *********


🎭 Series Post

View all