अधीर मन झाले!
भाग -सात.
"तुझी जुळी बहीण आहे ती. लहान नाहीये. नेहाचा विषय निघाला म्हणून बोलतो, नेहाला तू आवडतोस हे तुला कळत होतं ना? तुझ्याही मनात ती आहेच हे ठाऊक आहे मला. आकाश, दोस्ता, माणसांची पारख आहे रे मला."
रवी बोलत होता. आकाशच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते.
"अच्छा! म्हणजे एकंदरीत तुझं मत आहे की मेघाचे तुझ्यावर प्रेम आहे. मला सांग तुला तिच्याबद्दल काय वाटतं?" आकाश रवीला विचारत होता.
"रागावणार नसशील तर खरं सांगू? माझाही जीव तिच्यावर जडलाय रे. तिची सोबत मलासुद्धा हवीहवीशी वाटते." रवी अगदी मनापासून बोलत होता.
आकाशच्या चेहऱ्यावर राग जमा झाला होता. तो आवेशाने उठून उभा राहिला. तो आता काय करेल या विचारात असतानाच त्याने हसून रवीला कडकडून मिठी मारली.
"मित्रा, दोघेही एकमेकात गुंतले आहात तर अशी पळवाट का काढतो आहेस? घरी यायला का टाळाटाळ करत आहेस." आकाश मिठी मारूनच बोलत होता.
"माझे म्हणणे तुला कळले नाही रे. मला मेघा आवडते हे तिला कुठे माहिती आहे? आणि मुळात मी तिच्या लायकीचा नाही रे. तुझी इतकी छान आनंदी फॅमिली. आणि कुठे मी एक अनाथ मुलगा. कसा मेळ जमेल, तूच सांग ना?"
बोलतांना त्याचा स्वर हळवा झाला होता.
बोलतांना त्याचा स्वर हळवा झाला होता.
"असे काही नसते रे. आमच्या तरी घरी असा कुणी विचार करणारे नाहीत. तरी तुला तसे वाटत असेल तर इतर मार्ग आहेत ना. तुला एवढे चांगले मार्क्स मिळालेत. मी मेडिकलला जाणार आहे तुसुद्धा तिथे ऍडमिशन कर. एकदा डॉक्टर झालास तर तुला काही बोलायची कुणाची काय बिशाद?" आकाश.
"माझी स्वप्न थोडी वेगळी आहेत रे. माझी जन्मदात्री कोण हे मला ठाऊक नाही. पण माझी जन्मभूमी प्रिय आहे मला. माझे पुढचे जीवन त्यासाठीच अर्पण करायचे आहे." रवी त्याला सांगत होता.
"म्हणजे?" आकाश.
"म्हणजे मला देशसेवेचे व्रत घ्यायचे आहे. मी एन.डी.ए. ची प्रवेश परीक्षा पास झालोय." आपला एन.डी.ए. चा निकाल त्याच्यासमोर ठेवत रवी म्हणाला.
"अरे, डॉक्टर बनूनही देशसेवा करू शकतोस की." इति आकाश.
"हो, पण मला लहानपणपासून वाटायचं की सीमेवर लढणारा सैनिक हाच खरा हिरो असतो. तो हिरो बनण्याचे स्वप्न मी पाहिले होते. ते स्वप्न पुरे करायची हीच संधी आहे. मेघाला कसली आशा दाखवून आयुष्यभरासाठी दुखवायचे नाहीये रे. आकाश, एक मित्र म्हणून सांग, मी चुकीचा वागतोय का?"
तो हळवा झाला.
"काय चूक काय बरोबर, ते मला काही माहिती नाही. तू आधी घरी चल." आकाश इरेला पेटला होता.
"नाही आकाश, भावनेच्या भरात घेतलेला निर्णय हा प्रत्येकवेळी योग्य असतोच असे नाही रे. मी घरी आलो तर मेघा परत माझ्यात अडकेल. माझ्यामुळे तिला त्रासात नाही बघू शकणार रे मी."
त्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.
"आणि तुझ्या त्रासाचं काय?" त्याच्या पाणीदार डोळ्यात बघत आकाश.
"मला कसला त्रास? तिच्या आठवणीत मी माझं उर्वरित आयुष्य आरामात जगू शकेल. मेघा खूप हळवी आहे रे. मी नजरेसमोर नसेन तर कदाचित विसरून देखील जाईल. माझ्यापेक्षा एखादा चांगला मुलगा नक्कीच तिच्या नशिबात येईल. आयुष्यात तिने फक्त खूष राहावे एवढीच अपेक्षा आहे." डोळ्यातील पाणी पुसत रवी म्हणाला.
काय बोलावे ते आकाशला काही कळत नव्हते. त्यानं रवीला एक घट्ट मिठी मारली.
"आकाश, माझ्यासाठी एक करशील? मी काय करतोय हे तिला सांगू नकोस. तिला माझ्या कोषातून बाहेर काढायला मदत कर. एक मित्र म्हणून एवढं करशील ना माझ्यासाठी? आपण भेटलोय हे सुद्धा सांगू नकोस. तसेही कदाचित ही आपली शेवटची भेट असेल असे समज." रवी हळवा होत म्हणाला.
"काहीही काय बोलतोस? माझ्याशी का नातं तोडतोस तू?" आकाश.
"तसे नाही रे. आता पुढच्या महिन्यापासून माझी ट्रेनिंग सुरु होईल. त्यानंतर तीन वर्ष ना सुट्टी ना बुट्टी! नंतर एक वर्ष आय.एम.ए चे प्रशिक्षण असेल म्हणून म्हणतोय. चल, आता निघायला हवे. छोटयाचे औषध घेऊन जायचे आहे." म्हणत रवी उठला. जाताना त्याने आकाशला एक प्रेमळ आलिंगन दिले.
काय होते त्या आलिंगनात? एका प्रेमाची कबूली, मैत्रीवरचा विश्वास. मेघासाठी असलेले आसुसलेपण, तिच्याप्रती झालेला हळवा क्षण!
आकाशच्या मिठीतून बाहेर येत मागे वळून न बघताच रवी निघून गेला. त्याला थांबवावे असे आकाशला वाटत होते, पण तो थांबणार नाही हेही त्याला माहीत होते.
जेष्ठातील बरसणाऱ्या मृगसरींनी तप्त धरती जराशी तृप्त होत असतानाच पुन्हा त्या सरी बरसायच्या थांबल्या अन त्यानंतरच्या दाहाने अंगाची लाही लाही होऊ लागली. मेघाचेही तसेच झाले होते. रवी परतेल ही आशा मनात असताना त्याची येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नव्हती.
"आकाश दादा, रवी खरेच येणारच नाही का रे? मग त्याच्या निकालाचे काय? पुढील शिक्षणाचे काय?" ती आकाशला विचारत होती.
रवीबद्दल कितीही टाळाटाळ केली तरी मेघा आपले प्रश्न घेऊन त्याच्यासमोर हजर होती.
"अगं, त्याचा निकाल तो घेऊन गेलाय. आणि पुढे शिकण्याबद्दल त्याचेही काही प्लॅन्स असतीलच ना? तू कशाला काळजी करतेस." आकाश.
"तू भेटलास त्याला?" तिने त्याच्याकडे नजर रोखत विचारले.
"नाही गं. ते आपलं सहज बोललो." नजर चोरत आकाश.
"म्हणजे भेटलास ना तू त्याला?" तिने पुन्हा तोच प्रश्न केला. प्रश्नात एक जरब होती.
तो गप्पच होता.
"बोल ना? गप्प का आहेस? त्याला भेटलास नि साधं मला सांगितले सुद्धा नाहीस." तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले.
"मेघू, अगं तू का रडतेस? आणि त्याच्यासाठी तुझा जीव का एवढा उतावीळ होतोय?" तो.
"जन्माला यायच्या आधीपासून आपण एकत्र वाढलो ना? तरी माझ्या मनातलं तुला कळू नये?" ती डोळे पुसत उठली.
"रडूबाई, थांब जरा. तुझ्या डोळ्यातील पावसाला थोपव आणि सांग, काय चाललंय माझ्या रडोबाच्या मनात? कोणीतरी वसलंय का तिच्या पिटुकल्या हृदयात?" तिच्या डोळ्यात प्रेमाने बघत त्याने विचारले.
त्याच्या तशा विचारण्याने ती खुदकन हसली. थोडावेळ थांबून मग ती म्हणाली,
" दादा, तुला आठवते, मी जे मागेन ते देण्याचे तू मला प्रॉमिस केले होतेस? आज मला काही मागायचे आहे. "
"मग बोलना, तुझ्यासाठी काहीही." हसून तो.
"तुझा मित्र हवाय मला. आयुष्यभराचा सोबती म्हणून. देशील?" ती.
डोळ्यात थोपवलेला पाऊस पुन्हा सुरु झाला.
"दिला. पण त्यानं तुझ्याऐवजी दुसऱ्या कुणालाच प्राधान्य दिले तर?" तिच्या हातावर हात ठेवून आकाश.
"एकवार त्याच्या तोंडून मला हे ऐकू तर दे. त्याच्या मार्गातून मी स्वतःच दूर निघून जाईन." ती शांतपणे म्हणाली.
त्याने तिला आपल्या मिठीत घेतले.
"मेघू, तो कुठेही असला तरी तुझे हे निःस्वार्थ प्रेम नक्कीच त्याला तुझ्याकडे खेचून आणेल. हा माझा शब्द आहे तुला." तो तिच्या केसातून हात फिरवत होता.
"थँक यू दादा!" ती एखाद्या लहान मुलीसारखी उड्या मारत तिथून निघून गेली.
'मेघू, भावनेच्या भरात काय बोलून बसलो मी? रवी परत येणार नाही हे स्पष्टच बोलला होता. तरी मी असा शब्द कसा दिला?' मनातल्या प्रश्नाने त्याचा गोंधळ उडत होता.
'कोणते नाते निभावू मी? रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या मित्रप्रेमाचे नाते की एकाच नाळेने जुळलेल्या बहिणीच्या प्रेमाचे नाते?' मनातला गोंधळ वाढतच होता.
बाहेर टपोरे थेंब फेर धरू लागले होते. मृदगंध पुन्हा दरवळला होता.
त्याच्या मनाने कौल दिला एकाच बाजूने.. शुद्ध, निःस्वार्थ प्रेम!
आणि मग क्षणातच त्याचा सगळा गोंधळ नाहीसा झाला.
इतके दिवस हुलकावणी देणारा पाऊस आज पुन्हा बरसत होता. पावसाच्या आवाजाने आकाशने डोळे मिटून घेतले. मन अगदी शांत शांत झाले होते.
मेघाचे चित्त थोडे स्थिर झाले होते. रवीला नाही पण आकाश दादाला मनातील भावना सांगू शकल्याने एक हलके झाल्यासारखे तिला वाटत होते. चेहरा पुन्हा फुलला होता.
********
बारावी झाली आणि सर्वांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. त्याच शहरातील नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये आकाशने ऍडमिशन घेतली होती. मेघा डी. एड. करायला निघून गेली तर नेहा पदवीच्या अभ्यासासोबत पी. एच. डी. च्या तयारीत गुंतली.
पाठीवर आपली बॅग घेऊन सात एकर आवारात वसलेल्या इमारतीपुढे रवी उभा होता.
'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' म्हणजेच 'नॅशनल डिफेन्स अकॅडमी' खडकवासला - पुणे.
नाव वाचूनच त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गेल्या चार पाच वर्षापासून ध्येय म्हणजे काय हे कळायला लागले आणि आपण एन.डी.ए. लाच जायचे हे मनाने पक्के केले होते.
बारावीच्या परीक्षेनंतर एन.डी.ए. ची एंट्रन्स तो पास झाला होता पण खरा कस लागला होता तो दुसऱ्या टप्प्यात. संरक्षण सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना हा टप्पा पार करणे अनिवार्य असते, तो म्हणजे मुलाखतीचा. विविध निकषावर आधारित असलेली ही पाच दिवस चालणारी मुलाखत उत्तीर्ण होणे म्हणजे एक कसबच! रवी त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडला आणि खडकवासल्याच्या ह्या संस्थेत दाखल झाला. एवढा मोठा परिसर पाहून त्याचे डोळे दिपले. त्याच्या स्वप्नाच्या पूर्ततेची कसोटी आता सुरू होणार होती.
.
.
क्रमश :
.
क्रमश :
********
काय होईल पुढे? रवी आणि मेघा भेटतील का? कळण्यासाठी वाचत रहा कथामालिका, अधीर मन झाले!
पुढील भाग लवकरच.
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
********
* साहित्यचोरी गुन्हा आहे.*
* साहित्यचोरी गुन्हा आहे.*
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा