अधीर मन झाले!
भाग - चार.
तिला आठवला तिच्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेला तो खास पाऊस. मेघा आत तिच्या पाचव्या वाढदिवसाची तयारी करण्यात गुंतली होती. अचानक बाहेर पाऊस धो धो बरसायला लागला. पाच वर्षांची ती परी धावतच अंगणात आली. पावसात फेर धरून नाचायला लागली आणि काही क्षणातच कुणीतरी तिला घट्ट मिठीत घेतले. त्या पावसातही तिने ती ऊबदार मिठी लगेच ओळखली.
"बाबाऽऽ!" तिला कोण आनंद झाला होता!
"वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तेजा!" तिथेच तिचा मुका घेऊन त्याने तिला शुभेच्छा दिल्या.
तिने त्याच्याकडे पाहिले. आर्मीच्या वेशातील बाबा तिला आज सुपरहिरोच भासत होता. आधी कसलीच पूर्वकल्पना न देता आजच्या दिवशी अवचित तिच्या समोर तो उभा ठाकला होता.
"बाबा, तू अचानक कसा आलास? एकदम सुपरहिरोसारखा? आय एम सोऽऽ हॅपी!" तिने आनंदाने एक गिरकी घेतली.
" माझ्या प्रिन्सेसचा पाचवा वाढदिवस असेल आणि मी येणार नाही होय? सरप्राईज आवडले ना?" तिला कडेवर उचलून घेत तिच्यासोबत पावसात फेर धरत त्याने विचारले.
"खूप आवडले." तिचा आनंद ओसंडून वाहत होता.
"आईऽऽ" तिने जोरात आरोळी ठोकली.
"काय झाले गं?" म्हणून मेघा घाईतच बाहेर आली आणि समोरचे दृश्य पाहून आनंदाने तिच्या डोळ्यातील मोती गालावर आले. दोघे बापलेक देहभान विसरून पावसात भिजत होते.
"रवी? अरे, केव्हा आलास तू? आणि दोघेही असे पावसात काय नाचताय? चला आत या." ती तिथूनच म्हणाली. त्याच्या अशा अचानक येण्याने तिचा चेहरा मोहरून गेला होता.
"हो, हे सामान तेवढे घे ना." सामानाकडे इशारा करून तो म्हणाला.
मेघा सामान घ्यायला वळली तसे तिचा हात ओढून त्याने तिला आपल्याकडे खेचले. वरून फुटलेले ढग आणि खाली नखशिखांत भिजलेले तिघे! त्याच्या काळ्या डोळ्यात सारे विसरून ती हरवली. त्याला असे अचानक बघून आपण ओले होतोय याचे भान उरलेच कुठे होते? वर्दीतला तो तिच्या काळजात बसला होता. आणि तो? तब्बल वर्षानंतर घरी परतला होता. त्याची मेघा त्याच्या डोळ्यासमोर उभी होती. तिला किती बघू नी किती नाही, असे त्याला झाले होते.
तिच्या चेहऱ्यावरची त्याची नजर हटता हटत नव्हती. दोघेही एकमेकांच्या नजरेत गुंतले होते.
तिच्या चेहऱ्यावरची त्याची नजर हटता हटत नव्हती. दोघेही एकमेकांच्या नजरेत गुंतले होते.
"बाबाऽ, आईऽ तुम्ही मला विसरलात ना?"
दोघांना असे एकमेकांच्या नजरेत हरवलेले बघून तेजू बोलली.
दोघांना असे एकमेकांच्या नजरेत हरवलेले बघून तेजू बोलली.
"आमच्या या बर्थडे गर्लला आम्ही कसे विसरणार बरं?" रवी आणि मेघाने तिची गोड पापी घेतली.
इतक्या दिवसांनी अंगावर पाऊस झेलताना तेजस्विनीच्या नजरेसमोर बालपणीचे ते दृश्य जसेच्या तसे उभे राहिले. ओंजळीतील पावसाच्या थेंबात तिच्या डोळ्यातील दोन थेंब अलवार मिसळले. बाबा अजूनही अंगणात तसाच उभा आहे असे तिला वाटले. गॅलरीतून ती अंगणात आली. अंगावर कोसळणाऱ्या धारांत ती न्हाऊन निघाली होती.
बाबा गेल्यापासून किती वर्षांनंतर अंगणातल्या बरसणाऱ्या पावसात ती अशी अगदी चिंब चिंब भिजली. डोळ्यातील पाऊस तसाच सुरू होता, अविरत!
'पाय हे भाजले, अश्रुंच्या उन्हा
हाक दे, हात दे, श्वास दे पुन्हा.
बाबा बोल ना, बोल ना, बोल नाऽऽ
बाबा.
थांब ना रे तू बाबा.'
हाक दे, हात दे, श्वास दे पुन्हा.
बाबा बोल ना, बोल ना, बोल नाऽऽ
बाबा.
थांब ना रे तू बाबा.'
ती रडतच तिथे खाली बसली.
"बाबा आय मिस यू रे! का इतक्या लवकर सोडून गेलास मला?"
मिटल्या डोळ्यात ती आठवणीतल्या बाबाला साठवू पाहत होती. तिच्या खांद्यावर एक प्रेमळ हलका स्पर्श झाला. डोळे उघडून तिने पाहिले.. समोर मेघा होती. तेजस्विनी एकटक मेघाच्या डोळ्यात बघत राहिली. 'बाबाच्या ज्या प्रेमासाठी मी आसुसलेय तेच प्रेम तर आईच्या डोळ्यात ठासून भरलेय. आई आणि बाबा दोघांचाही माझ्यावर सारखाच जीव आहे ना? जर आईला माझ्यात बाबा दिसतो तर मग तिच्या प्रेमात मी बाबाला का शोधू नये?'
मनात आलेल्या विचाराने तिने मेघाला आवेगाने एक मिठी मारली.
"आई आय लव्ह यू गं!" ती भारावून म्हणाली.
"वेडं गं माझं कोकरू! आईवर तिच्या पिल्ल्याचं प्रेम आहे, हे का सांगावं लागतं? ते तर आपसूकच कळतं." मेघा तिला प्रेमानं कुरवाळू लागली.
" आता आत चल. पावसात जास्त भिजशील तर तब्येत बिघडेल." मेघा.
" थोडावेळ थांब ना गं. तब्येत नाही बिघडणार. बाबांची लेक आहे मी." तिच्या अंगावर पाण्याचे थेंब उडवत तेजू म्हणाली.
"कधी कधी अंगलट येतो बरं हा अतिविश्वास! तुझ्या बाबालादेखील असेच वाटायचे की पावसात भिजण्याने त्याला काही होणार नाही, पण तेव्हा आजारी पडला होताच की तो."
तिचे नाक खेचत मेघा.
तिचे नाक खेचत मेघा.
"हो, तेव्हा बाबाच्या अंगलट आलं होतं कारण त्याला तुझ्या आयुष्यात यायचं होतं. मी तर ऑलरेडी तुझ्या आयुष्यात आहेच ना. बघच तू, मला काहीच होणार नाही." तेजस्विनी हसून म्हणाली.
'हिच्या ओठांवरचं हसू किती गोड आहे! देवाने हिच्यात तिच्या बाबाची प्रत्येक लकब, प्रत्येक सवय अगदी जशीच्या तशी रेखाटली आहे. त्याच्या वाटेचं सर्व सुख हिच्या ओंजळीत टाकताना त्यालाच का आयुष्यातून हिरावले असेल?' मेघाच्या मनात दाटून आले.
बरसणाऱ्या पावसातसुद्धा तेजस्विनीने मेघाच्या मनातील भाव ओळखले. तिचे अश्रू पुसून ती तिला आत घेऊन आली.
"आई, आता रडायचं नाही. बाबा नसेल तरी तुझी लेक आहे ना? मी फ्रेश होऊन चहा टाकते. तुही लवकर कपडे बदल. तुझ्या प्रियकराचा हा आवडता पाऊस त्याला बाधत नसला तरी तुला बाधतो हे चांगलेच माहितीय मला."
तेजू फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेली.
तेजू फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेली.
मेघा आपल्या खोलीत कपडे घ्यायला कपाटापाशी आली. कपाट उघडताच तिची नजर आत टांगून ठेवलेल्या वर्दीवर पडली. ही तीच तर वर्दी होती जिच्या प्रेमात तो ठार वेडा होता. मेघावर त्याचे निस्सीम प्रेम होते पण तिच्यापेक्षाही त्याला त्याची वर्दी प्रिय होती. काकणभर जरा जास्तच!
तिने त्या वर्दीवरून हात फिरवला. डोळयांच्या पापण्या तिच्याही नकळत आपोआप मिटल्या. मन परत उडत उडत जाऊन पोहचले माहेरच्या त्या खोलीत, जिथे रवीने तिच्यापुढे मैत्रीचा हात समोर केला होता.
*********
मेघा आणि रवीच्या मैत्रीला सुरुवात तर झाली होती, त्या मैत्रीपूर्वीच तिच्या हृदयात 'समथिंग' वाजायला सुरुवात झाली होती. त्याचे काजळी काळे डोळे तिच्या काळजात घर करून गेले होते. तो घरी आला की त्याचा आजूबाजूला असलेला वावर त्याच्यात पुन्हा पुन्हा अडकायला तिला भाग पाडत होता. त्याचे जवळ असणे तिला सुखावत होते.
रवीशी मैत्री झाल्यापासून आकाश, मेघा आणि रवी ह्या तिघांची तिकडी चांगलीच जमली होती. त्याचे वरचेवर घरी येणे होऊ लागले. त्याचा बोलघेवडा स्वभाव मेघाच्या आईबाबांनाही आवडत होता. घरात कसले बंधन नव्हतेच त्यात तो आकाशचा मित्र, त्यामुळे कसली चिंताही नव्हती.
स्वयंपाकघरात फारशी पाय न ठेवणारी ती, तो आला की हमखास आईला मदत करायची. त्याच्या आवडीचे काहीतरी करायला आईला गळ घालायची. पहिल्या नजरेत त्याला पाहताक्षणीच त्याच्या प्रेमात पडल्याची जाणीव तिला झाली होती, पण हे प्रेमच असावे की केवळ आकर्षण? याचा संभ्रम मनात निर्माण झाला होता. तिला जे वाटतेय तेच रवीलाही तिच्याबद्दल वाटतेय का? याचे उत्तर तिच्याकडे नव्हते. एक मात्र खरं, की आकाशचा तो जेवढा बेस्टी होता तेवढाच तिच्याही जवळचा झाला होता.
बारावीच्या अभ्यास तिघांनीही मिळून करायचा ठरलं. आकाश आणि रवी दोघे विज्ञान शाखेचे तर मेघा कला शाखेची. मग तिला साथ देण्यासाठी नेहाचेही घरी येणे सुरु झाले. ती देखील त्यांच्यात मिसळून गेली होती. नेहाला मात्र रवी फारसा आवडत नव्हता. सारखे त्याची अवांतर बडबड, कुणाची खेचाखेची असे चाललेले असायचे. भरीस भर म्हणजे मेघा त्याच्याकडे आकर्षित होतेय हे तिला पटत नव्हते.
"मेघा, अभ्यास करताना तुझे काय सुरु असते गं? त्या रवीच्या एवढी मागे मागे काय करत असतेस?" एक दिवस तिने मेघाला चांगलेच झापले.
"अगं, तो आपला मित्र आहे की नाही? किती छान बोलतो. ऐकताना तर माझे मन भरतच नाही." मेघा.
"हो का? मी देखील तुझी मैत्रीण आहे म्हटलं. माझं बोलणं तर असं देहभान हरपून कधी ऐकताना मला दिसली नाहीस." नेहा.
"ओहो, कुणालातरी जेलसी होतेय तर. जळकुकडी कुठली." तिला धक्का देत मेघा.
"मेघू, माझ्या डोक्यात जाऊ नकोस हां, नाहीतर तुझ्या दादाला सांगेन मी." आता नेहा चिडली होती.
"माझा दादा तुझा कोण गं?" तिला डिवचत मेघा.
"मला काय माहिती? तू त्यालाच विचार." इति नेहा. लाजेने तिचे गाल लाल झाले होते.
"ओहो! ब्लशिंग हां? उगीच दादाला माझ्या काड्या करशील तर तुला वहिनी बनवणार नाही मी, कळलं का?" तिच्या कानात मेघा हळूच पुटपुटली.
"मेघू, मार खाशील हं आता." नेहा तिला मारायला धावली आणि नेमक्या समोरून येणाऱ्या आकाशला धडकली.
"काय गं? कधी मोठया होणार आहात तुम्ही दोघी? सारख्या धडपडत असता." आकाश नेहाकडे पाहत म्हणाला पण तिचे लक्ष होतेच कुठे? त्याला असे जवळ बघून ती पार गारद झाली होती.
"ओय, बहिणीच्या मैत्रिणी, तुलाच म्हणतोय मी." तिच्यासमोर आकाशने चुटकी वाजवली, तशी भानावर येऊन ती हसून बाजूला झाली.
"हिला काय झालेय?" मेघाकडे बघून आकाश.
"अरे, तुझ्या प्रेमात ती वेडी झालीये." त्याच्याकडे हसून बघत मेघा उत्तरली.
"मेघू, तुम्ही दोघीही पार वेड्या आहात. तुमचा बालिशपणा केव्हा जाईल कोणास ठाऊक? चला अभ्यासाला बसा." त्याने फर्मान सोडले तशा दोघी एकमेकींना खुन्नस देऊन हातात पुस्तकं घेऊन बसली.
बारावीची परीक्षा आता महिन्याभरावर येऊन ठेपली. मग काय? रात्रभराचे जागरण, कॉफीचे मग, एकमेकांना केलेले सहकार्य आणि वाढवलेला उत्साह यामुळे चौघांच्याही परीक्षा उत्तम गेल्या.
आता वाट होती ती निकालाची. त्याआधी मेघाला तिच्या भावना रवीसमोर मांडायच्या होत्या. पण परीक्षा आटोपल्याबरोबर तो वसतिगृहातून अचानक आपल्या अनाथाश्रमात निघून गेला. त्याच्या अशा जाण्याने ती कोलमडून गेली. 'जाण्यापूर्वी त्याला साधं मला भेटून जावंस देखील कसं वाटलं नाही?' हा प्रश्न तिला छळत होता.
.
.
क्रमश :
.
क्रमश :
*********
का वागला रवी असा? काय चालले होते त्याच्या मनात? कळण्यासाठी वाचत राहा कथामालिका,
अधीर मन झाले!
का वागला रवी असा? काय चालले होते त्याच्या मनात? कळण्यासाठी वाचत राहा कथामालिका,
अधीर मन झाले!
पुढील भाग लवकरच.
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*********
*********
** साहित्यचोरी गुन्हा आहे **
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा