अधीर मन झाले..(भाग ३९)

अधीर मन झाले..एक प्रेमकथा
दिवसभर संभवच्या डोक्यात एकच विचार सुरू होता, 'ओवीला मनातील गोष्ट नेमकी सांगायची कशी? मेसेज करून सांगावं की कॉलवर बोलावं? पण दोन्हींमध्ये ओवीची रिॲक्शन प्रत्यक्षात समजणार नाही. बेस्ट वे व्हिडिओ कॉलवर सांगितले तर?'

' येस हाच बेस्ट ऑप्शन आहे. तसंही एरव्ही खूपच बडबड करत असते ना ती, आज पाहुयात कशी रिॲक्ट होते आणि प्रत्यक्ष तिची रिॲक्शन पाहण्यात वेगळाच आनंद असेल.'

खूप विचार केल्यानंतर संभवने बरोबर रात्री बारा वाजता ओवीला व्हिडिओ कॉल केला.

'हा पण ना.. माझ्यासाठी अजून जागाच आहे वाटतं. मला माहित होतं ह्यावर्षी देखील सगळ्यांत आधी हाच मला विश करणार.' हातातील पुस्तक बाजूला ठेवत ओवी तोंडातल्या तोंडात पुटपुटली.

संभवचा कॉल आला तशी ओवीची कळी मात्र खुलली.

स्वतःला आरशात पाहत, केस थोडे ठिकठाक करत, घाईतच कानात ब्लू टूथ सरकवत तिने संभवचा कॉल रिसिव्ह केला.

"हाय ओवी... विश यू अ मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे."

"थॅन्क्स अ लॉट सोनुल्या."

"झालं का तुझं पुन्हा सुरू. तू नाही सुधरणार."

"हो मग... माझा हक्कच आहे तो."

"अच्छा... हो का?"

"हो ना...मग पार्टी घ्यायला कधी येतोस बोल?"

"हे काय निघतो लगेच."

"खडूस...काही येवू नकोस. तिकडेच बस ड्युटी करत. कोणीतरी प्रॉमिस केलं होतं मला की तुझ्या बर्थडेला मी पुण्यात असेल वगैरे वगैरे. दिलेलं प्रॉमिस तर काही पाळता आलं नाही आणि निघतो लगेच म्हणतोस. सगळं लक्षात आहे माझ्या. तू फक्त आता ये इकडे, व्याजासकट सगळं वसूल करते की नाही बघच तू."

"बापरे! म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू?"

"ते मी का सांगू तुला?"

"माझे आई... निदान आजतरी नको गं भांडू माझ्याशी."

"आता तर मी भांडणारच आहे बघच तू. शहाण्या कंप्लीट आठ महिने होत आले, तू आलाच नाहीयेस इकडे. काही वाटू दे जरा मनाला."

"काय करू आता तूच सांग. इच्छा असूनही नाही येता आले गं. आताही खूप प्रयत्न केला, पण फक्त दोन ते तीनच दिवसांची सुट्टी मिळत होती. मग कसं करणार होतो मी. म्हणून मग कॅन्सल केलं."

"मनापासून ठरवलं असतं तर नक्कीच सुट्टी वाढवून मिळाली असती. बट आय नो.. तुलाच सुट्टी घ्यायची नव्हती. हो ना."

"असं नाहीये गं बाई काही. थोडा तरी विश्वास ठेव माझ्यावर. इतकाही अविश्वास बरा नव्हे गं. आता पुढच्या महिन्यात दहा ते बारा दिवसांची सुट्टी घेण्याचा विचार आहे."

"तरीपण माझा नाहिये विश्वास. तुझं केव्हाही कॅन्सल होतं म्हणून मग आता मीही मनाची तयारी केलीये. पण काहीही म्हण इतकं भांडावसं वाटतं ना तुझ्याशी."

"भांड बाई भांड. घे एकदाचं मनाचं समाधान करून. पण त्याआधी मला तुझ्याशी खूप म्हणजे खूप महत्त्वाचं बोलायचं आहे."

" इतकं महत्त्वाचं काय आहे?"

"आहे महत्त्वाचं. पण कसं बोलू तेच कळत नाहीये."

"आता जसा बोलत आहेस तसाच बोल...तोंडाने." हसतच ओवी बोलली.

"कर फालतू जोक."

"मिस्टर संभव देशमाने.. माझ्या जोकला तुम्ही फालतू बोलूच कसं शकता?"

"तोंडाने...जसं की आता बोलत आहे." संभवने देखील जशास तसा रिप्लाय दिला.

संभवला देखील आता हसू आवरेना.

"कर कॉपी. तेवढं छान जमतं तुला."

"बरं जाऊ दे ना ते सगळं. मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे तुला काहीतरी."

"सांग ना बाबा मग, कोणाची वाट बघतोस."

"बरं तुला यावर्षी बर्थडेला माझ्याकडून काय गिफ्ट हवंय?"

"काही देवू नकोस. फक्त तू प्रत्यक्षात एकदा भेट म्हणजे झालं. असं व्हिडिओ कॉलवर किती दिवस भेटायचं यार."

"माझा तर आता रोजच तुला भेटायचा विचार आहे. अर्थातच तुझी इच्छा असेल तर हा."

"म्हणजे? काय बोलतोयेस तू? मला तर काहीच कळेना."

"म्हणजे आपल्याला रोज भेटता यावं यासाठी एक विचार केलाय मी."

"कसला विचार?"

"तुला कायमचं माझ्यासोबत आणण्याचा."

"काहीही..." खरंतर ओवीला हळूहळू लिंक लागत होती पण तरीही ती तसे दाखवत नव्हती. प्रेमाचे हसू मात्र तिच्या चेहेऱ्यावर फुलले होते.

"रिअली यार ओवी. यापुढे मला संपूर्ण आयुष्यात तू माझ्यासोबत हवी आहेस. आय मीन तुला समजले असेलच मला काय बोलायचे आहे ते?" थोडा पॉज घेत अडखळत संभव बोलला.

"सॉरी पण मला काहीच कळत नाहीये तुला काय म्हणायचंय ते." खरतंर ओवीला सर्वकाही समजले होते, पण तरीही तिला संभवच्या तोंडून वदवून घ्यायचे होते.

"अच्छा...म्हणजे खरंच तुला काहीच समजले नाही. बाकी सर्व गोष्टी न बोलताही बऱ्या समजतात गं... पण ही एवढीशी साधी गोष्ट तुला कळत नाहीये. आय डोन्ट बिलिव्ह दीज आ. हे इतकं तर समजतं मला."

"आता असं कोड्यात बोलल्यावर कोणाला समजेल सांग बरं."

"काही कोड्यात वगैरे बोललो नाही मी. तुलाच मुद्दाम समजून घ्यायचं नाहीये." नाराजीच्या सुरात संभव बोलला.

"असं काही नाहीये रे सोनुल्या. पण तू नॉर्मल बोलत नाहीयेस. मी कोणी परकी आहे का? इतका तर विश्वास आहे ना आपल्या मैत्रीत. मग असं कोड्यात बोलायची गरजच काय?"

"ओवी... तुझ्यासारखा बिनधास्त नाहीये गं मी. आयुष्यात तू अशी पहिली मुलगी आहेस जिच्याशी मी मैत्री केली. आता तुझी इतकी सवय झाली ना की तुझ्याशिवाय माझं काहीच होवू शकत नाही, असं वाटतं कधीकधी."

" माहितीये मला ते. तरी याव्यतिरिक्त अजून काही बोलायचंय का?"

'अरे यार... काय ठरवलं होतं मी आणि काय सुरू आहे हे? कशी आहे ना ही मुलगी? आता काही माझा पिच्छा सोडणार नाही ही. वदवूनच घेईल माझ्याकडून.' मनातच संभव बोलला.

"काय झालं साहेब कुठे हरवलात? काहीतरी बोलणार होतात तुम्ही." संभवची तारांबळ उडालेली पाहून ओवी देखील त्याची मजा घेत होती.

"आय लव यू... विल यू मॅरी मी." संभवने डोळे घट्ट मिटले आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता एका दमात मनातील सर्वकाही अगदी स्पष्ट बोलून टाकले.

संभवची अवस्था पाहून ओवीला तर हसूच कंट्रोल होईना. अर्थातच तिचा आनंद गगनात मावत नव्हता. तिच्या आयुष्यातील हा सर्वात बेस्ट डे होता. ह्या वाढदिवसाला संभव कडून तिला हे अगदी अविस्मरणीय असे बर्थ डे गिफ्ट मिळाले होते.
पण रात्रीचे जवळपास साडे बारा होत आले होते त्यामुळे कसेबसे स्वतःला कंट्रोल करत ती तोंडावर हात ठेवून हसत होती.

संभवची मात्र डोळे उघडण्याची हिंमतच होईना. फिंगर क्रॉस करून डोळे घट्ट मिटून तो तसाच  बसला होता.

खरंतर त्याने जसं इमॅजिन केलं होतं त्याच्या अगदी उलट घडत होतं. ओवीची रिॲक्शन संभवला नोटीस करायची होती, पण इथे तर संभवचीच गमतीशीर रिॲक्शन ओवी नजरेत साठवून घेत होती.

जास्त वेळ न घालवता ओवीनेही तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या.

"लव्ह यू टू सोनुल्या. उघडा.. डोळे उघडा आता."

"हळूच एक डोळा उघडून आधी ओवीचा चेहरा पाहत आणि परिस्थितीचा अंदाज घेत संभवने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. पण ओवीच्या नजरेला नजर देण्याची त्याची हिंमतच होईना. लाजेची लाली त्याच्या चेहऱ्यावर पसरली होती. खाली मान घालून हलकेच नजर वर करत त्याने ओवीकडे एक कटाक्ष टाकला. तर ओवीला त्याने हसताना पाहिले.

"हसू नको ना यार." नजर चोरत लाडिक सुरात संभव बोलला.

"खडूस... दोन वर्ष घेतलेस एवढंसं बोलायला. त्यातही किती ते आढेवेढे. किती दिवस झाले तुझ्या या शब्दांची मी वाट पाहत होते, तुला तर याचा अंदाज पण नसेल. पहिल्या दिवसापासून जशी आपली भेट झालिये तेव्हापासून तुझ्या डोळ्यात मला माझ्याबद्दलचं ते प्रेम दिसत होतं पण किती अंत पाहिलास रे माझा."

"मग सगळं ठाऊक होतं तर तू काही नाही बोललीस?"

"मी का बोलू? मैत्रीची हात जसा स्वतःहून पुढे केला होतास तसाच प्रेमाचाही करायचा होता ना."

"हे बरं असतं तुम्हा मुलींचं. स्वतः काहीच बोलायचं नाही पण आमच्याकडून मात्र सगळं वदवून घ्यायचं."

"हो मग असंच असतं ते."

"बरं कसं वाटलं तुला बर्थ डे गिफ्ट?"

"अप्रतिम..अगदी आयुष्यभर लक्षात राहील असं आहे. पण प्रत्यक्ष जेव्हा भेटशील तेव्हाच त्याला पूर्णत्व प्राप्त होईल. खरंतर मला हे सगळं प्रत्यक्ष भेटून तू सांगितलं असतंस तर सर्वकाही फील करता आलं असतं."

"विचार तर तोच होता पण नाही शक्य झालं आणि अजून महिनाभर मी थांबू शकत नव्हतो. म्हणून म्हटलं तुझ्या बर्थ डे च्या दिवशी अगदी योग्य मुहूर्त आहे."

"अच्छा..पण अजून महिनाभर थांबू शकत नव्हतो म्हणजे? असं का? तसंही इतके दिवस तर थांबलाच ना? मग आता काय प्रॉब्लेम आहे?"

"अगं आईचा फोन आला होता."

"मग काय म्हणाल्या काकू?"

"काहीही झाले तरी ह्यावेळी गावी आल्यावर मुली पाहण्याचा कार्यक्रम फिक्स आहे म्हणाली."

"अच्छा.. असे आहे होय."

"हो ना..."

"मग पाहायच्या ना मुली. पाहायला काय जातंय त्यात."

"हे तू बोलतेस ओवी?"

"मग काय झालं? तसंही तुझ्या परवानगीनेच तुझं लग्न होणार आहे ना? घरचे काय जबरदस्ती तुला बोहल्यावर चढवणार आहेत? "

"तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण ध्यानी मनी स्वप्नी तू असताना मी इतर मुली पाहण्याचा कार्यक्रम करेलच कसा?
त्यात तुला अंधारात ठेवून मी आईला थोडीच ना तुझ्याबद्दल काही सांगू शकणार होतो."

"म्हणजे आता सांगणार आहेस तू?"

"हो... तिने पुन्हा लग्नाचा विषय घेतला तर सांगावंच लागेल."

"आणि वकील साहेबांना सांगितलंस तू?"

"दादूला आधीच माहीत होतं सगळं. इव्हन घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू आहे हेही त्यानेच मला सांगितले आणि तुलाही लवकरच माझ्या मनातील भावना मी सांगाव्यात असं त्यानेच सुचवलं मला."

"तरीच म्हटलं हे वकील साहेब येता जाता मला टोमणे का मारत असतात. आता येतंय लक्षात."

"आणि कार्तिकी वहिनीला बोललीस का तू?"

"अगदीच स्पष्ट नाही पण तिलाही आधीच माहीत आहे, असं मला सारखं वाटत राहतं.

"आता दादुला माहित आहे म्हटल्यावर वहिनीला माहीत नाही असं होऊच शकत नाही. तसंही वहिनीला काही सांगू नको असं मी दोन वर्षापूर्वीच दादूला बोललो होतो. पण जरी सांगितलं तरी वहिनीने तुला काही सांगू नये अशी अट होती माझी."

"अरे पण का?"

"कारण माझ्या मनातील भावना मला स्वतः हुन तुला सांगायच्या होत्या. वहिनीकडून तुला समजावं असं नव्हतं वाटत मला."

"मग आता कसं वाटतंय तुझ्या भावना व्यक्त करून आणि  एकंदरीतच भावना व्यक्त करताना कसं फील झालं तुला?" संभवची खेचत पुन्हा ओवी संभवची मगाची अवस्था आठवून हसू लागली."

"आता हस तू प्रत्यक्ष भेटल्यावर सांगतो तुला बरोबर."

"हो हो सांग हा. फक्त जे बोलला ते विसरू नको म्हणजे झालं आणि आता तर मी पण खूपच उत्सुक आहे तुला प्रत्यक्ष भेटायला."

"मीही. येतो मग पुढच्या महिन्यात."

"बरं झोपा आता सकाळी ड्युटीवर नाही का जायचं?"

"न जाऊन सांगते कोणाला."

"मग झोपा आता."

"आता झोप तरी येईल का शहाणे. तू तिकडे मी इकडे."

"मी तुझ्या जवळच तर आहे. बघ ना."

"असं जवळ असून काय उपयोग. तशी जवळ नाहीस ना."

"तशी म्हणजे कशी रे?" लाजतच ओवीने विचारले.

"ते प्रत्यक्ष भेटल्यावर सांगतो हा मॅडम. आता झोपा तुम्ही. तुलाही झोपेची गरज आहे."

"खडूस...."

"आय नो आता आपल्या दोघांचीही झोप उडाली आहे पण उद्याचा विचार देखील करायला हवा ना."

"ह्मममम."

"वन्स अगेन... हॅप्पी बर्थ डे."

"थँक्यू. मिस यू यार."

"मिस यू टू. लव्ह यू. बाय." ओवीला फ्लाइंग किस देत संभव बोलला.

तशी ओवीने नजर फिरवली. आता कसे रिॲक्ट व्हावे तेच तिला समजेना.

"बाय." म्हणत लाजून तिने फोन कट केला.

आजचा दिवस संभव आणि ओवी दोघांसाठी देखील खूपच स्पेशल होता. आयुष्याचे जोडीदार म्हणून दोघांनीही एकमेकांना पसंती तर दिली. पण प्रत्यक्षात इतक्या सहजासहजी येऊ शकतील का दोघे एकत्र? जाणून घेण्यासाठी वाचत राहा... अधीर मन झाले.

क्रमशः

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all