अधीर मन झाले..(भाग ४०)

अधीर मन झाले..एक प्रेमकथा
ओवी तर आज सातवे आसमान पर होती. अखेर संभवचे आणि तिचे नाते फायनली प्रेमाच्या गावी पोहोचले होते. मनातील भावना व्यक्त केल्यामुळे संभवला देखील खूपच हलके वाटत होते. कधी एकदा ही बातमी घरी सांगतोय असे त्याला झाले होते.

ओवीला तर आज स्वप्नांच्या दुनियेतून बाहेरच येवू वाटेना. संभव सोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवून ती मनोमन मोहरत होती. त्यावेळी या नात्याला फक्त मैत्रीचे नाव असले तरी कुठे ना कुठे तरी त्याला प्रेमाचा गंध होता हे आता ओवीला समजत होते. नात्यातील तो हक्क, आपलेपणा, एकमेकांबद्दलची काळजी, ओढ, जिव्हाळा सारं काही आठवून ओवी प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाली होती.

त्यात आजचा दिवस तर तिच्यासाठी स्पेशलच होता. रात्री संभवने दिलेले बर्थ डे गिफ्ट तिच्यासाठी आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट होते. जे आयुष्यभर आता तिला जपायचे होते.

एका क्षणात सर्वकाही बदलले होते. नाते आता एक पाऊल आणखी पुढे जे सरकले होते. मनातील आनंद चेहऱ्यावर झळकत होता. भेटीच्या ओढीने जीव कासावीस होत होता. प्रेमाचा तो स्पर्श अनुभवण्यासाठी मनातून ती आतुर झाली होती.

एकीकडे ओवीची कॉलेजची तयारी सुरू होती. बराच वेळ आरशासमोर उभी राहून ती स्वतःलाच आरशात न्याहाळत होती. स्वतःशीच हसत होती, एकटीच लाजत होती. खरंच प्रेम हे वेडे असते ते उगीच नाही म्हणत.

तिकडे संभवची देखील काही वेगळी अवस्था नव्हती. त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता की त्याने खरंच ओवीला त्याच्या मनातील भावना सांगितल्या आहेत.

'ओवी यार असं झालंय कधी एकदा तुला भेटतोय. एक घट्ट अशी मिठी माराविशी वाटतेय तुला. एवढंच नाही तर तुझा हात हातात घेऊन दूरपर्यंत चालत जावंसं वाटतंय. तुझ्या डोळ्यांत डोळे घालून माझेच प्रतिबिंब मला त्यात पाहावेसे वाटतंय. तुलाही असेच होत आहे का गं?  की मी एकटाच वेडा झालोय तुझ्या प्रेमात? जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीस ना तेव्हापासून मी माझा राहिलोच नाही. तुझ्यासोबत आता आयुष्यभर या सर्व आठवणी मला जपायच्या आहेत.
आज तर फक्त तुझ्या आठवणीत रमावसं वाटतंय. दुसरं काहीच करू वाटेना.'

मोबाईल मध्ये ओवीचा फोटो न्याहाळत संभव कितीतरी वेळ तसाच बसून होता. ड्युटीवर जायला उशीर होतोय हेही तो क्षणभर विसरला होता.

न राहवून त्याने ओवीला कॉल केला.

संभवचा कॉल आला तसे ओवीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

"गुड मॉर्निंग ओवी."

"व्हेरी गुड मॉर्निंग..."

"झाली तयारी कॉलेजची?"

"करतेय. तुझी झाली?"

"मी पण आवरतच आहे. ऐक ना... एक विचारायचे होते."

"बोल ना मग."

"यार आज ना काहीतरी वेगळंच फिल होतंय मला."

"म्हणजे नेमकं काय होतंय?"

"म्हणजे...तू सोडून दुसरं काहीच दिसत नाहीये. आज दुसरं काही करूही वाटेना. ड्युटीवर पण जायची इच्छा होईना. म्हणजे ते टिव्हीमध्ये पाहतो बघ आपण अगदी तसंच फील होतंय यार. तुलाही असंच होतंय का गं?"

"काय हे सोनुल्या...हा काय प्रश्न आहे का? अर्थातच यार...सेम फिलिंग असणार ना आणि ते तर स्वाभाविकच आहे ना. काहीही प्रश्न काय विचारतोस, एवढं तर माहिती असायला हवं हा बुद्धू."

"हो पण तरीही तुला विचारायचं होतं मला. सरळ उत्तर दिलं असतं तर तुझं काही गेलं असतं का?"

"गेलं काहीच नसतं रे, पण तू ना कधीकधी असा बोलतोस की मुद्दाम तसा वागतोस तेच समजत नाही. शॉर्टमध्ये त्याला 'वेड पांघरून पेडगावला जाणं' असं म्हणतात."

"अच्छा... असं असेल तर मग तू रोजच पेडगावला जात असशील ना?"

"म्हणजे?"

"रात्री माझं सगळं बोलणं तुला बरोबर समजत होतं पण तरीही तू माझ्या तोंडून जसं वदवून घेतलं आणि स्वतः मात्र मजा घेत होतीस, हे तेच ना?"

"स्मार्ट हा...किती हुशार आहेस रे तू सोनुल्या. मला तर माहीतच नव्हतं."

तेवढ्यात सीमा ताईंनी ओवीला आवाज दिला.
"ओवी अगं आवरलं की नाही अजून? ये पटकन बाहेर. किती वेळ वाट पाहायची आता?"

"बरं चल आई आवाज देत आहे, बोलू नंतर. बाय."

"ओके बाय." म्हणत दोघांनीही फोन ठेवला.

फोन ठेवल्यावर दोघांनीही मोबाईलवर अलगद आपले ओठ टेकवले. आपसूकच दोघांच्याही चेहऱ्यावर लाजेची कळी खुलली.

सीमा ताईंनी मग लेकीचे औक्षण केले. ओवीनेही सर्वांना मग वाकून नमस्कार केला. सर्वांनी तिला भरभरून आशीर्वाद दिले.

"चला फायनली आपल्या ओवीने पंचवीशी गाठली.

"सीमा आता स्थळं पाहायला सुरुवात करायला हवी हा आपल्या ओवीसाठी." हसतच आजी बोलल्या.

"हो का आजी. इतकी काय घाई आहे गं मला घरातून हाकलून द्यायची?"

"घाई कसली गं त्यात. आता माझेही कितीक दिवस राहिले असे. तुझे लग्न पाहिले की मग तेवढेच मनाला समाधान."

"आजी..हे असं काहीही बोलू नकोस हा. माझेच नाही तर तुला अभ्याचे पण लग्न पाहायचे आहे अजून." आजीला मिठी मारत ओवी बोलली.

"बरं आजी मी निघते आता. मला कॉलेजला जायला उशीर होतोय. आई येते गं."

"बरं ओवी ...आज रात्री मित्र मैत्रिणींसोबत बाहेर वगैरे जाण्याचा प्लॅन करू नकोस. तुझ्यासाठी एक खास सरप्राइज आहे."

"कसलं सरप्राइज?"

"आता सरप्राइज आहे म्हटल्यावर आधीच कसं सांगायचं?"

"बरं बाई...नको सांगू. मी नाही करत काही प्लॅन. निघू का मी आता?"

"हो आणि गाडी जरा सावकाश चालव गं."

"हो गं बाई. तरी म्हटलं अजून तू बोलली कशी नाहीस. तुझं हे वाक्य कानी पडत नाही तोवर मलाही काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं."

"हो का... जा.. आता नाही का उशीर होत."

"निघतच आहे गं आई." म्हणत ओवी घराबाहेर पडली..

रात्री काय सरप्राइज आहे? याची तिला उत्सुकता लागली होती.

फायनली तिची प्रतिक्षा संपली. संध्याकाळी जेव्हा ती घरी आली तेव्हा तिच्या बर्थडे साठी केलेले डेकोरेशन पाहून तीही भारावून गेली.

"वाव....आई...काय आहे हे सगळं? आणि कोणी केलं इतकं सुंदर डेकोरेशन?"

"तुझ्यासाठी हेच तर खास सरप्राइज आहे."

"कोणी आलंय का आई?"

क्षणभर ओवीच्या मनात आले,' मला सरप्राइज देण्यासाठी अचानक संभव तर आला नसेल?.... पण कसं शक्य आहे हे?' मनातच ओवी विचार करू लागली.

"अगं एव्हढा कसला करतेस? तूच बघ नेमकं कोण आलंय."

"हाय ओवी... सरप्राइज...विश यू अ मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे."ओवीला बर्थ डे विश करत आणि तिच्या आवडीचे चॉकलेट्स तिच्या समोर धरत भिंतीच्या आडून सार्थक बाहेर आला.

"सार्थक तू..? तू कधी आलास? खरंच आय एम सरप्राइज यार. किती दिवसांनी भेटत आहेस." सार्थकला अचानक समोर पाहून ओवीचा आनंद गगनात मावत नव्हता. किती बोलू नि किती नाही, असेच झाले होते तिला.

"आणि काय रे शहाण्या...मुंबईला काय गेलास तर तिकडाचाच झालास होय." सवयीप्रमाणे सार्थकला गमतीने चापटी मारत ओवी बडबडत होती.

ओवीला असं एकदम आपलेपणाने आणि पहील्यासारखं बोलताना, वागताना पाहून सार्थकलाही खूप छान वाटले.

"बरं कसं वाटलं माझं सरप्राइज?"

"ऑफकोर्स नॉट बॅड. पण तू तर नेक्ट मंथमध्ये येणार होतास ना?"

"हो ठरलं तर तसंच होतं. पण मी बंगलोरची ॲपॉर्चूनिटी स्वीकारायचं ठरवलंय. सो नेक्स्ट मंथमध्ये आय एम गोइंग टू बंगलोर. म्हणून मग आताच तुम्हा सगळ्यांना भेटून यावं म्हटलं. पुन्हा मग पुढचे काही महिने तरी इकडे येणं शक्य होणार नाही."

"बघ सार्थक मी म्हटले होते ना तुला...सगळं काही तुझ्या मनासारखं होणार. फायनली यू प्रुव्हड युअरसेल्फ यार."

' खरंतर, जोपर्यंत तू माझ्या आयुष्यात येत नाहीस, तोपर्यंत काहीच माझ्या मनासारखे होणार नाही.' सार्थक मनातच बोलला.

"अरे मी काहीतरी बोलले सार्थक... तुझं लक्ष कुठे आहे?"

"हो गं..अगदी तू म्हणाली तसंच झालं."

सार्थकचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

"पण काय रे... इकडे पुण्यात केव्हा आलास मग?"

"आजच गं. डिरेक्टली इकडेच आलोय. आता पाहून उद्या सकाळी गावी जाईल."

"काय हे आजच आलास आणि उद्या लगेच निघालास पण?"

"अगं आई तर म्हणत होती, आधी घरी ये मग जा मामाकडे. पण म्हटलं आज तुझा बर्थडे आहे तर आजच जावूया. मग काय रात्री दहा वाजता सीमा मामीला फोन केला आणि माझा प्लॅन सांगितला."

"म्हणजे आई सुद्धा तुला सामील आहे तर."

"अगं आम्हाला देखील रात्रीच समजलं." आजी बोलल्या.

"याचा अर्थ फक्त मलाच माहीत नव्हतं!"

"तुला आधीच माहिती असतं तर मला पाहून तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला मला तो मिस केला असता की मी." हसतच सार्थक बोलला.

सार्थक आणि ओवीची नोकझोक तसेही सर्वजण मिस करतच होते. आज पुन्हा एकदा दोघांनाही असं नॉर्मल बोलताना पाहून सर्वांना तितकाच आनंद झाला.

"हो का शहाण्या..आता इतक्या दिवसांनी अचानक तू असा समोर आल्यावर कोणाला आनंद होणार नाही."

'तुझ्या चेहऱ्यावरील हाच आनंद पाहण्यासाठी तर जवळपास तीन वर्ष मी स्वतःला मुद्दाम तुझ्यापासून दूर ठेवलं होतं ओवी. पण आता नाही.' मनातच सार्थक बोलला.

"अरे कुठे हरवलास?"

"कुठे नाही गं, आहे इथेच."

"बरं माझं बर्थ डे गिफ्ट कुठे आहे?"

"काय हे ओवी... अगं आधी आवरुन तर घे. नंतर काय गप्पा मारायच्या ते मारा."

"तू थांब गं आई. सार्थक, आधी माझं बर्थडे गिफ्ट कुठे आहे दे पटकन."

"हो हो... ते कसं विसरेल मी. एक मिनिट हा, आणतोच.... हे घे...तुझा आवडता रंग.. हाच ड्रेस घालणार आहेस आज तू. होप सो तुला नक्की आवडेल." ओवीच्या हातात ड्रेसची पिशवी देत सार्थक बोलला.

"सार्थक.. चक्क तू ड्रेस आणलास माझ्यासाठी?"

"मग काय झालं?"

"नाही म्हणजे... मला असं म्हणायचं आहे की तू अंदाजे खरेदी केला असशील ना हा ड्रेस. होईल ना मला?"

"तू आधी ट्राय तर करून बघ मग बोल."

"नक्की ना.."

"हो गं बाई.. जा पळ."

खूप दिवसांनी सार्थक ओवीला भेटत होता. त्यामुळे त्यालाही मनोमन खूपच आनंद झाला होता. अर्थातच ओवी देखील खूपच खुश होती. 

मुंबई युनिव्हर्सिटीतून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या डिग्रीचे शिक्षण पूर्ण करून नुकतेच त्याचे बंगलोरच्या एका नामांकित कंपनीत सिलेक्शन झाले होते. 

दोन वर्षापूर्वी ओवीसोबत झालेल्या गैरसमजातून त्याने पुढे डिग्रीच्या शिक्षणासाठी पुणे हा ऑप्शन मुद्दाम ड्रॉप करून मुंबई ऑप्शन निवडला होता.
'थोडं दूर गेलं की मगच ओवीला आपली किंमत कळेल.' असा विचार त्यामागे होता.

आज फायनली सार्थकने स्वतःला सिध्द केले होते. नव्या आशेने तो पुन्हा एकदा ओवीच्या आयुष्यात आला होता. ह्यावेळचा सार्थक मात्र खूपच वेगळा वाटत होता सर्वांना. त्याच्या वागण्या बोलण्यात कमालीचा बदल झाला होता. आधीपेक्षा त्याची पर्सनॅलिटी आता खूपच छान दिसत होती. त्याच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आला होता.

थोड्याच वेळात ओवी आवरुन बाहेर आली. सार्थकने दिलेला ड्रेस ओवीला एकदम परफेक्ट झाला होता. ओवीला पाहून सार्थक क्षणभर स्वप्नांच्या दुनियेत हरवला. सार्थककडून गिफ्ट घेताना ओवीने कोणतेही आढेवेढे घेतले नाहीत, त्यामुळे त्यालाही मनातून खूपच छान वाटत होते.

"कशी दिसतेय मी?" ओवीने सर्वांना प्रश्न केला.

"ब्युटीफूल." क्षणाचाही विलंब न लावता सार्थक उत्तरला.

"थँक्यू ... पण काय रे सार्थक, तू स्वतःहून खरेदी केलास हा ड्रेस?" ड्रेस वरुन अलगद हात फिरवत ओवीने प्रश्न केला.

"हो... एनी डाऊट?"

"डाऊट असा नाही, पण तुला मुलींच्या ड्रेस खरेदीमधील इतकं कसंकाय आणि कधीपासून समजायला लागलं रे शहाण्या? तेही इतकं परफेक्ट." खोचकपणे ओवीने विचारले.

"तुला आवडला ना ड्रेस... झालं तर मग. बाकी गोष्टींचा इतका विचार नको करुस तू."

"हो का... पण तरी सांग ना, मुंबईला कोणी मैत्रीण भेटली का? जिने तुला हा ड्रेस खरेदी करायला मदत केली." हळू आवाजात ओवी सार्थकच्या कानात बोलली.

"हो ना... पण एक नाही बरं का.. अशा खूप साऱ्या मैत्रिणी भेटल्या. अजून काही माहिती हवीये का मॅडम?"

"अरे व्वा... मग पटली की नाही एखादी मुलगी? आता काय बंगलोरला जॉब मिळाला तुला... तेही मल्टीनॅशनल कंपनीत म्हणजे तुझे लग्न तर ह्यावर्षी नाही तरी पुढच्या वर्षी फिक्स आहे बरं का.. म्हणून म्हटलं, असेल कोणी तर सांग...आपण आत्याला मामांना करू मॅनेज."

"एक मुलगी आवडते मला... तुला सांगेल, पण योग्य वेळ आल्यावर."

"ओय होय...क्या बात है सार्थक."

ओवीला तर कल्पनादेखील नव्हती की सार्थक तिच्याचबद्दल बोलत आहे. सवयीप्रमाणे तीही अगदी फ्रँकली वागत होती त्याच्याशी.

"पण ओवी अगं एक प्रॉब्लेम आहे." सार्थक म्हणाला

"आहेच का तुझा अजून काहीतरी प्रॉब्लेम."

"म्हणजे...अगं... मी त्या मुलीला अजून विचारले नाही. पण लवकरच विचारणार आहे. त्यात ती काय उत्तर देते माहीत नाही. त्यामुळे थोडी भीती वाटते विचारायला. उगीच नाही म्हणाली तर मी नाही सहन करू शकणार तिचा नकार."

"तू अजिबात काळजी करू नकोस. मैं हु ना... आणि मला खात्री आहे, ती जी कोणी असेल ती तुला नाही म्हणूच शकत नाही. इतका हँडसम आणि हुशार आहेस तू. मग ती नाही कशी म्हणेल बरं. एकदा तू विचारून तर बघ. "

"थॅन्क्स ओवी.. तुझ्या या अशा बोलण्याने माझा कॉन्फिडन्स खूप वाढला बघ आता. मी लवकरच विचारतो तिला."

ओवीच्या तोंडून स्वतःसाठी 'हँडसम आणि हुशार' हे शब्द ऐकून सार्थकला मात्र वेगळेच समाधान मिळाले.

"बरं आता बर्थ डे गर्ल सोबत एक सेल्फी मिळेल का?" हसतच सार्थकने विचारले.

"अफ कोर्स यार....हे काय विचारणं झालं." ओवी उत्तरली.

सार्थकने लगेचच खिशातून मोबाईल काढला. सार्थकच्या खांद्यावर हात ठेवत छान अशी पोज देत ओवी आणि सार्थक एकाच फ्रेममध्ये कैद झाले. ओवीचा तो प्रेमळ स्पर्श सार्थकला मात्र अजूनच घायाळ करत होता. ओवीच्या सार्थक सोबतच्या वागण्या बोलण्यात कितीही मोकळेपणा असला तरी तिच्या मनात मात्र संभव होता. पण एव्हाना सार्थक मात्र स्वप्नांच्या दुनियेत खूप दूरवर जाऊन पोहोचला होता.

क्रमशः

काय होणार आता पुढे? जाणून घेण्यासाठी वाचत राहा 'अधीर मन झाले...एक प्रेमकथा.'

©® कविता वायकर




🎭 Series Post

View all