अधीर मन झाले..(भाग ४१)

अधीर मन झाले..एक प्रेमकथा
एकीकडे संभवने ओवीला प्रेमाची कबुली देऊन तिच्या वाढदिवसाला त्याने खास असे बर्थडे गिफ्ट दिले होते. प्रेमाचा रंग तिच्या चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वाहत होता. तर दुसरीकडे सार्थकने अचानक घरी येवून ओवीचा मेमोरेबल असा बर्थडे सेलिब्रेट केला होता. दोघांच्याही मनात ओवीबद्दल एकच भावना होती. सार्थक ओवीसोबत आयुष्याची वाटचाल करण्याची स्वप्न पाहत होता, पण ओवीने मात्र संभवला आयुष्याचा जोडीदार म्हणून मनोमन स्वीकारले देखील होते.

रात्री सगळे जमल्यावर सर्वांनी मिळून ओवीचा वाढदिवस साजरा केला. माधवी ताईंनी कार्तिकीला व्हिडिओ कॉल करून ओवीच्या बर्थडेच्या आनंद सोहळ्यात तिलाही सामावून घेतले. खरंतर कार्तिकी समर दोघेही ओवीच्या वाढदिवसाला येणार होते, पण अचानक कार्तिकीची तब्बेत बिघडली आणि त्याचं येणं कॅन्सल झालं.

कार्तिकीच्या घरच्यांनी देखील फोनवरच ओवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ओवीच्या बडबड्या आणि प्रेमळ स्वभावामुळे कार्तिकीच्या सासरच्या लोकांसोबत ओवीचे खूप छान बाँडींग तयार झाले होते. सर्वांसोबत ओवीचे असलेले कनेक्शन पाहून सार्थक देखील विचारात पडला.

'कशी आहे ना ही मुलगी. सर्वांना किती झटकन आपलंसं करते. सदा हसतमुख, सर्वांची आवर्जून विचारपूस करणारी ओवी खरंच तुझ्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्याचा जोडीदार असेल तर मग आयुष्य खूपच सोप्पं होऊन जाईल?' ओवीला न्याहाळत सार्थक विचार करू लागला.

"ओवी खरंतर तुला सार्थकला थँक्यू म्हणायला हवं आ. कारण त्याच्यामुळेच आजचा हा दिवस खूपच खास झाला बरं का." माधवी ताई बोलल्या.

"मी नाही आ काकी काही थँक्यू वगैरे बोलणार त्याला. उगीच नात्यात थँक्यूची फॉमॅलिटी कशाला हवीये? सार्थक काही कोणी परका आहे का? त्याने तर माझ्यासाठी हे सगळं करायलाच हवंय. 'आखिर दोस्ती में इतना तो बनता है ना.' काय रे सार्थक बरोबर ना."

बोलता बोलता ओवीने पुन्हा एकदा खुर्चीत बसलेल्या सार्थकच्या खांद्यावर हात ठेवत नात्यातील आपलेपणा आणि हक्क दाखवून दिला. खरंतर सार्थकला ओवीचे हे हक्काचे बोलणे, तिचा मनहा सहवास खूपच हवाहवासा वाटत होता.

"तू म्हणशील ते आणि तेच बरोबर. कारण आमची ओवी कधीही चुकीचं बोलतच नाही." वर मान करुन ओवीकडे पाहत सार्थक बोलला.

तेवढ्यात सीमा ताईंनी ओवीला हाक मारली.

"काय गं आई... काही काम होतं का? ताटं वाढायला घेऊ का? थांब मी मदत करते तुला."

"ओवी... राहू दे ते...मी त्यासाठी नाही बोलावलंय तुला. माझं वेगळंच काम आहे तुझ्याकडे." ओवीच्या हातातील ताट काढून घेत सीमा ताई बोलल्या. .

"बोल ना मग."

"प्लीज समजून घे तू, मला काय म्हणायचं आहे ते."

"आई...अगं तू बोल तर आधी मगच मला समजेल ना."

तेवढ्यात सार्थकने ओवीला आवाज दिला.

"हो...आले रे...."

सीमा ताईंना आता बोलावे की नाही असेच झाले क्षणभर. त्या विचारांत पडल्या.

'खूप घाई करत आहे का मी?' त्या मनातच बोलल्या.

"आई काय झालंय नेमकं? कसलं टेन्शन आहे का?"

"नाही गं."

"मग अचानक अशी शांत का झालीस? तुला काहीतरी बोलायचे आहे ना...बोल ना मग?"

"आता राहू दे.. नंतर बोलू आपण. इतक्या घाईत नाही बोलता येणार. तू जा...सार्थक का बोलवतोय ते बघ आधी."

"अगं जाईल मी नंतर...तू आधी जे काही बोलायचे आहे ते बोल बरं."

"म्हटलं ना ओवी, आपण बोलू नंतर. मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. इतक्या घाईत नाही बोलता येणार. खरंतर माझंच चुकलं... तुला लगेच बोलवायलाच नव्हतं पाहिजे. पण काय करणार, आईचे मन आहे ना..."

"आई... माझं काही चुकलंय का गं?"

"वेडीयेस का... असं काही नाहीये. तू जा एन्जॉय कर. खूप दिवसांनी सार्थक घरी आलाय. चालू दे तुमच्या गप्पा."

"नक्की जाऊ ना मी?"

"हो गं...नक्की जा.. मी ताटं झाल्यावर आवाज देते आणि जमलं तर जेवण झाल्यावर माझ्या खोलीत ये, तेव्हा बोलू आपण... चालेल ना?"

"चालेल काय त्यात... येईल मी जेवण झाल्यावर..आता जाते..." म्हणत ओवी बाहेर निघून गेली. सीमा ताई मात्र पाठमोऱ्या ओवीला न्याहाळत क्षणभर तशाच उभ्या राहिल्या.

'माझी ओवी आता खरंच खूप मोठी झाली.' तोंडातल्या तोंडात सीमा ताई पुटपुटल्या आणि पुढच्या कामाला लागल्या.

आज सार्थक आला आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बालपणीच्या अनेक गोष्टींची चर्चा रंगली. आजीदेखील मुलांना त्यांच्या लहानपणीच्या करामती सांगून खूपच हसवत होती. सर्वजण छान एन्जॉय करत होते. पण इकडे सीमा ताई मात्र ओवीच्या काळजीत अडकल्या होत्या.

गप्पा सुरू असताना दोनदा ओवीचा फोन वाजला. पण ओवीच्या नकळत सार्थकने तिचा फोन म्युट केला होता त्यामुळे संभवचा कॉल आलेला ओवीच्या लक्षातच आले नाही. त्यात बोलता बोलता ओवीचा एकदा दोनदा मोबाईलकडे हात गेला होता, पण सार्थकने तिला हटकले.

"नाही आ ओवी, निदान आज तरी फोन नको ना घेऊस. किती छान गप्पा सुरू आहेत."

"अरे पाहू दे तर कोणाचे मेसेजेस वगैरे आले असतील."

खरंतर ओवीचे मन तिला सांगत होते, संभव आठवण काढत आहे. पण आता तिचाही नाईलाज झाला होता.

'ओवी आज किती दिवसांनी तू माझ्याशी इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने वागत आहेस. असे असताना मी आता संभवला आपल्या दोघांच्यामध्ये येवूच कसा देईल? गेले दोन वर्ष झाले फक्त तुझ्यासाठी मी स्वतःला सिद्ध केलंय. तुम्हा सगळ्यांपासून स्वतःला दूर ठेवलं. आता आपल्या घरचेच आपल्या दोघांना एकत्र आणतील, बघच तू.' मनातच सार्थक ओवीसोबत भविष्याची स्वप्न रंगवू लागला होता.

"सार्थक...अरे कुठे हरवलास?"

"अमम.. काही म्हणालीस का?"

"अरे म्हटलं, कुठे हरवलास?"

"कुठे नाही..इथेच आहे." सार्थक उत्तरला.

"चल ना मग जेवायचं नाही का?"

"जेवायचं तर...खूप भूक लागलीये मला, चल." हसतच सार्थक बोलला.

सीमा ताईंनी आणि माधवी ताईंनी मिळून सर्वांसाठी जेवणाची ताटं केली.

ओवीच्या नियमानुसार सर्वांनी जमिनीवर बैठक मारली. सार्थक तर ओवीच्या बाजूलाच बसला. ही गोष्ट सीमा ताईंना मात्र खटकत होती.

आजीचे गुडघे दुखतात म्हणून फक्त आजीसाठी जमिनीवर बसून जेवणाचा नियम लागू नव्हता. बाकी सगळे जमिनीवर बसले. हसत खेळत सर्वांचे जेवण आटोपले. जेवण झाल्यावर पुन्हा एकदा गप्पांना उधाण आले.

सीमा ताईंचे देखील सर्व काम आटोपले. किचनच्या दारातूनच त्यांनी ओवीला येण्याचा इशारा केला आणि त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या.

"बरं तुमचं चालू द्या.. मी आलेच." ओवी म्हणाली.

"अगं आता तू कुठे निघालीस?"

"आलेच रे...तुम्ही करा कंटीन्यू."

"लवकर ये गं." सार्थक म्हणाला

'आईने नेमके कशासाठी बोलावले असेल?' विचार करत ओवी सीमा ताईंच्या रुमजवळ आली.

"आई...येवू का गं?"

"हो गं..ये. आईंच्या रूममधे यायला परमिशन हवीये तुला."

"तसे नाही गं."

"मग कसे ओवी? जसं कार्तिकीचं लग्न झालंय तशी आपल्या मायलेकीच्या नात्यात हलकीशी दरी आल्यासारखे वाटते. तुला नाही वाटत का?
मला तर आत्तापर्यंत वाटत होते की माझी लेक माझी छान मैत्रीण आहे. माझ्याशी सगळं शेअर करते, पण तसं काहीच नाहीये ओवी."

"नेमकं काय झालंय आई? एनीथिंग सिरियस? असं का बोलतेस तू?"

"ओवी राहून राहून वाटतंय तुझं ना वेगळं विश्व तयार झालंय. तू शरीराने घरात असतेस पण मनाने भलतीकडेच. कोणाशी जास्त बोलत नाहीस की गप्पा मारत नाहीस. आज कितीतरी दिवसांनी तू इतकी हसून खेळून बोलत आहेस सर्वांशी. एरव्ही तू, तुझा अभ्यास आणि तुझी खोली... बस एवढंच विश्व झालंय तुझं. नक्की काय सुरू आहे हे ओवी? खूप दिवसांपासून विचारेन म्हणत होते पण आज नाही राहवले म्हणून बोललेच.?"

"आई...अगं काहीही काय? असं नाहीये गं काही."

"मग माझ्या काही प्रश्नांची अगदी खरी खरी उत्तरं देशील?"

"ऑफ कोर्स आई... बोल ना?"

"सार्थकचं आणि तुझं नेमकं काय सुरू आहे?"

"म्हणजे? मी समजले नाही. तुला नेमकं काय म्हणायचंय?" चमकून ओवीने प्रश्न केला.

"ओवी तुला सगळं समजलंय मला नेमकं काय म्हणायचं आहे ते."

"आई...तू समजते तसं काहीच नाहीये गं... विश्वास ठेव माझ्यावर."

"पण मला तसं नाही वाटत ओवी."

"आई... आई... अगं तू खूप म्हणजे खूप चुकीचा अर्थ घेत आहेस. तू समजते तसे खरंच काहीच नाहीये. सार्थकमध्ये आणि माझ्यामधे फक्त आणि फक्त निखळ मैत्री आहे गं आई...प्लीज विश्वास ठेव माझ्यावर."

"ओवी...तू खरंच सांगत आहेस ना?"

"हो गं आई... खरंच तुला वाटतं तसं बिलकुल नाहीये."

"तुझ्यावर विश्वास आहे गं माझा. तसे असेल तर मग ठीक आहे. कारण आयुष्याचा जोडीदार निवडताना खूप काळजी घ्यावी लागते गं बाळा. एकदा का हा निर्णय चुकला की मग आयुष्याचे गणितच बिघडून जाते. पण तरीही एक गोष्ट विचारू?"

"हो, विचार ना."

"सार्थक तर नाही पण दुसरं कोणी आहे का तुझ्या मनात?"

"नाही गं... तसं असतं तर मी सांगितलं नसतं का तुला?" नजर चोरत आणि थोडं बाजूला जात ओवी उत्तरली.

ओवीच्या रीॲक्शन वरुन तर सीमा ताईंची आता खात्रीच पटली होती. तिच्या बोलण्याचा अंदाज घेत त्यांनी ओवीला आणखी काही प्रश्न विचारले.

"बरं ओवी...आता मला सांग कोण आहे ती नशीबवान व्यक्ती?" सीमा ताईंनी प्रश्न केला.

"काहीही काय गं आई..कोणी नाहीये." नजर खाली झुकवत थोडं लाजतच ओवी बोलली.

"तुला नाही खोटं बोलता येत ओवी. मी आई आहे तुझी..लेकराची प्रत्येक गोष्ट आईला समजते बरं का आणि मला माहितीये कोणीतरी आहे तुझ्या मनात. आधी मला वाटलं तो सार्थक आहे पण माझा अंदाज चुकला. आतातरी सांगशील का की कोण आहे ती नशीबवान व्यक्ती?"

ओवी विचारांत पडलेली पाहून सीमा ताईंनी थोडं सबुरीने घेतलं.

"तुझी खूप काळजी वाटते गं ओवी. म्हणून मी विचारत आहे. तसं काही असेल तर त्यात वावगं काहीच नाही बाळा. पण तुझ्या मनात कोणी चुकीची व्यक्ती तर नाही ना, याची खातरजमा करणं एक आई म्हणून माझं काम आहे गं. माझी ओवी चुकीचं काहीच करणार नाही याची खात्री आहे मला. पण तरीही काळजपोटी विचारत आहे मी. सांगून टाक सगळं, एक आई म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून सांग."

"आई.... खरंतर मी स्वतःहून ही गोष्ट तुला सांगणार होते."

"मग आता सांग ना. अजूनही वेळ गेलेली नाही."

"आई कसं सांगू तेच समजत नाहीये."

"तुला खात्री आहे ना तुझ्या निर्णयावर आणि त्या व्यक्तीवर देखील?"

"एकशे एक टक्के खात्री आहे आई."

"झालं तर मग. आतातर काही प्रश्नच नाही. तू बोलू शकतेस माझ्याशी. इथे बस आणि तुझ्या मनात जे काही सुरू आहे ते बोलून टाक." ओवीचा हात हातात घेत सीमा ताई बोलल्या.

"आई ती व्यक्ती म्हणजे... कार्तिकी दीचे लहान दिर...मिस्टर संभव देशमाने आहेत."

"काय...? ओवी हे काय बोलत आहेस तू?"

"आई...प्लीज चुकीचा अर्थ नको घेऊस ना. संभव खूप चांगला मुलगा आहे अगं. खूपच हुशार आणि शिस्तप्रिय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून तो खूप चांगला आहे. ह्या सर्व गोष्टींची जेव्हा खात्री पटली तेव्हाच मी त्याच्याशी मैत्री केली. पण तो इतका चांगला आहे ना की माझं मलाच समजलं नाही मी केंव्हा त्याच्या प्रेमात पडले."

"अगं हो हो..किती स्पष्टीकरण देणार आहेस आता. त्याची काहीच गरज नाहीये ओवी."

"म्हणजे तू रागावली नाहीस ना माझ्यावर?"

"मी का रागावेल वेडाबाई? खरंच संभव खूप चांगला मुलगा आहे, हे मला काही माहित नाही का. उलट तू आमचं काम सोप्पं केलंस. लाखात एक मुलगा शोधलास बघ. मग आता नाही म्हणण्याचा प्रश्न येतोच कुठे?"

"आई...आई..आई.. तू किती गोड आहेस ग." सीमा ताईंना घट्ट मिठी मारत ओवीने आनंद साजरा केला.

"पण कार्तिकी आणि समररावांना माहीत आहे का ही एवढी मोठी गोष्ट?"

"हो...म्हणजे कालच मला संभव म्हणाला तसं, उलट वकील साहेबांनीच त्याला सपोर्ट केला आमच्या नात्यासाठी."

"अरे व्वा...हे एक बरंच झालं मग."

"आणि संभव देखील पुढच्या महिन्यात सुट्टीला आल्यानंतर त्याच्या आई बाबांना सगळं सांगणार आहे. कारण त्याच्याही घरच्यांनी आता त्याच्यासाठी मुली पाहणं सुरू केलंय."

"तुला माहितीये मला खूप टेन्शन आलं होतं ओवी... खरंतर तुझ्या काळजीने रात्रभर मला झोप नाही. रात्री तुझ्या रूमचा लाईट सुरू दिसला तेव्हाच मी आले होते तुला विश करायला. पण तू फोनवर कोणासोबत तरी बोलत होतीस. मला वाटलं सार्थक सोबतच बोलत आहेस."

"पण आई तुला असं कसं वाटलं की सार्थक आणि माझ्यात काहीतरी सुरू आहे?"

"माहीत नाही का पण मला ना राहून राहून वाटतंय की तुझ्या नाही पण त्याच्या मनात काहीतरी आहे तुझ्याबद्दल. तेवढं तर समजतं ना."

"गप गं आई. तसं काही असतं ते सार्थकने मला केव्हाच बोलून दाखवले असते."

"तुला नाही समजत ओवी जाऊ दे. पण तुझ्या बाजूने तसे काही नाही हे छान झाले."

"पण का गं? म्हणजे सार्थक काही वाईट नाही आ. पण ॲझ अ लाईफ पार्टनर म्हणून मी कधीही त्याच्याकडे पाहिले नाही."

"सार्थक वाईट आहे असं मी म्हणतच नाही गं, पण तो ना थोडा सनकी स्वभावाचा आहे. त्याच्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली नाही की तो काय करेल याचा नेम नाही."

"मला आहे अंदाज आई. मागे कार्तिक दीच्या लग्नावेळी आलाय मला अनुभव. पण तो त्याचा स्वभाव आहे गं. राग आला की तो पटकन् व्यक्त होतो. मनात नाही ठेवत काही."

"म्हणूनच म्हणते बाई, थोडं जपूनच वाग त्याच्याशी. तुझ्या या मनमोकळ्या स्वभावाचा वेगळाच अर्थ घेईल तो. पुढे जाऊन भलतेच व्हायचे काही."

"आई... किती विचार करतेस गं तू. नको एवढं टेन्शन घेऊस. असं काहीही होणार नाही."

"कसलं टेन्शन आणि काय होणार नाही?" अचानक सार्थक तिथे आला. ओवी आणि सीमा ताईंची चर्चा ओझरती सार्थकच्या कानावर पडली.

दोघींनीही मग चमकून त्याच्याकडे पाहिले.

क्रमशः

आता काय होणार पुढे? सीमा ताईंचा ओवी आणि संभवच्या नात्याला असलेला सपोर्ट येईल का कामी? जाणून घेवूयात पुढील भागात.

(सर्वप्रथम सर्व वाचकांचे मनापासून आभार आणि सर्वांना मनापासून सॉरीसुद्धा. खरंतर हा भाग पोस्ट करायला खूपच उशीर झालाय. तुमच्या कमेंट दिसत होत्या पण मला अलीकडच्या काही कमेंटला रिप्लाय करता येत नव्हता आणि भाग पोस्ट पण होत नव्हता. त्यात कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे लिखाणात खंड पडत आहे. काय करणार माझाही नाईलाज आहे. पण तरीही जमेल तसे पुढील भाग लिहिण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा आहे.)

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all