अधीर मन झाले..(भाग ४४)

अधीर मन झाले..एक प्रेमकथा
आता सीमा ताई खूपच पेचात अडकल्या होत्या. सुलभा आत्याने सार्थकसाठी ओवीचा हात मागितला आणि तेव्हाच त्यांचे हातपाय गळाले. इकडे नंदा ताई आणि संपूर्ण देशमाने फॅमिलीने देखील संभवच्या आवडी निवडीवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि ओवी व त्याच्या नात्याला हिरवा कंदील दर्शवला.

एव्हढेच नाही तर नंदा ताईंनी दोनच दिवसांत ते ओवीला रीतसर मागणी घालण्यासाठी येणार असल्याचे सीमा ताईंना फोन करून सांगितले. परंतु, ही बातमी रमाकांतरावांपर्यंत आणि घरातील इतर सदस्यांपर्यंत पोचण्याआधीच सुलभा आत्याने सार्थक आणि ओवीच्या लग्नाचा विषय काढून खूप मोठा बॉम्ब फोडला आणि सर्वांनाच खूप मोठ्या धर्मसंकटात टाकले.

रात्री सर्व काम आटोपून सीमा ताई घाईतच त्यांच्या खोलीत आल्या.

"सीमा अगं मला थोडं बोलायचंय तुझ्याशी." रमाकांतराव म्हणाले.

"अहो त्याआधी मला तुम्हाला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. आधी माझं ऐकून घ्या बरं." सीमा ताई म्हणाल्या.

"बरं बाई तू सांग आगोदर मग मी बोलतो. तसंही लेडीज फर्स्टच असायला हव्यात, नाहीतर आम्हा पुरुषांचे काही खरं नाही बाबा." हसतच रमाकांतराव बोलले.

"अहो... ही काय गमतीची वेळ आहे का? आधीच मला खूप टेन्शन आलंय आणि तुमचं काय सुरू आहे."

"सीमा.. काय झालंय नेमकं? आणि इतकं कसलं टेन्शन आलंय तुला? शांतपणे बस बरं इथे आणि आता बोल." सीमाचा हात हातात घेत रमाकांतराव बोलले.

"अहो...तुम्हाला थोडाफार अंदाज आलाच असेल ना मला काय बोलायचं आहे ते? कदाचित तुम्हालाही त्याबाबतच बोलायचं आहे."

"हो म्हणजे अंदाज तर आहे पण तरीही स्पष्टपणे बोल म्हणजे मलाही नीट समजेल."

सीमा ताईंना काय बोलावे काहीच समजेना.

"तू सुलू ताईच्या बोलण्याचा विचार करत आहेस ना?"

"ह्ममम... ताईंनी खूपच कोड्यात टाकलंय ओ आपल्याला."

"त्यात काय एवढं? ओवीच्या मनात नसेल तर आपण तिच्यावर जबरदस्ती थोडीच ना करू शकतो सीमा."

"ते तर आहेच ओ, पण आपण नाही म्हणून सांगितले तर ताईंना खूप वाईट वाटेल ओ."

"अगं त्यात काय एवढं? मी तर तिला आधीच सांगितले आहे की ओवी आणि सीमाचा होकार असेल तरच गोष्टी पुढे जातील अन्यथा नाही. मग तू कशाला इतकं टेन्शन घेतेस?"

"अहो.. तसं नाही ओ. पण तुम्हाला आता कसं सांगू तेच मला समजेना."

"जे काही असेल ना सीमा ते स्पष्ट बोल. शेवटी आपल्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तिच्या मनाविरुद्ध काहीही व्हायला नकोय आणि एक बाप म्हणून ओवी सार्थक सोबत लग्नाला तयार नाहिये एवढं तर मला नक्कीच समजलंय. त्यामुळे याव्यतिरिक्त अजून काही असेल तर आताच स्पष्ट बोल."

"अहो...नंदा ताईंचा फोन आला होता, त्यांनी त्यांच्या संभवसाठी ओवीचा हात मागितलाय. एवढंच नाही तर दोनच दिवसांत ते ओवीला रीतसर मागणी घालण्यासाठी येणार आहेत."

"अगं सीमा तू हे आधी नाही का सांगायचं मग मला. मी मगाशी ताईला जे आहे ते स्पष्ट सांगून टाकले असते आणि तिथेच विषय संपवला नसता का. काय तू पण."

"अहो मलाही आज दुपारीच समजले हे, नंदा ताईंचा फोन आला तेव्हा. मी तुम्हाला सगळं सांगणारच होते पण त्याआधीच सुलभा ताईंनी त्यांचे मत व्यक्त केले. अशावेळी मी काहीच करू शकत नव्हते. म्हणून शांत बसण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता ओ माझ्याकडे."

"बरं मला एक सांग, ओवीला सगळं माहिती आहे का हे? आणि तिचं काय मत आहे त्याबाबतीत?"

"हो माहीत आहे तिला... पण अहो ऐका ना."

"आता काय?"

"मी एक गोष्ट याआधीच तुम्हाला सांगायला हवी होती, पण नाही सांगितली. त्यासाठी आधीच सॉरी."

"काय झालंय सीमा? सांगशील का आता?"

"ओवी आणि संभव आधीपासूनच एकमेकांच्या प्रेमात आहेत."

"काय? आणि तुला हे कधी आणि कसं समजलं?"

"मला महिन्यापूर्वी समजलं, ओवीच्या बर्थडेच्या दिवशी. तेही मला डाऊट आला तेव्हा मी खोदून खोदून तिला विचारले. थोडं विश्वासात घेतलं तिला तेव्हा कुठे पोरीने सर्वकाही सांगितलं मला. पण ओवीची निवड चुकीची नाही ओ."

"सगळं ठीक आहे सीमा. ओवीची निवड तर परफेक्ट आहेच. संभव मुलगा अगदी लाखात एक आहे. त्याबाबतीत कुठलीही शंका नाही, पण अगं एकदा तरी माझ्या कानावर घालतेस ना हे सर्व."

"अहो चुकलं माझं. खरंतर मी सांगायला हवं होतं तुम्हाला. पण तुमची रोजची धावपळ, कामाचा वाढलेला व्याप या साऱ्यांतून ही गोष्ट कशी सांगू तुम्हाला तेच मला समजत नव्हतं. त्यात ओवी मला म्हणाली होती की संभव पुढच्या महिन्यात सुट्टीला आल्यावर घरात सांगणार आहे आणि ठरल्याप्रमाणे आता सुट्टीला आल्यावर संभवने त्याच्या घरी ही गोष्ट सांगितली. त्यामुळेच नंदा ताईंनी आज फोन केला असावा. त्यांच्या बोलण्यातून तर त्या खूपच खुश दिसत होत्या."

"बरं ठीक आहे. पाहू आता पुढे काय करायचं ते. मी ताई सोबत बोलतो उद्या सकाळी आणि तिच्या बाजूने विषय पुढे जाण्याआधी तिथेच थांबवतो."

"अहो पण तुम्ही डायरेक्ट कसं नाही म्हणून सांगणार? ताईंना वाईट वाटेल खूप."

"मग काय करू तूच सांग. दुसरा पर्याय आहे का आपल्याकडे? ताईच्या आनंदासाठी मी ओवीच्या भावनांचा बळी नाही देवू शकत. आयुष्य ओवीचे आहे आणि तिच्या आयुष्याचा निर्णय घेण्याइतपत ती आता मोठी झाली आहे. हा...तिची निवड जर चुकीची असती तर मी कधीच तिला सपोर्ट केला नसता पण आता तोही प्रश्न नाहीये ना.

"हो....पण सुलभा ताईंचं काय? आणि सार्थक...त्यांच्या भावनांचं काय? मला तर ना काहीच कळेना झालंय बघा."

"सार्थकच्या भावना...म्हणजे काय सीमा? मी नाही समजलो."

"अहो, म्हणजे मला खात्री नाही पण मला राहून राहून असं वाटतंय की सार्थकच्या मनात नक्कीच ओवी विषयी काहीतरी भावना आहेत. माझ्या मते सार्थकला आपली ओवी आवडते. कदाचित सुलभा ताई सार्थकच्या सांगण्यावरूनच इथे आल्या असाव्यात."

"हे काय बोलतीयेस तू सीमा.?"

"असं फक्त वाटतंय ओ मला. तसं सार्थक काहीही बोलला नाही ओवीला. आधी तर मला वाटलं होतं की ओवी आणि सार्थक मध्येच काहीतरी सुरू आहे. पण नंतर समजले ओवी आधीच संभवच्या प्रेमात आहे आणि विशेष म्हणजे त्याला कार्तिकी आणि समर रावांचा सपोर्ट आहे. मग मला थोडे हायसे वाटले."

"हे बरंये...नाही नाही म्हणता तुला तर बरीच माहिती आहे सीमा. मला मात्र यातील एक शब्दही माहिती नाही. पण काय गं सार्थक बद्दल तुला असे का वाटले. काहीतरी कारण असेल ना त्याला?"

"अहो ओवीचा बर्थडे त्याने ज्या पद्धतीने साजरा केला ना त्याचवेळी मला सर्व गोष्टी क्लिक झाल्या. बायकांची नजर कधी धोका नाही देणार. म्हणूनच ओवीला विश्वासात घेऊन तिच्या मनातील गोष्टी मी काढून घेतल्या आणि मग वेगळेच सत्य समोर आले."

"बरं ठीक आहे. बघू आपण.. उद्या मी बोलतो ताईसोबत. आता तू जास्त विचार करत बसू नकोस. होईल सगळं ठीक. झोप आता शांत. तसाही खूप उशीर झालाय."

"हो ना. पुन्हा सकाळी मला लवकर उठायचंय. "

"झोप झोप आणि बी रिलॅक्सड ओवीच्या मनाविरुद्ध काहीही होणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस."

रमाकांतरावांचे धीराचे शब्द ऐकून सीमा ताईंच्या चेहऱ्यावर आपसूकच मग हास्य फुलले. आता कुठे त्यांना खूपच हलके वाटत होते. त्यामुळे अगदी काही वेळातच त्यांना शांत झोप लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी घराबाहेर पडण्याआधी रमाकांतरावांनी सुलभा ताईंना बोलावले.

"ताई...अगं खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्यासोबत. येतेस का जरा."

"काय रे भाऊ काय झालं?"

"अगं तेच तू काल ज्या विषयावर बोललीस ना त्याबाबतच थोडं बोलायचं आहे."

"हो बोल ना मग. बरं झालं तूच विषय घेतलास. चार चार वेळा मीच बोलणं योग्य नाही वाटत रे."

रमाकांत रावांच्या बाजूच्या खुर्चीत बसत सुलभा ताई बोलल्या.

"अगं मी जे काही तुला आता सांगेल त्याचा फक्त गैरअर्थ काढू नकोस."

"गैर अर्थ काय रे त्यात. तू बोल, तुमचा जो काही निर्णय असेल तो मान्य असेल मला. तसंही बोलण्याआधीच तुमचा नकार स्पष्ट जाणवतोय मला." क्षणात सुलभा ताईंच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले.

"हे बघ, हेच नकोय मला. तू असं रागावू नकोस बरं. शेवटी मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे."

"हो ते तर आहेच, मी कुठं काय म्हणते मग." नाराजीच्या सुरात सुलभा आत्या बोलल्या.

"थोडं स्पष्टच बोलतो ताई मी."

"तेच तर हवंय मला." इकडे तिकडे पाहत सुलभा आत्या  म्हणाल्या.

"अगं ओवीच्या मनात आधीच दुसरं कोणीतरी आहे आणि त्या मुलाच्या घरच्यांना देखील ओवी पसंत आहे. असं असताना मी ओवीच्या मनाविरुद्ध नाही जाऊ शकत. प्लीज तूही थोडं समजून घे."

"हो हो काही हरकत नाही."

"ताई राग आला तुला?"

"नाही रे... राग काय त्यात? उलट छान वाटलं तू स्पष्ट बोललास."

"मी समजू शकतो गं तुझ्या भावना."

"तू नाही समजू शकत भाऊ. जर तसं असतं तर तू स्वतः या गोष्टीत जातीने लक्ष घातलं असतं. तू माझ्या पाठी भक्कम उभा राहिला असता. माझा आधीचा सार्थक असता आणि तुम्ही लोकांनी नकार दिला असता तर काही नसतं वाटलं. तुझी मुलगी डॉक्टर होणार आणि माझा मुलगा आतापर्यंत तिच्यापेक्षा कमीच होता. पण आता परिस्थिती पूर्णत: वेगळी आहे भाऊ. असं असताना तुम्ही नकार द्याल असं वाटलं नव्हतं."

"ताई नाही म्हणायचं कारण तर मी तुला सांगितलं ना गं आताच. मग तरीही तू असं का गं बोलतेस?"

"तसं नाही रे पण मोठ्या आशेने मी आले होते तुझ्याकडे. नाराजीच पदरात पडेल असे स्वप्नातही वाटले नव्हते रे."

"यावर काय बोलू मी आता?"

"काही बोलू नको रे. आता ओवीनेच मुलगा पसंत केला आहे म्हटल्यावर तुझं तरी काय चालणार ना तिच्यापुढे?"

"ताई अगं मलाही सर्व रात्रीच समजलंय. आधी मलाही काहीच माहीत नव्हतं गं. नाहीतर कालच बोललो नसतो का मी."

"याचा अर्थ लेकीने मुलगा निवडला आणि तू त्याची कोणतीही चौकशी न करता लगेच तिच्या हो मध्ये हो मिळवले सुद्धा. त्या मुलापेक्षा जास्त तू सार्थकला ओळखतोस ना रे? मग तरीही तू तुझ्या सख्ख्या भाच्याला सोडून कोणा परक्या मुलाचा जावई म्हणून आधी विचार केलास आणि तेही मुलाची कोणतीही माहिती न काढता, याचंच खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय भाऊ."

बोलता बोलता सुलभा ताईंच्या डोळ्यांत आसवांची दाटी झाली.

"ताई अगं तसं काहीच नाहीये. तू अर्धवट ऐकून घेवून वक्तव्य नको ना गं करुस."

"जाऊ दे भाऊ. जा तू तुझ्या कामाला. उगीच आता चर्चा करण्यात तुझा अमूल्य वेळ नको वाया घालवूस. मलाही माहितीये तुझ्या मागे कामाचा खूप व्याप आहे."

एव्हाना भाऊ बहिणीची सुरू असलेली चर्चा घरातील इतर सदस्यांच्या कानावर पडली होती. त्यांनाही आता सर्व गोष्टींचा अंदाज आला होता. सुलभा ताईंची नाराजी देखील सर्वांना स्पष्ट दिसत होती.

"ताई...मी चुकीचा आहे असं डायरेक्ट ठरवून मोकळी झालीस सुद्धा तू. माझी बाजू तर आधी समजून घेतेस ना."

"आता अजून काय समजून घेवू रे भाऊ. जाऊ दे आता हा विषय आपण इथेच थांबवूयात. चर्चा करून थोडीच ना काही निष्पन्न होणार आहे."

"बरं बाकी सोड सगळं पण मला एक गोष्ट सांग, तू तुझ्या मनाने ओवीला सून बनवण्याचा विचार केला होतास की सार्थक तुला काही बोलला होता?"

"माझ्या दृष्टीने ते महत्त्वाचं नाहीये भाऊ आता. मी म्हटलं ना आपण हा विषय इथेच थांबवूयात."

"बरं... तू त्रास करून घेवू नकोस. नाही बोलत मी काही. पण एक गोष्ट सांगतो तुला, सार्थकसाठी त्याला हवी तशी मुलगी शोधण्याची जबाबदारी माझी. मग तर झालं."

काहीही न बोलता सुलभा ताईंनी फक्त मिश्किलपणे हसून  प्रतिसाद दिला आणि त्या उठून बाजूला निघून गेल्या.

क्रमशः

काय होईल आता पुढे? सुलभा ताईंचा राग तर स्वाभाविक होता. पण अर्धवट माहितीमुळे भाऊ बहिणीच्या नात्यात दरी निर्माण होणार की सत्य समोर आल्यावर समजूतदारपणे नाती टिकवण्यासाठी प्रयत्न होणार? आणि सार्थक...तो पचवू शकेल का हा नकार? जाणून घेण्यासाठी वाचत राहा अधीर मन झाले...एक प्रेमकथा.

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all