अधीर मन झाले..(भाग ४५)

अधीर मन झाले..एक प्रेमकथा
सुलभा ताई काही ऐकून घ्यायच्या मनःस्थितीतच नव्हत्या. 'एकदा का ओवी सून बनून घरी आली की मग माझ्या सार्थकची काळजीच मिटली.' असे त्या मनोमन बोलायच्या. खूप साऱ्या अपेक्षा घेऊन त्या भावाकडे आल्या होत्या. पण समोरून जेव्हा नकार आला तेव्हा मात्र त्यांची सगळी स्वप्न एका क्षणात धुळीला मिळाली होती.

रमाकांत रावांचा देखील नाईलाज होता. त्यांच्या परीने त्यांनी त्यांच्या सुलभा ताईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सीमा ताईंना ज्या गोष्टीची भीती वाटत होती अखेर तेच झाले होते. सुलभा ताई खूपच चिडल्या होत्या.

"बरं ताई येतो... काळजी घे... सध्या तू रागात आहेस म्हणून अशी बोलत आहेस, तुझा राग शांत झाला की नक्की आपण बोलू. तुला जरी बोलायचे नसले माझ्याशी तरी मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. आता तू काहीही ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नाहीये. हे मी अगदीच समजू शकतो." एवढे बोलून बहिणीचा निरोप घेऊन रमाकांतराव त्यांच्या पुढच्या कामासाठी निघून गेले.

"सुलभा...तुझा राग अगदीच समजू शकते मी. पण याचा अर्थ असा नाही की  आम्हाला काहीच कळत नाही. अगं तूही थोडं समजून घे. ओवीच्या मनात जर दुसरं कोणीतरी असेल तर रमाकांत तिला सार्थकसोबत लग्नाला कसा काय फोर्स करू शकेल?" आजी लेकीची समजूत काढत म्हणाल्या.

"जाऊ दे ना आई. सोड ना तो विषय आता. कितीही चर्चा केली तरी काही गोष्टी बदलणार आहेत का आता?"

"सुलभा अगं असं बोलून उलट तूच काही गोष्टी धरुन ठेवत आहेस. तुझा राग स्पष्ट दिसत आहे तुझ्या वागण्या बोलण्यातून आणि हे अजिबात चांगलं नाहीये आ."

"मग काय करू आई मी? तुम्हा लोकांना कल्पना सुद्धा नसेल अगं ..ह्या एका नकारामुळे पुढे काय होईल आणि काही नाही याचा तर विचारच करवत नाहीये मला."

"म्हणजे?"

"म्हणजे काही नाही आई. मी निघते थोड्या वेळात. जावं लागेल मला आता. ज्या कामासाठी आले होते ते तर पूर्ण झालं नाही मग आता थांबून तरी काय करू?"

सुलभा ताईंच्या बोलण्याने नात्यांमध्ये निर्माण होत असलेली दरी स्पष्ट दिसत होती.

"ताई...अहो दुपारचं जेवण झाल्यावर जा ना हवंतर." सीमा ताई बोलल्या.

"नको गं सीमा. जावं लागेल मला. हवंतर नाश्ता करते आणि मग निघते."

सुलभा ताई काही ऐकायला तयारच नव्हत्या.

तेवढ्यात ओवी घाई घाईत बाहेर आली. तिची कॉलेजला जायची गडबड सुरू होती. पण आता सुलू आत्याला कसे फेस करावे ते काही ओवीला समजेना.

घाईतच मग तिने नाश्ता केला आणि ती उठली. अधूनमधून ती सुलभा आत्यावर बारीकसा कटाक्ष टाकत होती. पण हे असे सगळे झाल्यावर आत्यासोबत काय आणि कसे बोलावे तेच तिला कळत नव्हते. आत्याच्या नजरेला नजर देण्याची तर तिची हिंमतच होत नव्हती. मग बोलणे तर खूपच दूरची गोष्ट.

दुरुनच सीमा ताईंनी 'आत्यासोबत बोल' म्हणून ओवीला
खुणावले. धाडस करून ती आत्यासमोर गेली.

"आत्या... चल येते मी.?" असे म्हणत ओवी सुलभा आत्याचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पायाशी वाकली.

" ह्ममम...खूप मोठी हो. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. जे जे हवे ते सारे तुला मिळो." मोठ्या मनाने आत्याने ओवीला आशीर्वाद दिला. मनातून तिलाही मग हायसे वाटले.

तसाही आत्याचा ओवीवर आधीपासूनच खूप जीव होता. ओवीसारखी हुशार मुलगी आपली सून व्हावी ही आत्याची मनोमन इच्छा होती. पण आता तर ते शक्यच नव्हते.

"बरं...चला... आई, वहिनी निघते मी आता." टेबलवरील पर्स घेत  सुलभा आत्या बोलल्या.

"सुलभा... याचा अर्थ नाहीच ऐकणार ना तू आमचं? का गं इतका हट्टीपणा करतेस?"

"आई, अगं समजून घे ना. जावं लागेल मला. कालपासून घर सोडलंय. त्यात आता सानू नाहीये तिच्या बाबांची काळजी घ्यायला. त्यामुळे मला जावंच लागेल गं."

"बरं बाई... जा. पण पुन्हा एखाद दिवशी निवांत वेळ काढून ये आणि आता मनात कोणतीही अढी ठेवू नको. माझेही आता असे कितीसे दिवस राहिले. एवढ्या तेवढ्या कारणाने तुमच्यात वाद होवू देऊ नका. याआधी जसं सगळं छान सुरू होतं तसंच यापुढेही सुरू ठेवा." लेकीचा हात हातात घेत आजी कळकळीने सांगत होत्या.

'आई... कळतंय गं मला. पण मी तरी काय करु? माझ्या सार्थकसाठी मोठ्या आशेने मी इथे आले होते. मी घेईल गं समजून पण त्याला कोण समजावेल आता. वेडा झालाय तो ओवीच्या प्रेमात. आता काय उत्तर देवू मी त्याला. एका आईसाठी तिच्या लेकरांचा आनंद किती महत्त्वाचा आहे हे मी अगदीच समजू शकते.' काहीही न बोलता नजरेतूनच सुलभा ताई खूप काही बोलून गेल्या.

विचारानेच सुलभा ताईंच्या डोळ्यांत आसवांची दाटी झाली होती. भावनांना कसाबसा आवर घालत त्या तशाच घराबाहेर पडल्या. आज पहिल्यांदा लेकीला असं नाराज होवून माहेरचा उंबरा ओलांडताना आजी पाहत होत्या. नकळतपणे त्यांचेही डोळे अश्रूंनी डबडबले.

"पोहोचल्यावर फोन कर गं." पाठमोऱ्या लेकीला आजी काळजीपोटी बोलल्या.

एकाच दिवसांत मोहिते कुटुंबातील सर्व वातावरणच बिघडून गेले होते. तिकडे देशमाने फॅमिलीत मात्र आनंदाला उधाण आले होते. एकीकडे समर आणि कार्तिकी आता आई बाबा होणार ह्या आनंदाच्या बातमीने संपूर्ण घर आनंदून गेले होते आणि आता तर ओवी धाकटी सून बनून देशमाने फॅमिलीचा एक भाग होणार म्हणजे दुधात साखरच नाही का.

कधी एकदा ओवीला भेटतो असे झाले होते संभवला. आल्यापासून खूप प्रयत्न करूनही त्याला ओवीला भेटताच आले नाही. त्यात दिवसभर ओवीचे कॉलेज आणि रात्री भेटणे तर शक्यच नव्हते त्यामुळे तोही तिला भेटण्यासाठी खूपच आतुर झाला होता. त्यात आता दोघांच्याही एकत्र येण्यावर घरच्यांनी शिक्कामोर्तब केले म्हणजे त्यांच्या भेटीचा मार्ग तर मोकळाच झाला होता जणू.

दुपारी कार्तिकीने सवयीप्रमाणे माधवी ताईंना फोन केला.

"आई अगं तुला समजले की नाही अजून."

"काय गं.. काय समजले की नाही?"

"हेच की दोनच दिवसांत आम्ही येत आहोत तुमच्याकडे, आमच्या संभव भाऊजींसाठी ओवीचा हात मागायला."

"काय...?  हे काय बोलत आहेस तू कार्तिकी? आता हे आणि कधी ठरलं?"

"म्हणजे तुला काहीच माहीत नाही अजून?"

"मला कसं माहिती असणार? आणि मला कोण सांगणार?"

"अगं सीमा काकी बोलली नाही का अजून घरात?"

"कार्तिकी...तू काय बोलत आहेस ना मला काहीच समजत नाहिये. त्यात आधीच इकडे वेगळेच रामायण झाले आहे मग कसे समजणार तूच सांग?"

"आई...काय झालंय नेमकं तिकडे?"

"वेट वेट वेट...याचा अर्थ ओवीच्या आयुष्यात जो मुलगा आहे तो संभव आहे?"

"ऑफ कोर्स आई. मला आधी पासूनच माहीत होतं हे. पण समरने कोणालाही सांगू नको असं बजावलं होतं मला. संभव भाऊजी आता घरी आले तेव्हा त्यांनी ओवी आणि त्यांच्याबद्दल घरात सर्वकाही सांगून टाकले. घरात सगळ्यांना इतका आनंद झाला म्हणून सांगू आई. आपली ओवी ना जिथे जाईल तिथे सर्वांना आपलंसं करते. म्हणून बघ आता आमच्या घरुन सुद्धा किती छान सपोर्ट मिळतोय त्यांच्या नात्याला."

"देवा... आता पुढे काय होणार याचच टेन्शन आलंय मला."

"काय बोलतोयेस आई तू? अगं इतकी आनंदाची बातमी आणि तुला आनंद झाला नाही? तिकडे नेमकं काय झालंय? ते तरी सांग."

"काय सांगू तुला मी आता! रात्रीपासून सगळंच वातावरण बिघडून गेलंय इकडे?"

"अगं मला काहीच समजत नाहीये तू काय बोलत आहेस आई? मला समजेल असं बोल की जरा."

माधवी ताईंनी मग घडलेला सर्व प्रकार कार्तिकीला सांगितला. तिलाही क्षणभर धक्काच बसला. हे मध्येच असं काहीतरी ऐकायला मिळेल असा स्वप्नात सुद्धा तिने विचार केला नव्हता.

"कार्तिक पण तू तुझ्या घरात कोणाला बोलू नकोस ही गोष्ट. तुम्ही मुलींनी इतके दिवस हे असं लपवून नव्हतं ठेवायला पाहिजे गं. निदान तू तरी मला बोलायला हवं होतंस कार्तिकी."

"आई अगं ओवीचं कॉलेज सुरू होतं. त्यात भाऊजी तिकडे मग सांगण्याचा काही प्रश्नच नव्हता ना. आताही भाऊजींच्या लग्नाचा विषय घरात सुरू होता त्यामुळे समरच्या सांगण्यावरूनच त्यांनी घरात ही गोष्ट सांगितली. तसंही ओवीची इंटर्नशिप झाल्याशिवाय लग्न होणारच नाहीये. म्हणजे ह्या सगळ्यांत अजून एक ते सव्वा वर्ष तरी जाणार आहे. आता फक्त छोटेखानी आपल्या आपल्यात अंगठीचा कार्यक्रम करण्याचा विचार आहे घरच्यांचा. म्हणजे रात्री तशी चर्चा सुरू होती."

"ते सगळं ठीक आहे गं पण आता सुलभा ताईंना जेव्हा समजेल की तो मुलगा दुसरा तिसरा कोणी तुझा दिर आहे तेव्हा काय वाटेल त्यांना?"

"आत्याला काय वाटेल यापेक्षा ओवी आणि संभव भाऊजींच्या भावना महत्त्वाच्या नाहीत का आई. त्यात लग्न म्हणजे दोन जीवांच्या आयुष्याचा प्रश्न असतो. ओवीचे सार्थकवर प्रेमच नाही तर पुढे जाऊन त्यांच्या नात्याला काय अर्थ आहे. जबरदस्तीने आपण तिच्या मनाविरुद्ध जाऊन काहीच करू शकत नाही ना."

"सगळं ठीक आहे गं. पण सुलभा ताईंना कोण समजावणार..?"

"मी बोलू का आत्या सोबत?"

"ये बाई..तू तुझा जीव सांभाळ आता. ह्या भानगडीत पडूच नकोस तू. मला आधी सीमाशी बोलायला हवं. रमाकांत भाऊजी देखील खूप टेन्शन मध्ये आहेत. सध्या तरी तू शांत रहा. मी बघते काय करायचं ते. तू आराम कर आता आपण नंतर बोलू आणि काळजी घे स्वतःची. तिसरा लागलाय आता. त्यामुळे जरा जपून."

"हो गं बाई, मी घेतेय गं माझी काळजी. तू नको टेन्शन घेवूस. आधी तू बोलून घे सर्वांशी."

"हो मला बोलावं तर लागणारच आहे. बघते मी. तू कर आराम." असे बोलून माधवी ताईंनी बोलणे आवरते घेतले.

त्या लगेचच सीमा ताईंसोबत बोलायला गेल्या.

"सीमा अगं काय सुरू तुझं आणि भाऊजींचं?"

"कशा संदर्भात बोलत आहात ताई तुम्ही."

"ओवी आणि संभवच्या नात्याबद्दल, ही एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून का लपवली सीमा? आपण एक फॅमिली आहोत ना गं. मग घरातल्या गोष्टी घरातल्या सदस्यांना माहित नको का? कार्तिकी बोलली नसती तर मला काहीच समजले नसते."

"ताई तसं नाहीये ओ काही. निदान तुम्ही तरी समजून घ्या ना. हे सगळं इतकं घाईत झालं की मलाच समजेना, काय चूक काय बरोबर."

"काळजी करू नकोस. निघेल काहीतरी मार्ग. रात्री हे दोघेही घरी आल्यावर आपण बोलून मार्ग काढू यातून. तोपर्यंत कार्तिकीच्या घरच्यांना काही बोलू नकोस."

"काय बोलू नको कार्तिकीच्या घरच्यांना? नेमकं काय सुरू आहे तुमच्या दोघींचं?" दोघी सुनांचे बोलणे नेमके आजीच्या कानी पडले.

क्रमशः

आता कशी सुटेल ही सगळी गुंतागुंत? तिकडे देशमाने फॅमिलीत तर मुलांच्या साखरपुड्याची चर्चा सुरू होती. आता सुलभा आत्या नाराज असताना कसा पार पडेल ओवी आणि संभवचा साखरपुडा? जाणून घेऊयात पुढील भागात.

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all