अधीर मन झाले..(भाग ४६)

अधीर मन झाले..एक प्रेमकथा
सीमा ताई आणि माधवी ताईंची सुरू असलेली चर्चा नेमकी आजीच्या कानावर पडली.

"काय गं माधवी..काय विचारतिये मी? काय कळू द्यायचं नाही कार्तिकीच्या घरच्यांना? काही प्रॉब्लेम झालाय का? काय बोलताय तुम्ही? मलाही कळू द्या."

"आई..अहो काही नाही झालंय.. तुम्ही उगीच टेन्शन घेताय." सीमा ताई बोलल्या.

"तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. एवढं कळतं मला सीमा. जे काही असेल ते सांगून मोकळं व्हा बरं."

"सीमा आता काही गोष्टी लपवण्यात काहीच अर्थ नाहीये. तसंही आज ना उद्या ह्या गोष्टी समोर येणारच आहेत मग आता ही लपवाछपवी नकोच." माधवी ताई म्हणाल्या.

"ताई तुम्हीच सांगा काय ते माझी नाही हिंमत होणार." सीमा ताई म्हणाल्या.

"हे असं असतं तुझं...वेळीच बोलत नाहीस आणि मग काही गोष्टी अंगाशी येतात."

"बरं सांगताय का आता? काय झालंय नेमकं? किती अंत पाहणार आहात माझा?"

"आई अहो, आपल्याला काल समजलं ना, ओवीचा सार्थकला नकार देण्याचं कारण."

"हो मग... त्याचं काय झालं आता?"

"आई ओवीच्या मनात जी व्यक्ती आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून कार्तिकीचे लहान दिर आहेत."

"अगं हे काय बोलत आहेस तू माधवी! हे जर सुलभाला समजलं तर तिला काय वाटेल?"

"आई पण आता त्याला दुसरा ऑप्शन आहे का हो. संभव देखील खूप चांगला मुलगा आहे. वेल सेटल्ड आहे. त्यात मुलं आता एकमेकांत गुंतली आहेत मग असं असताना आपण नाही म्हणण्याचं कारणच कुठे उरतं आणि तसंही अगदी सहजच बोललेली आपली वाक्यच आता खरी ठरताहेत असं वाटतंय. दोघी बहिणींचं प्रेम पाहून आपणच बोलत होतो ना आधी की एकाच घरात तुम्हा दोघींनाही द्यायला हवं मग काही प्रश्नच नाही. कदाचित आता देवाच्या मनातही तीच इच्छा असावी. तसंही एकाच वेळी तीन आयुष्य खराब होण्याऐवजी आपल्या एका निर्णयामुळे निदान दोन आयुष्य वाचतील तरी. सार्थकसाठी सुद्धा आपण ओवी सारखीच छान मुलगी शोधूयात ना म्हणजे त्याचेही आयुष्य मार्गी लागेल."

"ह्मममम... तुझंही खरंच आहे म्हणा, तसंही ओवीची निवड चुकीची नाही हेही तितकंच खरं. छान मुलगा निवडला ओवीने. आता दोघी बहिणी एकाच घरात नांदणार याचा आनंद मानायचा की सार्थक आणि ओवीच्या नात्याला काही भविष्य नाही याचे दुःख मानायचे. काही कळत नाहीये आता सुलभाची समजूत कशी काढायची."

"आई...तुम्ही नका हो काळजी करू निघेल काहीतरी मार्ग."

"पोर पहिल्यांदा अशी नाराज होऊन निघून गेली गं. त्यामुळे खूपच वाईट वाटतंय बघ."

बोलता बोलता आजीचे डोळे पाणावले. डोळ्याला पदर लावत त्या तशाच खुर्चीत जाऊन टेकल्या.

"आई उद्या कार्तिकीच्या घरचे लोक येणार आहेत ओवीला रीतसर मागणी घालायला."

"अगं पण हे असं अचानक का?"

"आई अहो संभव सुट्टीवर आलाय. त्याचीही पुन्हा सुट्टी संपेल म्हणून तिकडच्या लोकांची घाई सुरू आहे. लगेचच छोटेखानी अंगठीचा कार्यक्रम करण्याचा त्या लोकांचा विचार आहे. आताच मला कार्तिकीकडून समजले. म्हणूनच सीमाला म्हणत होते की इथे काय घडले ते तिकडच्या लोकांना समजता कामा नये."

"सुलभालाही नेमका हाच मुहूर्त सापडला होता का. असं टोकाचं कधी वागत नाही ती, पण आज तिला काय झालं होतं देवच जाणे. त्यामुळे इतकी आनंदाची बातमी आणि घरात असे सुतकी वातावरण झाले आहे. बरं जाऊ द्या ते सगळं तुम्ही तुमच्या पद्धतीने तयारी सुरू करा, पाहू जे होईल ते होईल."

असे बोलून आजीने दोन्ही सुनांना पाठिंबाच दिला होता. दोघींनाही त्यामुळे खूपच हलके वाटू लागले. मनावरचे खूप मोठे ओझे उतरल्यासारखे झाले.

"आई पण घरात कार्यक्रम असेल तर सुलभा ताईंना तर बोलवावेच लागणार ना. काहीही करा पण प्लीज त्यांना बोलावून घ्या. झालं गेलं विसरून जा म्हणावं. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करुया."

"हो मी बोलते तिच्यासोबत तुम्ही नका काळजी करू." आजी म्हणाल्या.

सुलभा ताई जे काही वागल्या ते फक्त आणि फक्त सार्थकच्या प्रेमापोटी होतं. कारण 'मी लग्न करेल तर फक्त ओवीशीच नाहीतर कोणाशीच नाही. ओवीचं माहीत नाही पण माझं ओवीवर खूप प्रेम आहे आणि आई काहीही कर पण मामा मामीला आणि ओवीला कंविन्स कर तू.' असे सार्थकने त्यांना बजावून ठेवले होते. त्यामुळे त्यांचाही आता नाईलाज झाला होता. आता सार्थकला काय उत्तर द्यावे तेच सुलभा ताईंना समजेना. 

आपण असं ओवीच्या मनाविरुद्ध जाऊन तिला सार्थक सोबत लग्नासाठी फोर्स नाही करू शकत हे सुलभा ताईंना ठाऊक होते. पण जेव्हा सार्थकला सगळं खरं समजेल तेव्हा तो कसा रीॲक्ट करेल? या विचारानेच त्या हैराण झाल्या होत्या. संपूर्ण प्रवासात त्यांच्या डोक्यात फक्त हाच विचार सुरू होता.

घरी पोहोचताच सर्वात आधी त्या देवघरात गेल्या आणि देवासमोर बसून त्यांनी देवाला मनापासून आवाज दिला. डोळ्यांत आसवांची दाटी झाली होती. लेकाच्या काळजीने त्या खूपच अस्वस्थ झाल्या होत्या.

'स्वामी आता तुम्हीच बुद्धी द्या. मी काय करू काहीच समजत नाहीये. समोर सगळा अंधार दिसत आहे. एकीकडे लेकाला आनंद मिळवून देण्यासाठी माझी धडपड सुरू आहे पण दुसरीकडे मी माझ्या जीवाभावाच्या रक्ताच्या माणसांनाच दुखवत आहे. मी जे वागत आहे ते सगळं काही चुकीचं आहे...समजतंय मला, पण सार्थकसाठी मी काहीच करू शकले नाही तर आई म्हणून मी हरेल. त्याचा माझ्यावरचा विश्वास उडेल. लेकराला खोट्या आशेवर तरी कसं ठेवायचं? आणि त्याला सगळं काही खरं समजलं आणि त्याने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर?? नाही.. नाही असं काहीही होता कामा नये. स्वामी आता तुम्हीच मार्ग दाखवा. मी काय करू मला सांगा.'

सुलभा ताई देवाला अत्यंत आगतिकपणे विनवणी करत होत्या.

तेवढ्यात त्यांना सार्थकचा फोन आला. तसे त्याला ठाऊक नव्हते त्या ओवीकडे जाऊन आल्या आहेत म्हणून. त्यामुळे 'आता इतक्यात सार्थकला खरे कळता कामा नये.' असा विचार करून त्यांनी सार्थक पासून सध्या तरी ही गोष्ट लपवण्याचे ठरवले होते. कदाचित देवानेच त्यांना तशी बुद्धी दिली असावी.

त्याच दिवशी रात्री रमाकांतरावांनी बहिणीला कॉल केला. पुन्हा एकदा तिच्याशी बोलून सर्व गैरसमज दूर करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती.

"हॅलो ताई...कशी आहेस? बरं वाटतंय का गं आता?"

भावाच्या अशा काळजीपोटी विचारपूस करण्याने सुलभा ताईंना खूपच भरुन आले.

"भाऊ जमलं तर मला माफ कर रे. मी सकाळी खूपच तोडून बोलले तुला. खरंतर या सगळ्यांत तुझी काहीच चूक नव्हती. पण मी तरी काय करु? माझाही नाईलाज झालाय. तू वाईट वाटून घेऊ नकोस रे."

"नाही गं...तू असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. तुझ्या मनाची अवस्था काय झाली असेल हे मी समजू शकतो. लेकासाठी तुझ्यातील आईला तसे वागणे  भाग होते. तुझ्या ठिकाणी दुसरी कोणतीही आई असती तरी ती अशीच वागली असती."

"भाऊ... तू खूप मोठया मनाचा आहेस रे. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तू मनात कोणताही राग ठेवला नाहीस आणि मोठ्या मनाने मला कॉल केलास. तुझ्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर नक्कीच हा विषय इतक्या सहजासहजी सोडून दिला नसता. पण मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तर मला तुमच्यासारखे भाऊ मिळाले. पण काहीही म्हण भरुन पावले रे आज."

"बरं ऐक मी आता तुला जे काही सांगेल त्याचा तू चुकीचा अर्थ घेऊ नकोस. किंवा हे सगळं तुझ्यामुळे आम्ही करत आहोत असेही वाटून घेऊ नकोस." रमाकांतराव हळूहळू मूळ मुद्द्यावर येत होते.

"हो रे नाही घेणार मी चुकीचा अर्थ पण आधी विषय काय आहे ते तर सांग."

"परवा ओवीचा साखरपुडा आहे आणि तुला यायचंय इकडे."

क्षणभर सुलभा ताईंना खूपच वाईट वाटले. पण तरीही मनाला समजावत त्या पुढे बोलू लागल्या.

"हे असं इतक्या घाईत? का रे भाऊ?" थोड्या तणावपूर्ण स्वरात सुलभा ताईंनी विचारले.

"सकाळीच सांगणार होतो..पण तू ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नव्हतीस."

"त्याबद्दल खरंच सॉरी. पण आता सांग आणि मुलगा कोण आहे हेही तू मला सांगितलेच नाही."

"तेच तर सांगणार होतो सकाळी, पण ठीक आहे आता ऐक. अगं ओवी आणि संभवचा साखरपुडा आहे परवा. संभव म्हणजे आपल्या कार्तिकीचे धाकटे दिर."

"हो का...अरे व्वा... छानच... पण इतक्या घाईमध्ये का बरं करताय? खरंच माझ्यामुळे तर नाही ना?"

"गप गं... तसं अजिबात नाहीये. अगं संभवची सुट्टी थोडेच दिवस आहे. त्यालाही पुन्हा ड्युटीवर जावे लागेल. त्यामुळे त्या लोकांनीच सर्व काही ठरवले आहे. बाकी दुसरं काहीच कारण नाही. अगं मलाही सर्व काही रात्रीच समजलंय. याआधी मला एक शब्दही बोलली नाही सीमा. पण मुलगा ओळखीचा आणि खात्रीचा असल्याने मीही काहीच बोलू शकलो नाही."

"ठीक आहे रे. तसेही आपण सगळे बोलत होतो अगदी तसेच झाले म्हणायचे. दोघी बहिणी पुन्हा एकदा कायमच्या एकत्र येणार. देवाची देखील हीच इच्छा होती म्हणायचं."

"हो ना.. संभवच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर मी पूर्ण चौकशी करूनच पुढे पाऊल टाकले असते. इतकी घाई कधीच केली नसती."

"हो रे..मलाही आता सर्वकाही समजले आहे. संभव सारखा मुलगा असेल तर मग जास्त चौकशी करण्याची गरजच नाही. खरंच तुमच्या दोन्ही लेकिंनी नशीब काढले. हा आता ओवी सारखी मुलगी माझी सून होवू शकत नाही याचं दुःख मात्र आयुष्यभर मनात सलत राहील. पण भाऊ एक विनंती होती ओवीच्या साखरपुड्याची बातमी सार्थकला समजू नये एवढीच माझी इच्छा आहे."

"ताई अगं.. पण पुढे जाऊन कधी ना कधी त्याला हे समजणारच ना. मग तेव्हा खूप त्रास होईल त्याला. त्यापेक्षा आताच सांगितले तर बरे होइल."

"नाही रे... मी ओळखते माझ्या लेकाला.  ही एवढी मोठी गोष्ट त्याला नाही सहन होणार. ओवीमधे जीव अडकलाय रे त्याचा. ओवीला असं दुसऱ्या कोणाची तरी होताना पाहून माहीत नाही तो कसा रिॲक्ट होईल. त्यात तो एकटाच आहे तिकडे. त्यामुळे काळजी वाटते त्याची. मीही अजून काहीच बोलले नाही त्याला आणि बोलणार पण नाही."

"ताई...समजू शकतो गं मी. ओवीच्या आयुष्यात संभव नसता ना तर खरंच मी सार्थक आणि ओवीच्या लग्नाचा नक्कीच विचार केला असता. पण आता सगळ्याच गोष्टी खूप पुढे गेल्या आहेत."

"असू दे रे... देवाच्या मनात जे आहे तेच होणार नेहमी. आपण फक्त निमित्तमात्र. जन्मतःच आयुष्याची सर्व कागदपत्र त्यानेच तर लिहिलेली असतात. त्यात बदल करण्याचा आपल्याला अधिकारच नाही. पण तरीही आपण त्यात बदल करण्याचा प्रयत्न करतोच. असो... जे होते ते त्याच्याच मर्जीने त्यामुळे त्याच्या विरुध्द जाऊन आपण काही गोष्टी नाही बदलू शकत. ओवीच्या आयुष्यात सार्थक नाही तर संभव आहे ही देखील त्याचीच इच्छा आहे. आपण त्यात बदल करणारे आहोत तरी कोण? नाही का?"

"ताई...अगदी पटेल असं बोललीस गं. खरंच नियतीच्या मनात काय आहे ते आपण कोणीही सांगू शकत नाही बघ. कालपर्यंत तर माझ्या ओवीच्या लग्नाचा साधा विचार पण माझ्या मनात आला नाही आणि आज बघ परिस्थिती काय आहे. आज तिच्या साखरपुड्याची घरात चर्चा सुरू आहे. खरंच देवाच्या मनात जे आहे तेच होते बघ. तूही मोठ्या मनाने मला माफ केलंस खरंच खूप बरं वाटलं." रमाकांतराव म्हणाले.

"भांडून आरडा ओरडा करून आपल्या मनाचे खरे करत बसले ना भाऊ तर नाती तुटायला मग एक क्षण पुरेसा ठरेल. आणि मला ते नकोय. नशिबाने मला तुमच्यासारखे भाऊ मिळालेत. मग मी तुम्हाला नको का जपायला आणि सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असे नाही ना."

"किती समजूतदार आहे माझी बहिण. अशीच आमच्या पाठीशी कायम राहा ताई. जिथे आम्ही चुकू तिथे हक्काने आमचा कान पकडण्याचा अधिकार सुद्धा आहे तुला हे देखील विसरू नकोस."

"नाही रे अशी वेळ येणारच नाही."

"बरं...उद्या नक्की ये. आम्ही वाट पाहतोय तुझी. जर वेळेत काही बदल झाला तर  मी फोन करतो तुला."

"हो रे येईल मी. बरं चल कामं खूप पडलीत. आवरते आता. असंच अधूनमधून फोन करत जा रे. छान वाटलं आज तुझ्याशी बोलून."

"मलाही खूप छान वाटलं.. बरं, काळजी घे आणि उद्या ये नक्की."

"हो रे बाबा येईल म्हटलं ना..चल ठेवते मी." म्हणत सुलभा ताईंनी फोन ठेवला. पण तरीही त्यांच्या डोक्यातून सार्थकचा विचार काही केल्या जाईना.

"देवा...सांभाळ रे माझ्या सार्थकला." म्हणत त्या त्यांच्या कामाला लागल्या.

क्रमशः

सुलभा ताईंच्या समजूतदार पणामुळे भाऊ बहिणीचे नाते पुन्हा एकदा घट्ट झाले खरे पण सार्थकला न सांगता ओवीचा परस्पर साखरपुडा उरकला तर  त्याच्या मनाची अवस्था काय होईल? हा एव्हढा मोठा धक्का त्याला सहन होईल का? जाणून घेण्यासाठी वाचत रहा 'अधीर मन झाले..एक प्रेमकथा.'

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all