अधीर मन झाले..(भाग ४७)

अधीर मन झाले..एक प्रेमकथा
इकडे संभव आणि ओवीची प्रेमकहाणी आता आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणावर येवून पोहोचली होती. तर तिकडे सार्थक मात्र ओवीसोबत भावी आयुष्याची स्वप्न रंगवत तिच्या एकतर्फी प्रेमात आकंठ बुडाला होता.

सार्थकच्याच सांगण्यावरून सुलभा आत्या सार्थकसाठी ओवीचा हात मागायला म्हणून भावाकडे गेल्या होत्या. समोरून मात्र नकार आल्यानंतर काही काळ त्या अस्वस्थ झाल्या. रागाच्या भरात भावाला त्या काहीबाही बोलून गेल्या. पण त्यांना त्यांची चूक समजली, एव्हढेच नाही तर ओवी आणि संभवबद्दल समजल्यानंतर त्याही  खुश झाल्या. पण सार्थकसाठी त्यांना तितकेच वाईट देखील वाटत होते.

आता ओवी आपली सून होऊ शकत नाही हे सत्य स्वीकारण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. 'सार्थकला आता कोणत्या तोंडाने उत्तर देवू?' ही भीतीही त्यांना खूपच सतावत होती.

तिकडे संभव आणि ओवी आयुष्याच्या नवीन प्रवासाची स्वप्न रंगवत होते. प्रेमाच्या गप्पांना उधाण आले होते.

"ओवी.... फायनली आपण आयुष्यभरासाठी एकत्र येणार. खरंच यार! विश्वासाचं बसत नाहीये."

"सेम हियर यार. मला तर वाटलंही नव्हतं घरचे इतक्या लवकर आणि इतक्या सहजासहजी परवानगी देतील आपल्या लग्नाला आणि तुझ्या घरच्यांनी तर साखरपुडा करण्याचा निर्णय घेऊन मोठा शॉकच दिला रे."

"मी म्हटलं असतं तर आमच्या घरच्यांनी लग्नही लावून दिलं असतं दोन दिवसांत."

"काहीही फेकू नकोस हा."

"अगं खरंच...तू बोल फक्त, साखरपुड्याऐवजी लग्नच उरकून घेवूयात काय?" हसतच संभवने विचारले.

"हो का मिस्टर एअर फोर्स. तुम्ही तर खूपच फास्ट आहात म्हणायचं...अगदी तुमच्या प्रोफेशन प्रमाणेच."

"हो मग... तसं राहावं लागतं बाबा."

"त्यामुळेच तुमची प्रेमाची फ्लाईट आमच्या एअर पोर्टवर इतक्या फास्ट लँड झाली आणि आता लवकरच ती लग्नाच्या मांडवा पर्यंत पोहोचणार असंच दिसतंय."

"तुझी इंटर्नशिप बाकी नसती ना ओवी तर खरंच ह्या सुट्टीतच लग्न उरकवून घेतले असते मी. घरच्यांनी देखील नाही म्हटले नसते."

"हो का! उतावीळ नवरा आणि गुडघ्याला बाशिंग." हसतच ओवी बोलली.

"तुला काय जातंय गं बोलायला. माझ्यासारखं एकटं असं बाहेर राहून बघ मग कळेल. आपल्या हक्काचं, आपली काळजी घेणारं कोणीतरी आपल्या जवळ असावं असं सतत वाटत राहतं."

"गंमत केली रे, मी समजू शकते."

"ओवी यार.. खरंच आता खूप कंटाळा आलाय गं एकटं राहण्याचा. किती दिवस अजून असं रात्री पिलोला छातीशी कवटाळून झोपणार? आता बस झालं. तू ये बरं लवकर माझ्याकडे. आता खरोखर तू रोज मला माझ्या मिठीत हवीयेस."

संभवच्या बोलण्याने ओवी लाजून गोरीमोरी झाली. क्षणभर ती स्वप्नांच्या दुनियेत हरवली. संभवच्या त्या प्रेमाच्या मिठीच्या कल्पनेने तिच्या अंगावर जणू शहारा आला. प्रत्यक्षात आता ती मिठी अनुभवण्यासाठी तीही तितकीच आतुर झाली होती.

"मी तर आजही यायला तयार आहे. तुला काय वाटलं मला घाई नाहीये. पण अजून एक वर्ष आपल्याला वेट करायला लागणार. माझी इंटर्नशिप पूर्ण झाल्याशिवाय लग्नाचा विचार तरी कसा करू मी."

"त्यात काय... तू लग्न झाल्यावर पण इंटर्नशिप करू शकतेस ना."

"म्हणजे ह्या सुट्टीत खरंच लग्नाचा विचार आहे की काय तुझा?"

"तू तयार असशील तर नक्कीच विचार करेल. तू बोल फक्त."

"आणि घरचे... ते तयार होतील?"

"ते तू माझ्यावर सोड. तुझं लास्ट सेम झालं की मग आपण लग्न करुयात. तुला चालेल?"

"चालेल काय..धावेल. पण लगेच काही बोलू नकोस घरी. आधी साखरपुडा तर होवू देत."

"तो तर होणारच आहे गं. पण असं झालंय कधी एकदा तुला भेटतोय आणि घट्ट मिठी मारतोय. तुला तर तसं काहीच वाटत नाही ना?"

"गप रे... जणू काही भावना फक्त तुला एकट्यालाच आहेत. हो ना?"

"बरं बाई पोचल्या.. तुझ्याही भावना पोचल्या बरं का." संभव बोलला.

"दॅट्स लाईक अ गूड बॉय."

"बरं ऐक ना ओवी, उद्या सगळे आपल्या अवतीभोवती असणार,  म्हणजे मग आपल्याला थोडाही वेळ एकमेकांसाठी मिळणार नाही. तर यावर एक उपाय आहे माझ्या डोक्यात... सांगू?"

"अरे सांग की मग. वाट कोणाची पाहतोस?"

"परवा भेटुयात आपण? चालेल तुला? तशीही परवा तुला सुट्टीच असेल."

'अगदी माझ्या मनातलं बोललास बघ सोनुल्या.' ओवी मनातच बोलली.

"काय गं. काय झालं? शांत का झालीस? बघ म्हणजे तुझी मला भेटण्याची इच्छा असेल तरच हा."

"हो का..खडूस."

"हो ना. बरं काय करायचं बोल ना पटकन्."

"हो रे भेटुयात. तसंही उद्या साखरपुडा झाला की अर्ध लायसन मिळेलच ना." लाजतच ओवी बोलली.

"अरे हो ना...हे तर माझ्या लक्षातच आलं नाही."

"पण कुठे भेटायचं?"

"ते नंतर सांगेल मी तुला. तू भेटायला तयार झालीस ना मग हेच माझ्यासाठी खूप आहे."

"बरं ते सर्व ठीक आहे पण आता घड्याळ बघ एकदा. म्हणजे मग कळेल किती उशीर झालाय ते."

"असू दे...मला नाही पाहायचं घड्याळ. मला माझ्या होणाऱ्या बायकोसोबत गप्पा मारायच्या आहेत."

"हो का माझ्या होणाऱ्या नवरोबा."

"काय म्हणालीस.?"

"नवरोबा.."

"पुन्हा एकदा म्हण ना."

"न..व...रो..बा.." लाडीक सुरात ओवी बोलली.

"अजून एकदा."

"गप रे..."

"तुझ्या तोंडून नवरोबा शब्द ऐकताना कसलं भारी वाटतंय माहितीये बायको."

"बायको...?"

"हो.. बायको." क्षणभर ओवी देखील स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेली.

"बरं नवरोबा..झोपा आता. उद्या सकाळी थोडी गडबड आहे. ऐनवेळी असा साखरपुडा अरेंज केलाय तुम्ही. त्यामुळे तयारी काहीच नाही. म्हणून मग सकाळी थोडं बाहेर पण जायचंय." ओवी म्हणाली.

"माझीही काहीच तयारी नाही आ. पण तरीही उद्याच्या साखरपुड्यासाठी तयार आहे बघ मी."

"असू दे. तुम्हा पुरुषांचे ठीक आहे. तसंही कोणत्याही फंक्शन मध्ये बायकांचीच हवा असते. तुमच्याकडे कोणी पाहत पण नाही." संभवला खुन्नस देत ओवी बोलली.

"हो का. पण तरीही आमच्याशिवाय कोणताही कार्यक्रम थोडीच ना पूर्ण होतो. आम्ही पुरुषांनी तुमच्याकडे पाहिलेच नाही तर काय उपयोग मग तुमच्या नटण्याचा?"

"अच्छा...असं आहे होय. बरं जाऊ दे.. आता विषय थोडा नको तिकडे जात आहे असे नाही का वाटत तुला?" ओवीने संभवला हटकले.

"तूच नको तो ट्रॅक पकडला आणि आता मलाच बोल. हे बरं असतं तुम्हा बायकांचं." लटक्या रागात संभव बोलला.

"ओह! पण मी गम्मत करत आहे हे एवढंसं कळू नये तुला?" ओवी म्हणाली.

"हो का आणि मी पण गंमतच करत आहे हे तुला तरी कुठे समजलं खडूस." संभव उत्तरला.

"तूच खडूस. मला वाटलं खरंच रागवलास की काय तू."

"किती वर्ष झाले ओळखतेस गं मला."

"हीच आपली चार दोन वर्ष." गालातल्या गालात हसत ओवी बोलली.

"हो का...पण मला नाही तसं वाटत."

"आता खरंच रागावणार आहेस का तू माझ्यावर?" तोंड पाडून ओवी बोलली.

"वेडी..तुझ्यावर रागावून कसं जमेल आता. तुझ्यावर फक्त आणि फक्त प्रेमच करणार आहे मी."

"असं काही होत नाही लग्न झाल्यावर. अनुभवी लोकांकडून खूप काही ऐकलंय ना मी."

"किती तो अविश्वास. सगळेच पुरुष सारखेच नसतात गं राणी."

"माहितीये रे मला. मी गम्मत करत आहे."

"आय नो... तसंही माझ्याकडे कोणी नाही पाहिले तरी चालेल मला. तेवढेच मला तुझ्याकडे पाहण्याचा चान्स मिळेल की मग."

"तू पण ना. कसा आहेस रे तू सोनुल्या."

"आता आहे असा आहे मी आणि असाच मी तुला आवडलो, हेच खूप आहे माझ्यासाठी. बरं झोप तू आता. मी पण झोपतो. भेटुयात उद्या."

'सार्थकबद्दल सांगू का संभवला? खरंतर सांगायला हवं, पण उद्या आमचा साखरपुडा आणि आज हे सांगून सगळ्या आनंदावर विरजण तर पडणार नाही ना? जाऊदे त्यापेक्षा नकोच. योग्य वेळ आल्यावर शांततेत सांगेल त्याला.' अचानक ओवीच्या मनात विचार आला.

"काय...कुठे हरवलात मॅडम? बोलता बोलता अचानक एकदम झोपली की काय?"

"नाही रे... फायनली उद्या आपलं नातं एक पाऊल पुढे सरकणार. हाच विचार करत होते."

"ओके...बरं आता जास्त विचार करत बसू नको. झोपून घे आता. खूपच उशीर झालाय."

"हो रे... चल.. बाय ...गुड नाईट.." म्हणत ओवीने फोन ठेवला. त्यानंतर झोपण्याचा खूप प्रयत्न करूनही तिला झोपच लागेना. सार्थकच्या विचाराने ती क्षणभर अस्वस्थ झाली. पण संभवसोबतच्या गोड आठवणी होत्याच सोबतीला. खूप वेळानंतर कुठे तिला झोप लागली.

दुसऱ्या दिवशी संपूर्ण देशमाने फॅमिली मोहित्यांच्या घरी जमली. सर्वजण खूपच आनंदी होते. जुनी ओळख आता पुन्हा नव्याने नव्या नात्यात गुंफली जाणार याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वाहत होता.

सुलभा आत्या देखील सारे काही विसरून माहेरी आल्या होत्या. सर्वांशी त्या हसून खेळून बोलत होत्या, पण मनातून त्यांना सार्थकची खूपच काळजी वाटत होती.

थोड्याच वेळात ओवी आणि संभवचा छोटेखानी अंगठीचा कार्यक्रम पार पडला नि अखेर नवीन नात्याची नवी सुरुवात झाली. 'ओवी आणि संभवची जोडी किती छान आहे,' म्हणत सर्वचजण त्यांचे कौतुक करत होते आणि त्याबरोबरच त्यांना भरभरून आशीर्वाद देखील देत होते.

पुन्हा एकदा दोन्ही कुटुंबात आनंद सोहळा रंगला होता. तेवढयात ओवीच्या फोनवर सार्थकचा फोन आला. परंतु तिचा फोन होता कार्तिकीकडे. आता काय करावे ते कार्तिकीला समजेना. एकदा नाही, दोनदा नाही तर तीनदा त्याचा फोन येऊन गेला. न राहवून बाजूला जाऊन कार्तिकीने फोन उचलला.

"हा सार्थक बोल...मी कार्तिकी, अरे ओवीचा फोन माझ्याकडे आहे. काही काम होतं का तुझं तिच्याकडे. मला सांग मी देईल तिला तुझा निरोप.," कार्तिकी बोलली.

"अगं काही नाही दी..अगदी सहजच केला होता फोन. थोडा फ्री होतो म्हणून म्हटलं चला ओवीला कॉल करुयात. पण ओवी कुठे आहे? तुझ्याकडे आली आहे का ती?"

"नाही अरे, मीच आले आहे इकडे." 

"अच्छा...मग ओवी काही कामात आहे का? तिला देतेस दोन मिनिट."

'आता काय बोलू?' कार्तिकी विचारात पडली.

"अरे ती छोट्या काकीला किचनमध्ये हेल्प करत आहे. तू  काळजी करू नकोस मी देईल तिला तुझा निरोप." तत्क्षणी जे सुचले ते कार्तिकी बोलून गेली.

तेवढयात ओवीने तिला आवाज दिला.

"दी...अगं ये ना इकडे...तिकडे काय करतेस? छान फोटो काढुयात सोबत, ये ना पटकन्."

"दी... ओवीचा आवाज होता ना हा? कसले फोटो काढायचे आहेत तुम्हाला? नेमकं काय सुरू आहे तिकडे? ओवी खरंच कामात आहे की...?" कार्तिकी खोटं बोलत आहे अशी सार्थकला शंका आली.

"सार्थक ऐक ना... मी तुझा निरोप ओवीला देते. आता मला जावं लागेल. आम्हाला पण निघायचं आहे. ओवी करेल तुला कॉल. मी सांगते तसं तिला." अजून काही खोटं बोलायच्या आत घाबरून कार्तिकीने फोन ठेवला.

'नक्कीच तिकडे काहीतरी सुरू आहे. पण काय? कार्तिकी दी माझ्याशी खोटं बोलत होती की माझाच काहीतरी गैरसमज होतोय? जाऊ दे..एव्हढा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आज काहीही झाले तरी ओवीलाच डायरेक्ट विचारतो मी, की बाई माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. लग्न करशील का माझ्याशी?' विचारानेच सार्थकच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली.

'त्यात ही आई पण ना...काही करेल असं वाटत नाही. वाटलं होतं आई मामासोबत बोलली तर थोडं सोप्पं होईल. पण तसं काही होईल असं वाटत नाही. कधी विचारणार ती मामाला आणि कधी होणार पुढची बोलणी. त्यापेक्षा मीच आता काहीतरी करतो. ओवीलाही विचारतो आणि हवंतर मामासोबत पण बोलून घेतो. मला खात्री आहे मामा नक्की मला समजून घेतील.' सार्थक स्वत:शीच बोलत होता.

इकडे ओवीचा संभव सोबत साखरपुडा झाला देखील. तिकडे सार्थक मात्र वेगळेच प्लॅनिंग करण्यात गुंतला होता.

क्रमशः

ओवी सांगू शकेल का सार्थकला सर्व सत्य? जाणून घेण्यासाठी पुढील भाग जरूर वाचा.

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all