अधीर मन झाले..(भाग ४८)

अधीर मन झाले..एक प्रेमकथा
संभव आणि ओवीचा साखरपुडा मोठ्या उत्साही आणि आनंदी वातावरणात पार पडला. दोन्ही फॅमिली खूपच खुश होत्या. पण आता सुलभा आत्याला मात्र वेगळीच भीती सतावत होती. मनासारखी गोष्ट घडली नाही तर सार्थक काय करेल याचा नेम नाही. त्यातच कार्तिकीच्या खोटं बोलण्याने सार्थकच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. पण तरीही असे काही होईल याचा स्वप्नात देखील त्याने विचार केला नव्हता.

रात्री न राहवून सार्थकने ओवीला कॉल केला. पण तिचा फोन बिझी लागला.

'इतक्या उशिरा ही कोणाशी बोलत असेल?' मनातच सार्थक विचार करू लागला.

पाच ते दहा मिनिटांनी त्याने पुन्हा ट्राय केले. पण अजूनही ओवीचा फोन बिझीच येत होता. सवयीप्रमाणे ती संभव सोबत बोलत होती.

'इतकं काय महत्वाचं बोलत असेल ही? की माझा कॉल पाहून सुद्घा मला अवॉइड करत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इतका वेळ आणि तेही इतक्या उशिरा. खरंच खूप म्हणजे खूपच बॅडलक आहे सार्थक तुझं.' सार्थक मनातच बोलला.

थोडा विचार करून त्याने ओवीला मेसेज केला.

"ओवी खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी, प्लीज माझा कॉल रिसिव्ह कर ना."

स्क्रीनवर पडलेला सार्थकचा मेसेज ओवीने पाहिला.

"संभव दोन मिनिट थांब ना. अरे सार्थक फोन करत आहे. काहीतरी काम आहे त्याचे. मी करते तुला पुन्हा कॉल. वेट... तो काय म्हणतोय ते पाहते अगोदर."

"ओके ओके. बोल त्याच्याशी. मी तोपर्यंत आपले फोटो बघत बसतो."

संभवचा कॉल कट करून ओवीने लगेचच सार्थकला कॉल केला.

"हा बोल सार्थक, काय बोलायचं आहे तुला?"

"अगं हो बोलायचं तर आहेच पण इतक्या उशिरा तू कोणाशी बोलत होतीस? आणि माझे कॉल पाहूनही तू दुर्लक्ष करत होतीस."

"माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी." सार्थकच्या या संशयास्पदरित्या विचारलेल्या प्रश्नावर ओवी चिडून उत्तरली.

"काहीही काय ओवी?"

"अरे खरंच बोलत आहे मी. विश्वास नाही ना बसत तुझा? तर मग घरात कोणालाही विचार."

"कसा बसेल विश्वास! तुझी गम्मत करायची सवय अगदी लहानपणापासून माहीत आहे बरं का मला."

"हो का...मग तरीही मी कोणाशी बोलत आहे हा प्रश्न पडलाच ना तुला. तुला जे बोलायचं आहे ते राहिलं बाजूला आणि भलत्याच चौकशा कसल्या करतोस रे."

"सॉरी ...तू रागावू नकोस ना यार."

"मग काय करू सार्थक. तू असं का वागतोस ते खरंच मला कळत नाहीये."

"बरं सोड ना तो विषय. मला एक सांग..आई आली होती का गं तिकडे?"

"कशासाठी?"

"आली की नाही तेवढं सांग फक्त."

"आत्याने नाही का सांगितलं मग तुला?"

"नाही ना... म्हणून तर तुला विचारलं."

"अच्छा..."

' काय करू? सगळं खरं खरं सांगून टाकू का सार्थकला.? नाही... नको आधी त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकायला हवं.' ओवी मनातच विचार करू लागली.

"बरं तुला काय बोलायचं होतं ते सांग आधी." ओवी म्हणाली.

"ओवी... मी जे काही तुला आज सांगणार आहे त्याचा प्लीज गैरअर्थ काढू नकोस."

"अरे आधी बोल तर तू."

"ओवी... माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. तू लग्न करशील माझ्याशी?"

' शेवटी ज्याची भिती होती तेच झालंय. काय बोलू मी आता? खरं सांगितलं तर सार्थक कसा रिऍक्ट होईल माहीत नाही आणि खोटं बोलू शकत नाही आणि काहीच बोलले नाही तर सार्थक माझ्या वागण्याचा चुकीचा अर्थ घेईल. देवा काय करू मी आता? तुम्हीच मार्ग दाखवा.'

"ओवी...काहीतरी बोल ना यार. माझं हृदय बंद पडेल आता."

"काहीही काय बोलतोस सार्थक."

"ओवी प्लीज मला उत्तर हवंय. खूप धाडस करून आज फायनली तुला मी हा प्रश्न विचारतोय. माहीत नाही माझ्यात एवढं बळ आलं कुठून. पण कधी ना कधी ही गोष्ट मला तुला सांगायचीच होती गं. तुझ्या मनात देखील तीच भावना आहे का जी माझ्या मनात तुझ्याविषयी आहे? जे काही असेल ते बोलून टाक ओवी. आधीच खूप उशीर झालाय असं वाटतंय मला."

"खरंच खूप उशीर झालाय आता सार्थक."

"म्हणजे? असं का बोलत आहेस तू ओवी?"

"सार्थक... तुझ्या मनात कधीपासून हे सगळं सुरू आहे?"

"खरं सांगू ओवी..ते मलाही नाही माहीत. पण कदाचित आधीपासूनच तुझ्याबद्दल माझ्या मनात वेगळेच स्थान आहे. तुझ्या छोट छोट्या गोष्टी आधीपासूनच मनाला भावतात बघ. तुझं बोलणं, वागणं अगदी सगळंच खूप आवडतं मला आणि आणखी एक गोष्ट जी तुम्हा कोणालाच माहिती नसेल, मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मुंबई मधून डिग्री पूर्ण केली. तुझ्यापासून, तसेच तुम्हा सगळ्यांपासून दूर राहिल्यानंतर तरी आपल्यातील नातं आणखी घट्ट होईल असं वाटलं मला. फक्त तुझ्यासाठी मी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी झगडलो. आता खऱ्या अर्थाने काहीतरी अचीव्ह केल्याचं फील येतंय. पण मला हेही माहितीये तुला मी कधीच आवडलो नाही. त्या दिवशी तुझ्या बर्थ डेला मी तुला दिलेलं सरप्राइज, तुझं माझ्या प्रतीचं वागणं बोलणं सगळंच बदलल्या सारखं वाटलं मला. तुझ्या नजरेत माझ्या विषयी आदर दिसत होता मला. खूप भारी फिलिंग होतं ते माझ्यासाठी. खरंतर त्याच दिवशी मला माझ्या मनातील भावना तुला सांगायच्या होत्या. पण तेव्हा हिंमतच नाही झाली बघ. प्लीज आतातरी उत्तर मिळेल का मला?"

"हे बघ सार्थक...मी आता तुला जे काही सांगेल ते अगदी शांतपणे ऐकून घे."

"तेच तर ऐकण्यासाठी माझे कान आतूर झालेत ओवी. बोल ना पटकन्."

"सार्थक...आपण आयुष्यभरासाठी फक्त चांगले मित्र बनून नाही का राहू शकत?"

"ओवी अगं असं काय करतेस! आपण तर छान मित्र मैत्रीण आहोतच की आणि आयुष्यभरासाठी देखील राहणारच आहोत. पण आता त्यात आणखी एक नातं नव्याने ॲड केलं तर आयुष्य कसं परिपूर्ण झाल्यासारखं वाटेल, मनाला देखील वेगळेच समाधान भेटेल."

"सार्थक तुला समजत नाहीये मला काय म्हणायचंय ते. प्लीज समजून घे ना यार."

"ओवी काय कमी आहे गं माझ्यात? इतका वाईट आहे का गं मी? की तुला आजकाल माझ्याशी बोलावंसं सुद्धा वाटत नाहिये."

"सार्थक... अरे... तसं अजिबात काही नाहीये. खरंय तू खूप छान मुलगा आहे. कोण म्हटलं तू वाईट आहेस आणि तुझ्यात अजिबात काहीही कमी नाहीये."

"मग तुला मी का आवडत नाही?"

"असं काही नाहीये सार्थक. अरे मित्र म्हणून तू मला याआधीही आवडत होतास आणि यापुढेही कायम आवडत राहशील. पण ॲझ अ लाईफ पार्टनर म्हणून मी तुझ्याकडे कधीही पाहिलं नाही रे. म्हणजे तसं आतूनच कधी फील झालं नाही बघ."

"नसेल पाहिलं तर मग आता पहा ना ओवी. अगं जगातील हवं ते सुख मी तुझ्या पुढ्यात आणून ठेवेन. तुला कसलीही कमी पडू देणार नाही. फक्त तू एकदा म्हण की तुझेही माझ्यावर प्रेम आहे."

"जरी प्रेम नसलं तरीही प्रेम आहे असं म्हणू? हे कसं शक्य आहे सार्थक."

"ओवी अगं लहानपणापासून आपण एकमेकांना ओळखतो ना. एकमेकांच्या आवडीनिवडी सुद्धा आपल्याला अगदी परफेक्ट माहिती आहेत. मग यालाच तर प्रेम म्हणतात ना ओवी. कदाचित तुझं तुलाही हे समजत नसेल. पण मला माहितीये तुलाही मी तितकाच आवडतो. आताच तर तू म्हणालीस ना, याआधीही मी तुला आवडत होतो आणि आयुष्यभर आवडत राहील."

"सार्थक... अरे...फक्त निखळ मैत्री आहे आपल्यात आणि त्याच अर्थाने बोलले मी. तुझ्या मनात जर तसे काही असेल तर ते फक्त एकतर्फी आहे रे. कसे समजत नाही तुला?"

"अगं एकदा.. फक्त एकदा तुझ्या अंतर्मनाला विचारुन तर बघ, नक्कीच तुलाही तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल."

"बस झालं सार्थक. काय सुरू आहे हे. तुला समजत नाहीये की समजून घ्यायचंच नाहीये. एकदा सांगितलं ना माझ्या मनात तुझ्यासाठी फक्त आणि फक्त मैत्रीची भावना आहे. उगीच का हट्ट करतोस?"

"मी हट्ट करतोय ओवी? कळत तर तुला नाहीये. माझं प्रेम तुला कधी दिसलंच नाही का गं? तू फक्त एकदा 'हो' म्हण, मग बघ अगदी एखाद्या राणीसारखं ठेवेल तुला."

"स्टॉप इट यार सार्थक. आता खूप उशीर झालाय. ह्या सर्व गोष्टींचा आता काहीही उपयोग होणार नाही. तुला एवढ्या वेळा सांगूनही कळत नाही का रे. प्लीज आता काहीही बोलू नकोस. त्याने सत्य परिस्थिती बदलणार नाहीये. माझं अलरेडी लग्न ठरलंय सार्थक. तुला माहिती नसेल पण आता तुलाही हे माहिती असायलाच हवं."

"हे काय बोलत आहेस तू ओवी. नको ना गं असं बोलू. खोटं आहे ना हे सगळं?"

"अजिबात नाही. मी खरं तेच बोलतिये. हवं तर आत्याला विचार. तुझे जर खरंच माझ्यावर प्रेम असेल आणि मी सुखात राहावं असं जर तुला मनापासून वाटत असेल तर नक्कीच माझ्या भावना तुला समजतील सार्थक आणि इथून पुढे तू मला अजिबात त्रास देणार नाहीस. माझ्या आयुष्यात कधीही ढवळाढवळ करणार नाहीस तू. आपल्यातील मैत्रीचे नाते टिकवायचे असेल तर तुलाही माझे ऐकावे लागेल."

"ओवी...तुला त्रास व्हावा असं का वाटेल मला? तू खरंच मला ओळखलंच नाही गं."

सार्थकचे बोलणे ऐकून ओवी क्षणभर खूपच भावूक झाली.

"सार्थक...सॉरी रे..मला असं नव्हतं म्हणायचं. पण तुला असं वाटत नाही का की आपण जिच्यावर प्रेम करतो तीचंही आपल्यावर तितकंच प्रेम असावं."

"वाटतं ना."

"हो ना... मग मला सांग, तुझं माझ्यावर प्रेम आहे पण माझं तुझ्यावर प्रेमच नसेल तर मग त्या नात्याला काय भविष्य आहे? तुलाही अशी मुलगी भेटेल जिचं तुझ्यावर खूप प्रेम असेल. अशाच मुलीसोबत तू सुखाने संसार करु शकशील, ना की माझ्यासोबत तू कधीही सुखी होशील."

"पण ती मुलगी तू नसशील त्याचं काय ओवी? अगं तू सोडून मला कोणावर प्रेम होणारच नाही हे माहिती असताना कसा माझा सुखाने संसार होणार? जाऊ दे तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा. यापुढे माझं तोंडही तुला दिसणार नाही. तुझ्या आयुष्यात माझी ढवळाढवळ तर खूप दूरची गोष्ट झाली. विश्वास ठेव माझ्यावर."

"असं काहीही बोलू नकोस आ सार्थक."

"काहीही नाही... खरं तेच बोलतोय मी. आयुष्यात तू सोबत नसशील तर काहीही अर्थ नाहीये माझ्या आयुष्याला आणि तसंही तुला दुसरं कोणाचं झालेलं मी नाही बघू शकत."

"वेड लागलंय का सार्थक तुला? काहीही काय बोलतोस तू?"

"खूप प्रयत्न केले मी तुझ्या मनात जागा निर्माण करण्यासाठी. पण काहीही उपयोग झाला नाही बघ."

"हे बघ सार्थक, तू पुण्यात आल्यावर आपण पुन्हा एकदा निवांत बोलू याविषयावर. अरे कोणाचा नाही निदान आत्याचा आणि मामांचा तरी विचार कर. आता कुठे त्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आलेत. एकदा का तुझं आयुष्य मार्गी लागलं की मग तेव्हा कुठे त्यांना समाधान भेटेल आणि तू जर असं अविचाराने वागलास तर त्यांना काय वाटेल याचाही विचार कर."

"सगळा विचार झालाय आता माझा. डोन्ट वरी तुम्हा कोणालाच माझा त्रास होणार नाही. याची पुरेपूर काळजी घेईल मी. चल ठेवतो मी आता. खूप वेळ घेतला मी तुझा. त्यासाठी मनापासून सॉरी. बाय..."

"सार्थक तू काही वेडंवाकडं करणार नाहीस आ. बघ तुला शपथ आहे माझी."

"ओवी.. नको गं अशी शपथ घालून अडकवून ठेवूस. आधी शपथ सुटली म्हण."

"अजिबात नाही म्हणणार. तू तुझी काळजी घे फक्त बाकी काही नकोय मला."

"बरं जाता जाता एक शेवटचं सांग आणि प्लीज खरं खरं सांग.."

"हा बोल ना.."

"तुला खरंच माझ्याविषयी कधीच काही वाटलं नाही? अगदी कणभर देखील नाही का गं?"

"सार्थक...जाऊ दे ना आता तो विषय..तू आराम कर बरं."
वळून वळून सार्थक पुन्हा त्याच विषयावर येत होता.

"मिळालं मला उत्तर... खरंच माझ्यासारखा कमनशिबी मीच आहे ओवी. ज्याला त्याचं पहिलं प्रेम देखील मिळू शकत नाही."

"असं काही नाहीये, उलट तुला तुझ्यावर तुझ्याइतकंच प्रेम करणारी कोणीतरी भेटणार आहे. मग प्रेम पहिलं असो वा दुसरं त्याने काय इतका फरक पडतो. आपल्यावर कोणीतरी प्रेम करणं ही गोष्टच किती सुंदर आहे ना. तुलाही लवकरच ती व्यक्ती भेटो अशीच मी देवाकडे प्रार्थना करेल. तू अजिबात काळजी करू नकोस."

आतापर्यंत सार्थकने कसेबसे थोपवून धरलेले अश्रू अखेर गालावर ओघळले.

'आपण जिच्यावर मनापासून प्रेम करतो त्याच व्यक्तीने प्रेमाविषयी असं स्पष्टीकरण द्यावं..! हे खूपच अनपेक्षित होतं त्याच्यासाठी.

बोलता बोलता त्याने फोन कट केला आणि डोळ्यांतील अश्रूंना मनसोक्त वाट मोकळी करुन दिली. त्यानंतर ओवीने खूप प्रयत्न केला पण सार्थकने काही तिचा फोन उचललाच नाही.

इकडे संभव मात्र ओवीच्या फोनची वाट पाहून कंटाळून शेवटी झोपी गेला.

क्रमशः

सार्थक सावरू शकेल का स्वतःला? सर्वकाही समजल्यानंतर आता काय असेल त्याची भूमिका? इतक्या सहजासहजी तो विसरू शकेल ओवीला? जाणून घेण्यासाठी वाचत रहा 'अधीर मन झाले..एक प्रेमकथा.'

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all