अधीर मन झाले..(भाग ५०)

अधीर मन झाले.. एक प्रेमकथा
संभवला अचानक समोर पाहून माधवी ताई क्षणभर गोंधळल्या. पिंक शर्ट आणि व्हाईट पँट मध्ये अगदी रुबाबदार असा संभवचा लूक दिसत होता.

"अरे जावईबापू...या ना, आत या. ओवी... अगं कोण आलंय बघ तरी."

"बसा तुम्ही. ओवी येईलच इतक्यात. अगं ओवी ऐकलंस का?"
माधवी ताईंनी ओवीला पुन्हा आवाज दिला.

ओवी तिथेच होती. दाराआडून त्यांचे बोलणे ऐकत होती. दबक्या पावलांनी अंदाज घेत ती बाहेर आली. ओवीला देखील गुलाबी आणि व्हाईट ड्रेस कॉम्बिनेशनमध्ये छान तयार झालेलं पाहून माधवी ताईंचे विचारचक्र सुरू झाले.

'आज हे असे मॅचिंग मॅचिंग का झाले आहेत?' माधवी ताई मनातच विचार करू लागल्या.

खरंतर हा निव्वळ योगायोग होता.

ओवी संभवसाठी पाणी घेऊन आली. दोघांचीही नजरानजर झाली तसे दोघेही गालातल्या गालात हसले. जुळून आलेले हे कपड्यांचे कलर कॉम्बिनेशन पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले. एकमेकांच्या प्रेमाचा रंग दोघांच्याही चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वाहत होता. सीमा ताईंनी देखील होणाऱ्या जावयाची आपुलकीने चौकशी केली.

"ओवी.. अगं जावई बापू येणार आहेत आधी तर सांगतेस ना. छान चमचमीत नाश्त्याचा बेत केला नसता का." माधवी ताई बोलल्या.

"नाही काकू.. नका... नाश्ता वगैरे कशाला." संभव बोलला.

"असं कसं... अहो आता तुम्ही होणारे जावई आहात या घरचे. तसं कसं जाऊ देवू आम्ही तुम्हाला."

"तसं नाही काकू. अहो जाण्याआधी मी येईल ना पुन्हा. हवंतर तेव्हा खास जेवणासाठीच येईल. मग तर झालं."

"तेव्हा याच हो, पण आताही काहीतरी खाऊनच जा." माधवी ताईंचा आग्रह वाढतच होता.

'ओवी...अगं तू तरी सांग काकूंना.' नजरेतूनच संभवने ओवीला खुणावले. सीमा ताईंच्या हे बरोबर लक्षात आले.

"ताई... अहो ते बाहेर जाऊन खाणार आहेत. आता खाल्लं तर पुन्हा भुकमोड होईल. हवंतर आता कॉफी करते ना मी त्यांच्यासाठी." सीमा ताई बोलल्या.

"बाहेर म्हणजे कुठे जात आहेत हे?" माधवी ताईंनी विचारले.

"ताई...तुम्ही या इकडे मी सांगते तुम्हाला." माधवी ताईंना आत घेऊन जात सीमा ताई बोलल्या.

"सीमा...काही कळतं की नाही तुला? अगं त्यांचं एकवेळ मी समजू शकते पण तुलाही कळत नाही का गं. अगं कालच साखरपुडा झालाय त्यांचा आणि आज लगेच तू त्यांना असं बाहेर जायची परवानगी देतेस?"

"ताई..अहो संभवची सुट्टी संपली की तोही निघून जाईल. मग पुन्हा त्या दोघांची भेट डायरेक्ट लग्नातच होईल. म्हणून मग त्यांनी थोडा वेळ एकमेकांसोबत घालवला तर कुठे बिघडलं? एकमेकांसोबत गप्पागोष्टी होतील, त्यामुळेच तर नातं आणखी घट्ट होईल आणि जमाना खूप बदललाय हो ताई आता. पूर्वीसारखं काही राहिलं नाही. त्यात मुलंही समजूतदार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सांगून ते जात आहेत हेच खूप नाही का आपल्यासाठी. खोटं बोलूनही ते एकमेकांना भेटू शकत होते. त्यांनी जर आपल्याला इतक्या विश्वासाने सांगितलं तर आपणंही त्यांच्यावर विश्वास ठेवायला नको का? आपण नाही त्यांच्यावर विश्वास ठेवायचा मग कोणी ठेवायचा?" सीमा ताईंनी लेकीची बाजू घेत स्पष्टीकरण दिले.

"जमाना जरी बदलला असला तरी नातं घट्ट होण्यासाठी असं लग्नाआधी बाहेर फिरायला वगैरे जाणं नाही योग्य नाही वाटत सीमा. आता माझ्या कार्तिकीचंच बघ ना. ते तरी कुठं असं भेटले होते लग्नाआधी? तरी त्यांचं नातं किती छान बहरलंय. सुखाचा संसार देखील सुरुच आहे ना आणि तेही ह्याच जमान्यातील आहेत बरं का."

"आता तुम्हाला काय माहीत ते दोघे भेटले होते की नाही ते." सीमा ताई तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या.

"काय म्हणालीस?"

"कुठे काय? मी म्हटलं संभव आलाय तिला घ्यायला मग नाही कसं म्हणणार ना आता. जाऊ द्या तिला. दोघेही समजूतदार आहेत. त्यांनाही त्यांची स्पेस द्यायला हवीच ना. मुलांच्या भावना आपण नाही मग कोणी समजून घ्यायच्या?"

"तू तुझंच खरं करणार माहितीये मला. तुझीच फूस आहे ओवीला, हे समजतं बरं का. आवर आता कर पटकन् कॉफी." माधवी ताईंनी देखील मग अप्रत्यक्षरीत्या होकार दर्शवला. तसाही त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणा.

बाहेर संभव आजी सोबत गप्पा मारत बसला होता. ओवी देखील तिथेच बसून संभवला न्याहाळत होती.

'चुकून काकीने जर जाऊ दिलं नाही तर? जाऊ दे.. तरी मी जाणारच. उगीच मी ह्याला घरी बोलावलं का? पण जाऊ दे, एका दृष्टीने संभव घरी आला ते बरंच झालं. आता कमीत कमी ओझं तरी उतरलं मनावरचं.' ओवी मनातच विचार करत, थोडी द्विधा मनःस्थितीत अडकली होती.

तेवढयात सीमा ताई कॉफी घेऊन आल्या.

"थँक्यू काकू.." म्हणत संभवने कॉफीचा कप उचलला.

"बरं ये मुलांनो... जाताय तर जा, पण पुन्हा वेळेत घरी या. उगीच लाँग ड्राईव्ह वगैरे असले प्रकार नको. इथेच आपलं सारसबागेत नाहीतर पर्वतीवर जाऊन या. फिरणंही होईल आणि पोटभर गप्पाही होतील आणि आम्हालाही काळजी राहणार नाही."

माधवी ताई सारसबाग म्हणाल्या आणि ओवीला कार्तिकी आणि समरची तिने घडवून आणलेली त्यांची ती पहिली भेट आठवली. सगळे चित्र डोळ्यासमोर अगदी जसेच्या तसे उभे राहिले आणि नकळतपणे तिच्या चेहऱ्यावर मग हास्य फुलले.

"चला.. निघायचं? कॉफीचा कप स्ट्रेमध्ये ठेवत संभव बोलला.

"आलेच... पर्स घेऊन येते." म्हणत ओवी तिच्या खोलीत गेली.

"डोन्ट वरी काकू...मी आहे तिच्यासोबत. वेळेत येवू आम्ही परत. आय नो... तुम्हाला तिची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण टेन्शन घेवू नका. ओवी आता माझीही जबाबदारी आहे." संभव माधवी ताईंना म्हणाला.

"मला माहितीये ओ तुम्ही कसे आहात ते. पण बाहेरचं जग नाही ना तसं. लग्नाआधी असं एकत्र बाहेर फिरताना कोणी पाहिलं तर लगेच काड्या करायला सुरूवात होईल."

"जगाचं काय घेऊन बसलात तुम्ही काकू. नावे ठेवणारे ठेवतच राहणार पण तुम्ही आमच्या सोबत आहात ना? नाही म्हणजे आम्ही चुकीचं काही करणार नाही यावर तुमचा विश्वास आहे ना..? "

"हे काय विचारणं झालं का जावईबापू."

"झालं तर मग. जगाचा विचार मी तरी नाही करत आणि तसंही मी तुमच्या लेकीला लग्नाआधीच थोडीच ना पळवून नेणार आहे. " हसतच संभव बोलला. सीमा ताईंना आणि आजीलाही मग हसू आले.

"तसं काही नाही ओ." ओशाळलेल्या सूरात माधवी ताई उत्तरल्या.

'हा तर माधवीच्या दोन पाऊल पुढे आहे.' आजी तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या.

तेवढयात ओवी पर्स घेऊन आली.

"चल निघुयात?" ओवी म्हणाली.

"हो चल. येतो काकू आणि तुम्हाला सर्वांना बिग थँक्यू बरं का... माझ्यावर इतका विश्वास दाखवल्याबद्दल."

"बरं आता ते थँक्यू वगेरे राहू द्या. घड्याळ पळतंय वेगाने जरा त्याचाही विचार करा. इथेच असा टाईमपास करत बसलात तर यायला उशीर होईल."

"हो...येतो आम्ही." म्हणत ओवी आणि संभव बाहेर पडले.

तरी शेजारच्या पानगे काकूंनी त्यांना असं एकत्र बाहेर पडताना पाहिलं आणि लगेचच त्यांनी मेन गेट साईडच्या बेड रुमच्या खिडकीत धाव घेतली. संभव आणि ओवीला त्यांनी बाईकवरुन एकत्र जाताना पाहिले आणि सवयीप्रमाणे त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.

"काय ही आजकालची मुलं, इतकंच एकमेकांशिवाय राहवत नव्हतं तर मग साखरपुड्याची नाटकं करायचीच कशाला मी म्हणते. डायरेक्ट लग्नच उरकवून टाकायचं होतं ना." पानगे काकांच्या कानाशी भूणभूण करत काकू बोलल्या.

"झालं का तुझं पुन्हा सुरू. आपल्या ह्याच सवयीमुळे आपल्या लेकाने आणि सुनेने वेगळा संसार थाटलाय. हेही अधूनमधून लक्षात ठेव म्हणजे झालं." काकांनी काकूंना खऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली  आणि तात्पुरते का होईना त्यांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला.

तिकडे ओवी आणि संभव आज वेगळ्याच विश्वात होते. नात्यातील अंतर हळूहळू कमी होऊ पाहत होते. मैत्रीच्या बागेत प्रेमाची फुलपाखरे जणू स्वच्छंदपणे विहरत होती. एकमेकांच्या त्या प्रेमळ स्पर्शाने हृदयाची स्पंदने आपसूकच गतिमान होत होती. खूप काही बोलायचे होते दोघांनाही पण ऐनवेळी शब्दांनी मात्र दडी मारली होती.

न राहवून संभव बोलता झाला.

"ओवी...काय गं...इतकी शांत का झालीस?"

"कुठे काय. तुला ड्रायव्हिंग करताना डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मी गप्प बसले."

"अच्छा...असं आहे होय. मला वाटलं वेगळंच काहीतरी कारण आहे की काय आणि तसंही तू मागे आहेस म्हटल्यावर माझं थोडीच ना लक्ष आहे ड्रायव्हिंगकडे."

"असं काही करु नकोस रे बाबा. अजून मला आपलं लग्न पहायचंय."

"अरे व्वा...मग अजून काय करायचंय...?"

"अजून तुझ्या सोबतीतला प्रत्येक क्षण मला अविस्मरणीय करायचा आहे."

"अजून...?

"अजून खूप काही करायचंय."

"अजून...?"

"अजून काही नाही, गप्प बस आता. आता पुन्हा अजून बोललास तर मी गाडीवरून उतरेल." संभवच्या पाठीत हलक्या हाताने एक चापट मारत ओवी बोलली.

"बापरे...! असलं काही करू नकोस बाई. मोठया मुश्किलीने आजचा हा योग जुळून आलाय. किती दिवसांचं माझं स्वप्न आज सत्यात उतरलंय. नाहीतर तू माझ्या पाठी बसलीये आणि आपण लाँग ड्राईव्हला जात आहोत. हे असं स्वप्न रोज पाहत होतो मी आणि आज बघ माझं स्वप्न खरं झालं. त्यात आता कोणताही व्यत्यय नको."

संभवच्या बोलण्याने ओवीच्या पोटात अचानक फुलपाखरं उडत असल्याचे फिलिंग आले. चेहऱ्यावर मग आपसूकच हास्य फुलले.

"काय रे, पण आपण नेमकं कुठे जात आहोत.?"

"सिंहगड."

"अरे वेडायेस का तू! खूप लांब होईल रे ते. काकी म्हणाली तसं इथेच कुठेतरी जवळ जाऊयात ना."

"काही नाही होत.  मी आहे ना सोबत. मग कशाला घाबरतेस. की तुझ्या काकीसारखा तुझाही माझ्यावर विश्वास नाहीये."

"गप रे असं काही नाहीये. पण यायला उशीर होईल ना आपल्याला म्हणून म्हटलं रे."

नकळतपणे संभवच्या खांद्यावर हात ठेवत ओवी त्याची समजूत घालू लागली. तिच्या त्या प्रेमळ स्पर्शाने संभव क्षणभर स्वप्नांच्या दुनियेत हरवला. चेहऱ्यावर गोड स्माईल आणत तिरप्या नजरेने त्याने ओवीकडे पाहिले.

"अरे हसतोस काय...मी काहीतरी बोलत आहे रे सोनुल्या."
संभवच्या खांद्यावरील तिच्या हाताची पकड अधिकच घट्ट करत ओवी बोलली.

"डोन्ट वरी मी आहे ना. मग तू माझ्यावर सोड सगळं."

"पण घरचे काय म्हणतील? याचाही विचार करायला हवा ना. आधीच काकीच्या तावडीतून कसेबसे सुटलोत आज आपण."

"मी पण तुझ्या घरचाच आहे ना आता आणि काय गं काकीचं बोलणं तू कधीपासून इतकं मनावर घ्यायला लागलीस? लग्नाआधी दादा वहिनीची पहिली भेट तूच घडवून आणली होतीस ना. मग तेव्हा नव्हती का काकीची भीती वाटली तुला आणि आता कसली घाबरतेस."

"मी नाही घाबरत आ कोणाला."

"ते दिसलं हा. माझ्यासोबत यायला घाबरतेस का मग? रात्री तर कोणीतरी खूप मोठ्या मोठ्या बाता ठोकत होतं की तुझ्या कुशीत शिरून खूप रडावंसं वाटतंय वगैरे वगैरे. हा पण आय एम अल्वेज रेडी हा."

"कशासाठी..?" ओवीने आश्चर्यकारकरित्या विचारले.

"कशासाठी काय....तुला कुशीत घेण्यासाठी."

"काहीही.." संभवच्या पोटाला हळूच चिमटा घेत लाजून ओवी बोलली.

"अगं ये...काय करतेस? असं काही करु नकोस बाई.  मला गुदगुल्या अजिबात सहन होत नाहीत आ आणि पोटाला कोणी साधं टच जरी केलं तरी माझी हसून हसून पुरी वाट लागते. त्यामुळे उगीच गाडीचा बॅलन्स सुटायचा."

"अवघड आहे मग सगळंच." हळू आवाजात ओवी बोलली.

"काय म्हणालीस?"

"कुठे काय."

"खोटं बोलू नकोस. काहीतरी बोललीस तू."

"अरे सोनुल्या..मी म्हणाले की तुझं, हे स्टमक टचिंगवालं सिक्रेट तू मला सांगितलंस ते एका अर्थी बरंच झालं. म्हणजे मागेपुढे त्याचा मलाच फायदा होईल ना."

"गप्प बस हा..अजिबात माझ्या पोटाला टच करू नकोस. हात काढ आधी नाहीतर मी आता खरंच बाईक सोडून देईल आ ओवी." ओवी मुद्दाम संभवला छळत होती.

आता तर ओवीची हसून हसून पुरी वाट लागली होती.

"कसा आहेस रे तू."

"आता उगीच माझा नाईलाज आहे म्हणून नाहीतर मी कसा आहे दाखवलं असतं तुला."

"हो का...दाखव की मग..दाखव..दाखव."

"थांब थोडा वेळ... बाईकवरुन उतरल्यावर दाखवतो."

हसत खेळत गप्पा मारत एव्हाना दोघेही सिंहगड रोडला लागले होते.

क्रमशः

कशी होणार संभव आणि ओवीची पहिली ट्रीप? जाणून घेऊयात पुढील भागात.

©®कविता वायकर.


🎭 Series Post

View all