अधीर मन झाले..(भाग ५१)

अधीर मन झाले..एक प्रेमकथा
"बरं मला एक सांग ना ओवी, तू काहीतरी सांगणार होतीस ना मला?"

"सांगायचं तर आहेच पण कसं सांगू तेच मला कळेना झालंय."

क्षणात ओवीच्या चेहऱ्यावरचे भावच अचानक बदलून गेले. सार्थकचा चेहरा अचानक तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. 'त्याच्या मनाची काय अवस्था असेल ह्या क्षणी?' या विचाराने तिचा थोडा गोंधळ उडाला होता.

"काय गं काय झालं? जास्त अवघड नाही काही. तोंडानेच सांग." हसतच संभव बोलला.

"थोडा सिरियस विषय आहे रे...उगीच गमतीत नको ना घेऊस."

"बरं बाई...पण मग सिरियस असेल काही तर आता नको सांगू. आपण तिकडे पोहोचल्यावर मग सांग हवंतर."

"हो चालेल."

"बरं ऐक ना...काही खायचं का तुला. भूक लागली असेल ना?"

"भूक तर लागलीये. तुला नाही लागली होय?"

"मला तर नाही लागली बुवा...तुला भेटुनच आज माझं पोट भरलंय."

"इतके नको फिल्मी डायलॉग मारुस हा. फक्त प्रेमानेच लोकांची पोटं भरली असती तर सगळा हॉटेल व्यवसाय बंद पडला असता."

"हो ते पण आहेच म्हणा. बरं चल तू म्हणतेस तर खाऊयात काहीतरी."
एका हॉटेलच्या समोर बाईक थांबवत संभव म्हणाला.

दोघांनी मिळून मग पोटभर खाऊन घेतले. संभव सोबत ओवी खूपच खुश होती पण अधूनमधून सार्थकचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येई आणि क्षणभर ती मनातल्या मनात स्वतःलाच दोष देई.

'सार्थकला त्रास देवून मी मात्र इकडे मजा करत आहे. खरंच हे योग्य आहे का?' असे काहीबाही प्रश्न तिला सतावत होते. पण संभव सोबत असल्यावर तो खूप वेळ थोडीच ना तिच्या मनाला असं इतरत्र भटकू देणार होता. तसेही संभवला माहितच होते की ओवी थोडी डिस्टर्ब आहे.
'सार्थक सोबत बोलल्यापासूनच हिचं काहीतरी बिनसलं आहे.' हे तो जाणून होता. तसेच, 'ओवी स्वतःहून मला सर्व काही सांगेल याची त्याला मनातून खात्री होती. त्यामुळे त्याने तिला कोणताही फोर्स केला नाही. उलट थोडं मोकळ्या वातावरणात गेल्यावर तिचा मूड नक्कीच फ्रेश होईल आणि तिच्या मनातील भावना ती नक्कीच माझ्याशी शेअर करेल,' याची त्याला खात्री होती.

नाश्ता करून दोघेही पुढच्या प्रवासाला लागले. काही वेळातच ते गडावर पोहोचले. सर्वात आधी एन्ट्रीलाच पुणे दरवाजाच्या पहिल्याच पायरीवर दोघांनीही डोके ठेऊन नमस्कार केला आणि मनोमन राजांचे स्मरण केले.
'आयुष्यात येणारे प्रत्येक आव्हान निडरपणे पेलण्याची जिद्द मनी कायम ठेवा राजे. कितीही संकटे आली तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडेपर्यंत धडपडत राहण्याची ऊर्जा मनी तेवत ठेवा राजे आणि परिस्थिती कशीही असो एकमेकांच्या साथीने त्यावर मात करण्याची उमेद कधीही कमी पडू देवू नका राजे. आज तुमच्या आशीर्वादाने आयुष्याच्या नवीन अध्यायाची सुरुवात करत आहोत. तुमचा आशीर्वाद कायम पाठीशी असू द्या राजे!!'

मनोमन दोघांनीही राजांचे स्मरण केले आणि एकमेकांचा हात हातात घेऊन दोघांनीही पुणे दरवाजातून आत प्रवेश केला. नुकताच पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागली होती. त्यामुळे गडावरील वातावरण अगदीच मनमोहक झाले होते.

तसा सिंहगड दोघांसाठीही काही नवीन नव्हता. सिंहगडाचे आणि त्या दोघांचेही नाते खूप जवळचे होते. लहानपणी बाबांसोबत पहिल्यांदा गडावर आल्याचे ते दिवस ओवीला आठवले. त्यानंतर शालेय ट्रीप सोबत एकदा दोनदा जाणं झालं होतं तिचं. दोन वर्षांपूर्वी मेडिकल कॉलेजच्या ग्रूप सोबतदेखील सिंहगड ट्रेक अनुभवले होते तिने. त्यानंतर आज, होणाऱ्या नवऱ्यासोबत तिथे जाण्याचे भाग्य ओवीच्या नशिबात होते जणू.

संभव देखील जास्त वेळा नाही पण दोनदा तीनदा येवून गेला होता सिंहगडावर. शाळेत असताना एकदा आणि एकदा फॅमिली सोबत. आज ओवीसोबत पुन्हा एकदा तो सिंहगड जगणार होता.

"ओवी.. इकडे बघ..." म्हणत संभवने मग सेल्फीसाठी मोबाईल समोर धरला. पुन्हा एकदा मोबाईल बरोबरच आयुष्याच्या फ्रेममध्ये देखील दोघे अगदी परफेक्ट फिट बसले.

लहानपणीच्या सिंहगडाच्या आठवणी, ट्रीपमधील मजा मस्ती ओवी संभवला सांगत होती.

"मी पाचवीत असताना जेव्हा इथे आले होते ना संभव तेव्हा ह्याच स्पॉटवर एक आजी बसल्या होत्या. शांतपणे जाणाऱ्या येणाऱ्याचे फक्त निरीक्षण करत होत्या. काही बोलत नव्हत्या की कोणाकडे काही मागत देखील नव्हत्या. त्यांच्या मनात काहीतरी सुरू होते. बाकीची मुले थोडी पुढे गेली मी मात्र त्या आजीशी बोलण्यासाठी तिथेच थांबले. हातातील बिस्किटाचा पुडा आजीसमोर धरला आणि घ्या म्हटलं. पण आजीने स्पष्ट नकार दिला, 'नको बाळा, खा तू. माझ्याशी बोललीस तर खूप बरं वाटलं बघ. नाहीतर आजकाल कोणाला वेळ आहे गं आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसासाठी. माझी नात पण तुझ्यासारखीच आहे बघ. अगदी चुणचुणीत पण....' आजीने मधेच बोलणे तोडले. त्यावेळी मला त्या आजीच्या बोलण्याचा अर्थ जास्त काही कळला नाही. पण जसजशी मोठी होत गेले तसे हे जीवनाचे कोडे उलगडू लागले."

"पण मग आजीला तू बिस्कीट दिलेच नाहीस का?" उत्सुकतेपोटी संभवने विचारले.

"दिले की...म्हणजे आजीनेच आण इकडे म्हणत पुड्यातून दोन बिस्कीट काढून घेतले. माझ्या डोक्यावरून हात फिरवत मला भरभरुन आशीर्वाद दिले. खूप छान वाटले त्या दिवशी. हे सगळं आमच्या मॅडम आणि सरांनी पाहिले त्यांनीही मग खूप कौतुक केले माझे. खरंतर मी जगावेगळं असं काहीच केलं नव्हतं आणि कौतुक मिळावं म्हणून तर मुळीच नाही. फक्त आई बाबांनी जे शिकवले तेच करत होते."

"हाऊ स्वीट... पण तू लहानपणी पासून अशीच आहेस का गं??

"अशी म्हणजे कशी रे?"

"अशी म्हणजे स्वतःपेक्षा जास्त जगाचा विचार करणारी, वृद्ध वयस्कर लोकांविषयी तुझ्या मनात नेहमीच वेगळीच भावना असते. त्यांच्या बाबतीत तू खूपच हळवी आहेस. आजकाल तुझ्या सारख्या विचारांच्या मुली क्वचितच सापडतील."

"माहीत नाही का, पण स्वतःचा स्वार्थ नाही समजत मला. कोणाला जास्तवेळ दुःखात नाही पाहू शकत मी. म्हणूनच तर आज सगळं काही माझ्या मनासारखं घडत असताना आणि तू माझ्यासोबत असताना देखील मला का कोण जाणे पण सार्थकची काळजी सतावत आहे. "

"म्हणजे?? काय झालंय सार्थकला?"

"कसं सांगू तुला काहीच समजत नाहीये."

"चल आपण त्या झाडाखाली सावलीला बसुयात. म्हणजे मग निवांत बोलता येईल आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या मनात जे काही सुरू आहे ते अगदी मनमोकळे पणाने बोल. कुठलेही दडपण न घेता. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? की मी तुला समजून घेणार नाही याची भीती वाटतेय तुला?"

"नाही रे... तसं काही नाहीये. उलट तू मला समजून घेणार याची खात्री आहे मला."

"हो ना? मग बस इथे आणि सांग काय सुरू आहे तुझ्या मनात?" ओवीचा हात हातात घेत संभव बोलला.

'काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत.' नजरेतूनच संभवने ओवीला धीर दिला.

"अरे, तुला माहीतच आहे की रात्री मला सार्थकचा कॉल आला होता."

"हो माहितीये की. मग काय म्हणाला तो?"

"रात्री बराच वेळ आमचा कॉल सुरू होता."

"हो मग त्यात काय एवढं? तुम्ही एकमेकांचे छान मित्र आहात मग एकमेकांना जेव्हा गरज असेल तेव्हा बोलून मन मोकळं करायलाच हवं ना."

"त्यात एवढं काही नाही रे, पण सार्थकने मला रात्री खूप मोठा शॉक दिलाय अरे.

"म्हणजे.... नेमकं काय झालंय?" काळजीच्या सुरात संभवने विचारले.

"लग्नासाठी मागणी घातली त्याने मला."

"काय... सिरीयसली?"

"हो..य.... मी खरं तेच बोलतिये."

"मग तू काय उत्तर दिलंस त्याला?"

"मी काय उत्तर देणार? अरे आपला साखरपुडा झालाय संभव. मी तुझ्या शिवाय दुसऱ्या कोणाचा स्वप्नातही विचार करू शकत. नाही. असं असताना सार्थकने मला प्रपोज करणं हे किती शॉकींग होतं माझ्यासाठी. तू तर कल्पनाही करु शकणार नाहीस."

"इट्स ओके ना यार... त्याच्या भावना त्याने व्यक्त केल्या आणि तुला माहितीये... तुझं जर सार्थक वर मनापासून प्रेम असतं आणि समज आपला साखरपुडा झाल्यानंतर मला हे समजलं असतं तर मी हे नातं पुढे जाऊच दिलं नसतं. तुला तुझं प्रेम आधी मिळवून दिलं असतं मी."

"पण इथे सगळंच उलट आहे रे."

"मग सार्थकला तू नाही म्हटल्यावर त्याची काय रिॲक्शन होती गं?"

"अरे खूप समजावलं मी त्याला. त्यात आपला साखरपुडा झालाय हे त्याला माहीतच नव्हतं."

" मग.... फायनली समजलं की नाही त्याला?"

"सांगावंच लागलं रे मला त्याला. माझ्याकडं दुसरा ऑप्शनच नव्हता."

"अरे यार..खूपच वाईट वाटलं असेल ना त्याला."

"मग काय. मला तर त्याला कसं फेस करावं ते समजतच नाहीये."

"पण तुझा साखरपुडा झालाय हे समजल्यानंतर त्याने त्याचा विचार बदलला की तो अडून बसला त्याच्या मतावर?"

"बराच वेळ लागला त्याला हे स्वीकारायला. शेवटी मग केलं त्याने ॲक्सेप्ट. पण अरे माझा तुझ्याशी साखरपुडा झालाय हे नाही माहीत त्याला अजून. माझा साखरपुडा झालाय पण नेमका कोणासोबत हे नाही माहीत त्याला अजून."

"म्हणजे... असं कसं बरं?"

"म्हणजे तोच म्हणाला की त्या भाग्यवान व्यक्तीचं नाव सध्या तरी मला सांगू नकोस, नाहीतर माझ्या मनात त्या व्यक्ती विषयी द्वेष भावना निर्माण होईल आणि त्याला तसं वागायचं नाहीये."

"बापरे! मी तर स्वप्नातही विचार करू शकत नाही की आपल्या प्रेमाला त्याचं प्रेम मिळावं म्हणून कोणी त्याचा इतक्या समजूतदारपणे त्याग करण्याची तयारी दाखवू शकतं?"

"हो ना अरे, सुरुवातीला तर माझाही यावर विश्वासच बसेना पण सकाळी जेव्हा मी पुन्हा बोलले त्याच्यासोबत तेव्हा वेगळाच सार्थक मला जाणवला. खूप समजुदार आणि पॉझीटिव्ह वाटला रे तो मला. एका रात्रीतून त्याने त्याच्या मनाला कसं समजावलं देवच जाणे. पण मनातून भीती वाटते रे उगीच त्याने जीवाचं काही..." बोलता बोलता ओवी मध्येच थांबली.

"घे..."

"काय आहे हे?"

"हा फोन घे आणि लगेच सार्थकला फोन करून त्याची खुशाली विचार." संभव म्हणाला.

संभवचे हे समजूतदारपणाचे वागणे पाहून ओवी मनोमन सुखावली. नकळतपणे तिच्या डोळ्यांत आनंदाश्रूनी गर्दी केली.

"काहीही झालं नसेल सार्थकला, तू काळजी करू नकोस. कॉल कर आधी त्याला."

संभवच्या सांगण्यावरुन ओवीने लगेचच सार्थकला कॉल केला. पण त्याने काही फोन उचललाच नाही. दोनदा तीनदा कॉल करूनही काहीच रिप्लाय नाही. त्यामुळे ओवी खूपच टेन्शन मध्ये आली.

क्रमशः

सार्थक करेल का ओवीच्या कॉलला रिप्लाय? की काही प्रॉब्लेम झाला असेल? जाणून घेण्यासाठी वाचत रहा 'अधीर मन झाले.. एक प्रेमकथा.'

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all