Login

अधीर मन झाले..(भाग ५२)

अधीर मन झाले..एक प्रेमकथा
ओवीने दोनदा तीनदा कॉल करूनही सार्थकने तिचे कॉल घेतले नाहीत त्यामुळे ओवी खूपच टेन्शन मध्ये आली.

संभव तिची समजूत काढत बोलला....
"हे बघ ओवी... तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. काहीतरी कामात असेल सार्थक. थोडा वेळ थांब आणि मग पुन्हा ट्राय कर."

"अरे पण असं कधी होत नाही की तो माझा कॉल कधी घेत नाही."

"पण तू तरी ह्या अशावेळी कुठे कॉल करतेस त्याला. ही प्रत्येकाची कामाची वेळ असते गं. म्हणून कदाचित त्याने नसेल उचलला."

"हो तसेही असेल कदाचित."

पुढच्या पाचच मिनिटात सार्थकचा ओवीला कॉल आला.

"हॅलो ओवी...काय गं...काय झालं?"

"तू कुठे होतास सार्थक? किती कॉल केले मी तुला?" तू फोन का घेत नव्हतास?"

"अगं तुला काल बोललो होतो ना मी... की आज माझी महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून."

"अरे हो... तू बोलला होतास पण मी पूर्णपणे विसरून गेले रे." ओवी बोलली.

"तुला काय वाटलं...मी जीवाचं काही बरंवाईट करून घेतलं. असंच ना?"

"नाही रे...तुझी काळजी वाटत होती म्हणून कॉल करत होते."

"तुला माझी इतकी काळजी आहे हे ऐकून खूप छान वाटलं. पण आता होणाऱ्या नवऱ्याची देखील काळजी घे बाई. जास्त छळू नकोस त्याला."

सार्थक जरी हसून बोलत असला तरी त्याच्या मनाची घालमेल ओवीला समजत होती. त्यामुळे त्याच्या या बोलण्यावर कसे रिॲक्ट व्हावे ते क्षणभर तिला कळेना.

"काय गं कुठे हरवलीस?"

"आहे रे. बोल तू."

"आता फक्त माझं एकट्याचं डोकं नको खाऊस. जरा तुझ्या ह्यांचं पण डोकं खात जा आणि आता माझी काळजी करू नकोस. मी एकदम ठीक आहे. आता तू तुझी लाईफ एन्जॉय कर. मी नाही आता जास्त त्रास देणार तुला."

"असं काही नाहीये रे सार्थक...तू काहीही बोलू नकोस हा."

"काहीही नाही आ, खरं तेच बोलतोय. बरं ते जाऊ दे सगळं. मला इतकी भूक लागलीये ना ओवी की पोटात आता कावळ्यांनी अक्षरशः थैमान घातलंय. त्यांना खावू घालतो आधी." केविलवाण्या सुरात सार्थक बोलला.

"बरं जेव शांतपणे....बाय." म्हणत ओवीने फोन ठेवला.

"मला तर कधीकधी प्रश्न पडतो संभव की, हा नेमका तोच सार्थक आहे ना? इतका कसा काय बदलला यार हा?"

"परिस्थिती माणसाला बदलायला भाग पाडते ओवी. तसेच काहीसे झाले असेल." संभव बोलला.

"पण, सार्थक ठीक आहे, हे ऐकून बरं वाटलं रे...त्यासाठी तुला खूप मोठं थँक्यू. तू माझं टेन्शन समजून घेतलं आणि मला सार्थकसोबत बोलण्याची परमिशन दिली."

"हे अशा फक्त थँक्यूने काही नाही होणार आ. एवढं मोठं काम केलं मी त्यासाठी फक्त थँक्यू. दिस इस नॉट फेअर आ." गमतीच्या सुरात संभव बोलला.

"मग काय हवंय तुला?" नजर चोरत आणि लाजतच ओवीने प्रश्न केला.

"इतकं काही लाजायची गरज नाही आ. तू जे समजतेस तसलं इतक्यात तरी काही नकोय हा मला. उगीच भलता सलता विचार करू नकोस माझ्याबद्दल."

"खडूस...मी कुठे काय बोलले तेव्हा?"

"तुझे एक्स्प्रेशन कळले बरं का! सध्या फक्त तुझा हा सहवास पुरेसा आहे माझ्यासाठी. तू फक्त माझ्यासमोर अशी बसून जरी राहिलीस तरी आयुष्य आनंदाने जगू शकतो मी. समजलं?"

"बस झाले आ तुझे हे फिल्मी डायलॉग."

"फिल्मी काय त्यात? मी खरं तेच बोलतोय. खऱ्या प्रेमाचा अर्थ तरी काय गं? आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला सुखात आनंदात पाहणं आणि आपल्यामुळे त्याच्या किंवा तिच्या चेहेऱ्यावर हसू कायम कसं ठेवता येईल याचा विचार करणं, बस इतकं सोप्पं आहे हे."

"हो...पण मग होणाऱ्या बायकोचा हात हातात घेणं, तिला किस करणं, मिठीत घेणं. हे असं वाटणं पण तितकंच स्वाभाविक आहे ना? म्हणून मी तुझ्या वाक्यावर तशी रिॲक्शन दिली आणि ती नॅचरल होती यार. तुला जर इतकंही समजत नसेल तर अवघड आहे मग आणि सॉरी हा थोडं स्पष्टच बोलले. पण मी अशीच आहे, जे पोटात ते आपसूकच ओठांवर येतं माझ्या. त्याला काही इलाज नाही बघ."

"आणि ह्याच ओवीच्या स्वभावाच्या तर मी प्रेमात पडलोय. तू जे बोललीस ते अगदीच स्वाभाविक आहे. पण सब्र का फल मीठा होता है आणि त्याची गोडी ही अविटच असते हेच आजकाल लोकांना समजत नाही म्हणून जस्ट कॉमनली बोललो गं मी. सॉरी पण तू नको मनाला लावून घेऊस."

"हे तू बोलतोयेस. मग मगाशी गाडीवर जे काही बोलत होतास ते काय होतं?"

"काय बोललो मी गाडीवर?"

"तू मला त्रास दिलास तर मीही तुला दाखवेन वगैरे वगैरे."

"तसं बोलायचं असतं गं राणी आणि हे बघ ...प्रेम, लग्न म्हणजे फक्त दोन शरीरांचं मिलन नाही ना, त्याआधी दोन मनांचं मिलन व्हायला हवंय. अगं खरं प्रेम असेल ना तर फक्त नजरेतून सूद्घा प्रचंड प्रेमवर्षाव करता यायला हवा." संभवने प्रेमभऱ्या नजरेने ओवीकडे पाहिले.

"प्लीज यार असं नको पाहू ना माझ्याकडे." चेहऱ्यावर आलेली केसांची बट हलकेच कानामागे सरकवत लाजतच ओवी बोलली.

"काय हे... किती लाजतेस. पण म्हणजे माझ्या नजरेतील प्रेम तुला समजले हे महत्त्वाचं." संभव म्हणाला.

"पण आजकाल प्रेमाची व्याख्या खूप बदलली रे संभव. सगळेच तुझ्यासारखा साधा सरळ विचार नाही करत. खूप घाई असते आजकाल सर्वांना सर्वच गोष्टींची."

"हो ती तर मलाही आहेच की. कालच आपल्या घरच्यांनी आपलं लग्न लावून दिलं असतं तर कित्ती छान झालं असतं. मी म्हणत देखील होतो पण कोणी ऐकलंच नाही माझं."

"कसा आहेस रे तू? एकदा म्हणतो घाई आहे एकदा म्हणतो सब्र का फल मीठा होता है. तू पण ना."

"म्हणजे घाई तर आहेच गं. कारण मीही एक माणूसच आहे आणि मलाही भावना आहेत. पण त्यासाठी अजून शंभर टक्के अधिकृत मान्यता नाही ना मिळाली. काही संस्कार आपणच आपले जपायचे असतात. अधिकृत मान्यता मिळेपर्यंतचा काळ बनवता येईल तितका सुंदर बनवायचा बस. शेवटी आपला दृष्टिकोन महत्त्वाचा." ओवीचा हात हातात घेत संभव बोलला.

"आता लग्नाआधी हे असं हातात हात घेणं अधिकृत आहे का मग?" म्हणत ओवीने गोड स्माइल देत एक खोचक कटाक्ष टाकला संभववर.

"तेवढं चालतं गं. साखरपुडा झालाय आपला म्हणजे हे इतकं तर अधिकृतरित्या चालतंय." ओवीकडे पाहून डोळा मिचकावत संभव बोलला.

"तू म्हणजे खरंच कसा आहेस ना संभव." संभवच्या हाताची पकड अधिक घट्ट करत हसतच ओवी बोलली.

"आता आहे असा आहे. जसा आहे तसा तू स्वीकारलंस ना मला, मग बस आणखी काय हवंय."

"न स्विकारण्यासारखं तुझ्यात काहीच नाही रे. उलट आपल्या दोघांचे विचार बऱ्याच बाबतीत जुळतात, हे आता प्रकर्षाने जाणवतंय मला. असाच तुझा हात कायम हातात असेल तर संपूर्ण आयुष्य आनंदात जाईल माझे. बस यापेक्षा जास्त काही अपेक्षा नाहीत."

"विचार जुळतात म्हणून तर आपण आज एकत्र आहोत ना. लवकरच आता तोही दिवस येवो आणि तुला कायमचं माझ्यासोबत मला नेता यावं."

"येणार रे. बघ आजचा दिवस आपल्या आयुष्यात आला ना मग तोही दिवस लवकरच येणार."

तेवढ्यात बोलता बोलता ओवीची नजर समोरच्या दिशेला गेली. एक अंदाजे पंधरा सोळा वर्षांची मुलगी पंचविशीच्या घरातील एका तरुणासोबत एकदम अंगचटीला येऊन बसलेली तिला दिसली. ओवीचे विचारचक्र अचानक फिरले. तिचा संताप संताप होत होता.

"काय गं...काय झालं? अचानक अशी गप्प का झालीस."

"काही नाही रे. आजूबाजूला काही विचित्र प्रकार दृष्टीस पडले की माझा संताप होतो."

"म्हणजे?? मला समजेल असं बोल गं बाई."

"तिकडे समोर बघ."

"जाऊ दे आपल्याला काय करायचंय?"

"आपल्याला काही करायचं नाहीच रे, पण मी एक डॉक्टर आहे संभव. त्या दिवशी एका सतरा वर्षांच्या मुलीची डिलिव्हरी मी अगदी जवळून पाहिली.

"काय...? इतक्या लहान वयात?

"हो..त्यात तिचं लग्न झालेलं नाही. विचार कर मग. तिच्या आई वडिलांचा होणारा संताप देखील मी अगदी जवळून पाहिला. आजकाल खूप विचित्र प्रकार घडत आहेत. त्याबद्दल न बोललेलंच बरं. त्यात ह्या मुली अशा वागतात. इतक्या कशा वहावत जातात तेच मला कळत नाही. चांगलं वाईट यांतील फरकच त्यांना समजत नाही."

"हो गं...खूप अवघड आहे हे सगळं."

"पूर्वीच्या लोकांचं कसं होतं बघ..आय लव यू न बोलता, लग्नाआधी एकमेकांना न भेटता किती भरभरून प्रेम करत होते ते एकमेकांवर आणि आता छोटछोट्या गोष्टीवरून वाद होतात कपल्समध्ये. आधीही व्हायचे पण संसार टिकवण्यासाठी लोक धडपडत असायचे. पण आता सगळंच बदललं. आधी लग्न करण्याची घाई आणि नंतर ते मोडण्याची पण. म्हणजे बघ किती सोप्पं झालंय ना हे सगळं. याचा परिणाम नकळतपणे त्यांच्या मुलांवर होतो हे कळलच नाही लोकांना.

"अगं एवढंच नाही तर नवरा बायकोचं नातं सुद्धा खूप तकलादू झालंय गं आजकाल. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ना तर उधाण आलंय सध्या. आजूबाजूला असे कितीतरी लोक आहेत की ज्यांची फॅमिली मुलंबाळं असतानाही बाहेर अफेअर्स सुरू असतात. खरंच चीड येते अशा लोकांची."

"ते सगळं सोड..आपण लोकांचा दृष्टीकोन आणि त्यांची मानसिकता नाही बदलवू शकत."

"ते तर आहेच गं. पण आपण लग्नानंतर असं टिपिकल नवरा बायकोसारखं नाही वागायचं हा ओवी. एकतर आपलं शेड्युल सांभाळून आपल्याला एकमेकांना समजून घ्यायचंय. असा निवांतपणा आयुष्यात पुढे भेटेलच असं नाही. त्यामुळे दोघांनाही एकमेकांना खूप ऍडजस्ट करून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे भांडणं वाद देखील होवू शकतात. पण कितीही वाद झाले तरी ते तुटेपर्यंत ताणायचे नाहीत आ. माघार घ्यायची सवय पण ठेवायची." अत्यंत समजूतदारीच्या सुरात संभव बोलला.

"पण माघार नेमकी घ्यायची कोणी? हा प्रश्न आलाच." तोंडातल्या तोंडात हसू दाबत ओवी बोलली.

"तू...सगळीकडे लेडीज फर्स्ट मग इथेही तू आधी."

"असं नाही आ. त्यावरून पण पुन्हा वाद व्हायचे. त्यापेक्षा एक काम करुयात, जेव्हा जेव्हा असं काही होईल तेव्हा एकदा तू माघार घ्यायची एकदा मी. असं टर्न वाईज करुयात." ओवीने उत्तम पर्याय सुचवला.

"याचा अर्थ तू वाद घालणार माझ्याशी हे कन्फर्म आहे. आपल्यात भांडणच होणार नाही याची खात्री मात्र नाही." नाराजीच्या सुरात संभव बोलला.

"अरे भांडणच जर नसेल तर मग काय फायदा? भांडणामुळेच तर प्रेम वाढतं ना."

"मग रोजच असा प्रेमवर्षाव व्हायला लागला तर अवघड होऊन बसायचं बरं. एकतर मला तुझ्यासारखं भांडता येत नाही बाई."

"म्हणजे मी भांडखोर... किती खडूस आहेस रे तू."

"आला का राग?"

"अजिबात नाही. एवढ्या तेवढ्याने मला राग नाही येत, समजलं."

"हो, मग ठीक आहे."

तेवढ्यात आजूबाजूला लोकांचा अचानक गोंधळ सुरू झाला.

'अरे पोलीस आले पोलीस' म्हणत लोक इकडे तिकडे धावत सुटले.

"संभव चल उठ पटकन्! आपण पण ना कोणत्या मुहूर्तावर आलोय इकडे."

"किती भित्री आहेस गं तू, कर नाही त्याला डर कशाला?" घाबरू नकोस, मी आहे ना." ओवीचा हात घट्ट पकडत संभव बोलला.

"अरे पण ते पोलीस इकडेच येत आहेत ना संभव."

"हो दिसतंय गं मला, पण आपण काही केलंय का? नाही ना... झालं तर मग. तुझा होणारा नवरा एक ऑफिसर आहेस हे विसरू नकोस."

"अरे हो...हे तर विसरलेच होते मी." दाताखाली जीभ चावत थोडं हास्यास्पद सुरात ओवी बोलली.

"व्वा...किती छान! पण खरंच ही गमतीची वेळ आहे का ओ मॅडम?" थोड्या गमतीशीर आणि रागीट सुरातच संभव बोलला.

क्रमशः

काय प्रकार असेल हा? काय करेल आता संभव? या सर्व प्रकारातून कसे बाहेर पडतील ते दोघे? जाणून घेऊयात पुढील भागात.

(सर्वात आधी वाचकांची मी मनापासून माफी मागते. कारण खूप दिवस झाले ही कथा रेंगाळत आहे. माझ्याकडून ती वेळेत पूर्ण होत नाहीये. काही वाचकांनी खूप वेळा पर्सनली मेसेज करून पुढील भागाची मागणी केली. इथेही बऱ्याच वाचकांनी कमेंट मध्ये सांगितले पण इच्छा असूनही लिहू शकले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. पुढचे भाग लिहायला सुरुवात केली आहे. जमेल तसे पोस्ट करते. तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा आहे.)