अधीर मन झाले..(भाग ५३)

अधीर मन झाले..एक प्रेमकथा
अचानक गडावर पोलिस आल्यामुळे सर्वांचाच गोंधळ उडाला.

"ताब्यात घ्या रे ह्यांना." समोरून आलेल्या पोलीसांच्या तुकडीतील एका ऑफीसरने कर्मचाऱ्यांना आदेश दिला.

लगेचच तिथे असलेल्या त्या पंचवीश वर्षीय तरुणाला आणि त्या सोळा वर्षीय मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

ओवी आणि संभव तिथेच बाजूला उभे होते. समोर पोलिसांना पाहून ओवीने झटकन संभवच्या हातातील हात काढून घेतला आणि ती थोडं अंतर ठेवून उभी राहिली.

'काय झाले?' भुवया उंचावत संभवने प्रश्न केला?

'समजून घे ना.' खाणाखुणा करत ओवी उत्तरली.

आपल्यामुळे संभव कोणत्याही चुकीच्या प्रकरणात अडकायला नको तसेच कोणताही चुकीचा संदेश समोर जायला नको म्हणून ओवी आधीच सावध झाली.

तेवढयात ते ऑफिसर संभव आणि ओवीच्या दिशेने आले.

"जयहिंद सर.." संभवला सॅल्युट करत त्या ऑफिसरने त्याला शेक हॅण्ड केले.

"जयहिंद..." हसतच संभव उत्तरला.

"सर तुम्ही आज आमची खूप मोठी मदत केलीत. खरंच खूप आभारी आहोत आम्ही तुमचे."

"आभार काय त्यात? माझं कर्तव्यच आहे ते."

"थँक्यू सर. पण तुमच्या मनाचा मोठेपणा आहे हा. तुम्ही सुट्टीवर असतानाही आम्ही तुम्हाला कामाला लावलं त्याबद्दल खरंच सॉरी."

"अजिबात तसं काही नाहीये. उलट तुमच्यामुळे आज मला माझ्या होणाऱ्या बायकोसोबत सिंहगडाची सफर करता आली." ओवीकडे पाहत संभव बोलला.

"अरे व्वा! काँग्रॅच्युलेशन टू बोथ ऑफ यू. लग्नाला नक्की बोलवा सर आम्हाला." ओवी आणि संभवकडे पाहत ते ऑफिसर बोलले.

"अहो मग बोलवणारच की... हा काय प्रश्न आहे का? " हसतच संभव उत्तरला.

"बरं ही माझी होणारी बायको...डॉक्टर ओवी मोहिते."

"नमस्कार मॅडम." ऑफिसर बोलले.

"नमस्कार." ओवी उत्तरली.

"तुम्हा दोघांनाही आमच्याकडून खूप शुभेच्छा. असेच नेहमी एकमेकांसोबत राहा आणि कायम आनंदी राहा."

"नक्कीच, पण आज अमित येणार होता ना इकडे?"

"हो... सरच येणार होते, पण अचानक त्यांना दुसरं एक काम लागलं म्हणून त्यांना तिकडे जावं लागलं. मग त्यांनी मला पाठवलं इकडे."

संभव त्या ऑफिसर सोबत एकदम आपलेपणाने आणि खूप जुनी ओळख असल्यासारखा बोलत होता.

"खूप छान वाटले सर तुम्हाला भेटून आणि एवढं फ्रँकली बोलताना पाहून. तरी अमित सरांकडून बरंच ऐकलंय तुमच्या बद्दल आणि आज प्रत्यक्ष अनुभवयाला देखील मिळालं."

ओवीच्या चेहऱ्यावर मात्र असंख्य प्रश्नचिन्ह होती. ती अवाक् होऊन सारे काही पाहत होती. हे काय सुरू आहे? क्षणभर तर तिला काहीच समजेना. पण हळूहळू सारं काही तिच्या लक्षात येत होतं.

"बरं चला सर, एन्जॉय युवर क्वालिटी टाइम. आता जास्त डिस्टर्ब नाही करत आम्ही तुम्हाला." गालातल्या गालात हसत ते ऑफिसर बोलले.

"अहो काय हे. आता तुम्हीही." हसतच संभव बोलला.

"बरं जाता जाता पोलीस स्टेशनला या सर. तसा अमित सरांचा फोन येईलच तुम्हाला, पण मीही सांगतो."

"हो हो नक्की." संभव उत्तरला.

"पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद सर." म्हणत संभवचा निरोप घेऊन ते ऑफिसर निघून गेले.

ओवी मात्र हाताची घडी बांधून रागीट नजरेने संभवकडे एकटक पाहत होती.

संभवला तर हसूच आवरेना.

"अजिबात बोलू नकोस तू माझ्याशी आणि हसू तर त्याहून नको." तोंड फिरवत ओवी बोलली.

"सॉरी... कान पकडू की उठाबशा काढू? बोल." ओवीच्या समोर जात संभव बोलला.

"काही गरज नाही त्याची. खडूस कुठचा."

"मग गाणं म्हणू की डान्स करु? हिंदी मूव्हीतल्या हिरोसारखं."

"तसं असेल तर मग डान्स कर." गालातल्या गालात हसत ओवी बोलली.

"बघ हा... खरंच करेल आणि तू मला कंपनी देणार असशील तर नक्कीच मला आवडेल."

"मला तुझा खूप राग आलाय, हे विसरू नकोस."

खरंतर ओवीच्या मनात आज संभवबद्दलचा आदर कैकपटीने वाढला होता. पण आता हे सगळं असं अचानक घडल्यावर आता तिचा टर्न होता, म्हणून तीही जरा जास्तच भाव खात होती. संभवचा पुरेपूर बदला घेण्याचा तिचा विचार पक्का होता.

"नाही गं....तुला माझा राग आलाय हे कसं विसरेल मी. म्हणूनच तर मनवत आहे तुला." हसतच संभव उत्तरला.

"पण त्याचा काही उपयोग नाहीये आता. माझा राग नाही जाणार इतक्यात."

"पण का ? इतका वाईट आहे का मी? इतक चुकीचं वागलोय मी तुझ्याशी?" केविलवाण्या लाडीक सुरात संभवने प्रश्न केला.

"हो...खूप म्हणजे खूप वाईट आहेस तू. कारण तू तुझ्या कामासाठी इथे आला होतास, माझ्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायला नाही." तोंड फुगवून ओवी बोलली.

"अगं राणी...अजिबात तसं काहीच नाहीये. विश्वास ठेव माझ्यावर."

"मग आता जे काही मी माझ्या कानांनी ऐकलं आणि डोळ्यांनी पाहिलं ते काय खोटं होतं?"

"तू भांडणार आहेस का आता माझ्याशी?"

"हो... इच्छा तर खूप आहे."

"नको गं असं बोलू...मी सांगतो ना तुला सगळं."

"सगळं झाल्यावर?"

"काही गोष्टी समजून घे ना ओवी."

"म्हणजे आता समजून पण मीच घ्यायचं?"

"शांत... एकदम शांत, अजिबात चिडचिड करू नकोस आणि आता अजिबात काही बोलूसुद्धा नकोस. आता मी बोलणार आणि तू फक्त ऐकायचं. त्याआधी एक दीर्घ श्वास घे. अरे....घे ना दीर्घ श्वास. असं बघू नकोस." संभव म्हणाला.

ओवीनेही लगेचच ऐकले आणि एक मोठा श्वास घेतला.

"येस.. दॅट्स लाईक अ गुड गर्ल."

नजर चोरत ओवी मात्र इकडे तिकडे पाहू लागली. अलगद संभवने तिचा हात हातात घेतला. क्षणात मग ओवीचा राग कुठच्या कुठे पळून गेला.

"अगं आपण फिरायला जाणार हे आधीच ठरलं होतं, पण तुझ्यासोबत नेमकं कुठे जावं ते समजत नव्हतं. सिंहगड आधीच डोक्यात आलेलं माझ्या, पण तू येतेस की नाही आणि त्यात तुझे घरचे तुला पाठवतात की नाही हा प्रश्न होता. मग म्हटलं जाऊ दे,हा ऑप्शन कॅन्सल. नंतर मनात विचार आला की, लाँग ड्राईव्हला जाऊयात. मस्तपैकी भटकुयात. सोबत वेळच घालवायचा आहे मग काय तो कसाही घालवता येईल. तेवढयात इथे सिंहगड पोलिस स्टेशनला इन्चार्ज असलेला माझा मित्र अमित, याचा मला कॉल आला." ओवी संभवचे बोलणे अगदी कान देवून ऐकत होती.

"ॲक्च्युअली प्रकरण थोडे सिरियस होते. एक पंचवीस वर्षीय तरुण काही अल्पवयीन मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून आधी त्यांचा विश्वास संपादन करतो आणि परदेशात घेऊन जातो. तिथे गेल्यावर त्या मुलींसोबत पुढे काय होते ते अद्याप तरी कोणालाच समजले नाही. याआधी त्याने दोन मुलींना असेच फसवले आहे, असा पोलिसांना डाऊट आहे. अद्यापही त्या दोन मुली गायब आहेत. बरं तो एकटा नाही, अजून बरेच जण यात सामील आहेत. पण ते वेगवेगळ्या ठिकाणी राहून कामे करतात. याचे काम म्हणजे गरीब घरातील मुलींना अशी फूस लावून पळवून आणणे. त्यांना लग्नाचे, पैशाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढणे. पैसे दिसायला लागले की मुलीही अगदी सहज त्याच्या शिकार होतात. त्यात तो इतका स्मार्ट की मुलीही लगेच भूललात त्याच्या बाह्य रुपाला. खूप दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर आहेत. अखेर आज तरी तो हाती लागेल अशी अपेक्षा होती पोलिसांना आणि फायनली आज तो हाती लागला. आता बऱ्याच गोष्टी समोर येतील."

"बापरे...!! किती भयानक आहे हे सर्व. म्हणजे मगाशी   आपल्यासमोर जो त्या मुलीसोबत बसला होता, तो तोच होता?" न राहवून ओवी अखेर बोलती झाली."

"होय...पुढे तर ऐक, ते तर याहून भयानक आहे. आज रात्रीच्या फ्लाईटने तो त्या मुलीला घेऊन दिल्ली एअर पोर्टमार्गे कॅनडाला जाणार होता. अमितने त्यासाठीच मला कॉल केला होता. चुकून तो आज हातातून निसटलाच तर दिल्लीतून त्याला पुढे जाऊ द्यायचे नव्हते. पण म्हटलं तो विचार नंतर करायला हवा आधी त्याला इथूनच बाहेर पडू न देणे हे योग्य होईल."

"अरे पण तो त्या मुलीला घेऊन आज इकडे येणार आहे हे तुला कसं समजलं?"

"खुप मोठी स्टोरी आहे यार ती. नंतर सांगेल ना तुला. हा आपला क्वालिटी टाइम आहे ना ओवी. सगळं सांगत बसलो तर सगळा वेळ त्यातच जाईल गं. आपण आपल्याबद्दल बोलुयात ना."

"पण मला ऐकायचीये ना स्टोरी. प्लीज सांग ना...पुढे काय झालं मग?"

"म्हणजे तू नाहीच ऐकणार तर?"

"प्लीज...."

"बरं बाई सांगतो ऐक. तर कुठे आलो होतो मी?"

"अरे मी म्हटलं की तुला कसं समजलं की ते इथे येणार आहेत?"

"अगं मला तरी कुठे माहीत होतं. अमितकडूनच मला हे समजलं. ॲक्च्युअली त्या मुलीच्या आई वडिलांना पोलिसांनी आधीच विश्वासात घेतले होते. मुलीच्या आईला समजले की ही आज त्या मुलासोबत सिंहगडावर जाणार आहे. तिच्या आईने लगेच पोलिसांना ही खबर दिली."

"पण मला एक कळत नाही आई वडील स्वतः आपल्या लेकीला का थांबवू शकत नव्हते? ही अशी रिस्क घ्यायचीच कशाला मी म्हणते?"

"अगं बाई, मग ह्याला कसं पकडलं असतं? तोच तर प्लॅन होता पोलिसांचा. आज ही मुलगी नाही तर दुसरी... त्याला काही फरक पडला नसता. म्हणून मग त्याला पकडणे मस्ट होते."

"अरे हो... ते पण आहे. मग पुढे काय झालं?"

"तू म्हणते तसं, त्या मुलीची आई नकोच म्हणत होती रिस्क घ्यायला. आम्ही समजावतो आमच्या मुलीला असंही म्हणाली, पण अमितने कसेबसे कंविन्स केले तिच्या आईला आणि सावज म्हणून आज त्याच मुलीचा पोलिसांनी वापर केला."

"अच्छा...मग पुढे?"

"मला सकाळी अमितचा कॉल आला तेव्हा त्याने मला सांगितलं हे सिंहगड प्रकरण. त्यात पोलिसांनी त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर ट्रेस केला होता. मोठ्या मुश्किलीने त्या मुलीच्या आईने तिच्या फोनमधून त्याचा नंबर मिळवला होता. त्यामुळे काम सोप्पं झालं. तेव्हा अमितने माझी मदत मागितली."

"पण अरे एवढी मोठी पोलीस फोर्स असताना त्यांनी तुझी मदत मागावी? हे काही पटेना बघ."

"तीच तर खरी गम्मत आहे. तुला काय मलाही आधी पटेना. पण अमितने खूप विचार करून माझ्यावर ही जबाबदारी सोपवली. त्या व्यक्तीला पकडायचे म्हणजे फुल प्रूफ प्लॅन आवश्यक होता. जो की अमितने आणि त्याच्या टीमने मिळून बनवला होता."

"प्लॅन...कोणता प्लॅन?"

"अगं बोलता बोलता मी त्याला म्हणालो होतो की, आज होणाऱ्या बायको सोबत फिरायला जातोय म्हणून."

"अरे देवा! मग?"

"मग काय! त्यालाही आपल्यासारखं यंग कपलच हवं होतं या प्लॅनसाठी. म्हणून मग त्याने माझी मदत मागितली. मी माझ्या होणाऱ्या बायकोसोबत सिंहगडावर जाऊन त्या व्यक्तीवर, त्याच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवायचे आणि सगळे अपडेट्स त्याला पाठवायचे. जे मी तुझ्या नकळत करत होतो."

"पण तू मला विश्वासात घेऊन हे सांगू शकला असतास ना."

"नाही ना...कोणालाही काहीच कळू द्यायचं नाही असं अमितने मला आधीच सांगितलं होतं. म्हणून मग दुसरा कोणताच पर्याय नव्हता आणि तुला जर समजलं असतं तर तू इतकं नॅचरल वागली असतीस माझ्याशी?"

"अरे पण किती वेळ झाला आपण सोबत आहोत पण मला तर कसलाच डाऊट नाही आला तुझ्यावर. तू नेमकी एअर फोर्स मध्ये आहे की पोलीस फोर्समध्ये?" हसतच ओवीने प्रश्न केला.

"कुठे का असेना पण मुळात आज मी तुझ्यासोबत इथे आहे हेच माझ्यासाठी भारी फिलिंग आहे. बस बाकी काही नको आता." ओवीचा हात हातात घेत संभव बोलला.

"झाले का पुन्हा तुझे फिल्मी डायलॉग सुरू."

"कसंही वागलं तरी तुला ते फिल्मीच वाटतंय जाऊ दे." लटक्या रागातच संभव बोलला.

"अरे गंमत केली मी. इतकंही समजत नाही का रे तुला?"

"नाही ना समजत. जरा प्रेमाने, गोड भाषेत समजावलं तर कदाचित समजेल."

"गप्प बस खडूस. जास्त प्रेम दाखवलं तर उगीच तुला ते पचायचं नाही. जास्त गोडाने डायबेटिस होते, माहितीये ना? शेवटी मलाच तुझी काळजी रे."

"मग तू कशाला आहेस? डॉक्टर आहेस ना तू! आणि मलाही आता आयुष्यभर तुझ्याकडून इलाज करून घ्यायला नक्कीच आवडेल." एकदम रोमँटिक मुडमध्ये संभव बोलला.

"हो का आणि मलाही आवडेल.... तुझ्यावर आयुष्यभर इलाज करायला." चेहऱ्यावरील केसांची बट अलगद कानामागे सरकवत नजर चोरत लाजतच ओवी बोलली.

"राहू दे ना...छान दिसतंय." पुन्हा तिच्या केसांची नाजूक बट गालावर घेत संभव बोलला.

त्याच्या त्या नाजुक स्पर्शाने ओवी मोहरली. संभवच्या प्रेमाचा गुलाबी रंग आणि त्यावर पसरलेली लाजेची लाली अगदी ओसंडून वाहत होती.

"तू असं नको ना पाहू यार....कसंतरी होतं मग." लाजतच ओवी बोलली.

"म्हणजे नेमकं कसं होतं गं?" ओवीला एकटक न्याहाळत गालातल्या गालात हसत संभव बोलला.

"कसली गोड दिसतेस गं लाजल्यावर. असं वाटतंय सारखं तुझ्याकडेच बघत बसावं. ह्यावेळेची माझी सुट्टी खऱ्या अर्थाने सार्थकी लागली. पण आता जाताना खूप अवघड होणार आहे माझं. तुला सोडून जाण्याची तर इच्छाच होणार नाही बघ."

"तरीही तू जाशील, पण माझी काही वेगळी अवस्था नसणार आहे इकडे." भावूक सुरात ओवी बोलली. तिच्या डोळ्यांत नकळतपणे पाणी आले.

"ये बाई आता रडू नकोस, नाहीतर मीही रडेल बरं."

"गप्प बस, तुला नाही समजणार."

"मला नाही तर कोणाला समजणार गं पोरी."

"गप रे...पण एक बोलू?"

"दोन बोल."

"मला ना तुला एक घट्ट मिठी माराविशी वाटतेय. प्लीज जायच्या आधी माझी ही एवढी इच्छा पूर्ण करशील?"

"आता! इथे! वेडीयेस का तू ओवी? असं पब्लिक प्लेसमध्ये! कसं शक्य आहे ते?"

"तितकं कळतं हो मला. इतकं काही ओव्हर रिॲक्ट करु नकोस. इथे नाही म्हणत मी."

"जायच्या आधी म्हणालीस म्हणून मला प्रश्न पडला ना."

"म्हणजे तू पुण्यातून जायच्या आधी, असं म्हणाले मी".

"असं होय...डोन्ट वरी बालिके...तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. मलाही तेच तर हवंय." शेवटचे वाक्य मात्र हळू आवाजात संभव तोंडातल्या तोंडात पुटपुटला.

"काय म्हणालास?"

"कुठे काय?"

"खडूस..."

"तू डबल खडूस."

दोघांची अशी क्युट नोकझोक सुरू असतानाच एक मुलगी धावतच संभवकडे आली.

"ये हाय...तू संभव देशमाने ना?" खूपच आनंदी स्वरात त्या मुलीने प्रश्न केला.

आश्चर्यकारकरित्या संभवने तिला लूक दिला.

"हो मी संभव देशमाने, सॉरी पण मी नाही ओळखलं तुम्हाला."

"तू नाहीच ओळखणार रे, पण मी मात्र आयुष्यात कधीच तुझा चेहरा विसरू शकणार नाही. इतका बदललास पण अजूनही तुझ्या चेहऱ्यावरचा तोच क्यूटनेसपणा अगदी जसा होता तसाच आहे बघ."

ती मुलगी इतकी फ्रँकली बोलत होती की आता संभवबरोबर ओवीलाही अवघडल्यासारखे झाले.

क्रमशः

कोण असेल ती मुलगी? ती संभवला कशी ओळखते? जाणून घेऊयात पुढील भागात.

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all