अधीर मन झाले..(भाग ५४)

अधीर मन झाले.. एक प्रेमकथा
ओवी आणि संभवच्या गप्पा सुरू असताना एक तरुणी तेथे येते. संभव सोबत एकदम जुनी ओळख असल्यासारखी ती बोलायला सुरुवात करते, पण संभव मात्र तिला ओळखत नाही.

"सॉरी मी तर नाही ओळखले तुम्हाला पण तुम्ही कसे ओळखता मला?" उत्सुकतेपोटी संभवने प्रश्न केला.

"अरे...आपण एकाच कॉलेजमध्ये होतो ना."

"कॉलेजमध्ये....पण कधी? मला तर नाही आठवत."

"अरे...फक्त दोन वर्ष सोबत होतो, अकरावी आणि बारावी. पण तरीही माझ्या लक्षात आहे बघ."

"ओह... अच्छा. पण खूप जुनी गोष्ट आहे ती त्यामुळे मला इतकं काही आठवत नाही."

"हो ना... त्यात तुला मुलींची ॲलर्जी...आमच्या ग्रुपमध्ये तर तुला खडूस म्हणायच्या सगळ्याजणी. कितीतरी वेळा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तुला, पण खडूस तू ॲक्सेप्टच केली नाहीस रे." त्या मुलीच्या बोलण्यावर ओवीला मात्र खुदकन हसू आले.

"हो ते माहीत आहे मला. काहीजणी तर आजही तोंडावर बोलतात की तू खूप खडूस आहेस म्हणून." ओवीला टोमणा मारत संभव बोलला.

"पण आज एका गोष्टीचा आनंदही होतोय आणि वाईटही वाटतंय की आम्हाला कधीही भाव न देणारा मुलगा आज एका सुंदर मुलीसोबत फिरतोय."

"अरे ती माझी होणारी बायको आहे. साखरपुडा झालाय आमचा हे बघ." हातातील अंगठी दाखवत संभव बोलला.

"वाव... दॅट्स ग्रेट हा. बरं ह्या लकी मुलीचं नाव तरी सांग आता."

"ओवी... डॉ. ओवी मोहिते."

"खूपच छान... हॅलो डॉ.ओवी... आय एम निधी." ओवीला हात मिळवत ती बोलली.

"तुला एक सिक्रेट सांगू ओवी?"

आता ही काय बोलणार म्हणून ओवीने कान टवकारले.

"संभव म्हणजे क्लासमधील बऱ्याच मुलींचे पहिले क्रश होता, अगदी माझाही. पण शहाण्याने कधी भावच दिला नाही गं आम्हाला. नाहीतरी कदाचित आज इथे आमच्यापैकी कोणीतरी असती." ओवीच्या कानात हळूच ती बोलली.

ओवीला यावर हसू आले. संभवला मात्र प्रश्न पडला हिने ओवीला नेमकं काय सांगितलं?"

"बरं संभव तुझा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल? मला ना आता खूप घाई आहे, माझे कलीग तिकडे वाट पाहत असतील. बाकी गप्पा कॉलवर मारु आणि लक्षात ठेव लग्नाला बोलवायला विसरु नकोस." ती तरुणी बोलली.

"संभवने नजरेतून ओवीची परवानगी घेत त्या मुलीशी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर केला आणि ती मुलगीही दोघांना शुभेच्छा देऊन लगेचच तिथून निघून गेली.

तेवढ्यात ओवीचा फोन वाजला.

"हॅलो ओवी... अगं जरा माझ्या जावयाकडे फोन दे ना मला बोलायचंय त्यांच्याशी."

"संभवकडे..??" आश्चर्यकाकरीत्या ओवीने प्रश्न केला.

"मग तिथे दुसरा कोण जावई आहे माझा? काय बोलतेस ओवी? तू पण ना."

"हे घे...तुझ्याशी बोलायचंय आईला." संभवकडे फोन करत ओवी बोलली.

"माझ्याशी? पण काय बोलायचं असेल?" खुणेनेच संभवने विचारले.

"आता ते मला काय माहिती, घे बोल." खांदे उडवत ओवीही त्याच्याच भाषेत उत्तरली.

"हा काकू बोला ना." थोडं चाचपडतच संभव बोलला.

"जावईबापू तुमचे मनापासून अभिनंदन.एका क्रिमीनलला पकडून देण्यात तुम्ही पोलिसांची मदत केली. अशी बातमी झळकत आहे टिव्हीवर. खरंच खूप छान वाटत आहे आणि तितकाच अभिमान सुद्धा." "

"थँक्यू काकू...असेच कायम तुमचे आशीर्वाद पाठीशी असू देत."

"ते तर आहेतच हो आणि यापुढेही कायम असतील. बरं आज इकडेच या जेवायला. छान तुमच्या आवडीचा बेत करते आज."

"हो काकू नक्की येतो. घ्या ओवीसोबत बोला. केव्हाची तडफड सुरू आहे तिची तुमच्याशी बोलण्यासाठी." हसतच संभव बोलला.

"काय हे आई! किती घाबरले होते अगं मी. मला वाटलं आता ओरडा बसतो तुझा. काकीने जास्त लांब कुठे जाऊ नका असे सांगूनही आम्ही इतक्या दूर आलो म्हणून वाटलं मला तसं."

"वेडीयेस का तू! मला माहिती आहे तू संभवसोबत आहे. मग ते कुठे का असेना. माझा तुझ्यावर जितका विश्वास आहे ना तितकाच त्याच्यावर सुद्धा आहे. बरं संभवला घेऊन ये घरी. रात्री जेवण करूनच जाईल तो आणि आता तुमच्या गप्पा टप्पा मजा मस्ती झाली असेल तर उगीच टाइमपास करत बसू नका. अंधार व्हायच्या आत घरी या."

"हो गं... येतो. बरं चल, ठेवते मी आता. बोलू घरी आल्यावर." म्हणत ओवीने फोन ठेवला.

"मज्जाये बाबा....लाडक्या जावयाची." संभवची खेचत ओवी बोलली.

"हो मग असणारच ना. पण तू जळू नकोस माझ्यावर."

"खडूस....मी का जळेल पण?"

"वेट.... अमितचा कॉल येतोय."

'जाता जाता पोलीस स्टेशनला भेट दे.' हे सांगण्यासाठी संभवचा मित्र, इन्स्पेक्टर अमित यांनी त्याला कॉल केला होता.

"बरं ओवी...आपल्याला निघावं लागेल आता. पोलिस स्टेशनला बोलवत आहेत. जाता जाता जावं लागेल."

"अरे पण मी काय करू तिकडे येवून?"

"काय करू म्हणजे? अगं तसं पाहिलं तर तूही एक भाग होतीस त्या प्लॅनचा. हा आता तुला नव्हतं माहीत हे, तो भाग वेगळा. पण तू सोबत होतीस म्हणून मला माझे काम करता आले."

"बरं चल मग लवकर पुन्हा घरी जायला पण उशीर होईल."

"खुप छान गेला नाही आजचा दिवस." संभव बोलला.

"हो ना रे. पण आता पुन्हा कधी असं सोबत इकडे येणं होईल माहित नाही."

"येवू की लवकरच त्यात काय. भविष्यात आपल्या लेकरांना किल्ला दाखवावा लागेल ना आपल्याला. तेव्हा येवूच की पुन्हा." ओवीकडे पाहून डोळा मिचकावत हसतच संभव बोलला.

"आपल्या लेकरांना घेऊन? अशी किती लेकरं हवीत रे तुला?" लाजतच ओवीने प्रश्न केला.

"कमीत कमी दोन तरी हवीत मला. एक मुलगा एक मुलगी."

"बापरे!! हे सगळं प्लॅनिंग तू केलं सुद्धा? आणि तेही एकट्यानेच."

"हो मग."

"बरं यावर बोलू आपण नंतर, विषय खूप खोल आहे. त्यामुळे आता निघूयात का?"

"ओके बॉस. पण आता धावत जायचं आ खाली. बघू आता तुझी एनर्जी. फक्त बोलण्यातच पुढे आहेस की आणखी पण काही गुण आहेत ते कळेलच आता."

"तू मला नको हा चॅलेंज करू सोनुल्या. इतर मुलींसारखी इतकीही नाजूक नाही हा मी. तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते, एके काळी बास्केटबॉल टीमची कॅप्टन होते मी."

"वो वाव.. दॅट्स ग्रेट यार, पण कधी बोलली नाहीस तू?"

"चल जाता जाता बोलुयात." दोघेही मग जायला निघाले.

"अरे आपली ओळख झाली तेव्हापासून कधी खेळलेच नाही मी. त्यामुळे त्या विषयावर कधी बोलणंच झालं नाही आपलं. फर्स्ट इयरला एकदा इंटर कॉलेज बास्केटबॉल मॅचमध्ये पार्टीसिपेट केलं होतं पण नंतर जसा अभ्यास वाढत गेला तसं खेळ मागे पडत गेला."

"डोन्ट वरी....तुला आवडतं ना बास्केट बॉल खेळायला, मग लग्नानंतर पुन्हा सुरू कर."

"तू म्हणतोस ना मग नक्की करेल."

"बरं ते जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आता हात पकड माझा आणि थोडं फास्ट चल." संभव म्हणाला.

"असा तुझा हात हातात असेल तर मग न थकता मी कितीही दूरपर्यंत चालू शकते समजलं."

"हो का...बरं..चल मग आणि तुझी बडबड आधी बंद कर. विनाकारण दमशील नाहीतर."

संभव आणि ओवी दोघेही मग पुढच्या दहा ते पंधरा मिनिटात गडाच्या प्रवेश द्वाराजवळ आले. पुन्हा एकदा शक्य तितका गड तसेच गडाच्या अवतीभोवतीचा परिसर नजरेत साठवून घेत आणि मनोमन राजांचे स्मरण करत तसेच खूप साऱ्या आठवणींची साठवण करत दोघेही मग जायला निघाले. आज एकमेकांच्या सहवासात भुकेची जाणीव सुद्धा झाली नाही त्यांना.

पायथ्याशी थोड्याच अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी म्हणून दोघेही मग थांबले. सर्वजण जणू त्यांचीच वाट पाहत होते. दोघांचेही सर्वांनी तोंडभरून कौतुक केले, त्यांचा छोटासा सत्कार देखील करण्यात आला. तसेच त्यांच्या भावी जीवनासाठी सर्वांनी त्यांना भरभरुन शुभेच्छाही दिल्या.

थोडक्यात पाहुणचार आटोपून तसेच खूप साऱ्या आठवणींची मनात साठवण करून दोघेही परतीच्या प्रवासाला लागले. आज एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड केल्यानंतर नात्यातील आपलेपणा, प्रेम, हक्क, काळजी, आदर सारेच क्षणात वाढले होते. एकाच बाईक वरून प्रवास करताना नात्यातील मर्यादेची बंधने देखील थोडीफार का होईना पण गळून पडली होती.

न राहवून एका क्षणी ओवी पाठीमागून घट्ट बिलगली संभवला.
एकमेकांच्या प्रेमळ स्पर्शाने दोघेही मनोमन सुखावले. प्रीतीची फुलपाखरं संपूर्ण शरीरभर घिरट्या घालत असल्याचा भास होत होता दोघांनाही.

"ओवी... अगं लोक बघत आहेत. हे काय करत आहेस तू?"

"बघू दे... मला नाही फरक पडत. माझा होणारा नवरा आहेस तू. त्यामुळे माझा तितका तर हक्क आहेच, समजलं." संभवच्या पाठीवर अलगद डोके ठेवत आणि त्याच्याभोवतीची मिठी अधिकच घट्ट करत लाडीक सुरात ओवी बोलली. क्षणभर मग संभवच्या मिठीत ती पूर्णतः विरघळली.

"वेडाबाई...पण मिठीचा आनंद तू एकटीच घेत आहेस आ. मलाही हवाय तो. बाईक थांबवू?"

"गप रे. इथे कुठे आता बाईक थांबवून मिठ्या मारत बसायचं."

"ह्मममम...हे बरंये तुझं...सेलफिश कुठची."

"गप रे... असं काही नाहीये." मिठीची पकड सैल करत ओवी बोलली.

हसत खेळत आयुष्यातील अत्यंत मौल्यवान असे क्षण आज दोघेही अगदी भरभरून जगत होते. तसेही भेटीची ओढ आज खऱ्या अर्थाने पुर्ण झाली होती. एकमेकांच्या सोबतीत वेळ कसा जात होता ते समजत नव्हते. हा क्षण येथेच गोठावा आणि प्रवास कधी संपूच नये असे दोघांनाही मनोमन वाटत होते. पण गप्पांच्या ओघात प्रवास कधी संपला ते दोघांनाही समजलेच नाही.

"ओवी यार पोहोचलो पण आपण. तरी किती स्लो ठेवलं होतं बाईकचं स्पीड."

"हो ना. बरं चल बाबा आधी वर जाऊयात. आई वाट पाहत असेल."

"ऐक ना... एकदा काकूंना फोन करून सांग ना, मी घरी नाही येत आता. लग्नाआधी असं सारखं सासुरवाडीत जाणं बरं नाही दिसत गं. ह्यावेळची अर्धी अधिक सुट्टी जणू इकडेच घालवली आहे मी. आता आईचा फोन येण्याआधी मला घरी पोहचायला हवं. रात्रीच्या जेवणासाठी थांबलो तर खूप उशीर होईल मग घरी जायला. प्लीज तेवढं बघ ना. बोल ना तू काकुंसोबत."

"मी का बोलू? मोठ्या तोऱ्यात तूच बोलला होतास ना मी येतो म्हणून मग आता तू तुझं बघ काय करायचं ते."

"मला कळतंय गं...तुझी इच्छा नाहीये मी जावं म्हणून पण प्लीज समजून घे ना."

"तू समजून घे ना यार. पुन्हा हे दिवस येणार आहेत का आपल्या आयुष्यात? झालं अजून दोन तीन दिवसांनी जाशील मला सोडून. पुन्हा येशील मग डायरेक्ट लग्नाला. मग हीच ती वेळ आहे ना रे. चल ना पण. तेवढंच अजून काही वेळ तुझ्या सहवासात राहता येईल मला." केविलवाण्या सुरात ओवी संभवची समजूत घालत होती.

तेवढ्यात संभवचा फोन वाजला.

"नक्कीच आईचा फोन असणार ओवी. तू पण ना असं बोलतेस मग माझा पाय निघत नाही." खिशातून मोबाईल काढत संभव बोलला.

"आई नाही वहिनी आहे गं..थांब काय म्हणते पाहू दे आधी."

"तुझं बोलून झाल्यावर माझ्याकडे दे फोन. मला बोलायचं आहे दीसोबत."

"हो गं... थांब. हा बोल वहिनी."

"काय हे भाऊजी. कुठे आहात? अहो वाजले पहा किती. आज काही घरी यायचा विचार वगैरे आहे की नाही?"

"तुझी बहिण येवूच देत नाहीये, मी तरी काय करू? तूच सांग  आता."

"ओह... रिअली?"

"मग काय. बरं ऐक ना वहिनी...अगं आई चिडली नाही ना माझ्यावर?"

"पण आई का चिडतील? उलट आज खूप कौतुक सोहळा सुरु होता तुमचा."

"काय सांगतेस?"

"हो मग. घरी आल्यावर समजलेच तुम्हाला."

"बरं वहिनी ऐक ना...ह्या तुझ्या बहिणीला सांग जरा काहीतरी, ती ऐकतच नाहीये अगं. आता जेवूनच जा म्हणतेय."

"अगं दी... ह्यानेच आईला फोनवर सांगितलं की मी येतो म्हणून आणि आता इथे बिल्डिंगच्या खाली पोहोचलो तर म्हणतो मी जातो आता, उशीर झालाय म्हणून. किती खडूस आहे गं हा तुझा दिर." संभवच्या हातातील फोन ओढून घेत ओवी कार्तिकीसोबत बोलली.

"दे त्यांच्याकडे फोन, मी सांगते त्यांना."

"घे बोल तुझ्या वहिनीसोबत." संभवकडे मोबाईल देत ओवी बोलली.

"भाऊजी..अहो तिथेच आहात तर जा ना मग. आधी तुम्हीच सांगितलं रात्री जेवायला येतो म्हणून मग आता का पलटी खाताय? त्यात आता लाडक्या जावयासाठी स्वयंपाक पण रेडी असेल."

"अगं वहिनी, पण आई काय म्हणेल? संध्याकाळ पर्यंत घरी येतो असं सांगून मी निघालो सकाळी आणि आता वेळेत नाही आलो तर तिला उगीच वाईट वाटणार."

"भाऊजी...तुम्ही नका ना काळजी करू त्याची. मी समजावते ना आईंना."

"बघ हा वहिनी."

"हो...य आणि आणखी एक गोष्ट सजेस्ट करू?"

"आता काय...?"

"जमेल तर आज येऊच नका घरी. तिकडेच थांबा आणि सकाळी या मग. ह्याच गोड आठवणी साठवायच्या असतात हो." हळू आवाजात कार्तिकीने तिच्या लाडक्या दिराला सल्ला दिला.

"वहिनी... अगं हे असं काहीही काय सुचवतेस तू मला!"

"खरं तेच बोलतेय मी. खरंच थांबा. मी आईंना काय सांगायचं ते बरोबर सांगते. तुम्ही त्याची काळजी नका करू. तसंही आता साडे सहा वाजलेत. जेवण होता करता आठ नऊ तर नक्कीच होतात मग इतक्या उशिरा एकटे आणि ते पण बाईक वरून घरी कसं येणार ना?" कार्तिकी ठामपणे बोलली.

"अगं म्हणूनच मी लवकर निघायचं म्हणतोय तर तू नको तेच सल्ले देत आहेस मला. ठेव आता फोन. येतोय मी घरी काही ऐकणार नाही मी तुझं."

पुढे विषय न वाढवता संभवने फोन कटच केला.

तेवढ्यात सीमा ताईच खाली आल्या.

"ओवी अगं काय हे! केव्हाची वाट बघतेय मी तुमची आणि इथे का थांबलात तुम्ही? चला की वर. मगाशीच तुमची गाडी पाहिली मी येताना, पण बराच वेळ झाला तुम्ही वर येईनात म्हणून मग मीच खाली आले."

"आता तूच समजाव तुझ्या लाडक्या जावयाला. वर नाही येणार तो, जायचं म्हणतोय."

"हे असं अजिबात नाही चालणार आ जावईबापू. दिलेला शब्द असा कोणी फिरवतं का?"

"काकू तसं नाही ओ..पण तुम्ही तरी मला समजून घ्या ना. एकतर लग्नाआधी सारखं असं सासूरवाडीला येणं बरं नाही ना दिसत. आईलाही ते आवडणार नाही."

"ते तुमचं तुम्हीच ठरवताय. असं कोणी काही बोलत नाही आणि नंदा ताईंशी मी बोलते, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही चला बरं." सीमा ताई बोलल्या.

क्रमशः

काय करेल आता संभव? सीमा ताईंच्या शब्दाला देईल का तो मान?  त्यात कार्तिकीने सूचवलेला ऑप्शन त्यांचं काय होणार.? सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळतील पण पुढील भागात.

©®कविता वायकर.


🎭 Series Post

View all