अधीर मन झाले..(भाग ५५)

अधीर मन झाले.. एक प्रेमकथा
अखेर सीमा ताईंच्या आणि ओवीच्या शब्दाला मान देत संभव त्यांच्या सोबत घरी गेला. एकमेकांसोबत घालवलेल्या, दिवसातील प्रत्येक क्षणाची मनातल्या मनात दोघेही आवृत्ती करत होते. नकळतपणे मग दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलत होते.

सोबतीतला प्रत्येक क्षण, मग त्या एकांतातील गप्पा असोत,  प्रेमाचे संवाद असोत किंवा मग स्पर्शातून फुलणारे प्रेम असो... सारं काही दोघांनीही मनाच्या कप्प्यात अलगद साठवून ठेवलं होतं. आता पुढचे काही महिने तरी ह्याच आठवणींची सोबत मोलाची ठरणार होती. दोन दिवसांनी संभवची सुट्टी संपणार होती. पुन्हा एकदा तोच विरह दोघांनाही सहन करावा लागणार होता. त्यामुळे आताचा हा सहवास कधी संपूच नये असे दोघांनाही वाटणे स्वाभाविक होते.

त्यातच दोन्ही सासवांनी मिळून आज होणाऱ्या जावयासाठी जेवणाचा खास बेत केला होता. त्यात जावयाची कामगिरी पाहून सीमा ताईंना तर संभवबद्दल खूपच अभिमान वाटत होता. 

"व्वा काकू...काय घमघमाट सुटलाय हो खिरीचा." आत येताच संभव बोलला.

"अरे व्वा..एकदम बरोबर ओळखलंत की तुम्ही. मला कार्तिकीने सांगितलं तुम्हाला खीर खूप आवडते म्हणून." सीमा ताई बोलल्या.

"हो... खीर म्हणजे माझा अगदी जीव की प्राण."

"बरं तुम्ही आधी फ्रेश होवून या, मी पटकन गरमागरम भजी काढते तोपर्यंत.
ओवी....अगं तुझ्या कपाटातून टॉवेल दे त्यांना."

"आई माझ्या रूममधे जाऊ?" हळू आवाजात ओवीने प्रश्न केला.

"काय विचारतेस हे ओवी? तुझ्या नाही मग कोणाच्या रूममधे पाठवतेस? आता तुझा होणारा नवरा आहे ना तो." सीमा ताईदेखील हळू आवाजातच उत्तरल्या.

"तसं नाही गं, पण आधी विचारलेलं बरं." डोळा मिचकावत ओवी म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. तिलाही जणू हेच हवे होते.

"बरं जा आता पटकन् उगीच टाईमपास करू नकोस. त्यांना जायला पुन्हा उशीर होईल मग."

'केलीच त्याला पाठवायची भाषा.' मनातच ओवी बोलली. कारण संभवने आज जावे अशी ओवीची तर अजिबात इच्छा नव्हती. त्यात कार्तिकने सल्ला दिल्यापासून संभवला ठेवून घेण्याचे तिने जरा जास्तच मनावर घेतले होते.

"चल फ्रेश होऊन घे." ओवी म्हणाली आणि संभवला घेऊन ती तिच्या खोलीत गेली.

"हे घे हा टॉवेल आणि तिकडे बाथरुम आहे बघ. जा फ्रेश होऊन ये. काही लागलं तर आवाज दे मी इकडेच आहे."

"ओके बॉस." ओवीच्या हातातून टॉवेल घेत संभव बोलला.

"ओवी अगं आजचा दिवस खरा आहे की एक स्वप्न तेच कळेना झालंय."

"हो रे सेम...मलाही अगदी असंच फील होतंय बघ."

"पण ओवी काहीही म्हण तुझी रूम एकदम नीटनेटकी ठेवली आहेस बरं का तू. सगळं सामान कसं अगदी जिथल्या तिथं." रूममधे इकडे तिकडे नजर फिरवत संभव बोलला.

"थँक्यू बरं का. मला आवडतं असं सगळं नीटनेटकं ठेवायला. खूप पसारा झाला की माझी चिडचिड होते."

"म्हणजे आता पुढे जाऊन माझं काही खरं दिसत नाही."

"म्हणजे तू पसारा करतोस की काय?"

"अगदीच नाही गं. मलाही सगळं नीटनेटकं हवं असतं, पण तुझ्या इतकं परफेक्ट काम नाही जमत मला. म्हणजे तितका वेळही नसतो ना."

"डोन्ट वरी मी शिकवेल हा तुला...पण आता जा लवकर फ्रेश होऊन ये. नाहीतर पुन्हा आई यायची आपल्याला बोलवायला." ओवी बोलली.

'बापरे! म्हणजे लग्न झालं तरी सगळी कामं करावीच लागणार असं दिसतंय.' तोंडातल्या तोंडात संभव पुटपुटला.

"काय रे काही म्हणालास का?"

"कुठे काय? काहीच तर नाही." असे बोलून ओवीच्या हातातील टॉवेल घेऊन संभव बाथरूममध्ये गेला.

थोड्याच वेळात फ्रेश होऊन तो बाहेर आला.

"ओवी हा टॉवेल कुठे ठेवू?"

"आण इकडे." म्हणत ओवी संभवच्या हातातून टॉवेल घेण्यासाठी दोन पाऊल पुढे झाली.

संभवचा फ्रेश आणि टवटवीत चेहरा पाहून क्षणभर ती त्याच्या पाणीदार डोळ्यांत हरवली.

"काय गं..काय झालं?"

"कुठे काय..? काहीच तर नाही. आण तो टॉवेल."

संभवच्या हातातील टॉवेल घेऊन गालातल्या गालात हसत ओवी पाठमोरी फिरली तेवढ्यात न राहवून संभवने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला अलगद मागे खेचले.

नकळतपणे ओवी आणि संभव आता एकमेकांच्या अगदी समोरासमोर आले. दोन पाऊल मागे जात आणि दोन्ही हात पसरवत संभवने तीला मिठीत येण्यासाठी नजरेतून इशारा केला. तोही खूप आसुसला होता प्रेमाच्या त्या पहिल्या मिठीसाठी. क्षणाचाही विलंब न लावता लाजतच ओवी मग त्याला जाऊन घट्ट बिलगली. दोन जीव क्षणभर का होईना पण एकमेकांच्या मिठीत अलगद विरघळले. जगाचे सारे सुख जणू त्या एका मिठीत सामावले होते, असेच काहीसे फिलिंग दोघांनाही येत होते. दोघांच्याही हृदयाची धडधड प्रचंड वाढली होती. ही वेळ इथेच थांबावी असेच दोघांनाही वाटत होते.

"आय लव यू ओवी."

"लव यू टू संभव." बोलताना नकळतपणे ओवीचे डोळे पाणावले.

"तू गेल्यावर मला अजिबात करमणार नाही यार." संभव भोवतीची मिठी अधिकच घट्ट करत ओवी बोलली.

"असं नको ना बोलू. माझा पाय निघणार नाही गं मग?"

"नको ना जाऊ मग."

"हो ना मॅडम... खूप लाडात आलीस आता. हे सगळे लाड ना आता लग्न झाल्यावर. तोपर्यंत आपली पहिली भेट ते आजपर्यंत साठवलेल्या आठवणी आहेतच सोबतीला." ओवीचे गाल ओढत गमतीच्या सुरात संभव बोलला.

"जाऊ दे...खूपच खडूस आहेस यार तू." लटक्या रागात ओवी म्हणाली.

"हो गं..माहितीये मला. रोज आठवण करून द्यायची काही गरज आहे का?"

"आहे गरज."

"बरं चल काकू येतील पुन्हा बोलवायला. आपल्याला बाहेर जायला हवं." भावनांना आवर घालत आणि परिस्थितीचे भान राखत संभव बोलला.

इच्छा नसतानाही दोघेही मग एकमेकांच्या मिठीतून बाजूला झाले.

"बरं जा तू फ्रेश होऊन ये, मी आहे बाहेर."

"खडूस...."

"प्लीज समजून घे ना. बरं नाही दिसत गं ते." संभव म्हणाला.

ओवी मात्र डोळ्यातील पाणी टिपत तशीच उभी होती. हा एकांत तिला हवाहवासा वाटत होता. संभवच्या ती उबदार मिठी देखील तिला हवीहवीशी वाटत होती. अर्थातच संभवची काही वेगळी अवस्था नव्हती, पण कसाबसा तो स्वतःवर कंट्रोल ठेवत होता.

न राहवून पुन्हा तिच्या जवळ जात संभवने अलगद तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि "फ्रेश होऊन ये लवकर," म्हणत तो तसाच बाहेर निघून गेला.

सीमा ताईंनी तोपर्यंत जेवणाची सर्व तयारी करून ठेवली होती. तेवढ्यात शशिकांतराव आणि रमाकांतरव देखील आज लवकर घरी आले. होणारा जावई आज जेवणासाठी येणार म्हणून सीमा ताईंनीच त्यांना बोलावून घेतले होते.

थोड्याच वेळात ओवी आवरुन बाहेर आली.

"ओवी...आज कुठे जेवायला द्यायचं ह्यांना? म्हणजे जमिनीवर बसवायचं की डायनिंग टेबलवर?" सीमा ताईंनी मुद्दाम विचारले.

"आई.. अगं आज नको खाली. वरच बसू दे त्यांना. आता या घरचा जावई होणार आहे ना तो."

"अरे व्वा....पण याचा अर्थ जावयाच्या आरोग्याची काळजी नाही ओवी तुला?" माधवी ताईंनी खोचकपणे प्रश्न केला.

"असं काही नाहीये काकी. मी तसं काही म्हणाले का?"

"अगं तूच तर मागे एकदा त्यांना लेक्चर दिलं होतंस की जमिनीवर बसून जेवणाचे किती फायदे असतात ते. त्याने आरोग्य कसं निरोगी राहतं." हसतच माधवी काकी बोलली.

"तेव्हा गोष्ट वेगळी होती. आता वेगळी आहे काकी. समजून घे ना."

"बरं आता तुम्ही दोघी नंतर वाद घालत बसता का. बाहेर भुका लागल्यात सगळ्यांना. ओवी चल बरं हे सगळं बाहेर न्यायला मदत कर मला." सीमा ताई बोलल्या.

ओवी आणि सीमा ताईंनी मग पटापट सगळं आवरून जेवणाची ताटं तयार केली.

"चला तयार आहे सगळं... बसा जेवायला." सीमा ताई म्हणाल्या.

"ओवी इथे बसलं तर चालेल ना तुला? की खाली बसायचं आहे मी." संभवने मुद्दामहून ओवीला टोमणा मारला. त्याला तो जुना दिवस आठवला जेव्हा ओवीने त्याला जमिनीवर बसून जेवायचे धडे जे दिले होते.

"गप रे... असं काही नाहिये. इथे वरच बस."

"बघ सीमा...अजून पूर्णपणे ही देशमाने झाली नाही तेच कशी पार्टी बदलली बघ हिने. मोहित्यांचे सगळे नियम विसरली पोरगी." माधवी काकी बोलली.

"आता तू मला टोमणे मारण्याची एक संधी सोडू नकोस हा काकी."

"मग नाहीच सोडणार आणि तसंही कार्तिकीने तिची कामगिरी माझ्यावर सोपवलिये ना." 

"बरं चला तुम्ही बसा जेवायला ह्यांचं काय रोजचंच आहे हे." आजी म्हणाल्या.

"अरे तुम्ही पण बसा की आमच्यासोबत. सगळे सोबतच जेवूयात की." संभव म्हणाला.

"अहो नाही...तुम्ही जेवा आम्ही बसतो नंतर." सीमा ताई बोलल्या.

"ओवी.. अगं तू तरी बस ना. तुला खूप भूक लागली होती ना?"

"आज कशी भूक लागेल तिला? एरव्ही भुकेची कण्हत निघत नाही. घरात आल्या बरोबर सटर फटर खाणं सुरू होतं. आज बघ सीमा, हिला भुकेची आठवण तरी होते का!" माधवी ताई आज थांबायचं काही नावच घेइनात.

काकीची आणि ओवीची नोकझोक पाहून संभवला खूपच हसू येत होते.

"आता बसतेच मी जेवायला मला खूप भूक लागलीये म्हणत ओवी संभवच्या बाजूलाच बसली.

"एकाच ताटात जेवलात तरी आमची काही हरकत नाही बरं ओवी." पुन्हा माधवी काकी बोलली.

ओवीला आता हसावं की रडावं तेच समजेना झालं.

पण हे सगळं ती मनापासून एन्जॉय करत होती. हसत खेळत सर्वांची जेवणं आटोपली. थोड्याच वेळात संभव जायला निघाला.

"बरं आता खूप उशीर झालाय मला निघायला हवं."

"अहो आता खूप उशीर झालाय. एकटे आता बाईक वरून नका जाऊ. मी येतो तुम्हाला सोडायला. उद्या कोणाला तरी पाठवेल मी बाईक घेऊन." शशिकांतराव म्हणाले.

"नाही काका. मला सवय आहे, काहीच प्रॉब्लेम नाही."

"ओवी पटकन् वर जा आणि दादाच्या कपाटातून त्याचं जर्किंग घेऊन ये. थंडी आहे बाहेर खूप." माधवी काकी बोलली.

'पण जायलाच हवंय का त्याने आता?' हळू आवाजात ओवी बोलली.

"अगं जा...एकटी काय बडबडतियेस?"

संभवकडे एक रागीट कटाक्ष टाकत ओवी वर गेली. रुममध्ये गेल्यावर तिने कार्तिकीला कॉल केला.

"काय हे दि...तू म्हणाली होतीस ना संभवला राहू दे इकडे. मग का कॉल केला नाहीस तू आईला? आता तो जायला निघाला यार. खूप वाईट वाटतंय मला."

"ओवी...ऐक ना..अगं आई नको म्हणाल्या. मलाही त्यांच्या काही गोष्टी पटल्या. प्लीज तूही समजून घे ना आणि आता काय हत्ती गेला नि शेपूट बाकी. आता तूच येणार आहेस इकडे. मग कशाला टेन्शन घेतेस?"

"जाऊ दे दी...तुला नाही समजणार माझ्या भावना."

"मला नाही मग कोणाला समजणार गं शहाणे."

"आता दोन दिवसांनी जाणार आहे तो. पुन्हा कधी मला भेटेल काही माहीत नाही. तुझं आणि वकील साहेबांचं ठीक होतं, लग्नाआधी हवं तेव्हा भेटता येत होतं. पण आमचं तसं नाही ना गं. इतक्या वर्षातून आज पहिल्यांदा एकत्र क्वालिटी टाईम स्पेंड केला. खूप त्रास होतोय तो आता जात आहे तर." डोळ्यांतील अश्रू अलगद टिपत ओवी बोलली.

"ओवी, अगं सापडलं की नाही जर्किंग? आण लवकर. त्यांना उशीर होतोय." तेवढ्यात माधवी काकीने आवाज दिला.

"दी..बोलते मी नंतर...काकी बोलवत आहे मला." म्हणत ओवीने फोन कट केला.

"हे घे जर्किंग आणि ही कानटोपी पण राहू दे सोबत." ओवी म्हणाली.

"अगं कानटोपी नको, हेल्मेट आहे ना."

"ती म्हणते तर राहू द्या हो. लेकराचं मन नका मोडू. तुम्ही निघालात तर वर जाऊन रडलंय वाटतं आमचं लेकरू." गमतीच्या सुरात माधवी काकी बोलली.

"काकी गप ना यार."

"चल ओवी येतो मी आणि काकू स्वयंपाक खूपच छान झाला होता. लवकरच पुन्हा जेवायला येणार आहे मी."

"कधीही या. हे आता तुमचंच घर आहे."सीमा ताई बोलल्या.

"बरं सावकाश जा आणि घरी पोहोचल्यावर आठवणीने फोन करा." आजी म्हणाल्या.

"हो हो नक्की. ओवीकडे एक कटाक्ष टाकत नजरेतूनच तिला संभवने 'येतो मी तू तुझी काळजी घे,' असा इशारा केला.

'खडूस...तूही तसाच...जा किती घाई झालिये दिसतंय ते." नजरेतूनच ओवी बोलली.

सर्वांचा निरोप घेऊन संभव बाहेर पडला. शशिकांतराव खाली पार्किंगपर्यंत त्याला सोडायला गेले.

आजचा दिवस संभव आणि ओवी दोघेही आयुष्यात कधीच विसरणार नव्हते.

पुढे दोनच दिवसांत खूप साऱ्या आठवणी मनात साठवत संभव सुट्टी संपवून त्याच्या कामावर हजर झाला.

संभव गेल्यानंतर ओवी खूपच अस्वस्थ फील करत होती. तिकडे सार्थक देखील ओवीच्या आठवणीत तळमळत होता. ओवी सोबत बोलण्याची मनातून त्याला खूपच इच्छा होत होती. पण तिला कॉल करण्याची मात्र त्याच्यात आता हिम्मत नव्हती. आधी ओवीशी बोलताना त्याला कधीच इतका विचार करावा लागत नव्हता, पण आता परिस्थिती पूर्णतः बदलली होती.

संभवच्या आठवणीत झुरत असतानाच ओवीला अचानक सार्थकची आठवण आली.

'संभव काही काळासाठी माझ्या पासून दूर गेलाय तरी मला इतका त्रास होत आहे. मग सार्थकची काय अवस्था असेल याची खरंच कल्पना करवत नाहीये. आपल्या मनात जेव्हा एखादी व्यक्ती घर करते, तेव्हा त्या व्यक्तीच्या आठवणीत आपण वेडेपिसे होतो. त्या व्यक्तीशिवाय जगणे नको वाटते. मग सार्थक कसं मॅनेज करत असेल?' विचाराने ओवीचे डोळे पाणावले.

तिकडे सार्थकच्या मनात विचारांचे वादळ उठले होते.

'ओवी सगळंच बदललं गं आता. वरवर कितीही आनंदी दिसत असलो तरी आतून पूर्णतः तुटलोय गं मी. तुझ्याशिवाय माझे आयुष्य मी विचारच करू शकत नाहीये. खूप प्रयत्न केला तुला मनातून दूर करण्याचा, पण मला ते जमतच नाहीये गं. तू तुझ्या आयुष्यात आनंदी आहेस यातच मी आनंद मानायला हवाय. सगळं कळतंय मला. मी प्रयत्न देखील करतोय, पण का कोण जाणे तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे असं आतून फील होतंय. असं असलं तरीही जे मला तुझ्याबद्दल वाटतंय ते तुला इतर कोणाबद्दल तरी वाटतंय त्यामुळे तो हक्क, आपलेपणा आता जाणवत नाही. त्यामुळे इच्छा असूनही तुला कॉल करण्याची, तुझ्याशी बोलण्याची हिंमतच होत नाहीये. तुला अजिबात त्रास द्यायचा नाहीये मला. माझ्या दृष्टीने हेच खरे तुझ्याप्रति माझे प्रेम असेल.' सार्थक स्वतःशीच बोलत होता. डोळ्यांत मात्र अश्रूंनी गर्दी केली होती.

न राहवून ओवीनेच त्याला कॉल केला.

'ओवी... का करतेस असं? आता नको कॉल करत जाऊ मला. नको अशी काळजी करू माझी. आतून खूप घुसमट होत आहे यार माझी.' भरल्या डोळ्यांनी मोबाईलच्या स्क्रिन वरील ओवीच्या नावाला न्याहाळत सार्थक स्वतःशीच बोलला.

क्रमशः

कसा सुटेल हा गुंता? भावनांची झालेली ही गुंतागुंत कधी सुटणार? जाणून घेण्यासाठी वाचत राहा 'अधीर मन झाले.. एक प्रेमकथा.'

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all