अधीर मन झाले..(भाग ५६)

अधीर मन झाले.. एक प्रेमकथा
'सार्थक फोन उचल.' ओवी तोंडातच पुटपुटली.

'कसा आहे हा मुलगा? आजकाल मलाच कळत नाहीये मी कसं वागू? त्याची मला काळजी वाटते यात काय गैर आहे?'

दोनदा कॉल करूनही सार्थकने ह्यावेळी देखील ओवीचा कॉल घेतला नाही.

पुढचे दोन तीन दिवस हे असेच सुरू होते. ओवीला सार्थक बद्दल काहीच समजेना. मोबाइलची रिंग जात होती पण समोरून काहीच रिप्लाय येत नव्हता. न राहवून ओवीने सुलभा आत्याला कॉल केला.

"हॅलो आत्या.."

"ओवी... आज कशी काय गं आत्याची आठवण काढलीस?"

"का? मी फोन नाही करू शकत का तुला?"

"तसं नाही गं..पण खूप दिवसांनी कॉल केलास ना म्हणून म्हटलं. बाकी काय म्हणतेस? तू कशी आहेस?"

"मी ठीक गं. तू सांग."

"मी पण मजेत गं."

"बरं आत्या...सार्थकचा कॉल वगैरे येतो की नाही गं?"

"हो गं..दिवसातून एकदा असतोच त्याचा फोन. हे काय आता थोड्या वेळापूर्वीच येवून गेला."

'अच्छा...याचा अर्थ हा मुद्दाम माझे कॉल घेत नाहीये.' ओवी मनातच बोलली.

"तुझं आणि त्याचं बोलणं नाही झालं का?" सुलभा आत्याने विचारले.

"नाही ना... तो माझा फोनच घेत नाही गं."

"त्याच्या मनात काही नसेल गं ओवी. पण त्याचा खूप जीव होता तुझ्यावर आणि अजूनही आहे. पण त्याचा आता काय उपयोग? आता तुझं दुसऱ्याच व्यक्तीसोबत लग्न होणार म्हटल्यावर त्याला त्रास तर होणारच ना गं. त्यालाही त्याचा वेळ घेऊ दे. हळूहळू त्याच्याही मनाची तयारी होईलच."

"सगळं मान्य आहे गं आत्या, पण आता कोणाशी कसं वागावं ना हेच कळेना झालंय मला."

"तू आता बाकी विचार नको करुस ओवी. तुझे आयुष्य तू आनंदाने जग. सार्थकची नको काळजी करत बसू. त्याला वाटेल तेव्हा तो करेल तुला फोन. पण त्याला जर सध्या तुझ्याशी बोलायचं नसेल तर त्याला त्याचा वेळ घेऊ दे. तूही समजून घे थोडं त्याला. त्याच्या मनाची अवस्था तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कोण ओळखू शकेल नाही का."

सुलभा आत्याचे बोलणे मात्र नकळतपणे ओवीच्या मनाला लागले.

"सो सॉरी आत्या. माझ्या मनी ध्यानीही नव्हतं कधी की, मी प्रेम करून आयुष्यात इतका मोठा गुन्हा केलाय; पण हे आता समजलंय मला. मी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवेल, नाही करणार मी सार्थकला कॉल. पण तू त्याची खुशाली मला कळवत जा. तसेही माझ्या मनात खूप गिल्ट आहे आणि ते आयुष्यभर राहील, पण त्याला आता इलाज नाही. जाऊ दे... तू नको टेन्शन घेऊस. काळजी घे स्वतःची." म्हणत ओवीने फोन कट केला.

'थोडक्यात काय... तर जे काही झालंय त्याला फक्त आणि फक्त मीच जबाबदार आहे. अरे पण ह्यांना का समजत नाहीयेत काही गोष्टी.? माझ्या मनी ध्यानी स्वप्नी फक्त आणि फक्त संभव आहे. असं असताना मी सार्थक सोबत लग्न करून महान बनायला हवं होतं का सगळ्यांच्या नजरेत? आणि मग माझ्या भावनांचे काय? चुकून मी तसे केलेच असते तर एक बायको म्हणून मी सार्थकला आनंदी ठेऊ शकले असते?' ओवी स्वत:शीच बडबडत होती. अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तिची धडपड सुरू होती.

त्याच दिवशी ओवीने तिच्या मनाशी निर्धार पक्का केला, जोपर्यंत सार्थकला स्वतःहून माझ्याशी बोलायची इच्छा होत नाही तोपर्यंत मीही त्याला उगीचच त्रास देणार नाही. मनातून तर तिला खूपच वाईट वाटत होते कारण सार्थक सारखा मित्र तिला कधीही गमवायचा नव्हता.

बघता बघता ओवीचे फायनल एक्सामचे वेळापत्रक आले. आता विनाकारण टाइमपास करून चालणार नव्हते. त्यामुळे इतर सर्व गोष्टींचा विचार सोडून तिने तिच्या स्टडीवर फोकस करण्याचे ठरवले. अभ्यासाचे वेळापत्रक तिने सेट केले. संभव देखील तिला समजून घेत होता. तिला अभ्यासासाठी सपोर्ट करत होता. तिच्या अभ्यासात व्यत्यय येणार नाही याचीदेखील तो आवर्जून काळजी घेत होता. ओवीशी बोलण्याचा कितीही मोह झाला तो स्वतःवर ताबा ठेवत होता. रोज फक्त एकमेकांची विचारपूस करण्यासाठी ते एकमेकांना कॉल करत होते. भावनांना आवर घालण्याचे कितीही अवघड असले तरी त्यांना ते करावेच लागणार होते.

बघता बघता ओवीची फायनल एक्झाम पार पडली. खूप रिलॅक्स फील करत होती ती. डोक्यावरचे खूप मोठ्ठे ओझे तिला हलके झाल्यासारखे वाटले. आता ठरल्याप्रमाणे ओवी आणि संभवचे लग्न होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन्ही घरच्यांनी विचार विनिमय करून लग्नाची तारीख फायनल केली. त्यात कार्तिकीची डिलिव्हरी पण जवळ होती, त्यामुळे तोही विचार करावा लागणार होता. कार्तिकीला तर इतक्यात संभव आणि ओवीचे लग्न नकोच होते, पण आपल्यामुळे त्या दोघांना अजून जास्त दिवस असं दूर ठेवायला नको हा विचार करून तिनेही मग परवानगी दिली. कार्तिकीला आता सातवा महिना सुरू होता. लग्नाची तारीख पुढच्या एक ते दीड महिन्यानंतरची होती. म्हणजेच नव्या पाहुण्याच्या आधीच ओवीचे देशमान्यांच्या घरात आगमन होणार होते.

"ओवी यार, फायनली आपलं लग्न होतंय." संभव म्हणाला.

"हो ना माझा तर विश्वासच बसत नाहीये संभव."

"यार...माझाही विश्वास बसेना झालाय."

"संभव पण जास्त सुट्टी घे आ तू. उगीच आठ दहा दिवस असं करु नकोस. मला तो प्रत्येक क्षण मेमोरेबल बनवायचा आहे आणि त्यावेळी तू माझ्यासोबत हवाय मला."

"मी तर एक महिन्याची सुट्टी घेण्याचा विचार करतोय गं. पाहू आता काय होतंय."

"दॅट्स ग्रेट यार. लवकर ये तू."

"लवकर येऊन काय करू? थोडं उशिरा आलं की पुढे जास्त वेळ मिळेल. लग्नाच्या दोन दिवस आधी आलं तर नाही चालणार?"

"तू पण ना....बरं चल ठीक आहे. तुझा विचार पण योग्य आहे. अरे पण कपड्यांच्या खरेदीचे कसे करणार मग?"

"दादू आहे ना. त्याची आणि माझी साइज सेमच आहे. त्याची चॉईस पण परफेक्ट आहे. त्यामुळे नो टेन्शन."

"ओके मग ठीक आहे, पण तरी तू असतास सोबत तर आणखी छान वाटलं असतं."

"हो गं... सगळं मान्य आहे पण काय करू तूच सांग. येवू का लवकर?"

"नको नको...नंतरच ये कारण दीची डिलिव्हरीची डेट पण आपल्या लग्नानंतर लगेचच आहे. त्यामुळे तेव्हा मग आपल्याला सगळ्यांसोबत थांबता येईल. दीला पण माझी गरज असेल रे तेव्हा."

"अरे हो...ते तर विसरलोच होतो मी. मला तर वाटलं आपलं लग्न अजून सहा महिने वेटींगवर असेल की काय पण वहिनीने परवानगी दिली म्हणून ठीक आहे. ती म्हणालीच होती मला माझ्यामुळे तुमच्यात आता अजून विरह नको. ठीक आहे मला हवे तसे एन्जॉय करता येणार नाही पण त्यापेक्षा तुमचे एकत्र येणे जास्त महत्त्वाचे आहे."

"हो ना कालच बोलली ती मलाही."

"बरं चला कामाचं बघतो आता. आहे वेळ तर सुट्टीचे ॲप्लिकेशन तरी बनवून ठेवतो."

"बरं चल ठीक आहे मी पण आवरते." म्हणत दोघांनीही फोन ठेवला.

पुढे एक महिन्यानंतर लगेचच संभव आणि ओवीचे लग्न होते. दोन्ही घरी लग्नाची गडबड सुरू होती. एकंदरीतच दोन्ही घरी अगदी आनंदाचे वातावरण होते. पण अधूनमधून ओवीला सार्थकची खूप आठवण यायची. एक हक्काचा मित्र तिच्यासाठी आता दुरावला होता. दोघांच्या नात्यात आता बऱ्यापैकी अंतर निर्माण झाले होते. त्या दिवसानंतर अजूनही सार्थकने ओवीला कॉल केला नाही की ओवीने पण त्याला कॉल केला नाही. पण आज मात्र का कोण जाणे, 'झालं गेलं सगळं विसरून जा आणि माझ्या लग्नाला नक्की ये,' हे सांगण्यासाठी त्याला कॉल करावा असे ओवीच्या मनात आले.

न राहवून तिने मग सार्थकला कॉल केला. ओवीचा कॉल पाहून सार्थकच्या चेहऱ्यावर आपसूकच हास्य फुलले. कित्येक दिवसांपासून तो जणू तिच्या कॉलचीच वाट पाहत होता. सुरुवातीला उचलू की नको असा प्रश्न त्याला पडला पण न राहवून त्याने तिचा कॉल घेतलाच.

"हॅलो सार्थक.."

"हा बोल ना ओवी."

"कसायेस?"

"मी मजेत आणि तू?"

"मी पण मजेत?"

"बरं... माझ्या कडून तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पुढच्या महिन्यात लग्न आहे ना तुझे म्हणून आताच शुभेच्छा देतो."

"मी फोन केल्यानंतर? तू स्वतः कॉल करून त्या दिल्या असत्या तर खूप आनंद झाला असता मला."

"अगं मी करणारच होतो तुला कॉल, पण सध्या कामाचा लोड खूप वाढलाय त्यामुळे नाही जमलं."

"बरं...पण मग इतक्या दिवसांत एकदाही तुला माझी आठवण आली नाही?"

"तसं नाही गं, पण आठवण येण्यासाठी आधी विसरावं लागतं समोरच्याला!" अगदी प्रामाणिकपणे सार्थक बोलला.

सार्थकचे हे वाक्य ऐकून ओवी निःशब्द झाली. त्याच्या अंतर्मनातील वेदना जणू नकळतपणे त्याच्या ओठांवर आल्या.

'याचा अर्थ हा अजूनही जिथे होता तिथेच आहे, मुव्ह ऑन झालाच नाहीये.' ओवी मनातच विचार करू लागली.

"काय झालं? तू अचानक अशी गप्प का झालीस?" सार्थक म्हणाला.

"विचार करत होते की, असं आहे तर मग मागे तू माझ्यासोबत स्वतःहून बोलणं का बंद केलं होतंस? त्यावेळी मी तुला खूपदा कॉल केले पण तुला एकदाही माझा कॉल रिसिव्ह करावासा वाटला नाही. असं का सार्थक?"

"ओवी...मला एक सांग, सगळ्या गोष्टी आता एकदम क्लिअर आहेत, असं असताना आपण एकमेकांशी सलगी ठेवणं तुला योग्य वाटतं?"

"त्यात काय गैर आहे मग सार्थक? अरे आपण एकमेकांचे लहानपणापासूनचे मित्र आहोत ना! मग तितका अधिकार तर आहेच ना? आणि सलगी ठेवणं म्हणजे नेमकं काय रे? मला नाही त्यात काही गैर वाटत."

"हो...पण माझ्या मनात तुझ्याबद्दल ज्या भावना आहेत त्या प्रयत्न करूनही मी बदलू शकत नाहीये ओवी. खूप विचार केला आणि तुझ्यापासून दूर राहण्याचा निर्णय पक्का केला. अधूनमधून आईकडून तुझी खुशाली कळत होती. त्यातच खूप समाधान होते. माझं पहिलं प्रेम, तिच्या प्रेमासोबत खूप खुश आहे हे माहीत असताना मी स्वतःच्या स्वार्थासाठी दोन प्रेमवीरांना वेगळं करायचं पाप कसं करणार होतो तूच सांग ओवी?"

सार्थकचे बोलणे ऐकून ओवीचे डोळे पाणावले.

'कसा आहे हा मुलगा! खरंच मी खूप वाईट मुलगी आहे. इच्छा असूनही सार्थकला त्याचं प्रेम मी कधीही मिळवून देवू शकत नाही. या गोष्टीला सुद्धा मीच जबाबदार आहे.
देवा... किती हतबल केलंस रे मला तू. एकतर संभवला माझ्या आयुष्यात आणलंस, मला त्याच्यात गुंतायला भाग पाडलंस आणि नंतर सार्थकच्या मनात माझ्याविषयी प्रेम भावना निर्माण केल्यास. का केलं असं? एकीकडे मला संभवला सुखी झालेलं पाहायचं आहे, त्याच्यासोबत आयुष्य सुंदर बनवायचं आहे. पण त्यासाठी सार्थकच्या भावनांचा बळी देण्याचे पाप माझ्याच हातून घडवून आणायचे होते का रे तुला? का करतोय तू हे सगळं? नेमकं काय आहे तुझ्या मनात? मी माझ्या आयुष्यात सुखी होईल देखील पण सार्थकच्या भावनांचा बळी देवून ते सुख मिळवल्याची सल आयुष्यभर मनाला बोचत राहील.'

विचार करता करता ओवीला खूप भरुन आले.

"ओवी... अगं कुठे हरवलीस? मी एकटाच बडबडतोय वाटतं."

"अरे ऐकतिये..बोल ना."

"खोटं... तुझं लक्ष नव्हतं माझ्या बोलण्याकडे. माहितीये मला."

"अरे होतं माझं लक्ष."

"मग सांग मी काय बोलत होतो?"

"सार्थक...किती ओळखतोस रे तू मला. इतकं का प्रेम करतोस माझ्यावर? मी वाईट वागत आहे तुझ्याशी आणि तू फक्त माझ्या आनंदाचा विचार करत आहेस. नको ना इतका चांगला वागू माझ्याशी. खूप त्रास होतोय रे मला."

"सॉरी....यापुढे नाही त्रास होणार. आज तुझ्याशी बोलण्याचा मोह आवरु शकलो नाही म्हणून कॉल रिसिव्ह केला तुझा. पण यापुढे ही चूक कधीही नाही होणार ओवी. विश्वास ठेव माझ्यावर."

"वेडायेस का तू सार्थक. अरे तुला होणारा त्रास नाही बघवत मला म्हणून मी बोलले तसं. इतकी साधी गोष्ट कशी कळत नाही रे तुला?"

"बरं नाही त्रास करून घेत मी. तुला तुझ्या आयुष्यात सगळी सुख मिळू देत. अगदी माझ्या वाट्याची सुद्धा. तुझ्या भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आता यापुढे माझा जास्त विचार करू नकोस. अधूनमधून बोलुयात आपण, अगदी आधी बोलायचो ना तसं. एकदम हक्काने. हा... पण तुझं लग्न झाल्यावर नेहमी नेहमी नाही आ ते शक्य. माहितीये मला संभव खूप समजूतदार मुलगा आहे. तू माझ्याशी कितीही वेळ बोलली तरी तो काहीही बोलणार नाही पण तरी नको कोणतीच रिस्क. ओके."

"म्हणजे तुला माहितीये माझं आणि संभवचं लग्न ठरलंय ते."

"ते तर सुरुवातीपासूनच माहिती आहे. कार्तिकी दीच्या लग्नातच हे सगळं सुरू झालं. तुझं आणि संभवचं वाढत असलेलं मैत्रीचं नातं खूप खटकायचं मला. खूप त्रास व्हायचा, पण तेव्हा मला कळत नव्हतं मला नेमकं काय होतंय आणि जेव्हा समजलं तेव्हा तू खूप दूर गेली होतीस माझ्यापासून. माझ्या आधी संभवने तुझ्या मनात हक्काची जागा मिळवली होती. पण खरं सांगू ओवी, असं असतानाही मी माझ्या भावना तुला सांगण्याचे धाडस केले पण त्यासाठी स्वतःला आधी तुझ्या लायक बनवलं. काय माहित नशिबाने दिलीच साथ तर प्रयत्न करून पाहुयात म्हटलं आणि व्यक्त झालो नसतो तर घुसमट झाली असती माझी. पण माझ्यापेक्षा संभवच्या प्रेमात प्रचंड ताकद आहे हे हळूहळू मला उमगले. मग नंतर मनाला समजावले. वेड्या मनाने देखील मग माघार घेतली. जास्त हट्ट नाही केला गं. त्यावेळी स्वतःचाच अभिमान वाटला. हे मात्र खरं."

"सार्थक... काय बोलू रे मी यावर? अगदी निःशब्द केलंस तू मला. पण मला एक वचन दे आज आपली मैत्री मात्र आहे तशीच कायम राहील."

"हो गं. पण आता सध्या तू तुझा आणि संभवचा विचार कर. खूप चांगला मुलगा आहे संभव. फक्त त्याच्यासाठी मी माझ्या प्रेमाचा त्याग केलाय हे विसरू नकोस. खूप शुभेच्छा तुम्हा दोघांनाही."

"तुला आम्हाला ज्या काही शुभेच्छा द्यायच्या असतील त्या आमच्या लग्नात येवून आम्हाला प्रत्यक्ष भेटून दे. बाकी काही नको मला."

"ओवी...अजून महिना आहे त्या गोष्टीसाठी तेव्हाचे तेव्हा बघुयात ना. माझी नाही गं हिम्मत होणार. प्लीज समजून घे ना."

"माझं मन मला सांगतंय की तू येणार. बघुयात आता तेव्हाच."

"बरं...बघू तेव्हा पण आता ठेवूयात का फोन? बराच वेळ झाला आणि मी कामं सोडून तुझ्याशी गप्पा मारत बसलोय. आता तरी करू दे काम."

"ओके..आवर मग, ठेवते मी." म्हणत ओवीने फोन बंद केला.

क्रमशः

सार्थक येईल का संभव आणि ओवीच्या लग्नासाठी? जाणून घेऊयात पुढील भागात.

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all