अधीर मन झाले..(भाग ५७)

अधीर मन झाले.. एक प्रेमकथा
बघता बघता एक महिना कसा संपला काही समजलेच नाही. दोन्ही घरी लग्नाची गडबड सुरू होती. संभव देखील एक महिन्याची सुट्टी घेवून घरी आला. लग्नाची सर्व तयारी झाली होती. दोन्ही घरे पाहुण्यांनी गजबजली होती. संभव आणि ओवीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या प्रवासाची सुरुवात होणार होती.

संभव घरी आला आणि खऱ्या अर्थाने आनंदाला उधाण आले. गजबजलेले घर पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. पुन्हा एकदा सर्वांना भेटून तो खूपच फ्रेश फील करत होता. खरंच ह्यावेळी तो स्वतःच्याच लग्नासाठी एवढी मोठी सुट्टी घेवून आला, यावर क्षणभर त्याचाच विश्वास बसेना झाला.

सारं काही त्याच्या अगदी मनासारखं होत होतं. पण त्यातच आता प्रश्न होता कार्तिकीचा. तिला नववा महिना सुरू होता आणि अशातच ही लग्नाची गडबड. एवढेच नाही तर तिने आता बहिणीचे लग्न म्हणून माहेरी जायचे की दिराच्या लग्नासाठी सासरीच थांबायचे? हा मोठा प्रश्न होता.

तिला मात्र दोन्हीही बाजूने सर्व एंजॉय करायचे होते. पण ते शक्य नव्हते, म्हणून ती मनातून खूप नाराज झाली होती. लग्नाची तारीख फिक्स झाल्यापासून या विषयावरून रोजच ती समरचे डोके खात होती. समर देखील काहीतरी उडवाउडवीची उत्तरे देवून तात्पुरती वेळ मारून नेत होता. तिला चिडवत होता.

पण दोन्ही घरच्यांनी मिळून यावर आधीच पर्याय शोधून ठेवला होता. फक्त कार्तिकीसाठी ते सरप्राईज असणार होते. दोन्ही घरच्यांनी विचार विनिमय करून लग्नाचा हॉल तीन दिवसांसाठी एक महिन्यापूर्वीच बुक करून ठेवला होता. त्यामुळे सर्वांना मिळून एकत्रितपणे ओवी आणि संभवचे लग्न तीन दिवस फुल्ल एन्जॉय करता येणार होते. लग्नात होणारा वास्तव खर्च टाळून जे काही करायचे ते करा, हे ओवीने आधीच सर्वांना बजावले होते. त्यातच फक्त कार्तिकीसाठी तिने तीन दिवसांच्या हॉल बुकिंगसाठी परवानगी दिली होती. अन्यथा अगदी साधा हॉल शोधून एक दिवसांत लग्न उरकण्याचा तिचा सल्ला सर्वांनाच मान्य करावा लागला असता.

"बरं कार्तिकी तुला जायचंय ना माहेरी? तू आवर मी सोडतो तुला." समर म्हणाला.

"मला हाकलून द्यायची इतकी घाई झालिये का रे तुला?" नाराजीच्या सुरात कार्तिकी उत्तरली.

"अगं पण तिकडे सगळेच तुझी वाट पाहत असतील. त्यात ओवीला पण तुझी गरज आहे."

"जायलाच पाहिजे का मी?" केविलवाण्या सुरात कार्तिकी म्हणाली.

"बघ बाबा...ते मी कसं सांगू आता? तुझ्या बहिणीचं लग्न आहे मग तुला तिकडे जायलाच हवं ना!" आरशासमोर उभा राहून केसांचा भांग पाडत समर बोलला.

"हो, पण इकडे माझ्या दिराचे पण लग्न आहे. मला तेदेखील एन्जॉय करायचे आहे. ते कसं कळत नाहीये तुला?"

"हो पण मग आता मी तरी काय करू सांग?"

"मला इथेही थांबायचं आहे आणि तिकडेही जायचं आहे. तू कर ना यार काहीतरी."

"आता मी काय करू? अगं लग्न फक्त चार दिवसांवर येऊन ठेपलंय, असं असताना इतक्या कमी वेळात काय करणार आहे मी?"

"अरे पण सगळं ठरत होतं तेव्हा तुला ही गोष्ट समजू नये समर. जितकं माझं तिकडं जाणं महत्त्वाचं आहे तितकंच इथे थांबणं देखील. हे तुला तरी समजायला हवं ना यार." नाराजीच्या सुरात कार्तिकी बोलली.

"तू जाना मग तिकडे. तसंही आपण लग्नाच्या दिवशी सगळे सोबतच असणार आहोत आणि लग्न झाल्यावर पुन्हा इकडेच येणार आहोत. मग कशाला टेन्शन घेतेस तू?" समर कार्तिकीची जरा जास्तच खेचत होता. तिला मात्र सगळे खरे वाटत होते.

"माझी अवस्था पाहतोय ना तू. इकडे तिकडे करतानाच होवू दे  माझी डिलिव्हरी. इतकं सोपं वाटलं का तुला हे सगळं? म्हणजे लग्न राहू दे बाजूला आणि हॉल ऐवजी मला डायरेक्ट हॉस्पिटल मध्येच पाठवण्याची तयारी कर तू." चिडून कार्तिकी बोलली.

"अरे का भांडताय तुम्ही दोघं?" दोघांचा आवाज ऐकून नंदा ताई आत येत बोलल्या.

"आई तुम्ही सगळ्यांनी परस्पर सगळ्या गोष्टी ठरवल्या पण माझा विचार कोणीच केला नाही ना. या सगळ्यात इकडे तिकडे करण्यातच मला काही झालं म्हणजे?" खाली मान घालून रडवेल्या सुरात कार्तिकी बोलली.

"असं काही नाही होणार. तू काळजी करू नकोस. करू आपण काहीतरी. आम्ही आहोत ना. तू असं टेन्शन नको घेवू बरं." समजावणीच्या सुरात नंदा ताई बोलल्या.

'समर सांगून टाक ना तिला सगळं. नको ना तिचा अंत पाहू आता.' नजरेनेच खुणावत नंदा ताई समरला म्हणाल्या.

'आई थांब गं. रात्री सांगतो मी तिला.' डोळा मिचकावत समर बोलला.

'गप्प बस. तिने किती टेन्शन घेतलंय बघ जरा.'

"कार्तिकी...तुझ्या साठी एक सरप्राइज आहे माझ्याकडे. खरंतर ते वेळ आल्यावर आम्ही तुला देणार होतो पण आता तुझी अवस्था मला खरंच पाहवत नाहीये."

"आई... नको ना गं." विनवणीच्या सुरात समर बोलला.

"तू गप्प बस." नंदा ताईंनी त्याला दम दिला.

"आई .. कसलं सरप्राइज?"

"चालू द्या तुमचं. जातो मी बाहेर. ही आई पण ना." बडबडतच समर बाहेर निघून गेला.

नंदा ताईंनी मग सगळं खरं खरं कार्तिकीला सांगून टाकलं.

"आई...हे तुम्ही मला आता सांगताय! तुम्हाला माहितीये मला किती टेन्शन आलं होतं."

"तुला काय वाटलं, आम्हाला तुझी काळजीच नाही. हो ना."

"अगदीच तसं नाही. पण तुमचा मुलगाच मला उकसवत होता.  मग मी तरी काय करू? 'चल तुला सोडतो कात्रजला..' हे पन्नास वेळा बोलून झालं असेल त्याचं. मग मलाही नंतर खरच वाटायला लागलं त्याचं हे बोलणं."

"वेडाबाई.... कसं व्हायचं गं तुझं कार्तिकी. समरची मस्करीही तुला समजू नये."

"ते जाऊ द्या आता आई. नाही येत पटकन् माझ्या लक्षात. मी तरी काय करू? बरं मग आपण कधी जायचं तिकडे? आय मीन हॉल वर?"

"उद्या दुपारी. सगळे उद्याच जमणार आहेत. संभव आणि ओवीचं लग्न तीन दिवस मस्त एंजॉय करायचं आता. हो, पण तू तुझी काळजी व्यवस्थित घायची बरं. जास्त धावपळ करायची नाही. झेपेल तितकंच एन्जॉय कर आणि एंजॉय करण्याच्या नादात तुझी औषधं, खाणंपिणं याकडेही लक्ष द्यायचंय तुला. तसं आम्ही आहोतच सगळेजण, पण तरीही तू स्वतःला जप. माझीही धावपळ होईल. इथे जसं तुझ्याकडे मला लक्ष देता येतं तिथे जमेलच असं नाही. त्यात आता दिवस भरत आलेत तुझे. त्यामुळे अतिउत्साहीपणा दाखवू नकोस. तसं माधवी ताई सुद्धा आहेतच त्यामुळे मला ती काळजी नाही म्हणा, पण तरीही सांगून ठेवते तुला."

"आई .. मी घेईल हो माझी काळजी. तुम्ही नका ना टेन्शन घेऊ."

"बरं आवर तू. मलाही खूप कामं आहेत. त्यात वेळ कमी आणि कामं खूप असं झालंय बघ. तूही समरच्या मदतीने आज रात्री तुमच्या बॅगा पॅक करून घ्या. उद्यासाठी काही काम शिल्लक ठेवू नका." म्हणत नंदा ताई त्यांच्या कामाला निघून गेल्या.

इकडे संभव आणि ओवीच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. आयुष्याचा नवा अध्याय लिहिण्यासाठी दोघेही सज्ज झाले. नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी दोघेही मनापासून उत्सुक होते.

ओवी आणि संभवच्या लग्नानिमित्त अनेक नाती पुन्हा एकदा एकत्र आली. खूप दिवसांपासून घरापासून दूर असलेला कैवल्य त्याच्या बायकोला म्हणजेच मानसीला घेऊन घरी आला नि माधवी ताईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. लेकाच्या लग्नानंतर आज पहिल्यांदा जोडीने दोघेही घरच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. नव्या सुनेचे कोड कौतुक करायचे राहूनच गेले होते.

दोन वर्षापूर्वी मानसी आणि कैवल्यचा अत्यंत साध्या पद्धतीने विवाह झाला होता. दोघांचेही अरेंज मॅरेज. मानसीला तिच्या डॉक्टरकीच्या पुढील शिक्षणासाठी जर्मनीला जायचे होते. त्याच दरम्यान तिचे कैवल्यशी लग्न ठरले. मग घाईतच त्यांचे लग्न देखील झाले. त्यावेळी कैवल्यचे स्वतःचे क्लिनिक सुरू होते. पण मानसीसाठी त्यानेही तिकडे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. ओळखीच्या काही वरिष्ठ डॉक्टरांच्या मदतीने त्याने परदेशात काही अनुभवी डॉक्टरांसोबत त्याची प्रॅक्टिस कंटीन्यू केली. पुढचे अजून एक ते दीड वर्ष त्याला मानसीसोबत तिकडे राहावे लागणार होते. ओवीच्या लग्नासाठी दोघेही खास वेळात वेळ काढून पंधरा दिवसांची सुट्टी घेऊन आले होते. एवढेच नाही तर सुलभा आत्या आणि तिच्या लेकीदेखील त्याच दिवशी आल्या. त्यांच्या येण्याने घराचे अगदी गोकुळ झाले होते.

तिकडे देशमाने फॅमिलीत देखील असेच उत्साहाचे वातावरण होते. कार्तिकीची लाडकी नणंद म्हणजेच संभव आणि समरची चुलत बहिण, प्रणिती जी घरी आली होती. संभव आणि प्रणितीच्या येण्याने घर अगदी गजबजून गेले. त्यातच संभवचा मामेभाऊ म्हणजेच त्याचा अत्यंत जवळचा मित्र, स्वराजदेखील आला. समरच्या लग्नानंतर आता पुन्हा एकदा ही सगळी गँग एकत्र आली म्हणजे मजा मस्ती तर होणारच. आता कुठे खऱ्या अर्थाने दोन्हीकडील लग्न घरांना शोभा आली होती.

पण सार्थक ओवी आणि संभवच्या लग्नाला येणार की नाही हे मोठे प्रश्नचिन्ह होते. न राहवून ओवीने सार्थकला कॉल केला. पण याहीवेळी त्याने फोन रिसिव्ह केला नाही. ओवी मनातून नाराज झाली.

"अगं ओवी काय हे? आवर पटकन्. अजूनही फोन सुटेना का तुझा. ठेव बरं तो फोन बाजूला. चल सगळेजण बोलवत आहेत तुला. " रुममध्ये येत सीमा ताई बोलल्या आणि ओवीला घेऊन  बाहेर गेल्या.

दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या वेळी दोन्ही घरची मंडळी हॉलवर पोहोचली. सगळ्यांच्या एकत्र येण्याने आता खऱ्या अर्थाने ओवी आणि संभवच्या लग्नाला चार चाँद लागणार होते.

मेहंदी, संगीत, हळद, लग्न सारे काही पुढच्या दोन दिवस ठरल्याप्रमाणे होणार होते. त्या दृष्टीने सगळी तयारी झाली होती. संभव आणि ओवी स्वतःच्याच लग्नाचाच हा सारा सोहळा मनापासून जगत होते असे म्हणायला हरकत नाही. पण असे असले तरी ओवी मनातून सार्थकला खूप मिस करत होती. कार्तिकीच्या लग्नात तो तिच्या अवतीभोवतीच होता, पण आज मात्र ह्या एवढ्या मोठ्या प्रसंगी सार्थक तिच्यासोबत नव्हता. त्यामुळे तिचेही मन दुःखी झाले होते.

क्रमशः

सार्थक ओवी आणि संभवच्या लग्नाला हजेरी लावणार की नाही? हे अजूनही गुलदस्त्यातच होते. नेमकं काय होणार पुढे? जाणून घेऊयात पुढील भागात.

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all