Login

अधीर मन झाले..(भाग ५८)

अधीर मन झाले..एक प्रेमकथा
सगळी मंडळी दोन दिवस आधीच हॉलवर पोहोचली. न राहवून ओवीने सुलभा आत्याला सार्थक बद्दल विचारले.

"आत्या, सार्थक नाही येणार का गं?"

"तू नाही फोन केला का त्याला?"

"केला होता, पण त्याने नाही उचलला."

"जाऊ दे त्याचं काही फिक्स नाहीये. तू नको त्याची वाट पाहू."

"अगं आत्या तू असं कसं बोलतेस गं? तू तरी सांग ना त्याला. तुझं तो ऐकतो ना गं सगळं."

"ओवी अगं त्याच्याही मनाचा तू विचार कर ना जरा. मी कोणत्या तोंडाने त्याला ये म्हणून सांगू? सगळी परिस्थिती तर तुला माहितच आहे. मग आता यावर जास्त न बोललेलंच बरं. " सुलभा आत्या समजावणीच्या सुरात बोलल्या. जणू तिलाही सार्थकने येवू नये असेच वाटत होते.

"काय गं ओवी, जेव्हा तू सार्थकचा विचार करायला हवा होतास तेव्हा केला नाहीस. त्यावेळी तू तुझा स्वार्थच साधलास ना. म्हणजे बघ तुझ्या नजरेत तरी सार्थकपेक्षा संभव कैकपटीने उजवा आहे. एअर फोर्स ऑफिसर आहे ना तो, मग असं असताना तू सार्थकला का भाव देशील, हे न कळण्याइतपत आम्ही नक्कीच मूर्ख नाहीये. मग आतातरी सार्थक बद्दलची खोटी काळजी कशाला दाखवतेस तू? त्याने तुझ्या लग्नात उपस्थित राहावं असं वाटूच कसं शकतं तुला?" भावाची बाजू घेत सानवीने ओवीला बरंच काही सुनावलं.

तिच्या अशा बोलण्याने ओवीचे डोळे पाणावले.

"सानू दी... अगं मी माझ्या दृष्टीने नाही तर तू तुझ्या दृष्टीने अर्थ काढत आहेस आता. प्लिज जमलं तर समजून घे मला. विनवणीच्या सुरात ओवी बोलली.

"सानू, सोड ना तो विषय आता. जे झालं ते झालं. त्यावर आता कितीही चर्चा केली तरी काही उपयोग आहे का? आणि तू का बोलतेस ओवीला? तिने मला विचारले ना, मग आहे ना उत्तर द्यायला." समजावणीच्या सुरात सुलभा आत्या लेकीला म्हणाली.

ओवीच्या डोळ्यांत टचकन पाणी आले. तेवढ्यात सीमा ताई तिथे आल्या. ओवीचा पडलेला चेहरा आणि तिचे पाण्याने डबडबलेले डोळे पाहून त्यांना थोडाफार अंदाज आला.

"ओवी, काय गं, काय झालं?" सीमा ताईंनी विचारले.

"कुठे काय? काहीच तर नाही."

"बरं चल तुझे बाबा तुला बाहेर बोलवत आहेत." कारण सांगून सीमा ताई लेकीला बाहेर घेऊन गेल्या.

"आई, कुठेयेत गं बाबा?"

"काही बाबांनी तुला बोलावले नाही. नक्कीच त्या दोघी तुला काहीतरी बोलल्या असणार याची खात्री आहे मला. आत काय झालं नेमकं?"

"काही नाही गं आई. तू नको ना टेन्शन घेऊस."

"सार्थकचा विषय निघाला होता का पुन्हा? त्यावरून झाले का काही?"

"हो... म्हणजे मीच विचारले आत्याला, सार्थक येणार नाही का म्हणून. त्यावर सानवीने थोडं सुनावलं. बाकी काही नाही.".

"अगं पण काय गरज होती विचारायची? कसं कळत नाही तुला हेच समजत नाही मला आणि तुला का इतका फरक पडतोय सार्थकच्या न येण्याचा? त्याला तरी बघवेल का हे सगळं? हाही विचार कर ना जरा"

"आई... अगं सार्थक माझा मित्र आहे गं. आधी मनातली प्रत्येक गोष्ट मी त्याच्याशी शेअर करू शकत होते. हसून खेळून गप्पा, मजा, मस्ती सारं काही चालायचं. मग आता हे सगळं क्षणात विसरुन जाऊ का मी?"

"मग आता स्वतःच्याच लग्नात असं तोंड पाडून फिरणार आहेस का? नॉर्मल हो बरं आधी." ओवीच्या तोंडावरून हात फिरवत सीमा ताईंनी तिची समजूत घातली.

"सॉरी आई.."

"नवीन आयुष्याची सुरुवात करताना भूतकाळातील बऱ्याच गोष्टी आपसूकच वजा होतात बाळा. त्यांचा विचार करत बसशील तर पुढे जाताना अडथळे येणार हे नक्की. म्हणून म्हणतेय, नव्या आयुष्याची सुरुवात आनंदाने कर. असं तोंड पाडून नाही."

"आई," म्हणत ओवीने सीमा ताईंना घट्ट मिठी मारली. ओवीला अश्रू अनावर झाले.

'वेळोवेळी आईचे असे मला समजून सांगणे आता यापुढे नाही होणार. त्यामुळे तिला भरुन आले.

तेवढ्यात संभव आणि स्वराज तिथे आले. ओवीला आणि सीमा ताईंना असं पाहून त्यालाही गहिवरून आले.

"ओवी... अगं अजून दोन दिवस आहेत. तू तर आताच सुरू झालीस. काय अगं..." गमतीच्या सुरात संभव बोलला.

"वहिनी...तुम्हाला रडता पण येतं? मला वाटलं होतं की फक्त तुम्ही इतरांना रडवता." ओवीचा मुड बदलण्यासाठी हास्यास्पद सुरात स्वराज बोलला.

त्याच्या बोलण्यावर ओवीलाही मग हसू आले.

"बरं चला रात्री मेहंदी आहे ना. आवरुन घ्या तुम्ही पटकन्." असे बोलून सीमा ताई निघून गेल्या.

"वेडी... जा आवरुन घे पटकन्. त्याआधी इकडे बघ बरं एकदा. स्वराज तू पण ये आणि हस गं थोडं आता." मोबाईल उंचावत संभव बोलला आणि पुन्हा एकदा एक गोड आठवण त्याने मोबाईल मध्ये कैद केली. 

"करा करा एकटेच मज्जा करा, मला सोडून." तेवढ्यात कार्तिकी तिथे आली आणि नाराजीच्या सुरात तिने टोमणा मारला.

"अरे वहिनी, तुला सोडून मजा शक्य आहे का? तूही ये चल." संभव म्हणाला.

"अरे थांबा मलाही येवू द्या." म्हणत समर देखील त्यांना जॉईन झाला. सर्वांची एकदम छान मजा मस्ती सुरू होती.

अगदी हसत खेळत मजा मस्ती करत पुढचे दोन दिवस खूप छान गेले. मेहंदी, संगीत, हळद सारं काही अगदी उत्साही वातावरणात पार पडलं. सगळेच जण मनापासून एन्जॉय करत होते.

ओवीचे रूप अगदीच खुलले होते. हातावर मेहंदीचा रंग असा काही चढला होता जणू संभवचे प्रेमच त्यातून ओसंडुन वाहत होते. चेहऱ्यावरील संभवच्या प्रेमाची लाली देखील अधिकच गडद झाली होती आणि त्यावर चढलेला हळदीचा रंग. या सर्वांत ओवीचे सौंदर्य अधिकच खुलले होते. अहाहा किती सुरेख दिसत होती ओवी. तिचे सौंदर्य पाहून संभव तर क्षणाक्षणाला तिच्या आणखीच प्रेमात पडत होता. आज पहिल्यांदा तो ओवीचे हे असे सुंदर रूप अगदी जवळून न्याहाळत होता.

"ओवी अप्रतिम दिसत आहेस आज तू." हळूच संभव ओवीच्या कानात बोलला.

संभवच्या बोलण्याने ओवीच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली.

"तूही छान दिसतोस." ओवी म्हणाली.

"पण तू माझ्यापेक्षाही जास्त गोड दिसत आहेस आज."

"थँक्यू." संभवकडे एक लाजरा कटाक्ष टाकत ओवी बोलली.

"आई, ओवीने जर स्वार्थी विचार नसता केला तर आज इथे आपला सार्थक असता नाही." सानवी सुलभा आत्याला म्हणाली.

"सानू... सोड ना आता तो विषय. अगं ओवीचं अर्धं अधिक लग्न उरकलं सुद्धा आता. उद्या फेरे पार पडले की मग झालं. त्यामुळे आता पुन्हा तोच विषय काढून माझं डोकं नको फिरवू प्लीज.

"अगं आई मी आपलं सहज बोलले ना. तू पण लगेच ओरड माझ्यावर. जाऊ दे मी आता काही बोलणारच नाही."

"हो...नकोच बोलूस."

तसे पाहिले तर आज सर्वजण आनंद साजरा करत होते. पण मनातून सुलभा आत्याला खूपच वाईट वाटत होते.

'बरं झालं सार्थक येणार नाही ते, कारण मलाच जर इतका त्रास होत आहे, मनातून इतके वाईट वाटत आहे तर सार्थकची काय अवस्था झाली असती? देवा असंच माझ्या सार्थकला वेळोवेळी सद्बुद्धी दे रे बाबा.' मनोमन सुलभा आत्याने देवाचे आभार मानले.

तिकडे नंदा ताई तर मनातून खूपच खुश होत्या.

'आपण किती नशीबवान आहोत की ओवी आणि कार्तिकी सारख्या समजूतदार सूना आपल्याला लाभल्या.' नंदा ताई मनातून स्वतःला खूपच भाग्यवान समजत होत्या.

सीमा आणि रमाकांतराव मात्र लेक आता आपल्याला सोडून जाणार या विचाराने सैरभैर झाले होते. ओवीची घरात सतत सुरू असलेली बडबड आता रोज कानी पडणार नाही त्यामुळे मनातून ते खूपच दुःखी झाले.

बघता बघता दोन दिवस कसे गेले ते समजलेच नाही आणि फायनली लग्नाचा दिवस उजाडला. दोन दिवस ओवी आणि संभवचा विवाह सोहळा खूपच उत्साहात पार पडला. आजचे विधी एकदा का पूर्ण झाले की दोघेही साता जन्माच्या पवित्र अशा विवाह बंधनात अडकणार होते. सर्वजण त्या गोड क्षणाची आतुरतेने वाट बघत होते. पण ओवी मात्र अजूनही 'सार्थक नक्की येईल,' ही वेडी आशा मनात बाळगून होती.

एक एक विधी पार पडत होता. अखेर ती वेळ आली. नऊवारी शालुत, अस्सल मराठमोळ्या लूक मध्ये ओवीचे रूप अधिकच खुलले होते. मंडपाच्या प्रवेश द्वारापाशी ओवी आणि संभव येऊन थांबले. औक्षण करून त्यांना स्टेज वर घेऊन येण्यासाठी सर्वजण त्यांच्या स्वागताच्या तयारील उभेच होते. सनई चौघड्याचे मंजुळ सुर सर्वत्र पसरले होते. लग्नाचा अस्सल माहोल तयार झाला होता.
इतक्यात गर्दीतून कोणीतरी ओवीच्या खांद्यावर हात ठेवला. ओवीने इतक्या गर्दीतही तो स्पर्श ओळखला. नकळतपणे तिचे डोळे पाणावले. मागे वळून पाहतो तर काय सार्थक उभा होता.

"मला खात्री होती तू येणार. तू माझा विश्वास कधीच नाही तोडणार." भरल्या नजरेने ओवीने एक कटाक्ष सार्थकवर टाकला.

'पण तू तोडलास ना गं माझा विश्वास.' मनातच सार्थक बोलला. त्याचेही डोळे पाणावले.

"अरे सार्थक किती वाट पाहिली यार तुझी. पण आलास खूप छान वाटलं रे." संभव म्हणाला.

"तुम्हा दोघांनाही तुमच्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा." संभव आणि ओवीचा हात हातात घेत सार्थक बोलला.

वधूच्या वेशात ओवी असे नटलेले पाहून सार्थक क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला.

"ओवी खूप छान दिसत आहेस आज तू. आपल्या लहानपणीच्या भातुकलीच्या लग्नात दिसायचीस ना अगदी तशीच. फरक फक्त इतकाच की माझ्या जागी आज संभव आहे."

सारा भूतकाळ झरझर ओवीच्या नजरेसमोर तरळला. तिला आतून खूप भरुन आले पण कसेबसे तिने स्वतःला सावरले. आज तिचे खरेखुरे लग्न होत होते यावर क्षणभर तिचा विश्वासच बसत नव्हता. माहेर सोडून आता सासरी जायचे या कल्पनेनेच तिचा कंठ दाटून आला.

"चला वधू वराला घेऊन या स्टेजवर." तितक्यात माईकमध्ये घोषणा झाली.

नकळतपणे सार्थकच्या हातातील हात सुटला आणि फुलांच्या पायघड्यांवरून ओवी आणि संभव स्टेजच्या दिशेने निघाले. सार्थक मात्र तिथेच बाजूला खुर्चीत टेकला.

"सार्थक तू येणार नव्हतास ना? मग इतकी धावपळ करत यायची काय गरज होती?" सुलभा आत्याने जवळ जात लेकाची विचारपूस केली. खूप दिवसांनी लेकाला समोर पाहून खरंतर त्यांना खूपच आनंद झाला होता.

"आई अगं नाही राहवलं मला. रात्री पर्यंत खरंतर काहीच फिक्स नव्हतं येण्याचं पण मन इकडे ओवीत अडकून पडले होते. मग जे होईल ते होईल म्हटलं आणि आलो निघून."

"तू पण ना सार्थक. तुझी अवस्था मला नाही बघवत रे."

"आई...तू नको ना गं काळजी करुस. मी एकदम ठीक आहे. मनाची तयारी झालीये आता माझी."

"खरंच?? इतकंही खोटं बोलू नकोस रे."

"बरं आई तू जा समोर स्टेजवर मी आहे इकडे. विधी पूर्ण झाल्यावर आणि गर्दी थोडी कमी झाली की मग भेटतो सर्वांना."

लेकाचा केविलवाणा चेहरा पाहून सुलभा आत्याला खूपच वाईट वाटत होते.

"ठीक आहे." म्हणत त्या समोर गेल्या.

'संभव फक्त तुझ्या एका कॉलवर मला इथे येणं भाग पडलं. मला तर वाटलं होतं तू सोबत असताना ओवीला चुकूनही माझी आठवण येत नसेल. पण तू म्हणालास, 'ओवी रडत होती, प्लीज शक्य असेल तर नक्की ये. तू आलास तर ओवीला बरं वाटेल. तिचं स्वतःलाच दोष देणं तरी थांबेल.' नाही राहवलं रे मग. आज तुझ्यामुळे ओवीची आणि माझी भेट झाली. खरंच तू माझ्यापेक्षाही छान लाईफ पार्टनर होणार याची आज खात्री पटली. असेच नेहमी आनंदी राहा एकमेकांसोबत.' अलगद डोळे टिपत सार्थक मनातच विचार करत बोलला.

"आई...काय गरज होती का गं सार्थकला इकडे येण्याची. ज्या मुलीने त्याच्या मनाचा विचार केला नाही त्या स्वार्थी मुलीसाठी तो आज इकडे आलाय. खरंतर मला अजिबात आवडले नाही हे." सानवीची खूप चिडचिड होत होती.

"सानू.... अगं ही वेळ आहे का हे सर्व बोलण्याची? गप्प बस जरा." रागातच सुलभा आत्याने तिला गप्प केले.

थोड्याच वेळात मंगलाष्टका सुरू झाल्या. वातावरण एकदमच बदलून गेले. मंगलाष्टकांचे मधुर स्वर कानी पडताच सीमा ताईं आणि रमाकांतरावांचा कंठ दाटून आला. हळूहळू सर्वांचेच मन भरुन येत होते.

सार्थकला मात्र आता तिथे बसवेना. न राहवून तो उठून बाहेर निघून गेला. त्याला मोठमोठ्याने राहावेसे वाटत होते. पण तेही करता येत नव्हते. अखेर वॉशरूममध्ये जाऊन तो मनसोक्त रडला. ओवीचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून हटायलाच तयार नव्हता.

थोड्याच वेळात मंगलाष्टका संपन्न झाल्या. सगळेजण तिकडे फुल मजा मस्ती एन्जॉय करत होते.

सार्थकला मात्र कसे एन्जॉय करावे ते कळेना. हातातून सारे काही निसटून जाताना तो स्वतःच्याच डोळ्याने कसे पाहणार होता हे त्याचे त्यालाच कळेना.

'इथे आलोय तर खरं पण आता सर्वांना कसं फेस करू?' हा मोठा प्रश्न त्याच्या समोर उभा होता.

फ्रेश होऊन तो बाहेर आला. तेवढ्यात कोणीतरी पाठीमागून त्याच्या खांद्यावर अचानक हात ठेवला. त्याने दचकून एकदम मागे पाहिले. क्षणभर तो गोंधळला.

क्रमशः

कोण असेल ती व्यक्ती? जाणून घेऊयात पुढील भागात.