Login

अधीर मन झाले..(भाग ५९)

अधीर मन झाले..एक प्रेमकथा
सार्थक फ्रेश होवून बाहेर आला तेव्हा अचानक कोणीतरी पाठीमागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने दचकून एकदम मागे पाहिले. क्षणभर तो गोंधळला.

"कोण तुम्ही? सॉरी, पण मी नाही ओळखले." अचानक समोर आलेल्या त्या मुलीला सार्थक म्हणाला.

"तू मला ओळखणे हे तसेही अपेक्षित नाहीये मला. मध्ये कितीतरी वर्ष गेली त्यानंतर आज पाहतेय मी तुला. बरं थांब मी तुला आपली एक आठवण सांगते, काही आठवतंय का बघ...तू आणि ओवी एकदा सीमा आत्यासोबत आमच्या गावी आले होते. तेव्हा खूप लहान होतो आपण. भातुकलीचा खेळ खेळताना ओवीच तुला बायको म्हणून हवी, मी नको म्हणून भोंगा पसरला होतास तू. आजीने कसेबसे तुला समजावले. पप्पांनी सायकल वरून एक चक्कर मारली तुला तेव्हा कुठे शांत झालास तू."

ती मुलगी सार्थकचे एक्सप्रेशन नोटिस करत पुढे म्हणाली, "आतातरी आठवलं की नाही मी कोण?"

"चिन्मयी?? ओवीची मामे बहीण? म्हणजेच दीपक मामाची मुलगी?"

"येस..अगदी बरोबर."

"किती मोठी झालीस गं चिनू!"

"म्हणजे तुला काय वाटलं मी एकटीच मोठी झाले? तू स्वतःकडे बघितलंस का? बघ माझ्या पेक्षाही मोठा झालास की?" टाचा उंचावत सार्थकची उंची मापत चिन्मयी बोलली.

चिन्मयीच्या गमतीशीर बोलण्याने सार्थकच्या चेहऱ्यावर हसू आले. बालपणीचा तो काळ झरझर दोघींच्याही नजरेसमोर फेर धरून नाचू लागला.

"किती छान दिवस होते नाही ते. उगीच आपण मोठे झालो असं वाटतंय आता. निदान त्यावेळी खोटं खोटं का होईना पण ओवीचा नवरा म्हणून मिरवण्याचं सुख वाट्याला येत होतं."

"काही बोललास का तू?"

"कुठे काय? काहीच तर नाही. पण इतक्या वर्षांनी भेटून सुद्धा तू कसं ओळखलंस गं मला?" सार्थकने प्रश्न केला.

"अरे मागे एकदा ओवीने तिच्या बर्थ सेलिब्रेशनचे फोटो ठेवले होते स्टेटसला तेव्हा त्यात पाहिले होते मी तुला. त्यामुळे आता अगदी सहज ओळखता आलं."

"अच्छा..." ओवीच्या बर्थ डेचा तो दिवस आठवून सार्थक पुन्हा एकदा जुन्या आठवणींनी बेचैन झाला.

"बरं चल, सगळे तिकडे मस्त एंजॉय करत आहेत आणि तू एकटाच इकडे? आता फेरे सुरू होतील. चल जाऊयात."

"चिन्मयी... तू हो पुढे, मी येतो."

"काय रे तू. एकतर आलास इतक्या उशिरा आणि आता मिक्स पण होत नाहीस. इतका कसा बदललास तू?"

"अगं तसं काही नाही. एक अर्जंट कॉल करायचा आहे. आलोच मी. तू हो पुढे."

"वेट वेट वेट...तुला खऱ्या आयुष्यात पण ओवी बायको म्हणून हवी होती की काय? म्हणून असा ब्रेक अप झाल्यासारखा चेहरा पाडून बसला आहेस?" थोडं हास्यास्पद सुरात सार्थकची खेचत चिन्मयी बोलली. ध्यानी मनी नसतानाही चिन्मयीने अगदी सहज विचारले.

चिन्मयीच्या या प्रश्नाने सार्थक मात्र हादरला.

"हे काय बोलतीयेस तू?"

"सॉरी हा, पण अगदी सहज मनात आलं म्हणून विचारलं बाकी काही नाही. तुला वाईट वाटलं असेल तर खरंच सॉरी."

"नाही गं..नाही वाईट वाटलं मला.कारण सत्य पचविण्याची ताकद पण असायला हवी ना माणसात. कारण तोच तर प्रयत्न करतोय सध्या." चेहऱ्यावर बळेच ओढून ताणून स्माईल आणत नजर चोरत सार्थक बोलला.

"म्हणजे???."

"काही नाही. जाऊ दे चल जायचं ना तिकडे?" असे म्हणून सार्थक पुढे निघून गेला.

'अरे पण तुझा कॉल?'

ऐकून न ऐकल्यासारखे करत सार्थक तसाच पुढे निघून गेला.

'याचा अर्थ मी बोलले ते खरंच होतं की काय? अरे देवा म्हणजे हा खरंच ओवीवर प्रेम करत होता? तू पण ना चिन्मयी...काय बोलून बसलीस हे? पण मग हे एकत्र का येवू शकले नसतील आणि माझ्या तर असंही कानावर आलंय की ओवीचे हे लव मॅरेज आहे. तिला खरंच सार्थकच्या मनातील काहीच माहिती नसेल?'

असे एक ना अनेक प्रश्न चिन्मयीच्या मनात घिरट्या घालू लागले.

चिन्मयी धावतच सार्थकच्या पाठीमागून आत गेली. एव्हाना ओवी आणि संभव अग्नीभोवती फेरे घेत होते. सार्थक सर्वांची विचारपूस करत होता. सर्वात आधी शकुंतला आजीकडे जाऊन त्याने तिचे आशीर्वाद घेतले. अधूनमधून सार्थक, ओवी आणि संभववर एखादा चोरटा कटाक्ष टाकत होता. सार्थकच्या मनाला होणाऱ्या वेदना त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होत्या.

'का वागली असेल ओवी असं? एरव्ही जगाचा विचार करणारी ओवी आज स्वतःच्याच बालमित्राशी असे कसं वागू शकते?' चिन्मयी मनातच विचार करत होती. पण तिला मात्र ओवीचे हे वागणे अजिबात पटले नव्हते. कारण तिने ओवी आणि सार्थकची मैत्री काही काळ का होईना पण जवळून पाहिली होती.

बघता बघता लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले. ओवी आणि संभव  आयुष्यभरासाठी एक झाले. हे सर्व पाहताना सार्थक मात्र आतून पूर्णतः तुटला होता.

सुलभा आत्याने लेकाच्या चेहऱ्यावरील भाव अचूक टिपले. नजरेतूनच त्याला धीर दिला. सार्थकचा जीव मात्र ओवीसाठी तीळ तीळ तुटत होता. पण आता सार्थकला मनाने खंबीर व्हावेच लागणार होते. ओवीशिवाय जगण्याची सवय त्याला आता करून घ्यावी लागणार होती.

सर्वजण ओवी आणि संभवसोबत स्टेजवर जाऊन फोटो काढत होते. त्यातच सर्वजण सार्थकला फोटो काढण्यासाठी आग्रह करत होते. आता त्याचाही नाईलाज झाला. सर्वांच्या आग्रहास्तव तो स्टेजवर गेला. 

'देवा, मी उगीच आलो का इथे? माझ्या भावनांचा मी स्वतःच खेळ मांडला आहे असं वाटतंय. खूप त्रास होतोय. पण प्रेम केलं ना त्याची शिक्षा देखील आता भोगायला हवी.' सार्थक मनातच विचार करत होता.

फोटो काढून झाल्यावर सार्थकने खिशातून कसलीतरी डबी काढली आणि ती ओवीच्या हातात ठेवली.

"हे काय आहे सार्थक?"

"तुझ्या लग्नाचे गिफ्ट. तुला काय वाटलं मी विसरलो?"

"नाही रे, तू कधीच विसरणार नाही हे माहितीये मला. पण काय आहे यात?"

"उघडून तर बघ."

"लगेच उघडू?"

"बघ तुझी इच्छा."

"अगं ओवी तो म्हणतोय तर उघड ना." संभव म्हणाला.

ओवीने मग लगेचच ती डबी उघडली. आत एक सोन्याची चैन होती. त्यामध्ये हार्टचे लॉकेट होते. संभव शेजारी असल्यामुळे ओवीला थोडे अवघडल्यासारखे झाले खरे पण संभवला सगळं आधीच माहिती असल्यामुळे इतका काही प्रॉब्लेम नव्हता. ओवीने ते हार्ट ओपन करून पाहिले तर तिला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. त्या लॉकेटमध्ये ओवी आणि संभवचा फोटो होता.

ओवीचे डोळे अश्रूंनी डबडबले.

'कसा आहे हा मुलगा! मी खरंच सार्थकला ओळखण्यात खूप मोठी चूक केली. सगळं समजल्यावर तो विचित्र रिऍक्ट करेल. मला त्रास देईल. असा काहीबाही समज मी करून घेतला होता. पण सार्थक इतका समजूतदार आहे हे खरंच मला समजू शकले नाही. देवा माझ्यापेक्षाही सुंदर आणि त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी मुलगी ह्याच्या आयुष्यात येवू दे. अशी आज मी मनापासून प्रार्थना करते. ही माझी इच्छा नक्की पूर्ण होवू दे.' ओवीने मनोमन देवाला साकडं घातलं.

"आवडलं?" तेवढ्यात सार्थकने प्रश्न केला.

"हममम. खूप जास्त." ओवी उत्तरली.

"आय एम प्राऊड ऑफ यू सार्थक अँड थँक्यू सो मच. खरंच तू खूप ग्रेट आहेस यार. पण जमलं तर मला माफ कर." संभव म्हणाला.

"अरे...तू का माफी मागतोस?" सार्थकने विचारले.

"सांगेल केव्हातरी." संभव म्हणाला.

"ओके..पण आता आमच्या ओवीला सांभाळ. तिला अजिबात त्रास देवू नको हा. नाहीतर गाठ माझ्याशी आहे बघ." भरल्या नजरेने सार्थकने संभवला गमतीशीर सुरात हक्काने दम भरला.

"बस काय...तू अजिबात काळजी करू नकोस." असे म्हणत संभवने सार्थकला एक घट्ट मिठी मारली. हे पाहून ओवीला देखील भरुन आले. खरंतर ही अशी मैत्री आणि प्रेम आज संभव पहिल्यांदा पाहत होता.

संभवने ओवीच्या हातातून ते लॉकेट घेतले आणि लगेचच सार्थक समोरच ओवीच्या गळ्यात घातले. सार्थकला देखील संभवचा खूपच अभिमान वाटला त्याक्षणी.

'मी ह्यांच्या दोघांच्या मध्ये तर आलो नाही ना?' असे क्षणभर संभवला वाटले.

'खरंच हे फक्त यालाच जमू शकते. मला कधीच जमले नसते हे.' संभव मनातच बोलला.

थोड्याच वेळात ओवी आणि संभवच्या लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले आणि अखेर तो क्षण आला. लेकीची पाठवणीची वेळ जवळ आली होती, त्यामुळे सीमा ताई आणि रमाकांत रावांना भावना अनावर झाल्या. एकुलती एक लेक सासरी जाताना त्या आई बापाचे काळीज पिळवटून निघत होते, पण आता प्रथा आहे म्हटल्यावर हे सर्व करणे भाग होते. सर्वांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. क्षणात सर्व वातावरणच बदलून गेले.

सर्वांना निरोप देताना ओवीच्या अश्रूंचा बांध अखेर तुटला. खरंच एका मुलीसाठी आणि तिच्या आई वडिलांसाठी हा खूपच वेदनादायक प्रसंग असतो. एकीकडे मनासारखी व्यक्ती तसेच मनासारखं सासर मिळाल्याचा आनंद तर दुसरीकडे हक्काचे माहेर नि माहेरची माणसे दुरावण्याचे दुःख, खरंच किती अवघड असतं नाही हे सारं?

सर्वात आधी ओवी तिच्या आईला जाऊन घट्ट बिलगली. सीमा ताई म्हणजे आईपेक्षाही जास्त तिची मैत्रीण ज्या होत्या. लेकीला निरोप देण्याचे खरंतर सीमा ताईंच्या अगदी जीवावर आले होते.

'काही नाही मी माझ्या ओवीला पाठवणार तुमच्या सोबत. मी तिला पुन्हा माझ्या सोबत घेऊन जात आहे.' तोंडात आलेले हे वाक्य तिथेच थोपवत सीमा ताईंनी कसेबसे स्वतःच्या मनाला समजावले.

रमाकांतराव देखील लेकीला त्यांच्या कुशीत घेण्यासाठी आतूर झाले होते. ओवीला जणू ते बरोबर समजले. डोळ्यातील अश्रूंना आणखी वाट मोकळी करून देत ती तिच्या लाडक्या बाबाला जाऊन घट्ट बिलगली. रमाकांत रावांनी कसेबसे स्वतःच्या भावनांना आवर घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला खरा पण लेक मिठीत येताच त्यांचा बांध देखील तुटला.

लेकीला बोट धरून चालायला शिकवण्याचा तो पहिला प्रयत्न ते आजचा तिचा हात संभवच्या हातात देईपर्यंतचा प्रवास, सारं काही अगदीं झरझर त्यांच्या नजरेसमोर तरळले.

सगळे वातावरण अगदी भावूक झाले होते. ओवीची अवस्था संभवला पाहवेना. तिला असं रडताना पाहून त्याचे डोळे देखील पाणावले.

एक एक करत ओवी सर्वांची गळाभेट घेत प्रत्येकाचा निरोप घेत होती. सर्वांना सोडून जातानाचे दुःख अश्रुंवाटे झरत होते. सर्वजण तिची समजूत काढत तिला धीर देत होते. कुटुंबासोबतची प्रत्येक आठवण तिच्या मनाचा कोपरा अधिकच हळवा करून जात होती.

ओवीची नजर अचानक सार्थकवर पडली. स्वतःचे दुःख लपवत बाजूलाच भिंतीला टेकून तो उभा होता. कोणाचीही पर्वा न करता ओवी सार्थकजवळ गेली. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते.

"जमलं तर मला माफ कर," म्हणत ओवीने सार्थकला घट्ट मिठी मारली. बालपणीच्या आठवणींचा सारा पसारा क्षणात तिच्या नजरेसमोर फेर धरून नाचू लागला. त्याक्षणी इतर सर्व गोष्टींचा तिला जणू विसरच पडला होता. तिच्या अश्रूंचा बांध आता तिलाही आवरता येईना. ओवीचे सार्थकला असे घट्ट बिलगणे इतरांना नाही पण सार्थकला स्वतःलाच खूप अनपेक्षित होते.

सारे बालपण झरझर दोघांच्याही नजरेसमोर आले. नकळतपणे सार्थकचे अश्रू देखील त्याच्या गालावर ओघळले. लहानपणापासून दोघेही एकत्र खेळले, वाढले होते. त्यामुळे दोघांमधील बाँडींग सर्वांनाच ठाउक होते. ओवीची ही मिठीच जणू आता सार्थकला त्याच्या भविष्याच्या वाटेवर मार्गक्रमण करण्यासाठी पुरेशी होती.

क्रमशः

सार्थक कसा बाहेर पडणार या साऱ्यांतून? ओवीला तो विसरू शकेल? जाणून घेण्यासाठी वाचत राहा "अधिर मन झाले...एक प्रेमकथा."