अधीर मन झाले..(भाग ६०)

अधीर मन झाले..एक प्रेमकथा
"जमलं तर मला माफ कर म्हणत ओवीने सार्थकला घट्ट मिठी मारली. बालपणीच्या आठवणींचा सारा पसारा क्षणात तिच्या नजरेसमोर फेर धरून नाचू लागला. त्याक्षणी इतर सर्व गोष्टींचा तिला जणू विसरच पडला होता. तिच्या अश्रूंचा बांध आता तिलाही आवरता येईना. ओवीचे सार्थकला असे घट्ट बिलगणे इतरांना नाही पण सार्थकला स्वतःलाच खूप अनपेक्षित होते.

सारे बालपण झरझर दोघांच्याही नजरेसमोर आले. नकळतपणे सार्थकचे अश्रूदेखील त्याच्या गालावर ओघळले. लहानपणापासून दोघेही एकत्र खेळले, वाढले होते. त्यामुळे दोघांमधील बाँडींग सर्वांनाच ठाउक होते. ओवीची ही मिठीच जणू आता सार्थकला त्याच्या भविष्याच्या वाटेवर मार्गक्रमण करण्यासाठी पुरेशी होती.

ओवीला रडताना पाहून सार्थकला देखील अश्रू अनावर झाले. पण परिस्थितीचे भान राखत त्याने वेळ निभावून नेली.

"ओवी, आतातरी जाशील ना सासरी? लहानपणी म्हणायचीस की, लग्न झाल्यावर मी सासरी जाणारच नाही उलट नवऱ्यालाच माहेरी ठेऊन घेईल.
बघ हा संभव, लवकर घेऊन जा हिला नाहीतर ही तुलाच ठेऊन घेईल बरं इकडे. मग काही खरं नाही तुझं."

इच्छा नसतानाही ओवीच्या मिठीतून अलगद स्वतःला बाजूला करत तिचा मूड बदलण्यासाठी, तिला हसविण्यासाठी मस्करीच्या सुरात सार्थक बोलला.

सार्थकच्या या गमतीशीर बोलण्यावर सर्वांनाच मग हसू आले. अत्यंत गंभीर झालेले वातावरण काही काळ का होईना पण नॉर्मल झाले. सर्वांच्या डोळ्यांत अश्रूंची गर्दी झालेली असतानादेखील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मात्र सार्थकमुळे हास्य उमटले.

"काय मग, आहे ना विचार पक्का? म्हणजे सासरी जाण्याचा गं." ओवीच्या गालावरील अश्रू अलगद पुसत हसतच सार्थक बोलला. ओवीलाही मग हसू आले.

हसतच ओवीने संभववर एक कटाक्ष टाकला तर तोही त्या दोघांकडे पाहून स्मित करत होता.

'बस झालं ओवी, खूप रडलीस, आता अजून नको.' नजरेतून सार्थकने तिला समजावले.

'खरंच तू ग्रेट आहेस यार सार्थक. किती सहजपणे तू परिस्थिती क्षणात बदलून टाकलीस. मनात इतके दुःख साठलेले असताना देखील ते सारे बाजूला ठेवून तू आज तुझ्या मैत्रीशी किती प्रामाणिक आहेस हे दाखवून दिलेस. एव्हढेच नाही तर तू माझादेखील शब्द राखलास आणि रात्रीच्या माझ्या एका फोन कॉलवर इतक्या गडबडीतही तू इथे आलास. खरंच तुझे करावे तेवढे कौतुक थोडेच. तुझ्या जागी दुसरी कोणी व्यक्ती असती तर मनात खुन्नस ठेऊन माझ्याशी वागली असती. पण तू तसे काहीही न करता आज इथे आलास. तू माझ्या आणि ओवीच्या प्रेमाआड आला नाहीस, आता माझी टर्न...मी देखील तुमच्या दोघांच्या मैत्रीच्या आड येणार नाही.' संभव मनोमन सार्थकची स्तुती करत म्हणाला.

एरव्ही बहिणीशी सतत काही ना काही कुरबुर करणारा, तिच्या खोड्या काढून तिच्याशी भांडणारा अभंग, तोही डोळ्यांतील अश्रू लपवत बाजूलाच उभा होता.

'अभ्या,माझ्या लग्नात सर्वांत जास्त तूच रडशील बघ, लिहून घे माझ्याकडून.' बऱ्याचदा भाऊ बहिणीच्या या भांडणात ओवी अभंगला हे वाक्य हमखास बोलायची.

ओवीचे हे शब्द आठवून अभंगच्या डोळ्यांत आसवांची दाटी झाली.

"अभी फायनली तुला हवं ते झालं बघ, आता नाही तुला त्रास देणार मी. चालले मी सासरी." अभंगचा हात हातात घेत ओवी बोलली.

काहीही न बोलता त्याने घट्ट मिठी मारली ओवीला. भाऊ बहिणीचे प्रेम अश्रूंद्वारे ओसंडून वाहू लागले. हे सारं पाहून उपस्थित सर्वांना अश्रू अनावर झाले. काही केल्या दोघांचे रडणे थांबेचना. एकमेकांच्या मिठीत दोघेही हमसून हमसून रडू लागले. सर्वांनी खूप समजूत घातली दोघांची तेव्हा कुठे ते शांत झाले.

"जाता जाता रडवलंस ना मला. शेवटी तुझंच खरं केलंस ना तू..आता तू भांडायला नसशील माझ्यासोबत तर माझा दिवस कसा जाईल?" डोळ्यांतील अश्रू पुसत अभंग बोलला.

"काळजी करू नकोस आपण व्हिडिओ कॉलवर भांडूयात ना."

ओवीच्या या वाक्यावर रडता रडताही अभंगला हसू आले. त्याला हसताना पाहून तिच्या चेहऱ्यावर देखील मग हास्य फुलले.

बहिण भावाचे हे प्रेम पाहून सर्वचजण त्यांच्या नात्याला कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून त्यांना भरभरून आशीर्वाद देत होते.

सर्वांचा निरोप घेऊन फायनली ओवी गाडीत बसली. तिची पावले जड झाली होती तरी आता दुसरा पर्याय देखील नव्हता. एकीकडे संभव सोबत नव्या आयुष्याची स्वप्न डोळ्यांत घेऊन तर दुसरीकडे जुन्या आठवणींचा पसारा आवरत आणि सर्वांना एकाच वेळी नजरेच्या कप्प्यात सामावून घेत संभव सोबत ती पुढील प्रवासाला निघाली.

ओवी आता देशमाने फॅमिलीचा एक भाग झाली होती. अगदी गमती गमतीत तोंडातून बाहेर पडलेल्या काही गोष्टी आज सत्यात उतरल्या होत्या. 'लग्न करून आम्ही दोघी बहिणी एकाच घरात जाऊ,' असं अगदी सहज आणि हसून समोरच्याला दिलेलं उत्तर हे सगळं कसं परमेश्वरानं जणू जुळवून आणलं होतं. फायनली आज ते बोल सत्यात उतरले होते.

"सीमा ताई लेकीची अजिबात काळजी करू नका. आता तुमच्या दोन्ही लेकी माझ्या झाल्यात. कार्तिकीला पाहायला आलो खरंतर तेव्हाच माझ्या संभवसाठी मी ओवीला पसंत केलं होतं, पण मुलांवर आपली मतं लादायला नकोत असा विचार करून कधी काही बोलले नाही मी. पण ह्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि माझं खूप मोठ्ठं काम अगदी सोप्पं झालं. आता एकदम निश्चिंत राहा. हवं तेव्हा पोरींना भेटायला येत जा. नात्यातील आपलेपणा, प्रेम, जिव्हाळा असाच आयुष्यभर जपूयात आणि दोन्ही घरी वरचेवर सुखाचे सोहळे साजरे करुयात. आता सध्या कार्तिकीला पण आम्ही आमच्यासोबत घेऊन जातो. तिकडेच सगळे कार्यक्रम उरकून ओवीला आणि तिला दोघींनाही मग सोबतच माहेरी पाठवतो." नंदा ताईंनी खूप सुंदर शब्दात त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या.

तसंही मोहिते फॅमिली मुलींच्या बाबतीत आधीपासूनच निश्चिंत होती. कारण असे प्रेमाचे सासर मिळायलादेखील भाग्यच लागते.

सर्वांचा निरोप घेवून नवरदेवाकडची मंडळी नवरीला घेऊन अखेर रवाना झाली.

लेकीच्या पाठवणी नंतर सगळंच कसं बदलून जातं नाही. घर अगदी रिकामं होऊन जातं. अगदी तसंच काहीसं होणार होतं आता मोहित्यांच्या घरी. ओवी सासरी गेली की हसरं खेळतं घर  अचानक शांत होणार होतंk, नुसत्या कल्पनेनेच साऱ्यांच्या चेहरे पडले होते. अत्यंत जड अंतःकरणाने सर्वजण घ म्हणून तिच्यासोबत गेली. कार्तिकी देखील सोबत होतीच. 

"ओवी फायनली आपली लहानपणापासूनची इच्छा पूर्ण झाली. एकाच घरात लग्न करून जायचं असं किती मनापासून आपल्याला वाटायचं ना, बघ आज हे सगळं सत्यात घडतंय यावर खरंच विश्वास बसत नाहीये ना?" कार्तिकीने विचारले.

"याचा अर्थ तुम्ही बहिणींनी आधीपासूनच सेटिंग लावली होती तर." खोचकपणे समर बोलला.

"हो ना आम्ही लहान पणापासूनच दोन भाऊ असणाऱ्या स्थळांच्याच शोधात होतो. मला एखादे स्थळ आले तर ती महाराणी मुलाची चौकशी सोडून मुलाला भाऊ आहेत का? हे आधी पहायची."

"आणि नसेलच भाऊ तर मग ते स्थळं रिजेक्ट का?" कुतूहलाने समरने विचारले.

"नाही रे, अगदीच तसे नाही, पण ओवी त्या मुलामध्ये चांगले गुण शोधण्यापेक्षा वाईट गुणच जास्त शोधायची त्यामुळे तो आपसूकच मग रीजेक्ट व्हायचा." हसतच कार्तिकी बोलली.

पुढे समोरच्या सीटवर कार्तिकी बसली होती. समर ड्रायव्हिंग करत होता. कार्तिकीसाठी त्याने स्वतः गाडी हातात घेतली होती. कार्तिकीच्या ह्या अशा नाजूक परिस्थितीत त्याला आता कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. मागच्या सीटवर संभव, ओवी आणि चिन्मयी हे तिघे बसले होते.

कार्तिकी, समर आणि संभव छान गप्पा मारत होते. ओवी मात्र खूपच गप्प गप्प होती.

"वहिनी तुझी बहीण काही खुश नाही दिसत माझ्याशी लग्न करून." ओवीचा हात हातात घेत खोचकपणे संभव बोलला. सर्वांच्या अशा गप्पा ऐकून चिन्मयीला मात्र खूपच हसू येत होते.

"काय गं ओवी. आता झालं ना तुझ्या मनासारखं मग इतकी उदास का? कार्तिकीने विचारले.

"दी...सगळं मनासारखं झालंय पण मला सर्वांचीच खूप आठवण येतेय गं. खूप रडायला येतंय. असं वाटतंय आता गाडीतून उतरावं आणि बस पकडून घरी निघून जावं." नाराजीच्या सुरात ओवी म्हणाली.

"अगं काय हे ओवी. भाऊजी सोबत असताना तुझ्या मनात असा विचार येऊच कसा शकतो गं. दिस इज नॉट फेअर हा." कार्तिकी बोलली.

"उतरायचंय तुला? नक्की ना? मग एक काम कर पुढच्या सिग्नलला गाडी थांबली की लगेच उतरून घे आणि कात्रज बस पकडून घरी जा." लटक्या रागात संभव बोलला. सर्वांनाच मग हसू आले.

ओवीने संभववर एक रागीट कटाक्ष टाकला.

"खडूस. इतक्यात कंटाळलास मला."

"मी नाही, तू कंटाळलीस मला. म्हणून तर गृहप्रवेशाच्या आधीच माहेरी जाण्याची भाषा केलीस."

"अरे काय सुरू आहे तुमच्या दोघांचं? आतापासूनच तू तू मैं मैं सुरू झाली तुमची. अवघड आहे बाबा सगळंच." म्हणत कार्तिकीने डोक्यालाच हात लावला.

"तुझ्या लाडक्या दिराला सांग हे."

"मला नको काही सांगू वहिनी, तुझ्या बहिणीलाच समजाव."

दोघांचे लुटूपुटीचे भांडण सुरू होते. त्यातही त्यांचे एकमेकांवरील प्रेमच दिसत होते. कार्तिकीसाठी हे काही नवीन नव्हते. पण चिन्मयी मात्र हे सगळे खूपच एन्जॉय करत होती.

"तुम्हा दोघांनाही मी एकच सांगेल, असेच हसत खेळत नेहमी एकमेकांच्या सोबत रहा. एकमेकांपासून कधीही दूर जाऊ नका. ना शरीराने ना मनाने. आयुष्यभर एकमेकांवर असेच भरभरून प्रेम करत रहा आणि गरज पडलीच तर हवं तेवढं भांडा पण एकमेकांची साथ कधीच सोडू नका." कार्तिकीने तिचे मत स्पष्ट सांगितले.

"हो गं वहिनी, तू म्हणते तसंच होणार. तुझ्या बहिणीचा हात आयुष्यभर आता असाच हातात असेल. तू काळजीच करू नकोस." ओवीच्या हाताची पकड अधिकच घट्ट करत संभव बोलला.

"पण तुझ्या लक्षात राहील ना हे? कारण आता काही सेकंदापूर्वी बोललास की सिग्नलला उतर आणि जा म्हणून." लटक्या रागातच ओवी बोलली.

"हो...मी बोललेलं तेवढं लक्षात ठेवलं आणि तू बोललेलं विसरलीस इतक्यात?"

"बाकी काहीही म्हणा भाऊजी तुमची जोडी मात्र लाखात एक आहे आ."

"हो मग, चॉईस कोणाची आहे!" कॉलर ताठ करत संभव बोलला.

"आज जमलेल्या सर्व  लोकांमध्ये ही एकच चर्चा होती की जोडी मात्र एकच नंबर आहे. अगदी एकमेकांना अनुरुप आहेत दोघेही. खूप छान वाटत होतं तेव्हा."

"ह्मममम...खूप भारी फिलिंग आहे गं हे, हो ना ओवी." संभवने विचारले.

ओवीचा मात्र काहीच रिप्लाय नाही.

"ओवी...काय गं काय झालं?" संभवने विचारले.

"अहो जिजू ती झोपलीये वाटतं." चिन्मयी बोलली.

"अरे आता तर गप्पा माऱत होती आणि लगेच झोपली सुद्धा. मला वाटलं की ही आपल्या गप्पा ऐकत आहे. पण ही तर खरंच झोपलिये ना." एका हाताने ओवीच्या मानेला आधार देत संभव बोलला.

समरच्या खांद्यावर डोके ठेवून ओवी डोळे बंद करुन शांतपणे सर्वांच्या गप्पा ऐकत होती.

'झोपली नाहीये मी, पण ठीक आहे; तू जर असे लाड करणार असशील तर झोपते थोडावेळ.' चेहऱ्यावर गोड स्मित आणत मनातच ओवी बोलली. संभवचा तो प्रेमळ स्पर्श ती मनात साठवून घेत होती. नात्यातील प्रेमळ उब दोघांमधील मर्यादेची बंधने हळूहळू कमी करू पाहत होती. थोड्याच वेळात तिला आपोआपच झोप लागून गेली. असा प्रेमळ नवरा सावरायला आहे म्हटल्यावर ओवीही निश्चिंत होवून झोपी गेली.

"भाऊजी झोपली असेल तर झोपू द्या तिला, नका उठवू. अजून बराच वेळ लागेल आपल्याला पोहोचायला. तोपर्यंत तिची झोप तरी होईल. लग्नामुळे खूप दगदग झाली आहे तिची. त्यात हे ट्रॅफिक." कार्तिकी म्हणाली.

"ओवीची दगदग झाली आणि तुझं काय? तू तर खूपच फ्रेश आणि हॅप्पी दिसत आहेस. उलट आम्हाला तुझी जास्त काळजी वाटत होती." समर म्हणाला.

"हो मग मी असणारच ना फ्रेश आणि हॅप्पी. माझी लाडकी बहीणच माझी जाऊ झालीये हा आनंद मी शब्दात नाही वर्णन करू शकत." हसतच कार्तिकी बोलली.

"एव्हढेच कारण नाही काही दादू."

"मग आणखी काय कारण आहे भाऊजी?" कार्तिकीने प्रश्न केला.

"खरं सांग, तुला तुझ्या आणि दादूच्या लग्नाचा दिवस आठवत आहे ना. काही वर्षांपूर्वी तुमचे लग्न झाले तेव्हा असंच आपण ह्याच गाडीतून घरी चाललो होतो. बैठक व्यवस्थेत फक्त थोडा बदल होता. स्वराज ड्रायव्हिंग करत होता. समोरच्या सीटवर आता वहिनी बसली आहे तिथे मी होतो, तुम्ही दोघे आमच्या दोघांच्या जागी होतात आणि चिन्मयीच्या जागी ओवी होती. मला मगाच पासून राहून राहून हेच आठवत आहे."

"खरं सांगू भाऊजी, अगदी तुम्ही माझ्या मनातलं ओळखलंत."

"पण त्यावेळी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता मी की पुढे जाऊन आजचा हा दिवस माझ्या आयुष्यात येईल. तुमच्या लग्नाच्या दिवसापासूनच तुमच्या बरोबरच माझे आयुष्य देखील बदलून गेले." संभव बोलला.

"उगीच म्हणत नाहीत, जोड्या या स्वर्गातच जुळतात. आमची जोडी जुळली म्हणून आज तुमचीही जुळली." समर बोलला. जुने दिवस आठवून तोही आनंदीत झाला.

"अगदी खरं आहे." संभव बोलला. 

हसत खेळत गप्पा मारत सगळेजण एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले होते.

ओवी मात्र आता खरंच खूप गाठ झोपली होती. तिच्या मानेला त्रास होवू नये म्हणून संभवने अलगद तिचे डोके मांडीवर घेतले होते. त्यामुळे तिलाही आता शांत झोप लागली होती. संभव देखील आता लाडक्या बायकोचे असे लाड करण्यासाठी अधीर झाला होता.

संभव आणि ओवीमधील प्रेम पाहून चिन्मयीला देखील हेवा वाटत होता.

'याचा अर्थ सार्थकचे ओवीवर प्रेम होते, पण कदाचित ते एकतर्फी असावे. म्हणूनच त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही. पण कार्तिकी दीदी म्हणते तसं हे दोघे मात्र एकमेकांसाठी अगदी मेड फॉर इच अदर आहे.' चिन्मयीला देखील हळूहळू कोडे उलगडू लागले होते. ती मनातच विचार करत होती.

लग्नसोहळा तर व्यवस्थित पार पडला. आता समर आणि कार्तिकीबरोबरच ओवी आणि संभवदेखील त्यांच्या आयुष्यातील नवीन इनिंगसाठी सज्ज झाले होते.

क्रमशः

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all