Login

अधीर मन झाले..(भाग ६२)

अधीर मन झाले.. कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, ओवीच्या गृहप्रवेशाची तयारी झाली होती. पण सर्वांची संभव आणि ओवीच्या लग्नात नाचण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली होती. कार्तिकीची डिलिव्हरी अवघ्या पंधरा दिवसांवर आल्याने वरात न करण्याचा निर्णय मोठ्यांनी घेतला होता. पण नाही वरात तर निदान म्युझिक सिस्टीम वर थोडा वेळ गाणे लावून नाचण्याची इच्छा सर्व तरुण मंडळींनी व्यक्त केली. पण त्याला सुद्धा नंदा ताईंची परवानगी नव्हती.

आता पाहुयात पुढे...

"अरे तुमच्याच भल्यासाठी सांगतिये ना मी समर. हा सगळा काय पोरखेळ वाटला की काय तुम्हाला? आता चार दिवस, झालं ना सगळं नाचगाणी एन्जॉय. मग आता पुन्हा तेच तेच कशाला हवंय ना? बाकी कोणाचा नाही पण कार्तिकीचा विचार कर ना तू. निदान तू तरी ह्यांच्या बालिश हट्टामध्ये सामील होवू नकोस."

"आई,आई ऐका ना. अहो, मी एकदम ठणठणीत आहे. पाहा ना. तुम्हाला माझ्याकडे पाहून तसं काही वाटतंय का?"

"आता तू आणखी मस्का मारू नकोस आ. तुला नसेल स्वतःची काळजी पण मला आहे. उगीच विषाची परीक्षा कशाला घ्यायची मी म्हणते."

"हो आई माहितीये मला, पण तुम्हीच म्हणायचात ना की, आमच्या वेळी आम्ही तर अगदी नऊ महिने नऊ दिवस भरेपर्यंत काम करायचो. मग माझे तर अजून पंधरा दिवस बाकी आहेत. तरी आताच इतकं टेन्शन कशाला घ्यायचं ना आणि तसंही इथे कुठे डिजे आहे तेव्हा. साध्या म्युझिक सिस्टीमच्या आवाजाने काही नाही होणार. उलट बाळसुद्धा खूप एन्जॉय करेल."

"पण उगीच रिस्क कशाला घ्यायची कार्तिकी. आधीच तीन दिवस खूप दगदग झालिये तुझी. म्हणावा तसा आराम पण मिळाला नाही तुला. त्यात तुमचे हे असे हट्ट. योग्य आहे का गं सांग बरं."

नंदा ताईंच्या बोलण्याने कार्तिकी हिरमुसली. तिचा पडलेला चेहरा पाहून समर देखील विरघळला. समरने दिपाली काकीला नजरेतून थोडा मस्का मारला.
'काकी तू समजाव ना आईला. तुझं ऐकेल ती.'

मग काय लाडक्या पुतण्यासाठी आणि सूनेसाठी काकीदेखील त्यांच्या गटात सामील झाली.

"अहो ताई.. मी काय म्हणते. काही नाही होणार ओ. इतकी काळजी बरी नव्हे. ती पाहा किती एक्साइट आहे."

"दीपा अगं आता तूही ह्या पोरा सोरांच्या नादी लगतेस. त्यांच्या हो मध्ये हो काय मिसळतेस?"

"तसं नाही ताई, पण ही वेळ पुन्हा येणार नाही ना. तसंही आपल्या घरातलं हे शेवटचं लग्न. त्यात बिचाऱ्या कार्तिकीची अवस्था. तिला म्हणावं तसं एन्जॉय पण करता आलं नाही. दीराच्या आणि बहिणीच्या लग्नात सगळ्यात जास्त एन्जॉय करण्याचा तिचा अधिकार आहे. पण तोही आनंद तिला घेता येत नाहीये. एका गृहप्रवेश झाला की मग होईल संभव आणि ओवीचा संसार सुरू आणि मग कार्तिकीलाही छोट्या पिल्लासाठी बरेच रुल्स फॉलो करत बसावं लागणार. एकदा त्यात अडकलं की अडकलं, मग लवकर तिची सुटका नाही त्यातून. हेच दिवस आहेत करू द्या थोडं एन्जॉय."

"सगळं पटतंय मला दिपा, पण तरीही विषाची परीक्षा नको वाटते गं. आत्तापर्यंत सगळं सुरळीत पार पडलं ना मग शेवटपर्यंत पडू देत असं वाटतं."

"पडणार...नक्की सुरळीत पार पडणार. आपणच जर पॉझिटिव्ह विचार केला तर सगळं पॉझिटिव्हच होतं ताई आणि त्या आताच्या पॅरीस ऑलिम्पिकमधील उदाहरण ताजे आहेच की आपल्यासमोर. अहो ती इजिप्तची महिला नादा हाफेज की कोण... ती तर सात महिन्याची प्रेग्नेंट होती, तरी तिने तलवारबाजी मध्ये उत्तम कामगिरी केली. मग हे तर त्यापुढे काहीच नाही ना. म्हणून म्हणतेय उगीच टेन्शन नका हो घेऊ."

दीपा काकीचे बोलणे नंदा ताईंना मनापासून पटले होते जणू.

"म्हणजे तुम्ही कोणीच ऐकणार नाही तर." हसतच नंदा ताई बोलल्या.

"नाही..." एका सुरात सगळे ओरडले.

"अरे अरे जरा हळू.. असा गोंधळ घालणार असाल तर मग माझं उत्तर फिक्स आहे." नंदा ताई बोलल्या.

"सॉरी आत्या...नाही घालणार गोंधळ, प्रॉमिस." स्वराज बोलला.

"हो...पण फक्त अर्धा तास आ. त्यापुढे एक मिनिटदेखील वाढवून मिळणार नाही हे ध्यानात ठेवा प्रत्येकाने."

"चालेल.. नो प्रॉब्लेम." सगळे पुन्हा एकदा ओरडले आणि लॉनवर जायला निघाले.

"आता खुश का मॅडम?" समरने कार्तिकीला विचारले.

"ऑफ कोर्स यार. आता असा फ्रीडम पुढचे फक्त काही दिवसच असणार. मग बाळ आलं की जबाबदारी खूप वाढणार."

"डोन्ट वरी, मी आहे ना. दोघे मिळून ही जबाबदारी आनंदाने पार पाडूयात. पण आता लेट्स एन्जॉय. आणि हो, जरा जपून. तिथे खुर्चीत बस हवं तर. उगीच नाचायचा वगैरे हट्ट करु नकोस. खूप मुश्किलीने परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ऐक माझं." समजूतदारीच्या सुरात समर बोलला.

'सगळे अगदी एकसे बढकर एक आहेत या घरात. किती गोड फॅमिली आहे ही.' गोड स्मित करत चिन्मयी मनातच बोलली.

"अरे चिन्मयी, तू आली आहेस का? मी तर आता पाहिलं तुला." जवळ येत संभवचे काका म्हणजे प्रदीप रावांनी विचारले. जे की चिन्मयीच्या बाबांचे अगदी जवळचे मित्र होते. आज त्यांच्या आणि चिन्मयीच्या बाबांमुळे म्हणजेच ओवीच्या सुनील मामांमुळेच कार्तिकी आणि ओवीला इतकी छान फॅमिली मिळाली होती.

"हो काका. किती छान फॅमिली आहे ओ तुमची?" चिन्मयी म्हणाली.

"हो ना...तुझ्या साठीही आपण अशीच छान फॅमिली शोधू बरं का."हसतच प्रदिपराव बोलले.

"काय हो काका. आता मध्येच माझं लग्न कुठे आलं? मला अजून पुढे खूप शिकायचं आहे. त्यानंतरच लग्न."

"जेव्हा करशील तेव्हा म्हणालो गं मी. बरं जा तू पण कर एन्जॉय."

"हो काका." म्हणत चिन्मयीने देखील सर्वांना जॉईन केले.

सगळेजण फुल्ल एन्जॉय करत होते. कार्तिकी मात्र एका जागी बसून दुरूनच सगळं पाहत होती. इच्छा असूनही तिला नाचता येत नव्हते. सगळ्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होतात.

जवळपास आता अर्धा ते पाऊण तास सर्वजण एन्जॉय करत होते.

आज पहिल्यांदा ओवी संभवला असं बेधुंदपणे नाचताना पाहत होती. त्याच्या या नवीन रुपाच्या ती जणू पुन्हा पुन्हा नव्याने प्रेमात पडत होती.

'संभव... हा नक्की तूच आहेस ना? मला वाटलं होतं संभव म्हणजे फक्त एक हुशार अभ्यासू किडा. पण बाकीचेही खूप सारे किडे आहेत की राव तुझ्यात. ते काही का असेना पण कसला क्युट दिसतोयेस यार.'

तेवढ्यात संभवचे अचानक ओवीकडे लक्ष गेले. तिची ती नजर त्याच्या काळजात एकदम वार करून गेली. त्यालाही थोडं लाजल्यासारखं झालं.

त्याचं ते बेधुंदपणे नाचणं एकदम शिथिल झालं.

'काय गं काय झालं?' चेहऱ्यावरील लाजेची छटा सावरत, थोडं स्मित करत आणि भुवया उंचावत नजरेतूनच त्याने प्रश्न केला.

'कुठे काय, काहीच तर नाही.' तिनेही झटकन तिच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारी प्रेमाची लाली हलकीशी सावरली आणि नजर जमिनीकडे झुकवत लाजतच तीही नजरेच्या भाषेतूनच उत्तरली.

'कंट्रोल ओवी, संभव आता तुझाच आहे. इतकीही उतावीळ होऊ नकोस की त्याच्या नॅचरल काही गोष्टींवर बंधने येतील आणि त्याच्या सहवासातील खरा आनंद मग तुला घेताही येणार नाही.' हातातील बांगड्यांशी चाळा करत मनातच ओवी बोलली.

खरंतर ओवीला संभववरुन जराही नजर इकडे तिकडे करावीशी वाटत नव्हती. एकटक त्याच्याकडेच बघत बसावे असे मनातून तिला खूप वाटत होते, पण या सगळ्या गर्दीत तिला तिच्या लाडक्या नवऱ्याला म्हणावे तसे न्याहाळता येत नव्हते. पण तरीही संभवला नजरेच्या कप्प्यात सामावून घेण्यासाठी तिची नजरही जणू आसुसली होती.

'कधी एकदा हे सारे विधी पूर्ण होतात आणि कधी एकदा संभवच्या मिठीत विसावते,' असे झाले होते ओवीला.

काही महिन्यांपूर्वीची संभवभोवतीची प्रेमाची ती पहिली मिठी आठवून ओवी अचानक मोहरली. तिच्या सर्वांगावर रोमांच फुलले. चेहऱ्यावरील लज्जामिश्रित स्मित बरेच काही सांगून जात होते.

'उरली सुरली ही सारी बंधनेही आता गळून पडावीत आणि नव्या नात्याची सुरुवात लवकर व्हावी,' अशी मनोमन तिला ओढ वाटत होती.

मनातील, हक्काची, प्रेमाची व्यक्ती आता तिच्या एकदम जवळ होती पण तरीही अजून मर्यादेची अनेक बंधने दोघांनाही पार करायची होती. गृहप्रवेश, सत्यनारायण, देवदेव यामधला काळ दोघांसाठीही थोडा कठीणच असणार होता. कारण एकमेकांच्या समोर राहूनच बंधनांची बेडी दोघांनाही आता जपावी लागणार होती.

"ओवी अगं काय तू पण, थकलीस इतक्यात? अजून थोडावेळ तर कंपनी देतेस ना मला." तेवढ्यात कपाळावरील घाम पुसत. थोड्या धापा टाकत संभव ओवीच्या बाजूला येऊन टेकला..

"तुझ्या सारखं नाचता येत नाही ना रे मला. म्हणून मग तुझा डान्स एन्जॉय तरी करावं म्हटलं. तसंही इथे दीलाही कोणीतरी हवं होतं ना कंपनी द्यायला."

"खडूस, आताही लाडक्या बहिणीचाच विचार. आता ह्या गरीब नवऱ्यालाही तुमच्या प्रायोरिटीज लिस्ट मध्ये ऍड करा मॅडम."

"गप रे, थोडं काही झालं की लगेच फिल्मीपणा सुरू, पण ते काही का असेना तुला असं बेधुंदपणे नाचताना बघून खूप भारी वाटलं आज." लाजतच ओवी बोलली.

"ओहो, लग्नानंतर बायकोकडून मिळालेली ही पहिली कॉम्प्लिमेंट, कायम लक्षात राहील माझ्या."

"बरं ऐक ना संभव."

"बोल ना... अरे, आता किती लाजशील, बोल पटकन."

"तू असं काहीतरी करतोस आणि मग माझा माझ्यावरच कंट्रोल राहतो की नाही असे वाटत राहते. स्वतःला थांबवणं खूप कठीण झालंय रे आता. हे फक्त मलाच वाटतंय की तुलाही होतंय असं काही?"

"काय प्रश्न आहे हा ओवी. मलाही भावना आहेत यार. तुला असं ह्या रूपात पाहून मी स्वतःला कसं कंट्रोल करतोय माझं मला माहिती. पण काही पर्याय नाही." संभव म्हणाला.

"समर यार ह्यांच्या गप्पा काही थांबत नाहीत तू पण बस बरं माझ्या जवळ." संभव आणि ओवीला पाहून कार्तिकी म्हणाली.

"ओके बॉस," म्हणत समर कार्तिकीच्या बाजूला येऊन बसला.

"ये ऐका बरं आता....बस करा हे. खूप एन्जॉय केला आता. ताईंनी तुम्हाला परवानगी दिली ना. आता त्यांनी सांगितलेला टाईम पण फॉलो करा. चला आता फायनली गृहप्रवेशाची प्रथा पूर्ण करुयात." दीपा काकी म्हणाली.

हा एक तास फुल्ल एन्जॉय केला सर्वांनी. सगळे अगदी मनसोक्त नाचले. संभव आणि ओवीच्या वरातीत सर्वांची नाचण्याची हौस मात्र पूर्ण झाली.

"हो काकी," म्हणत पुढच्या पाचच मिनिटात सगळे बंगल्याच्या मुख्य द्वारापाशी आले.

तेवढ्यात नंदा ताई आरतीचे ताट घेऊन आल्या. नवरा नवरीचे औक्षण करून त्यांनी दोघांनाही काही सूचना देत आत येण्यासाठी सांगितले.

उंबऱ्यावर ठेवलेले तांदळाचे माप ओलांडण्यासाठी ओवीने तिचा उजवा पाय पुढे केला. तेवढयात प्रणितीने तिला हटकले.

"उखाणा घेतल्या शिवाय दोघांनाही आत एन्ट्री मिळणार नाही." म्हणत प्रणितीने दार अडवून धरले.

ओवी आणि संभव एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसले.

"आवरा रे तुमचं. एकदाचा उखाणा घ्या आणि आह्मलाही आत जाऊ द्या. नाचून नाचून खूप भूक लागली आता." गमतीच्या सुरात स्वराज बोलला.

"बरं ऐका...म्हणत संभवने उखाणा घेण्याची तयारी दाखवली.

"आधी मी हा...उखाणा थोडा मोठा आहे, पण समजून घ्या आणि हा उखाणा की कविता ते तुम्हीच ठरवा."

"बरं, तू बोल तर आधी." समर म्हणाला.

"ओके...ऐका...."
"पहिल्याच भेटीत भांडणं झाली,
दुसऱ्या भेटीत नात्यांची वीण अलगद उलगडली,
तेव्हाच तिच्या स्वभावाची अनेक रूपे समोर आली,
हृदयाची तार मग अलगद छेडली गेली,
तिच्या परखड व्यक्तिमत्त्वाने तर माझी विकेटच पडली,
पहिल्यांदाच एका मुलीसाठी अशी भावना मनात निर्माण झाली,
हळूहळू गाडी मग प्रेमाच्या रस्त्यावर धावू लागली,
बघता बघता आज ती लग्नापर्यंत येवून पोहोचली,
ओवीच्या साथीने फायनली संसाराची सुरुवात झाली."

ओवीचा हात हातात घेत संभवने त्याच्या उखाण्यातून त्यांची पहिली भेट ते लग्न या दरम्यानचा प्रवास मोजक्या शब्दांत वर्णन केला.

"अरे व्वा! संभव, एकच नंबर." म्हणत सर्वांनी जोरात टाळ्या वाजवल्या.

मागच्या दोन तीन वर्षातील प्रेमाचा प्रवास झरझर ओवीच्या नजरेसमोर आला. पुन्हा एकदा संभवच्या नव्याने प्रेमात पडण्यासाठी तिला जणू कारण मिळाले.

'वाव... हुश्शार आहे की पोरगं...आता माझाही उखाणा ऐकून तू हैराण होणार हे नक्की.' मनातल्या मनात ओवी बोलली.

"वहिनी आता तुझा नंबर, पाहू आता कोणाचा उखाणा बेस्ट असणार."  स्वराज बोलला.

सर्वांनी ओवीचा उखाणा ऐकण्यासाठी आता कान टवकारले.

क्रमश:

तुम्हालाही ऐकायचाय ओवीचा उखाणा? त्यासाठी पुढील भाग वाचायला विसरू नका.