Login

अधीर मन झाले..(भाग ६३)

अधीर मन झाले..कथा अनोख्या प्रेमाची
"वहिनी, आता तू घे उखाणा." म्हणत सर्वांनीच ओवीला आग्रह करायला सुरुवात केली.

"घेते...." थोडं लाजतच ओवी बोलली.

कान देवून सर्वजण ऐकू लागले.

"आयुष्याची नवी इनिंग सुरू झाली आज
देवा ब्राह्मणांच्या साक्षीने..
सासू, सासरे, नणंद, जाऊ
सर्व नाती जपेन अगदी प्रेमाने..
खऱ्या अर्थाने आज
सार्थक झाले माझ्या जीवनाचे..
कारण साता जन्माची ही गाथा
सुरू झाली आज संभवच्या साथीने.."

"एकच नंबर वहिनी.."म्हणत सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट केला.

ओवीचा चेहरा मात्र अचानक पडला. नकळत का होईना पण तिच्या उखाण्यात सार्थकचा देखील उल्लेख झाला होता. हे उखाणा घेऊन झाल्यावर तिच्या लक्षात आले. उखाणा जरी वेगळ्या अर्थाचा असला तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने सार्थकचे नाव त्यात येणे हे ओवीला स्वतःलाही अपेक्षित नव्हते.

'देवा...ही कुठली परीक्षा घेत आहेस रे तू माझी? मनी ध्यानी नसतानाही आज सार्थकचे नाव माझ्या उखाण्यात आले. संभव समोर असताना खूप वेळापासून मला सार्थकचा पुरता विसर पडला होता. पण पुन्हा एकदा त्याने अशा पद्धतीने माझ्या विचारांचा ताबा घेतला. सार्थकला दूर केले तेव्हा माझ्या आयुष्याचे सार्थक झाले, असा अर्थ होतो ना त्याचा. असे कसे काय म्हणाले पण मी? नेहमी जगाचा विचार करणारी ही ओवी आज स्वतःच्या आयुष्याच्या बाबतीत मात्र स्वार्थी झाली. भलेही माझ्या मनात तसे काही का नसेना पण पण या सगळ्याला मी जबाबदार आहे ही गोष्ट मनाला राहून राहून खात आहे.' ओवी क्षणभर नको त्या विचारांत अडकली.

ओवीचा पडलेला चेहरा पाहून संभवला मात्र न बोलताही सारे काही समजले.

'एवढं काही झालं नाही गं ओवी. उगीच टेन्शन घेऊ नको आता.' ओवीच्या हाताची पकड घट्ट करत स्पर्शातूनच संभवने तिला धीर दिला.

ओवीचा उखाणा ऐकून नंदा ताई मात्र खूपच खुश झाल्या.

'आज माझ्याही आयुष्याचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले, असे म्हणायला हरकत नाही.' मनातच नंदा ताई बोलल्या.

त्यांना आज त्यांच्या सुनेचा खूपच अभिमान वाटला. प्रत्येक नाते अगदी प्रेमाने जपण्याची ग्वाही जी तिने तिच्या उखण्यातून दिली होती. काय हवे होते आणखी त्यांना. मनासारख्या सूना मिळाल्या, समरचा बहरत असलेला सुखी संसार त्या त्यांच्या डोळ्यांनी पाहत होत्या. आता ओवीच्या साथीने संभवचा संसार देखील फुलताना त्या पाहणार होत्या. 

"ओवी, तुला सांगायची गरज नाहीये, सगळं काही तुला आधीच माहितीये पण तरी सांगते, उजव्या पायाने हे माप ओलांडून आत ये." नंदा ताई म्हणाल्या.

ओवी माप ओलांडून आत आली. आता खऱ्या अर्थाने तिने तिच्या संसारात पहिले पाऊल टाकले होते. एका क्षणात ओवीला तिची जबाबदारी कैक पटीने वाढली असल्याची मनातून जाणीव झाली.

गजबजलेले हे गोकुळ सर्वांच्याच चेहेऱ्यावरील हास्य आणि आनंदाचे कारण होते. आता ओवीची त्यात भर पडली होती.

हसतखेळत मग सर्वांची जेवणे आटोपली. एकमेकांना घास भरवत ओवी आणि संभवने पुन्हा एकदा न बोलताही त्यांच्या एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली.
त्यानंतर पुढचे सगळे खेळ अगदी उत्साहात पार पडले. रात्रीचे बारा वाजून गेले तरी सर्वांचा उत्साह अजूनही काही मावळला नव्हता. आताही नंदा ताईंनी पुढाकार घेत सर्वांना खेळ थांबवण्याची विनंती केली.

"समर तू आधी तुझ्या बायकोला समजाव आणि झोपायला सांग बरं. किती तरी वेळा सांगूनही तिने आज थोडाही आराम केला नाहीये. तिचे पाय बघ किती सुजलेत. मी तर तिला सांगून थकले बाबा, म्हणून आता तुला सांगते. आवरा आणि झोपा बरं आता शांतपणे आणि सकाळी सगळ्यांच्या आधी उठायची देखील काही गरज नाहीये, हेही जरा समजाव तिला. मान्य आहे आता शेवटी शेवटी शांत झोप लागत नाही म्हणून लगेच किचन मध्ये येवून कामाला लागायचं असा अर्थ नाही होत त्याचा." थोड्या कडक सुरात नंदा ताई बोलल्या.

"हो आई, तू काळजी करू नको ना गं. तू ना अशी पहिली सासू असशील जी इतर सासवांपेक्षा पूर्णतः विरुध्द सूचना देतेस सुनेला. इतकी काळजी करतेस तिची. आय एम प्राउड ऑफ यू आई." म्हणत समरने नंदा ताईंना प्रेमाने मिठी मारली. न राहवून कार्तिकी देखील त्यांना बिलगली.

हे सुंदर चित्र पाहून चिन्मयी क्षणभर वेगळ्याच विचारांत गुंतली.

'खरंच, आजच्या जमान्यात हे असे चित्र पाहायला मिळणं दुर्मिळच.'

"सॉरी आई. पण मी तरी काय करू. कंटाळा आलाय हो. झोपायला गेलं तरी झोपच येत नाही मला. मी मुद्दाम नाही करत काही."

"माहितीये गं मला. पण काळजी वाटते. म्हणूनच मी बोलते ना. जा आता जास्त जागरण करू नकोस. आराम पण हवाच." नंदा ताईंनी सुनेची समजूत घातली.

पुढच्या दहा मिनिटातच सगळेजण मग झोपायला निघून गेले. आईची काळजी लक्षात घेऊन समर कार्तिकीला घेऊन खोलीत गेला.

ओवी आणि चिन्मयीची झोपण्याची व्यवस्था प्रणितीच्या खोलीत केली होती. प्रणितीच्या लग्नानंतर दीपा काकिने मात्र लेकीच्या आग्रहास्तव तिची रूम अगदी जशीच्या तशी ठेवली होती.

"ओवी, तू जा चेंज करून ये आधी. ये पण तुला चालेल ना मी तुला नावाने हाक मारलेली? की वहिनी म्हणू? तू सांग बाई आताच."

"काय प्रणिती ताई...सरळ सरळ ओवीच म्हणा ओ. आधी जसं म्हणायचात ना अगदी तसं." ओवी उत्तरली.

"हो का आणि तू कधीपासून ताई म्हणायला लागली गं मला? ते काही नाही तूही मला नावानेच हाक मार. ते जास्त आवडेल मला."

"नाही ओ..आधी ठीक होतं पण आता योग्य नाही वाटत ते. त्यात कार्तिकी दी तुम्हाला ताई म्हणते मग मी तरी कसं नावाने हाक मारणार ना?'

"बरं...तुला जे कंफर्टेबल वाटेल ते तू बोल. जा आता आवरुन घे तुझं. तोपर्यंत मी हा पसारा आवरते बेड वरचा. दोन तीन दिवस खूप दगदग झाली ना. आज झोप एकदम निवांत." प्रणिती म्हणाली.

चिन्मयी देखील खूप थकली होती. कधी एकदा अंग टाकते असे झाले होते तिला.

"चिन्मयी, झोप आलीये ना गं." प्रणितीने विचारले.

"हो ना ताई. कधी एकदा पडते असं झालंय."

"दोनच मिनिट थांब, मी आवरते हा पसारा. ओवी बाहेर आली की तुही चेंज करून घे आणि मग झोप. कोणी डिस्टर्ब नाही करणार मग." हसतच प्रणिती बोलली.

घाईतच मग तिने बेडवरील सर्व पसारा आवरून बाजूला ठेवला. तेवढ्यात कोणीतरी दारावर नॉक केले.

"आता कोण आलं?" म्हणत ती दरवाजा उघडायला गेली तर समोर संभव उभा होता.

"ब्रो तू...आता ह्यावेळी? आणि तू इकडे काय करतोयस? तुझ्या रूमचा रस्ता विसरलास की काय?" संभवची खेचत हसतच प्रणिती बोलली.

"आलो तुला भेटायला. येवू शकत नाही का?" म्हणत संभव तिला बाजूला सारत आत आला.

"अच्छा! बरं मग लास्ट टाइम माझ्या रूममध्ये कधी एन्ट्री केली होती हे आठवतंय का बघ बरं जरा. आज कसा वाट चुकलास रे इकडे आणि म्हणे तुला भेटायला आलोय. जणू काही मी दुधखुळीच आहे."

"बरं, समजलंय ना तुला आता सगळं, मग नो प्रॉब्लेम."

"असं कसं? तू आधी मोठ्या आईची परवानगी घेऊन ये जा."

"आता माझ्या हक्काच्या बायकोला भेटण्यासाठी पण मला परवानगी घ्यावी लागणार का?"

"हो मग.. सत्यनारायण होईपर्यत बायकोपासून लांब राहायचं ही प्रथा आहे आपल्याकडची. माहीत नाही होय."

"नाही ना माहीत." चिन्मयीकडे पाहून डोळा मिचकावत संभव बोलला.

बहिण भावाची ही नोकझोक तीही खूप एन्जॉय करत होती.

तेवढ्यात नुकतीच फ्रेश होऊन बाथरूम मधून बाहेर आलेली ओवी समोर उभी. अचानक संभवला असं समोर पाहून ओवीची झोपच उडाली. तिचा सर्व थकवा एका क्षणात जणू नाहीसा झाला.

ओवी बाहेर येताच चिन्मयी फ्रेश होण्यासाठी आत गेली.

ओवीला समोर पाहून संभव स्तब्धच झाला. ओवीचा फ्रेश आणि टवटवीत चेहरा, मोकळे केस, रंगलेल्या मेहंदीच्या हातात भरगच्च हिरवा चुडा, नाईट ड्रेसच्या कॉलरच्या बाजूने अर्धवट बाहेर डोकावणारे मंगळसूत्र आणि हातात ओला टॉवेल हे असे ओवीचे रुप अचानक संभवच्या समोर आले. क्षणभर दोघेही मग एकमेकांच्या नजरेत गुंतले.

फेस वॉशच्या त्या मंद सुगंधाने संभव त्याच्या बायकोकडे आपसूकच खेचला जात होता. पण ही ती योग्य वेळ नव्हती. नजरेतून त्याने तिच्यावर प्रेम वर्षाव केला. संभवच्या अशा एकटक पाहण्याने ओवीलाही आता स्वतःवर कंट्रोल ठेवणे अवघड वाटू लागले. त्यामुळे लाजतच तिने नजर खाली झुकवली.

"बरं तुमचा हा नजरेतील रोमान्स झाला असेल तर झोपुयात का मग आता आणि ब्रो तू पण जा बरं झोपायला. नाहीतर मोठी आई आली ना तर तिचे लेक्चर ऐकून घ्यावे लागेल आपल्याला. तुझ्या बरोबर आम्हालाही बोलणी बसतील मग आणि तसंही ह्या दोघीही खूप थकल्यात रे. झोपू दे त्यांना आता आणि तूही जाऊन झोप. तुलाही आरामाची खूप गरज आहे."

"प्रणे...ऐक ना गं. मला फक्त दहा मिनिट माझ्या बायकोसोबत वेळ घालवायचा आहे. प्लीज काहीतरी कर ना." प्रणितीला मस्का मारत संभव बोलला.

"ये बाबा, मी काय करणार आता? आणि मी एकटीच नाहीये इथे हे समजत नाहीये का तुला. चिन्मयी पण आहे ना रूममधे. एकटी असते तर मी स्वतः बाहेर निघून गेले असते दहा मिनिटांसाठी. हे कसं कळत नाही का तुला आणि आता अजून दोन दिवस धीर धर की जरा. मग तुझी बायको तुझ्याच मिठीत असेल." गालातल्या गालात हसत, संभवची खेचत हळू आवाजात प्रणिती बोलली.

"हो..तेव्हा तर असेलच गं. पण आज पण तिच्याकडून एक जादूची झप्पी हविये मला. म्हणजे पुढचे दोन दिवस मग धीर धरायला सोप्पं जाईल."

"बापरे.. कसा आहेस रे तू. तू नक्की माझा ब्रो च आहेस ना? खरंच माझा विश्वास बसत नाहीये." संभवला इतके उतावीळ झालेले पाहून त्याच्या खांद्यावर एक चापटी मारत प्रणिती बोलली.

संभवची ही धडपड पाहून ओवीही मनोमन सुखावत होती. अर्थातच तिलाही संभव सोबत काही काळ का होईना पण तो एकांत अनुभवायचा होता. 

"मला काही माहीत नाही प्रणी, मी टेरेसवर जातोय. चिन्मयी झोपली की मग हिला वर घेऊन ये, फक्त दहा मिनिटांसाठी. प्लीज माझ्यासाठी एवढं कर ना."

"तू पण ना ब्रो. आधीच खूप झोप येतिये यार मला आणि तुमचं इथं वेगळंच सुरू आहे. त्यात आता तू आलायेस तर हीचा चेहरा बघ खुललाय. काही वेळापूर्वी हिला खूप झोप आली होती आता गेली हीची झोप. तुझी बायको पण तुझ्यासारखीच." ओवीला टोमणा देत प्रणिती बोलली.

प्रणितीच्या अशा बोलण्यावर आता लाजावं की हसावं हेच ओवीला समजेना.

"समजून घे ना यार प्रणी,चार वर्ष या क्षणाची वाट पाहत होतो आम्ही. आज स्वप्न सत्यात उतरलंय. मग आमच्या मनाची घालमेल कशी समजत नाही यार तुला? तुझंही लग्न झालंय ना गं, निदान तू तरी समजून घ्यायला हवं ना."

"हो का...बरं बाबा जा, नको आता जास्त इमोशनली ब्लॅकमेल करुस मला. ओवीला घेऊन येते मी थोड्या वेळात." हे ऐकताच संभवचा चेहरा आनंदाने खुलला. ओवीदेखील मनोमन मोहरली. लाजेची लाली तिच्या चेहऱ्यावर पसरली.

"दॅट्स लाईक माय लव्हली सिस्टर." प्रणितीचे गाल ओढत संभव बोलला आणि हसतच तो तिथून निघून गेला.

"काय मग..मज्जाये बाबा आज कोणाची तरी." प्रणितीने पुन्हा एकदा ओवीची खेचायला सुरुवात केली.

प्रणितीचे बोलणे ऐकून ओवीच्या चेहऱ्यावरील लाजेची लाली अधिकच गडद झाली.

तेवढ्यात चिन्मयी तिचे आवरुन बाहेर आली.  ह्या दोघी मात्र लगेचच जणू काही घडलेच नाही असे दाखवत वागू लागल्या.

"बरं चिनू, तू त्या बाजूने झोप. मी ह्या बाजूने झोपते." ओवी म्हणाली.

"हो गं झोपते. मला तर आता जिथे पडेल तिथे झोप लागेल बघ, इतकी झोप आलीये. चलो तुम्हा दोघींनाही गुड नाईट आणि ओवी स्पेशली तुला स्वीट ड्रीम बरं का." ओवीला चिडवत चिन्मयी बोलली आणि तिची काही प्रतिक्रिया येण्या आधीच तिने तोंडावर ब्लँकेट ओढले.

खूपच थकवा जाणवत असल्यामुळे पुढच्या पाचच मिनिटात तिला झोप लागली सुद्धा.

"बरं ओवी, चल जायचं का मग. ब्रो तिथे तुझी वाट पाहत असेल." इशाऱ्यातूनच प्रणिती बोलली.

काहीही न बोलता ओवीने लाजतच मान खाली घातली.

"आता लगेच इथे नको लाजू. ब्रोसाठी शिल्लक ठेव तुझे हे लाजणे."

"तुम्ही पण ना ताई."

"बरं चल पटकन्. कोणी आले तर अवघड होईल मग." हळूच दरवाजा उघडत प्रणिती बोलली.

इकडे तिकडे कोणी आहे का पाहत दोघीही हळूच टेरेसच्या दिशेने निघाल्या.

"तुम्ही दोघी झोपला नाहीत अजून? आणि इकडे कुठे निघालात?"

अचानक कानावर आवाज पडला तशा दोघीही जागेवरच स्तब्ध झाल्या.

क्रमशः

काय होणार आता पुढे? जाणून घेण्यासाठी वाचत राहा 'अधीर मन झाले..एक प्रेमकथा.'

(वाचकांना एक नम्र विनंती आहे, तुम्हाला जर कथा मनापासून आवडत असेल तर किमान दोन शब्दांची का होईना पण कमेंट जरूर करा. अगदी एखादा ईमोजी जरी दिला तरी त्याचा आनंद खूप मोठा असेल आणि नसेल आवडत, लिखाणात काही चूक असेल तसेच काही सुधारणा सुचवायच्या असतील तर त्याही आवर्जून सुचवा. कारण कथेचे भाग वेळेत पोस्ट होत नाही हे सांगायला बरेच जण येतात, पण जेव्हा भाग वेळेत पोस्ट केला जातो तेव्हा मात्र आधीच्या भागाला कमेंट करणारे वाचक गायब होतात.(अपवाद वगळता). ह्या कथेच्या बाबतीत अगदी सुरुवातीपासून असेच झाले आहे. पुढचा भाग आला नाही की मग वाचक आधीच्या भागावर कमेंट करतात पुढचा भाग कधी येणार म्हणून. पण मग ज्या दिवशी भाग येतो त्याच दिवशी जर नियमित वाचकांनी लेखकाला प्रोत्साहन दिले तर पुढे लिहायला हुरूप येतो. पण तसे न झाल्यामुळे ह्या कथेला इतकी लांबड लागली आहे. मान्य आहे मध्यंतरी मी वेळेत भाग दिले नाहीत, माझी चुकदेखील मी अगदी प्रांजळपणे मी मान्य करते पण नाण्याची दुसरी बाजू प्रत्येक वेळी नाही मी कथन करू शकत.
तर सांगण्याचा उद्देश एकच की एक ते दीड हजार शब्दांचा भाग लिहायला एका सांसारिक स्त्रीला तिचा संसार, तिची मानसिकता, तब्बेत हे सारं सांभाळून किती वेळ लागत असेल याचा एक स्त्री म्हणून तुम्ही अंदाज लावूच शकता. पण कथा कशी सुरू आहे हे जर समजलेच नाही तर पुढे ती लिहिण्याची इच्छा तरी कशी होईल ओ? बऱ्याचदा सगळी कामं सोडून लिखाण करावे लागते, फक्त वाचकांच्या प्रेमापोटी अगदी निरपेक्ष भावनेतून आम्ही हे करत असतो. पण वाचक जर दिशाच दाखवणार नसतील तर ही कथा माझ्याकडून तरी कशी पूर्ण होईल? कारण तुम्ही वाचक आहात म्हणून आमच्या लिखाणाला अर्थ आहे. अन्यथा सारे व्यर्थ आहे. चुकून जर जास्त बोलले असेल तर त्यासाठी क्षमस्व.)