Login

अधीर मन झाले..(भाग ६४)

अधीर मन झाले.. कथा अनोख्या प्रेमाची
संभवने सांगितल्याप्रमाणे प्रणिती ओवीला घेऊन टेरेसवर जाण्यासाठी निघाली. तेवढ्यात अचानक कानावर आवाज पडला तशा त्या दोघीही जागेवरच स्तब्ध झाल्या.

"तुम्ही दोघी झोपला नाहीत अजून? आणि इकडे कुठे निघालात?"

आवाजाच्या दिशेने दोघीही वळल्या. तर समोर नंदा ताई उभ्या होत्या. आता तर भर उन्हाळ्यातही दोघींना घाम फुटला होता.

"अगं, काय विचारलं मी? झोप येत नाही का? इकडे कुठे निघालात तुम्ही." नंदा ताईंनी प्रश्न केला.

"अगं मोठी आई, आम्ही ना टेरेस वर जात होतो." चाचपडतच प्रणिती बोलली.

"आता? ह्यावेळी? तेही रात्रीच्या एक वाजता?" शंकास्पद सुरात नंदा ताईंनी धडाधड प्रश्न केले.

"अगं रूममधे खूप गरम होत होतं ना त्यामुळे म्हटलं थोडा वेळ मोकळ्या हवेत जाऊन यावं." घाबरतच प्रणितीने थाप मारली.

"एसी आहे ना तुझ्या रूममधे? मग?
इतकी दगदग झालिये गुपचूप झोपून घ्यायचं सोडलं आणि टेरेसवर निघाल्यात." रागीट सुरात नंदा ताई बोलल्या.

"मोठी आई, जाऊदे ना प्लीज. अगं आधीच मागचे दोन तीन दिवस माणसांच्या गर्दीने अगदी कोंडल्यासारखे झाले आहे. थोडं फ्रेश फील होईल गं मोकळ्या हवेत जाऊन."

"अगं अजून पुढचे दोन दिवस असंच जागरण होणार आहे. मागचे आठ दिवस असेच सुरू आहे. उगीच आजारी पडाल गं मुलींनो. म्हणून म्हणतेय ना मी."

"अगं पंधरा मिनिटांनी काय होणार आहे मोठी आई? आणि खरं सांगू का झोपेची खरी गरज तर सगळ्यांत जास्त तुला आहे. रोज सगळ्यांच्या आधी उठतेस आणि सगळ्यांत शेवटी झोपतेस. मग आता तूच सांग कोण आजारी पडणार आधी,?"

"मी आजारी पडले तरी काहीच टेन्शन नाही आता मला?

"ते कसं?"

"अगं आता आपल्या घरात एक हुशार डॉक्टर आहे मग घाबरायचं कारणच नाही ना." ओवीकडे पाहत हसतच नंदा ताई बोलल्या.

ओवी आणि प्रणितीलाही मग हसू आले.

"अगं हो, हे तर मी विसरलेच बघ." प्रणिती म्हणाली.

"पण म्हणजे उगीचच हाताने आजार वाढवून घ्यायचा असा अर्थ होत नाही ना त्याचा."

"हो गं, माहितीये मला."

"पण मोठी आई, तू अजून जागीच?"

"अगं कार्तिकी झोपली का ते पाहून आले. तिची डिलिव्हरी होईपर्यंत माझी अशीच तगमग सुरू राहणार बघ."

"नको गं इतकं टेन्शन घेऊस. तुझी काळजी करण्याची सवय कधी जाईल गं. सतत सर्वांची काळजी करत असतेस."

नंदा ताई एक सासू असून सुनेची इतकी काळजी घेत आहेत, हे पाहून ओवी मनोमन सुखावली. यावरून ती आणि कार्तिकी, किती नशीबवान आहेत याची प्रचिती तिला पावलोपावली येत होती.

'अशी समजूतदार आणि जीव लावणारी सासू सर्वांना मिळो,' म्हणत ओवीने मनोमन देवाचे आभार मानले.

"बरं जा तुम्हाला टेरेसवर जायचं आहे तर जाऊन या पटकन् पण उगीच गप्पा मारत टाइमपास करत बसू नका. मीही झोपते आता. खूपच थकायला झालंय."

"ओके, गुड नाईट." म्हणून दोघीही मग टेरेसवर गेल्या. नंदा ताई देखील मग झोपायला निघून गेल्या.

तिकडे संभव, ओवी आणि प्रणितीची वाट पाहून कंटाळला होता. मोबाईलवर ओवीचे जुने फोटो बघत तो क्षणभर जुन्या आठवणींत रममाण झाला.

'खरंच किती सुंदर होता हा इथपर्यंतचा प्रवास. असं वाटतंय अजूनही मी स्वप्नातच आहे. ओवीशी माझं लग्न झालंय यावर अजूनही पुरता विश्वास बसत नाहिये.' संभव स्वतःशीच बोलत होता.

"असा कसा तुझा विश्वास बसत नाहीये? हे बघ, तुझी बायको तुझ्या समोर उभी आहे. बसला का आता विश्वास? चांदण्या रात्रीतही तिचा चेहरा बघ किती उठून दिसत आहे." हसतच प्रणिती म्हणाली.

"किती वेळ लावला यार तुम्ही दोघींनी. मी आता कंटाळून शेवटी खाली येणार होतो."

"बरं झालं आला नाहीस ते. मोठ्या आईने नेमकी आम्हाला वर येताना पाहिले. तिच्या प्रश्नांची उत्तरे देताना नशीब माझी बोबडी वळली नाही. तिला चुकून जर डाऊट आला असता ना ब्रो तर तुझंही मग काही खरं नव्हतं."

प्रणिती एकटीच बडबडत होती. ह्या दोघांना मात्र वेगळीच ओढ लागली होती. प्रणितीच्या हे लक्षात आले.

"बरं चालू द्या तुमचं. मी जाते खाली. आता तुमचं काम झालंय ना, मग आता माझी काय गरज ना इथे." लटक्या रागातच प्रणिती बोलली.

"झाले का तुझे टोमणे मारून?"

"नाही अजून, उरलेले टोमणे नंतर मारते आणि हो मी खाली जाते आता, पण ओवी पुढच्या पंधराव्या मिनिटाला मला तू रूम मध्ये हवी आहेस."

"बरं सासूबाई, अगदी ठरल्या वेळेत पाठवतो हा मी तिला." संभव बोलला.

"बेस्ट लक, एन्जॉय युअर क्वालिटी टाइम आणि हो सर्वांत महत्त्वाची गोष्ट...ओन्ली फिफ्टीन मिनिट्स हा." पुन्हा एकदा हसतच ओवी बोलली.

"हो, माहितीये मॅडम. आता तू जातेस की थांबतेस आमच्यासोबत? आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. हो ना ओवी?" ओवीकडे पाहून डोळा मिचकावत संभव प्रणितीला म्हणाला.

"तुम्हाला नसेल लाज, पण मला आहे बरं का. जाते मी, बाय. या लवकर." म्हणत फायनली प्रणिती निघून गेली.

चंद्राच्या त्या मंद प्रकाशात एकमेकांवर नितांत प्रेम करणारे ते दोन जीव आता एकमेकांच्या अगदी जवळ होते. दोघांच्याही हृदयाची धडधड प्रचंड वेगाने वाढली होती. दोघांच्याही चेहऱ्यावरील लाजेची लाली हळदीच्या त्या पिवळसर रंगात अधिकच खुलून दिसत होती. शब्दांनीही अचानक कुठेतरी दडीच मारली होती जणू. इकडे तिकडे बघत ओवीने चांदण्या रात्रीत आजूबाजूच्या इमारतींवरुन एक नजर फिरवली. आभाळातील चांदण्यांचा जमिनीवर जणू सडाच पडला होता. त्यामुळे दुरचेही अगदी स्पष्ट दिसत होते. म्हणून की काय पण ओवी थोडी अन्कन्फर्टेबल फील करत होती.

"टेन्शन नको घेऊ गं. बी रीलॅक्स्ड आणि तसंही आता आपण लिगली नवरा बायको आहोत. त्यामुळे कोणाला कशाला घाबरायचं? आजूबाजूला कोणी असेल, कोणी आपल्याला पाहिलं तर काय होईल? हा विचार सोड ना तू."

"तसं नाही रे पण वाटतं ना."

"मी समोर असताना असे विचार मनात तुझ्या मनात येतातच कसे पण. ते जाऊ दे आपल्याकडे फक्त दहाच मिनिट आहेत आ ओवी. तेही असेच वाया घालवायचे का?" न राहवून ओवीचा हात हातात घेत संभव बोलला.

काहीही न बोलता संभवच्या हाताची पकड घट्ट करत लाजून तिने नजर खाली झुकवली.

असे असले तरी प्रेमाच्या त्या एका मिठीसाठी दोन्ही जीव प्रचंड आसुसले होते. क्षणाचाही विलंब न लावता संभवने ओवीला आपल्या बाहुपाशात घेतले. प्रेमाच्या त्या एका मिठीत संपूर्ण जगाचा क्षणभर दोघांनाही जणू विसर पडला. एकमेकांवर नितांत प्रेम करणारे ते जीव एकमेकांच्या मिठीत स्वर्ग सुखाची जणू अनुभूती घेत होते.
या सुंदर सोनेरी क्षणाचा साक्षीदार होता अवकाशातील तो चंद्रमा. त्या दोन जीवांवर तो स्वर्गातून जणू भरभरून प्रेम वर्षाव करत होता. त्यांच्या भावी जीवनासाठी त्यांना शुभेच्छा देत होता.

इतक्या दिवसांची प्रतिक्षा आज थोडीफार का होईना पण संपली होती. दोन ह्रदये आता एक होऊन त्या चांदण प्रकाशात एकमेकांची धडधड स्पष्टपणे जणू ऐकत होती. त्यात वाढलेली श्वासांची गती हलकेच एकमेकांच्या मानेवर विसावत होती. हा क्षण इथेच गोठावा असे दोघांनाही मनोमन वाटत होते. पण मर्यादेची शेवटची काही बंधने अजूनही बाकी होती. याचे भान दोघांनाही होते.

"लव यू बायको." म्हणत संभवने ओवी भोवतीची मिठी अधिकच घट्ट केली.

थोड्याच वेळात मिठीची पकड सैल करत आणि हलकेच तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेत त्याने क्षणभर त्यावर नजर स्थिर केली. ओवीने मात्र डोळे घट्ट बंद केले होते. स्वतःला पूर्णपणे संभवच्या स्वाधीन करत तिने त्याच्या प्रेमाचा आदर ठेवला होता. 'नाही' हा शब्द जणू ती विसरूनच गेली होती. परंतु, त्या चांदण प्रकाशात देखील ती त्याच्या नजरेचा सामना करू शकत नव्हती.

"ओवी, अगं डोळे उघडून एकदा बघ तरी माझ्याकडे." लाडीक सुरात संभव बोलला.

"अहं..." लाजतच ती उत्तरली.

न राहवून संभवने आपले ओठ तिच्या नाजुक नयनांवर स्थिर करत अलगद त्यांचे चुंबन घेतले. तशी ती मोहरली. तिच्या ओठांच्या पाकळ्या अलगद रुंदावल्या आणि हलकेच त्यावर स्मित फुलले. प्रेमाची वेगळीच अनुभुती तिच्या सर्वांगावर रोमांच खुलवून गेली.

"आता तरी डोळे उघड. माझी ही एवढीशी इच्छा तू पूर्ण करणार नाहीस ओवी." संभव बोलला तशी ती पुन्हा भानावर आली.

अलगद डोळे उघडून हलकेच तिने संभवच्या नजरेला नजर दिली. लाजेचे स्मित दोघांच्याही चेहऱ्यावर उठून दिसत होते.

"खूप गोड दिसतीयेस, जितकी लग्नाच्या मेकअपमध्ये तितकीच विदाउट मेकअप मध्ये सुद्धा."

"तूही तितकाच स्मार्ट दिसत आहेस. तुझ्यावर किती प्रेम करू नि किती नाही असं झालंय बघ."
संभवचे दोन्ही हात स्वतःच्या कमरेभोवती ओढत आणि आपल्या दोन्ही हातांचा हार त्याच्या गळ्यात गुंफत ती बोलली.

हे संभवला अगदी अनपेक्षित होते.

'काही वेळापूर्वी आपल्या नजरेला नजरही न देवू शकणारी आपली बायको एकदम आपल्याला असे जवळ घेत आहे.' हे पाहून तोही पुरता घायाळ झाला. स्वतःला तिच्या स्वाधीन करण्यासाठी जणू तोही आता आसुसला होता.

आपला चेहरा संभवच्या अगदी जवळ नेत तिने अलगद त्याच्या कपाळावर आपले ओठ स्थिर केले. अलगद त्याचे डोळे मिटले गेले. प्रेमाची ही सुंदर अनुभती त्याने हृदयाच्या कप्पात त्वरित बंदिस्त केली.

ओठांचा मार्ग बदलत ती त्याच्या कानात हळूच पुटपुटली.
"पंधरा मिनिटांची वेळ संपली आता नवरोबा. आजच्या पुरतं एवढंच बस."

तिचे उबदार श्वास त्याच्या कानात गुदगुल्या करून गेले. तसा तो शहारला. सारं काही स्वप्नवत आहे असेच क्षणभर त्याला वाटले. अलगद मग त्याने डोळे उघडले. पुन्हा एकदा एकमेकांच्या नजरेला नजर देत दोघांनीही गोड स्मित केले.

"एक मोठ्ठा श्वास घेत त्याने हा सर्व वेळ मनात कायमस्वरूपी बंदिस्त केला."

"जाऊयात आता?" ती म्हणाली.

"इतकी रोमँटिक बायको जवळ असेल तर कोणत्या नवऱ्याची जाण्याची इच्छा होईल?"

"पण जावं तर लागेलच ना."

"जाऊयात पण त्याआधी एक जादूची झप्पी दे ना."

हसतच दोघेही मग काही सेकंद एकमेकांच्या मिठीत शिरले. तिने त्याच्या गालावर अलगद आपले ओठ टेकवले. त्यानेही मग तिचे अनुकरण करत तिच्या गालावर त्याचे ओठ स्थिर केले.

"चलो.. फायनली आता जाऊयात खाली." म्हणत दोघेही मग आपले हात एकमेकांच्या हातात गुंफत अंदाज घेत जिन्यातून खाली आले.

एकमेकांना "बाय.. गुड नाईट," म्हणत दोघेही आपापल्या खोलीत गेले.

हळूच दरवाजा उघडून ओवी तिच्या रूममध्ये आली. रुममध्ये मंद उजेड होता.

तेवढ्यात प्रणितीने एकदम मोबाईलचा टॉर्च सुरू केला.

"मॅडम दहा मिनिट उशिरा आलात आ आपण. याची शिक्षा तर तुला आता भोगावीच लागणार."

"शिक्षा..कोणती शिक्षा?"

"इकडे ये सांगते."

ओवी मग प्रणितीच्या जवळ गेली.

"काय शिक्षा देणार आता मला?"

"कशी होती प्रेमाची ती मिठी? हे थोडक्यात सांग न मला. हीच शिक्षा आहे तुझी."

"गप्प बसा ओ ताई, काहीही काय?" लाजतच ओवी बोलली.

"ओय होय, कसली भारी लाजतेस गं. सांग ना पण. ऐकायला आवडेल मला."

"त्यात काय ऐकायचं. उलट तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवी आहात. सारं काही तुम्हाला न सांगताही समजायला हवं ना."

"हो गं..पण आमचं अरेंज मॅरेज आणि तुमचं लव मॅरेज. मग आमचं तुमचं सगळं कसं सेम असणार? एकमेकांना ओळखायच्या आधीच सर्व काही झालं होतं आमच्यात. तुमचं तसं नाही ना. तुमचं सगळं कसं अगदी स्टेप बाय स्टेप सुरू आहे. हे फिलिंग तुमच्या आयुष्यातील बेस्ट फिलिंग असणार याची खात्री आहे मला. हो ना?"

"अगदीच."

"मग सांग ना."

"नक्की सांगेल पण पुन्हा केव्हातरी. कारण ह्या क्षणी आता फक्त ते सारं फील करावंसं वाटतंय ताई. सॉरी पण काहीही बोलण्याची सध्या तरी इच्छा नाही. तुम्ही समजून घ्याल याची मला खात्री आहे."

"बस का. मी नाही समजून घेणार मग कोण घेणार? पण आजची शिक्षा फक्त काही काळासाठी पोस्टपोन झालिये कॅन्सल नाही हे विसरू नको बरं."

"अजिबात नाही विसरणार."

"बरं आता खूप वेळ जागरण करत बसू नकोस. आधीच खूप उशीर झालाय. झोप आता." प्रणिती बोलली.

पण काही केल्या ओवीला झोपच लागेना. संभवचा चेहरा काही केल्या तिच्या डोळ्यांसमोरून हटायला तयारच नव्हता. तो दिवस, ती रात्र तिच्या आयुष्यातील अनेक सुखद क्षणांची अनुभूती देणारे ठरले होते.

क्रमशः

ओवी आणि संभवच्या नात्याचा असाच सुंदर प्रवास अनुभवण्यासाठी वाचत राहा ' अधीर मन झाले.. एक प्रेमकथा.'