Login

अधीर मन झाले..(भाग ६६)

अधीर मन झाले..कथा अनोख्या प्रेमाची
एकीकडे कार्तिकीची डिलिव्हरी आणि दुसरीकडे आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात त्यामुळे ओवीसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. दोन्ही गोष्टी तिच्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या होत्या. क्षणभर ती विचारांत गुंग झाली. हातात पॅरीस टूरची तिकिटे होती पण अजूनही निर्णयापर्यंत ती काही पोहोचू शकली नव्हती.

"ओवी, काय गं..काय म्हणतिये मी? जाताय ना मग तुम्ही?" नंदा ताईंनी तिची तंद्री भंग केली.

"आई, अहो जाण्याची तर खूप इच्छा आहे ओ, पण नेमकी दीची ही अशी अवस्था. माझ्या दीला बाळ होणं ही खूप मोठी गोष्ट आहे ओ माझ्यासाठी. माहीत नाही का, पण त्या सुंदर क्षणाचा आपणही प्रत्यक्ष साक्षीदार व्हावं असं वाटतंय."

"हो गं, अगदीच समजू शकते मी तुझ्या भावना. पण ही वेळही महत्त्वाची आहे असं नाही का वाटत तुला? आणि विशेष म्हणजे कार्तिकीची सुद्धा अशीच इच्छा आहे."

"हो आई माहितीये मला. ती म्हणाली पण होती मला तसं, पण माझीच इच्छा नव्हती जाण्याची. मी संभवला पण सांगितले की नको जाऊयात आपण. कारण पुढे लवकरच त्याची सुट्टी संपेल. त्यामुळे घरच्यांसोबत पण खूप कमी वेळ मिळेल त्याला. त्याची उरलेली सगळी सुट्टी अशी बाहेर फिरण्यातच जाईल मग."

"ओवी, अगं सतत असा सर्वांचा विचार करत बसशील ना तर आयुष्यातील खूप सुंदर अशा क्षणांना मुकशील बरं तू. म्हणून म्हणते की, कधीतरी स्वार्थी होऊन फक्त स्वतःचाही विचार करावा माणसानं आणि असं करणं यात काहीही चुकीचं सुध्दा नाहीये बरं का." समजावणीच्या सुरात नंदा ताई बोलल्या.

"ओवी, अगं आई बरोबर बोलतिये. संभव आणि तू, ही इतकी सुंदर संधी सोडू नये असे मलाही वाटते. हवंतर तू एकदा कार्तिकी सोबत पण बोलून घे. तुझ्या आई बाबांचा देखील सल्ला घे. आणि माझी खात्री आहे, सगळेच जण तुला जाण्याचाच सल्ला देतील बघ आणि हो संभवच्या मनाचा देखील विचार कर एकदा." समजावणीच्या सुरात समर बोलला.

"ओवी, यार किती नशीबवान आहेस बघ तू. इतर सूना असं बाहेर फिरायला जाण्यासाठी हट्ट करतात तेव्हा त्यांच्या घरचे आणि विशेष करून सासवा त्यांना टोकतात आणि इथे तू एक सून अशी आहेस जिला घरचे जा म्हणून सांगताहेत आणि तू नाहीचा पाढा लावलाय. खरंच खूप अवघड आहे बाई माझ्या भावाचं. बिच्चारा माझा ब्रो." प्रणितीने सुद्धा मग तिचे मत मांडले.

सगळ्यांचा हा असा आग्रह आता ओवीलाही मोडवेना.

"बरं बाबा, जातो आम्ही पण त्याआधी मी जरा दीसोबत आणि आई बाबांसोबत बोलून घेते." ओवी म्हणाली.

तिने लगेचच कार्तिकीला फोन लावला.

"माझी अजिबात काळजी करू नकोस, तू तुझ्या आयुष्यातील हे सुखाचे क्षण आधी जग. कारण पुन्हा ही अशी संधी मिळाली तरी त्यात म्हणावे तितके नावीन्य तेव्हा उरणार नाही." म्हणत तिनेही तिला जाण्यासाठी आग्रह केला.

सीमा ताई आणि रमाकांतरावांचे कधी नव्हे तो आज या विषयावर एकमत झाले होते.

संभव आणि ओवी काही गरजेची शॉपिंग करण्यासाठी मग बाहेर गेले. जे हवं नको ते सारं काही त्यांनी खरेदी केलं. अर्थातच ओवी नाही म्हणत होती पण तरीही संभवच्या आग्रहास्तव तिने त्याच्या आवडीचे कपडे खरेदी केले.

बाहेर गेल्यावर न चुकता ओवीने आश्रमाला धावती भेट दिली. तिला पाहून सर्वांना खूपच आनंद झाला. सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत तिने त्यांच्यासाठी नेलेली मिठाई देवून सर्वांचे तोंड गोड केले. ओवी आली की आश्रम अगदी गजबजून जायचा. अगदी तसेच आताही झाले. सर्वांच्या तब्बेतीची चौकशी करत सवयीप्रमाणे तब्बेतीची काळजी घेण्याचा सल्ला तिने आवर्जून दिला. ओवी म्हणजे आश्रमातील प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली होती. इतक्या लहान वयात तिचे हे कार्य खरंच कौतुकास्पद होते. संभव तिच्या ह्याच गुणांवर भाळला होता.

लग्नानंतर सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी ती खासकरून आश्रमात आली होती. सर्वांनी ओवी आणि संभवला मग भरभरून आशीर्वाद दिले.

सर्वांचे हे ऋणानुबंध पाहून आणि ह्या सगळ्याचा मूळ धागा ओवीमुळे आज घट्ट झालाय हे पाहून संभवला त्याच्या लाडक्या बायकोचा खूपच हेवा वाटत होता.

"जावईबापू आमच्या लेकीची नीट काळजी घ्या बरं का." सर्वांनी मग संभवला विनवणी केली.

सर्वांचे असे प्रेम पाहून ओवीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

"अजिबात काळजी करू नका. तुमची लेक आता माझी जबाबदारी आहे. तिला सुखी ठेवणं हे तर आता माझं कामच आहे." संभव म्हणाला.

सर्वांचा निरोप घेऊन मग ओवी आणि संभव आश्रमातून बाहेर पडले. सर्वजण अगदी गेटपर्यंत त्यांना सोडायला त्यांच्या मागे मागे आले होते. हीच तर खरी ओवीच्या आयुष्यातील खूप मोठी कमाई होती.

रात्रीच्या फ्लाईटने दोघेही मग त्यांच्या नव्या प्रवासाच्या दिशेने रवाना झाले. समर त्यांना एअर पोर्टपर्यंत सोडायला गेला. खूप साऱ्या शुभेच्छा देवून त्याने त्या दोघांनाही हसत हसत निरोप दिला.

'या सुंदर क्षणाचा आपण साक्षीदार होऊ शकलो नाही,' म्हणून कार्तिकीला खूपच वाईट वाटले.

तिकडे संभव आणि ओवीच्या नात्याचा नवीन प्रवास अनेक सुखद अशा आठवणींचा साक्षीदार होऊ पाहत होता. एकमेकांचा सहवास दोघांनाही हवाहवासा वाटत होता. प्रेमाची पालवी कणाकणाने वाढत होती, फुलू पाहत होती आणि बहरण्यासाठी देखील ती सज्ज होती.

संभवला फ्लाईटची नेहमीची सवय होती. पुणे ते दिल्ली असा प्रवास तो अनेकदा फ्लाईटनेच करायचा. पण ओवीची ही पहिलीच वेळ होती फ्लाईटमध्ये बसण्याची.

आयुष्यातील फ्लाईटचा हा तिचा पहिलाच अनुभव आणि तोही आपल्या सर्वात प्रिय व्यक्ती सोबत. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. ती स्वतःला खूपच भाग्यवान समजत होती.

संभवचा हात हातात घट्ट पकडून ती त्याचा प्रेमळ सहवास, प्रेमाचा तो सुगंधी स्पर्श मनाच्या कप्प्यात अलगद साठवून ठेवत होती. संभव देखील तिचा हा खट्याळपणा स्मित चेहऱ्याने न्याहाळत होता. त्या क्षणी, 'यापेक्षा स्वर्गसुख ते दुसरे कोणते असू शकते?' हा प्रत्यय दोघांनाही जणू येत होता.

एकमेकांच्या सहवासातील हा पहिलाच मोठा प्रवास दोघांच्याही अगदी आयुष्यभर लक्षात राहणारा होता. नवीन लग्न झालेली दोन मने एक होऊ पाहत होती. नव्या प्रेमाची ती नवी नवलाई सहवासाने अधिकच खुलली होती, मनातील भावना स्पर्शातून व्यक्त होत होत्या, जगाचा विसर पडायला लावणारी ती स्पर्शभूक जाणीवेच्याही आता खूप पलीकडे गेली होती. नजरेतून एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव सुरू होता.

"थॅन्क्स सोनुल्या." संभवच्या हाताची पकड अधिकच घट्ट करत आणि अलगद त्याच्या हाताचे चुंबन घेत ओवी बोलली.

"अरे काय हे? आणि का गं, मध्येच आता हे थॅन्क्स कशासाठी?" आश्चर्यकारकरित्या संभवने विचारले.

"तू माझ्या आयुष्यात येण्यासाठी, माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेमाची जाणीव निर्माण करण्यासाठी आणि मला तुझ्यावर प्रेम करायला भाग पाडण्यासाठी आणि याहीपेक्षा जास्त, माझ्यावर भरभरून प्रेम करण्यासाठी. या आणि अजून अशा कितीतरी गोष्टीसाठी थॅन्क्स." ओवी म्हणाली.

" मग हे थँक्यू तू नाही तर मी म्हणायला हवं ना तुला."

"ते कसं?"

"ते कसं...ते नाही माहित, पण जे जे तू आता बोललीस त्या सर्वासाठी माझ्याकडून पण तुला बिग थँक्यू." संभव म्हणाला.

हसत खेळत गप्पा मारत दोघांचाही प्रवास सुरू होता. अगदी पोटभर गप्पा झाल्यानंतर ओवीला डोळा लागला. संभवचा हात घट्ट पकडून त्याच्या खांद्यावर डोके ठेवून ती शांत झोपी गेली. झोपेतील तिचे ते निरागस रूप पाहून संभव वारंवार तिच्या प्रेमात पडत होता. शक्य तितके तिला नजरेत सामावून घेत होता. एकमेकांच्या सोबतीततला प्रत्येक क्षण स्वर्ग सुखाची अनुभूती देत होता. ओवीला न्याहाळत त्यालाही कधी झोप लागली ते त्याचे त्यालाही समजले नाही.

दोघांनाही जाग आली ती फ्लाईट लॅड झाल्यावरच. तब्बल तेरा तासांचा प्रवास करून फायनली दोघेही त्यांच्या आयुष्यातील त्या अनोख्या वळणावर पोहोचले. पण अजूनही सगळीकडे अंधार पसरलेलाच होता. त्यात प्रेमाच्या गुलाबी रंगात दोघेही अगदी न्हाऊन निघाले होते. प्रितीचा बहर नात्याची वीण अधिकच घट्ट करू पाहत होता.

पॅरिसमधील वेळेनुसार रात्रीचे दोन वाजले होते. थोड्याच वेळात संभव ओवीला घेऊन पॅरीसच्या त्या आलिशान हॉटेलमधे पोहोचला. दोघांनाही सारे काही स्वप्नवत भासत होते. राहण्याची व्यवस्था उत्तम होती. ओवी तर खूपच खुश झाली. भविष्यात आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत अशा ठिकाणी जायची संधी मिळेल, तेही हनिमूनसाठी; याचा तिने स्वप्नातही कधी विचार केला नव्हता.

तिथे पोहोचल्यावर त्यांना दिली जाणारी स्पेशल ट्रीटमेंट पाहून तर दोघेही हरखून गेले. कदाचित समरने हे सगळे मॅनेजमेंट आधीच सेट केले असावे अशी संभवची आता खात्रीच पटली.

"वेलकम सर, वेलकम मॅम." तिथे नाईट ड्युटीवर असलेला अंदाजे बाविशीतील एक तरुण गोड स्मित करत बोलला.

आदराने त्याने ओवी आणि संभवचे स्वागत केले.

"प्लीज सर कम विथ मी." तो म्हणाला आणि पुढे चालू लागला. ह्यांच्या बॅगा त्याने दुसऱ्या एका व्यक्तीला त्यांच्या रुममध्ये घेऊन यायला सांगितले.

रूममधे येताच ओवी आणि संभव दोघेही आणखीच भारावून गेले. रुमची सजावट पाहून तर त्यांना हनिमून कपलचा फील प्रकर्षाने जाणवला. दोघांनीही एकमेकांकडे पाहून स्मित केले.

"सर, मॅम हार्टली काँग्रॅचुलेशन्स टू बोथ ऑफ यू. एन्जॉय यूअर क्वालिटी टाइम." म्हणत तो तरुण बाहेर जायला निघाला. पण संभवने त्याला हटकले.

"अरे अरे वेट."

"एनी प्रॉब्लेम सर?"

"नो.. बट थँक्यू यू सो मच फॉर आवर स्पेशल वेलकम अँड स्पेशल ट्रीटमेंट अँड ऑल."

"इट्स आवर प्लेजर सर." चेहऱ्यावर गोड स्मित आणत तो बोलला आणि निघून गेला.

"काय मग मॅडम आवडलं का हॉटेल?" ओवीच्या जवळ येत संभव बोलला.

"हा काय प्रश्न आहे." ओवी उत्तरली.

"फायनली आपण आपल्या आयुष्याच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो ओवी."

"हमम... ओवीच्या आणखी जवळ येत संभव बोलला. तिच्या हृदयाची धडधड एकदम वाढली.

"मिस्टर संभव देशमाने, इतका धीर धरला आता अजून थोडा. इतकेही अधीर होऊ नका. आधी फ्रेश होऊयात?" संभवच्या छातीवर हात ठेवून त्याला हलकेच मागे ढकलत ओवी बोलली.

"तेच तर तुझ्या कानात सांगणार होतो आता. दोन मिनिटात फ्रेश होऊन आलो, तूही आवर पटकन्. तुला काय वाटलं?" ओवीच्या नजरेला नजर देत संभव बोलला.

"काही नाही, तू जा बरं लवकर." लाजतच नजर चोरत ओवी बोलली.

"आलोच."

पाचव्या मिनिटाला संभव फ्रेश होऊन आला.

"आता जा तू आणि लवकर ये. मी वाट पाहतोय."

"हो आलेच,' म्हणत ओवी जायला निघाली.

"संभव..." पुन्हा मागे वळत ओवी बोलली.

"आता काय? असा टाईमपास करू नको बरं तू. जा ना फ्रेश होऊन ये लवकर."

"पुढे काहीही न बोलता ओवीने संभवच्या गालावर किस केले. लव यू म्हणत आणि संभवकडे पाहून डोळा मारत ती बाथरूममधे पळाली.

काही क्षण संभव स्तब्ध झाला. हे सगळं त्याला अनपेक्षित होतं.

'लव यू टू ओवी. असंच आयुष्यभर प्रेम करत राहा माझ्यावर बाकी मला काहीच नको.' गालावरून हलकेच हात फिरवत संभव बोलला. आपसूकच मग त्याच्या चेहऱ्यावर प्रेमाचे हास्य फुलले.

ओवी येईपर्यंत त्याने समरला आपण सुखरूप पोहोचल्याचा मेसेज केला.

थोड्याच वेळात ओवी तयार होऊन बाहेर आली. ओवीला समोर पाहून तो हरखून गेला. हातातील मोबाईल मग आपसूकच बाजूला गेला. आज पहिल्यांदा तो स्वतःच्याच बायकोला असं सेक्सी नाईट गाऊन पाहत होता. नकळतपणे त्याची पावले तिच्याकडे ओढली गेली.

क्रमशः

संभव आणि ओवीची स्पेशल नाईट अनुभवण्यासाठी पुढील भाग चुकवू नका.