Login

अधीर मन झाले..(भाग ६७)

अधीर मन झाले.. कथा अनोख्या प्रेमाची
नकळतपणे संभवची पावले ओवीच्या दिशेने वळली. संभवला समोर पाहून ओवीच्या मनाची घालमेल आणखीच वाढली. नकळतपणे तिच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. नजर सैरभैर होऊन लपण्यासाठी इकडे तिकडे जणू जागा शोधू लागली. दोघेही ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता समोर येऊन ठेपला होता.

संभव जवळ येत आहे हे पाहून ओवी झटकन पाठमोरी झाली. त्याच्या नजरेचा सामना करणे तिला आता अशक्य होते. तिच्या मनातील फुलपाखरे एकदम भिरभिरायला लागली. पोटात भलामोठा गोळा आला. हृदयाची धडधड प्रचंड वेगाने वाढली होती. कान्या नजरेने ती संभवचा कानोसा घेत होती. त्याच्या परफ्यूमच्या सुगंधाने तिच्या मनात आणखीच चलबिचल झाली. मनातील भावना तरंग होऊन बाहेर पडण्यासाठी जणू वाटच शोधत होत्या. तेवढ्यात ओवीच्या जवळ जात संभवने पाठमोऱ्या ओवीला घट्ट मिठी मारली. ओवीचे रोम रोम शहारले. अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. डोळे आपसूकच मिटले गेले. श्वासाची गती देखील आक्रमक होऊ पाहत होती.

तितक्यात, "लव यू सो मच ओवी." संभवच्या तोंडून बाहेर पडलेले प्रेमाचे हे शब्द गरम श्वासावर आरूढ होऊन ओवीच्या कानात अलगद विरघळले. तशी ती मोहरली. लाजेची लाली तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर मग अलगद स्वार होऊन स्वप्नांच्या दुनियेची एक सैर करून आली. ओवीचे कान पुनःपुन्हा त्या उबदार श्वासांची जणू आता मागणी करू पाहात होते. पण लज्जेची कवाडे तिला तसे करण्यापासून रोखत होती. तितक्यात संभवचे ओलसर ओठ ओवीच्या मानेवर स्थिर झाले. एकदा नाही दोनदा नाही तर वारंवार. तसे तिने एकदम अंग चोरले. न बोलताही ओवीच्या मुक्या भावना संभवला कळत होत्या. प्रेमाची गाडी आता एक एक पाऊल पुढे सरकत होती. झटकन ओवी संभवच्या दिशेने वळली आणि त्याला घट्ट बिलगली. तिचा चेहरा त्याच्या गोऱ्यापान अशा उघड्या गळ्यावर स्थिर झाला.

संभवच्या हृदयाची धडधड ओवीच्या कानांना स्पष्ट ऐकू येत होती. त्याच्या परफ्यूमचा सुगंध तिला आणखीच घायाळ करत होता. त्यानेही मग तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली आणि एक मोठा श्वास घेत बायकोच्या प्रेमाचा सुगंध त्याने मनात साठवून घेतला.

क्षणभर ते दोन जीव एकमेकांच्या मिठीत तसेच बंदिस्त झाले.

"ओवी, अगं झोपली की काय?" शांतता भंग करत संभव बोलता झाला.

"नाही रे, अशी कशी झोपेल मी. अजून तुझ्या प्रेमाच्या रंगात चिंब कुठे झालेय मी. असं असताना मला इतक्यात झोप लागेल असं वाटलंच कसं तुला?" तिही चटकन् उत्तरली.

"हो का! मग हेच एकदा माझ्या डोळ्यात बघून सांग बरं."

"गप्प बस. किती दिवसांपासून ह्या हक्काच्या मिठीची वाट पाहत होते मी. माझं मन भरू तर दे आधी."

"असे किती दिवस झाले, आता परवाच तर ही प्रेमाची मिठी दिली होती की तुला."

"त्या दोन मिनिटाच्या मिठीने काही मन नव्हतं भरलं माझं." लाडीक सुरात ओवी बोलली.

"अच्छा, असं आहे होय. मग तुझं मन भरलं की सांग हा मला." गमतीच्या सुरात संभव उत्तरला.

"तेही मी सांगायचं का आता?"

"मग कोण सांगणार गं ठमे." गमतीच्या सुरात संभव बोलला.

ठमे या शब्दाचे तिला हसूच आले. पण मनापासून तिला ते आवडले होते.

"तुझं तुला कळत नाही का रे सोनुल्या?"

"मला तर बरंच काही कळतं गं. एकदा फक्त माझ्याकडे बघ मग सांगतो मला काय काय कळतं ते."

ओवीचा चेहरा वर करण्याचा संभव प्रयत्न करू लागला.

" नाही ना. आधी तो लाईट बंद कर." म्हणत ओवी पुन्हा त्याला घट्ट बिलगली. लाजून डोळेही तिने घट्ट मिटले होते.

"आता लाईट बंद केल्यावर कशी दिसणार बरं तू मला. उजेडात तुला डोळे भरून पाहायचं आहे. राहू दे ना लाईट. आता लग्न झालं ना आपलं. काय होतंय मग त्याने."

"प्लीज कर ना पण लाईट बंद."

"शूssss करतो, पण थांब ना थोडा वेळ. आधी तुला मन भरून नजरेत साठवून तर घेऊ दे." म्हणत संभवने ओवीच्या हनुवटीला टेकू देत तिचा चेहरा वर उचलला. तिच्या ओठांवर लाजेचे स्मित फुलले.

तिचा निरागस चेहरा तो बारकाईने न्याहाळू लागला. त्याच्या ओठांवर देखील आपसूकच मग स्मित फुलले. त्याची नजर ओवीच्या ओलसर गुलाबी ओठांवर खिळली. तिचेही ओठ आता आसुसले होते त्याच्या ओठांचा ताबा घेण्यासाठी. हे त्यालाही समजून चुकले होते.

संभवने अलगद त्याचे ओठ ओवीच्या कपाळावर टेकवले. तशी काही क्षण मंद झालेली तिच्या हृदयाची धडधड पुन्हा वेगाने धावू लागली. तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर रेंगाळू लागले. तसा  तोही तिच्या ओठांचा ताबा घेण्यासाठी सरसावला. पण त्याआधी त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेत तिच्या डोळ्यांवर, गालांवर चुंबन घ्यायला सुरुवात केली. तिचे दोन्ही हात त्याच्या भोवती अलगद गुंफले गेले. हळूहळू संभव ओवीमध्ये विरघळत चालला होता. तिनेही आता स्वतःला त्याच्या स्वाधीन केले होते.

हलकेच मग त्याने तिच्या थरथरत्या ओठांचा ताबा घेतला. मन भरेपर्यंत दोघेही त्यांच्या आयुष्यातील त्या पहिल्या चुंबनाचा मनसोक्त आस्वाद घेत होते. ओठ ओठांत बंदिस्त झाले. हात हातात गुंफले गेले.

बराच वेळ एकमेकांच्या चुंबनात हरवलेले ते दोन जीव मन मनाच्या तृप्तीनंतर भानावर आले.

संभवसोबतच्या प्रणयाची सुरुवात तर ओवीला अगदी हवी तशीच झाली होती. त्यामुळे ती मनातून खूप म्हणजे खूपच खुश होती.

प्रेमाचे रंग दोघांच्याही चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते.

"अगं बायको एकदा डोळे उघडून बघ तरी माझ्याकडे. प्लीज माझ्यासाठी, फक्त एकदा." संभव म्हणाला.

"नाही पाहू शकत ना मी. तू आधी लाईट बंद कर."

"नाही करणार. फक्त एकदा डोळे उघड तू. मग नंतर बंद करेल मी लाईट बंद."

घाबरतच ओवीने मग अलगद डोळे उघडले. संभवच्या ओठांवरील स्मित पाहून ती लाजेने गोरीमोरी झाली. लाजून ती पुन्हा त्याच्या मिठीत शिरली.

"अरे... असं काय करतेस गं पोरी. किती लाजावं ते. एरव्ही तर मोठ्या गप्पा करत असतेस आणि आज काय होतंय नेमकं?"

"नाही माहित मला काय होतंय ते."

"पण मला माहित आहे ना, माझ्या बायकोला काय होतंय, तिला आता काय हवंय. सगळं माहीत आहे मला."

"हो का. मग सांग आता मला काय हवंय ते?"

"सांगू? खरंच सांगू?" ओवीला गुदगुल्या करत संभव तिला विचारत होता. तशी हसतच ती मागे मागे सरकत होती.

मागे सरकत सरकत ती एकदम बेडवर पडली. तिला सावरायच्या प्रयत्नात संभव देखील तिच्यावर आदळला. बेडवरील गुलाबाच्या पाकळ्यांची आतुरता अखेर संपली. अस्ताव्यस्त होत त्यांनी ओवी आणि संभवला स्वतःमध्ये सामावून घेतले. प्रेमाचा गुलाबी सुगंध सर्वत्र दरवळला. दोघांचीही नजरानजर झाली. ओवीच्या हातांचा हार संभवच्या गळ्यात होता.

संभव एकटक ओवीकडे पाहत होता. नजरेतून प्रेमाचा वर्षाव अखंड सुरुच होता.

संभवच्या गालांवर किस करत ओवीने त्याची तंद्री भंग केली.

"आता एकाच गालावर तू असं प्रेम केलंस तर दुसरा गाल रुसेल की राव. बघ मग आता त्याला कसं खुश करायचं ते." दुसरा गाल पुढे करत संभव बोलला.

ओवीने मग तिचे मऊ मुलायम गुलाबी ओलसर ओठ संभवच्या दुसऱ्या गालावर टेकवले. तसा तो प्रणयाच्या ओढीने उद्युक्त झाला. पुन्हा एकदा त्याचे ओठ ओवीच्या ओठांचा ताबा घेणार तोच तिने त्याच्या ओठांवर बोट ठेवत त्याला हटकले.

"काही चुकलं का ओवी माझं? तसं असेल तर सांग."

"हो..खूप काही चुकत आहे तुझं?"

"सो सॉरी, पण पुढच्या गोष्टींसाठी तुझी अजूनही तयारी नसेल तर अगदी हक्काने सांग. मी थांबायला तयार आहे." हळूच मागे सरकत संभव बोलला.

"ओ मिस्टर, संभव देशमाने..अजून किती थांबायला लावताय मला? आधीच काय कमी उशीर झालाय?" दोन्ही हातांनी संभवची कॉलर पकडून त्याला जवळ ओढत ओवी बोलली. तसा तोही काही क्षण स्तब्ध झाला. एकदम डोळ्यांत डोळे घालून ओवीने त्याला विचारले. तसा तोही एकदम गोंधळला.

"म्हणजे मी समजलो नाही." तिच्या या अनपेक्षित वागण्याने गोंधळलेल्या स्वरात संभव बोलला.

"आधी लाईट बंद करा की राव तो."

तिच्या या वाक्याने त्याच्या ओठांवर स्मित फुलले. घाईतच त्याने मग सगळे लाईट बंद केले. फक्त एक मिणमिणता झिरो बल्ब सुरू ठेवला.

"झालं का मन शांत?" हळूच तो तिच्या कानात पुटपुटला.

हलकेच मग तिने त्याच्या गालाचा चावा घेतला.

"आई गं. थांब दाखवतोच तुला आता." म्हणत त्यानेही मग तिला छळायला सुरुवात केली.

मिणमिणत्या त्या मंद प्रकाशात त्यानेही मग तिच्या गालावर, ओठांवर हलके चावे घेत तिचा बदला घ्यायला सुरुवात केली.

हळूहळू दोघेही मग एकमेकांच्या मिठीत अलगद विरघळले. प्रणयाची अवीट गोडी चाखत एक एक पाऊल पुढे टाकत  उरलेली सगळी रात्र दोघांनीही मग प्रणयाच्या धुंदीत एकमेकांच्या मिठीत स्वर्ग सुखाची अनुभूती घेत घालवली. अगदी मन भरेपर्यंत दोघांनीही लग्नानंतरची ती पहिली रात्र पॅरीसच्या त्या आलिशान हॉटेलमध्ये अगदी मनासारखी साजरी केली.

क्रमशः

एकमेकांसोबतचे ओवी आणि संभवचे पॅरीस मधील सोबतीतले आणखी काही क्षण अनुभवण्यासाठी वाचत रहा, "अधीर मन झाले..एक प्रेमकथा."

(प्रिय वाचकवर्ग, सर्व मर्यादांचे पालन करत आजच्या भागाला शक्य तितका न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तरी जर चुकून काही चूक झालीच असेल तर मोठ्या मनाने समजून घ्या आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. पुढील लिखाणासाठी त्याने खूप प्रेरणा मिळते.)