Login

अधुरे ज्ञान (भाग:-१)

अधुरे ज्ञान किती घातक असते हे सांगणारी कथा

शीर्षक:- अधुरे ज्ञान

भाग:-१

"आई, हे काय ऐकतेय मी?" रागात चरफडत रश्मीने तिची आई निताला विचारले.

"असे काय ऐकलेस तू की इतका राग आलाय तुला?" निता कपड्यांच्या घड्या घालत शांतपणे म्हणाली.

"तो इडियट साहिल इथे येणार आहे राहायला, हे खरं आहे का? याच गोष्टीचा मला राग आला आहे. का येतोय तो आपल्याकडे?" ती हाताची घडी घालत रागात म्हणाली.

"का म्हणजे? तुला कारण माहिती आहे ना, मग तरीही का विचारत आहेस?" निता कपडे कपाटात व्यवस्थित ठेवत म्हणाली.

"ते काही असू दे. मला तो अजिबात आवडत नाही. आपल्या घरी नको आहे तो मला, दॅट्स फायनल!" रश्मी फणकाऱ्याने म्हणाली आणि निता काही म्हणायच्या आत तेथून निघून सुद्धा गेली.

"ही पोरगी पण ना.. जरा म्हणून समंजसपणा दाखवत नाही. कसे व्हायचे हिचे पुढे काय माहिती?" जाणाऱ्या तिला पाहत कपाळावर हात मारत काळजीने निता म्हणाली.

सोळा वर्षाची रश्मी निता आणि निलेश यांची एकुलती एक मुलगी. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली असली तरी त्या दोघांनी तिचे खूपच लाडाकोडात संगोपन केले होते. त्यामुळे ती थोडी हेकेखोर झाली होती.

चौदा वर्षाचा साहिल तिच्या मावशी-काका यांचा एकुलता एक मुलगा. अचानक त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याला बघणारे कोणीही नव्हते म्हणून निता आणि निलेश यांनी त्याचा सांभाळ करायचे ठरवले होते. त्यांचे बोलणे रश्मीने ऐकले होते. तेव्हा तिला खूप राग आला होता कारण तो तिला लहानपणापासूनच आवडत नव्हता.

लहाणपणी जेव्हा पण तो त्यांच्या घरी यायचा तेव्हा नेहमी त्यांच्यात भांडणंच होतं असायचे. त्यात तो कित्येकदा तिच्या आवडत्या खेळणी आणि वस्तूंची मोडतोड करायचा. तिची छेड काढून तिला चिडवायचा. त्यामुळे तिला त्याचा खूप राग यायचा. तिने तिच्या आईबाबांकडे त्याची तक्रार केली तर तो लहान आहे, आपल्या घरी आला आहे तूच जरा समजावून घे म्हणून तिलाच समजूतीचे डोस द्यायचे त्यामुळे तिचा राग आणखीनच उफाळून यायचा.

साहिलच्या आईबाबांच्या दशक्रिया विधी नंतर निलेशने त्याला आपल्या घरी आणले. याची खबर जेव्हा रश्मीला लागली तेव्हा ती खूप चिडली.

आपण सांगूनही आईबाबांनी साहिलला घरी आणलेलं पाहून तिला आधीतर त्यांचाच खूप राग आला ; पण नंतर जेव्हा तिने साहिलकडे पाहिले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर खूप दुःख, उदासी आणि डोळ्यांत एकटेपणा जाणवला तशी ती थोड्या वेळासाठी शांत राहिली. पण तिने त्याची ना विचारपूस केली ना की सांत्वन केले. ती त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करत तिच्या रूममध्ये निघून गेली.

रश्मीच्या शेजारची रूम साहिलला देण्यात आली तेव्हा रश्मीचा पारा आणखी चढला. पण आईबाबांकडे बघून ती शांत राहिली.

आईबाबांच्या अचानक झालेल्या निधनाने साहिल मनातून कोसळून गेला होता. नेहमी हसतमुख, मस्ती करणारा तो सतत दु:खात  एकटं एकटं राहत होता. त्यामुळे निता आणि निलेश त्याची जास्तच काळजी घेऊ लागले. म्हणून रश्मीच्या मनात त्याच्याविषयी असूया निर्माण होऊ लागली. पण सध्या तिने शांत राहणेच पसंत केले.

काही दिवसांनी एका रात्री सगळे आपापल्या रूममध्ये झोपले होते.

साहिलच्या कानांवर काहीतरी विचित्र आवाज पडला. तो आवाज हळूहळू कर्कश होऊ लागला. तेव्हा तो घाबरून कानांवर हात ठेवून जोरात ओरडत उठला. डोळे उघडून त्याने पाहिले तर समोर पांढरट धुक्यातून एक गडद लाल डोळे असलेली काळी अक्राळ विक्राळ आकृती विचित्र हसत त्याच्या दिशेने येऊ लागली. ते पाहून तो खूप घाबरला. भीतीने त्याचे डोळे पांढरे झाले. माथ्यावर घामाचे दवबिंदू जमा झाले. भीतीने अंग थरथरू लागले. तो भयभीत होऊन अंगावरचे पांघरुण गळ्याजवळ हाताने घट्ट पकडत मोठ्याने किंचाळला. त्याची किंचाळी ऐकून निता आणि निलेश झोपेतून खडबडून जागे झाले आणि त्याच्या रूमच्या दिशेने धावतच गेले.

त्याचा भयभीत झालेला चेहरा पाहून निताने त्याला पटकन छातीशी लावून घेत विचारले,"काय झालं साहिल, बाळा? इतक्या मोठ्याने का किंचाळलास तू?"

"मा.. मावशी तिथे कोणी तरी आहे?" तो तिला बिलगत चेहरा लपवत भीतीने थरथरत एका दिशेला बोट दाखवत म्हणाला.

"तिथे कोणीच नाही बेटा, रिलॅक्स." निलेश त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाला.

निलेश तसे म्हणताच त्याने हळूच मान वळवून पाहिले तर खरंच तिथे कोणी नव्हते. तरीही त्याला भीती वाटत होती. अंग भीतीने थरथरत होते. त्याची तब्येत बिघडली. म्हणून निता त्याच्या जवळच झोपली.

सकाळी त्यांनी त्याला डाॅक्टरला दाखवले.

"आईबाबांचा अकाली जाण्याचा त्याला धक्का बसला आहे. त्यामुळे त्याला भास होत असतील. त्याची जास्त काळजी घ्या. एकटं सोडून नका." असे डाॅक्टरांनी सांगितल्यावर ते दोघेही आधीपेक्षाही जास्तच त्याची काळजी घेऊ लागले. हीच गोष्ट रश्मीच्या मनाला टोचू लागली.

त्यात निता जेवणंही त्याच्या आवडीचे बनवू लागली. हेही तिला रूचल नाही.

एकदा ती निताला म्हणाली,"आई, रोज त्या साहिलच्या आवडीचेच जेवणं बनवतेस. आज माझ्या आवडीची पनीरची भाजी कर ना."

"रश्मी, बाळा तू पण हेच खा ना. अगं बाकीची ही खूप काम आहेत. उद्या तुझ्या आवडीचे बनवते." निता तिला समजावत म्हणाली.

"जा, मला नाही खायचे. तू त्याचेच लाड करतेस, तुझे माझ्याकडे मुळीच लक्ष नाही. तो साहिल आल्यापासून तू फक्त त्याच्याकडेच लक्ष देतेस." असे म्हणत ती पाय आपटत तिथून निघून गेली.

तिच्या मनात साहिलच्या विषयी रोष वाढू लागला.

क्रमशः

काय करेल रश्मी?

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all