एक अधुरी प्रेम कहाणी
भाग/१
डॉ, वृंदा नुकतीच ओटीतून बाहेर आली होती. शरीराने जरी ती थकली असली. तरीही तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. एका आईला आणि बाळाला जीवनदान दिले होते आणि तेच समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.
टेबलवरील पाण्याचा ग्लास ओंठाना लावणारच की बाहेर काहीतरी गोंधळ चालू होता.
तिने बेल वाजवली. तेवढ्यात सिस्टर आत आली आणि तिने काही विचारायच्या आतच सिस्टर बोलली.
" मॅडम , एक बाई आणि माणूस त्यांच्या गरोदर मुलीला घेऊन आले आहेत. तिची कंडिशन जरा क्रिटीकल वाटत आहे."
"जा पटकन तिला ओटीत शिफ्ट करा. मी बघते."
तिला चेक करून तिचे ऑपरेशन करावे लागणार. हे सांगायला ती बाहेर आली.
बाहेर तिचे आई वडील दोघेही आस लावून बसले होते.
डॉ, वृंदा बाहेर आली आणि तिच्या कंडिशन विषयी बोलली.
"हे बघा, आम्ही बाळ आणि आई दोघांनाही वाचवण्याचा पुर्ण प्रयत्न करतो. पण तरीही तिची कंडिशन बघता एक निर्णय घ्यावाच लागणार आहे."
"डॉ. आधी आमच्या मुलीला वाचवा."
एक दीर्घ श्वास घेऊन वृंदा आत निघून गेली. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ती बाहेर आली.
"अभिनंदन, तुम्हांला नातं झाली आहे आणि दोघीही सुखरूप आहेत. आम्ही तिला थोड्याच वेळात रूममध्ये शिफ्ट करतो. मग भेटा तुम्ही."
असे म्हणत ती वळणारच की तेवढ्यात एक हॅन्डसम मुलगा तिथे आला.
"आई, कशी आहे शालिनी आता. अशी कशी पडली? तुम्ही कुठे होता ? तिला माहेरी मी आराम करण्यासाठी पाठवले होते आणि हे काय मध्येच झाले ?"
"अहो राघवराव , आम्ही मंदिरात निघालो होतो. तेवढ्यात तिचा पाय सटकला. पण, ती सुखरूप आहे आता. तुम्ही बाबा झाला आहात. खूप खूप अभिनंदन."
वृंदाला आवाज ओळखीचा वाटला. तिने मागे वळून पाहिले.
पण, तो दिसलाच नाही. त्याच्या बायकोला भेटण्यासाठी तो रूममध्ये निघून गेला. सगळेजण खूप आनंदात होते.
त्याचा आवाज ऐकल्यापासून वृंदा खूप बैचेन झाली होती. "कोण होता तो ? आपण ओळखतो का त्याला?"
तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली.
"वृंदा कुठे आहेस तू? तुझी केव्हाची वाट बघत आहे मी जेवणासाठी? अगं नऊ वाजत आले आहे."
"हो आलेच, एक इमरजन्सी आली होती. पण, आता सर्व ठीक आहे. "
वृंदाने काही असिस्टंट डॉक्टरांना सुचना देऊन निघाली. तिचे घर आणि दवाखाना एकाच ठिकाणी होता. तिचे घर त्याच दवाखान्यात चौथ्या मजल्यावर होते. त्यामुळे लगेच वर गेली.
तिचा नवरा आकाश तिची वाट बघत होता. आकाश तिचा नवरा सुध्दा युरोसर्जन होता. दोघांचेही अरेंज मॅरेज होते. आकाश आणि वृंदाच्या लग्नाला जवळपास पाच वर्षं होऊन गेली होती. दोघेही खूप खुश होते. पण, तरीही वृंदाच्या मनात सतत काहीतरी सलत होते. ती दाखवत जरी नसली तरीही कोणती तरी गोष्ट तिला सारखी सतावत होती.
आकाश मात्र तिच्यावर भरभरून प्रेम करीत होता. निःस्वार्थ प्रेम बरसवत होता.
"वृंदा आपल्या लग्नाला आता पाच वर्षं होत आली. आपण पुर्णपणे सेटल झालेले आहोंत. तेव्हा आपण आईबाबा होण्याचा विचार करायला हवा. आपली फॅमिली व्हायला हवी. माझे आईबाबा आणि तुझेही आईबाबा या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहेत. तुला काय वाटतू. तू त्यासाठी तयार आहेस ना?" आकाश बोलू लागला.
वृंदा थोडीशी लाजली आणि चेहराही आनंदाने फुलला असे भासवत ती खोलीत निघून गेली.
मोठ्या आनंदाने आकाशही तिच्या मागोमाग गेला.
पाहू या पुढे काय होते.
©®सौ.आश्विनी सुहास मिश्रीकोटकर
