Login

अधुरे स्वप्न 3

An mansicha baba tila tiche not pakdun tya swapnanchya rajrastyavar Paul takayala shikvat hota.

अधुरे स्वप्न ३
अष्टपैलू लेखक महासंग्राम
फेरी पहिली - कथामालिका


       आता तर किमय ने अभ्यासात स्वतः ला अगदी झोकून दिले होते. आधीच त्याची असलेली अभ्यासू वृत्ती, मोठी स्वप्नं अन् एकलकोंडा स्वभाव पुन्हा नव्याने डोके वर काढू लागले होते.


" अरे आम्हाला माहीत आहे तू खूप हुशार आणि अभ्यासू आहेस. आम्ही नाही म्हणत की तू आमच्यासारख्या उनाडक्या कर पण निदान मोकळा श्वास तरी घे ना." रूम पार्टनर असलेले उमेश आणि प्रशांत त्याला नेहमी म्हणायचे.

"माझं  उद्दिष्ट ठरलंय,अशा फालतू गोष्टींमध्ये अडकून मला माझं नुकसान करायचं नाही. ज्यांनी मला झिडकारले त्यांना त्यांना मला मोठं होऊन दाखवायचे आहे." असं बोलून तो पुन्हा कामाला लागायचा.


शेवटी त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं. फायनल इयरला  त्याने युनिव्हर्सिटी मध्ये टॉप केले. तेव्हा तेव्हा विषयातल्या मार्कांवरूनच एमडी ला ऍडमिशन मिळत असल्याने त्याला  अनेक चॉईस होत्या. मधुरा मात्र तिला ज्या विषयात एमडी करायचं होतं तिथे फर्स्ट वेटिंग होती. किमयने जर  दुसऱ्या विषयात एम डी केलं असतं तर मधुराचा एमडीला नंबर लागला असता.

सगळेजण मधुराला म्हणायचे सुद्धा"मधुरा तू एकदा म्हणून तर बघ त्याला तुझा एमडी चा मार्ग मोकळा ."


पन्ना मधुराने ज्या वाटेने जायचे नाही तो रस्ताच आपण धरायचा नाही असे  ठरवले .


किमय मात्र मनात आशा ठेवून होता की एकदा मधुरा त्याला म्हणेल आणि तो तिच्यासाठी ती सीट सोडून देईल पण तसे काही झाले नाही. मग त्याने देखिल त्याच विषयामध्ये एमडी करायचे ठरवत त्याच्या लेखी तिने केलेल्या प्रतारणेचा  धडा द्यायचं ठरवलं.


आता तर दोघे दोन मार्गांवरून चालणारे भिन्न पथिक झाले. मधुरा नावाचा अध्याय त्याच्या आयुष्यात आता कायमचा संपला होता. एमडी झाल्यानंतर पुढे त्याने पुण्याकडे जाऊन प्राध्यापकाची नोकरी केली. त्याच्या चिकित्सक स्वभावानुसार त्या भागात असणाऱ्या अनेक आयुर्वेद घराण्यांचा त्याने अभ्यास केला. सुट्टीच्या दिवशी त्याचा रुटीन ठरलेला असायचा. तिथे जायचं आणि अशा अनेक पारंपारिक वैद्यांच्याकडून जेवढे ज्ञान मिळवता येईल तेवढं मिळवायचं. आजूबाजूचा परिसर पिंजून काढत त्याने जेवढे त्याला परंपरागत ज्ञान घेता येईल तेवढे घेतले.


पंचकर्माचा बोलबाला असलेल्या त्या काळात पांचभौतिक चिकित्सा सारख्या एकल द्रव्य उपचार पद्धतीने त्याला भुरळ घातली. त्याने अनेक ग्रंथपालथी घालत ज्ञान अर्जित केले. त्याची चिकाटी त्याची हुशारी त्याची झोकून देण्याची वृत्ती या सगळ्या गोष्टींमुळे लवकरच पांचभौतिक चिकित्सा मधला तो एक अग्रणी वैद्य मानला जाऊ लागला.


 बरेच ज्ञान आत्मसात केल्यानंतर आणि आयुष्याला स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर आता त्याला त्याचा जन्म भाग खुणावू लागला होता. वडिलांचे उतार वयातले दिवस आणि आपल्या भागातल्या लोकांनाही आपल्याला जे येतं त्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने त्याने आपल्या भागात परतण्याचा निर्णय घेतला .

त्याच्या भागात आल्यानंतर त्याने जोमाने काम सुरू केले. प्राध्यापकी सोबतच स्वतःच्या खाजगी वैद्यकीय व्यवसायातून त्याने अनेक रुग्णांना आपल्या आयुर्वेदाच्या ज्ञानाने बरे केले. तशातच वडिलांची तब्येत थोडी ढासळू लागल्याने त्यांनी सुनमुख पाहायची इच्छा व्यक्त केली. त्यालाही आता आयुष्यात स्थैर्य हवे होते. दरम्यानच्या काळात  आपल्या संसारात
मग्न असलेली मधुरा त्याला भेटली होती. तिच्या मनात आता  कोणतीच अढी नव्हती  पण पतीच्या वैभवात जुनी मधुरा  कुठेतरी हरवलेली  त्याला भासली.


लग्नाचे नाव घेताच मिताली चे स्थळ त्याच्यासाठी चालून आले. मधुरा सारखीच हसरी, खेळकर  आणि त्याच्याच पेशाची मिताली त्याला मनापासून आवडली. सोबतच मधुरा मध्ये असलेला ध्येयासक्ततेचा अभाव मिताली मध्ये नव्हता.


मिताली लग्न होऊन त्याच्या जीवनात आली अन आयुष्याचे एक बहारदार पर्व सुरू झाले. प्रेम ,माया, आपुलकी ,जिव्हाळा ,समर्पण आयुष्याचे सगळेच रंग मिताली सोबतच्या सह जीवनात त्याने अनुभवले. खरं प्रेम, त्याची व्याप्ती त्याला तिच्याकडूनच कळली. आपल्यासारख्या वर कोणी इतकं प्रेम करू शकते याची त्याला पहिल्यांदाच जाणीव झाली.


त्याच्या रूपाने मितालीच्याही जीवनाचे नवे पर्व सुरू झाले होते. मितालीच्याही मनात त्याने यशाचे उत्कर्षाचे शिखर गाठण्याचे नवे स्वप्न पेरले. तिला हवी ती मदत करत तिच्या अनेक संसारिक  जबाबदाऱ्यांचे ओझे उचलत त्याने स्त्रियांवरच्या आजारांमध्ये आयुर्वेदाचा कसा वापर करता येईल यावर संशोधन करायला लावले. या सर्व गोष्टींना पांचभौतिक चिकित्सेची जोड देत मितालीने अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले.


दरम्यानच्या काळात संसार वेलीवर मानसी नावाचे गोंडस फुल जन्माला आले. मानसीच्या येण्याने तर जणू आनंदाचा झरा त्याच्या जीवनात वाहू लागला. बालपणीच आईच्या प्रेमाला पारखा झालेला तो मानसीमध्ये त्याची आई शोधू लागला.

"मिताली, माझी आई तर नसेल आली आपल्या पोटी, तिची माझ्यासोबत राहायची अपुरी इच्छा पूर्ण करायला?"
त्याचं असं बोलणं ऐकलं की मितालीला गहिवरून यायचं. आयुष्यात मायेला वंचित असलेल्या आपल्या नवऱ्याला आयुष्यात इतकं भरभरून प्रेम द्यायचं की त्याला त्या प्रेमाची कधीच उणीव जाणवू नये. आणि त्यात ती यशस्वी सुद्धा झाली होती.

आता फक्त मिताली आणि मानसी तेवढेच त्याचे विश्व झाले होते.


"मी मानसीला इतकं प्रेम देईन, इतकं प्रेम देईन की मी माझ्या आईवरच्या प्रेमाची पूर्ण भरपाई त्यात भरून  काढीन."
तो असं बोलायचा तेव्हा मीताली फक्त कौतुकाने ऐकत राहायची


मानसी  म्हणजे त्याच्या आयुष्याचा एक हळवा कोपरा होती. ज्या परिस्थितीतून आपल्याला जावं लागलं, त्याची अगदी झळ सुद्धा मानसीला लागू नये याची तो पुरेपूर काळजी घ्यायचा. तो स्वतः जरी सामान्य परिस्थितीतील असला तरी आज  पुरेसे यश अन् आणि पैसा त्याच्यापाशी होताच. स्वतःवर तो फारसा खर्च करत नसला तरी मानसी साठी मात्र त्यानी कोणतीच कमी राहू दिली नव्हती.


मधुराने त्याला सोडून वैभवाला कल दिला हे त्याच्या मनाने नेहमीसाठीच घेतलं होतं त्यामुळे मी माझ्या मुलीला एक यशस्वी व्यावसायिक बनवीन हे स्वप्न त्याने पाहिले होते आणि लेकीच्या  डोळ्यातही पेरले होते.


त्या स्वप्नांचा माग घेण्याची पायाभरणी अगदी लेकीच्या लहानपणापासूनच करायची याचा विचार करत त्या दृष्टीने त्याने आपल्या आयुष्याची वाटचाल सुरू ठेवली होती.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशा प्रकारची मानसीची वाटचाल सुरू होती. वडिलांची हुशारी, आईचं रूप रंग अन हसरा खेळकर स्वभाव असलेली चुणचुणीत मानसी सगळ्यांच्या गळ्यातलं ताईत होती.


अन् मानसीचा बाबा तिला तीचं बोट पकडून त्या स्वप्नांच्या राजरस्त्यावर पाऊल टाकायला शिकवत होता.

बापलेकांचा पुढील आयुष्याचा प्रवास बघूया पुढच्या भागात.

© डॉ. मुक्ता बोरकर आगाशे
मुक्तमैफल