Login

अधुरी प्रेम कहाणी... भाग २

तिरस्कारातून प्रेमाने वळलेली, इतिहास व कल्पना यांच्या सहयोगाने तयार झालेली प्रेमकथा

अधुरी प्रेम कहाणी भाग २


दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

©® सौ. हेमा पाटील.

मागील भाग या मुद्द्यावर येऊन थांबला होता की, सुधिन्वा राजाला धडकी भरावी असा कोणता राजा होता? आता पुढे...

"हे राजा, तू मला शिकवतोस? माझ्याहून तू अधिक ज्ञानी आहेस? मग हे तुझे शंभर पुत्र तू माझ्याकडे ज्ञानार्जनासाठी का पाठवले आहेस? आज तू गुरूंच्या ज्ञानाबद्दल शंका उत्पन्न केली आहेस. मग आता बघ माझी शक्ती." असे च्यवन ऋषी म्हणाले.

महाराज कृतवीर्य अचंबित झाले होते. च्यवन ऋषी इतके का कोप पावले आहेत हे त्यांना समजेना. महाराज शिकारीसाठी वनात गेले असताना च्यवन ऋषींच्या आश्रमापाशी पोहोचले होते. एवढ्या जवळ आलो आहोत तर ऋषींना व पुत्रांना भेटून जाऊयात असा विचार करून महाराज कृतवीर्य आश्रमाच्या दिशेने निघाले होते.

ऋषी शिष्यांना ऋचा शिकवत होते. ते ऐकताना महाराजांना एक उच्चार खटकला म्हणून त्यांनी पुढे होऊन सांगितले,
"ऋषिवर्य, याचा उच्चार चुकलाय." हे ऐकताच च्यवन ऋषी महाराजांवर संतापले होते. रागाच्या भरात महाराजांना अद्वातद्वा बोलू लागले, तरीही महाराज शांतच होते. ऋषींनी रागाने खाली बसकण घेतली व मंत्रोच्चार सुरू केले. रागाने खाली बसून मंत्रपठण करणाऱ्या ऋषींकडे महाराज एकटक पहात होते.
तेवढ्यात ऋषींनी डोळे उघडले. ऋषींचे डोळे लालभडक झाले होते. राजाच्या शंभर पुत्रांकडे दृष्टिक्षेप टाकत ऋषींनी पुन्हा एकदा मंत्रपठण केले. त्याचवेळी महाराजांच्या डोळ्यासमोर त्यांचे शंभर पुत्र जळून राख झाले. डोळ्यासमोर निमिषार्धात घडलेली घटना पाहून महाराज दिग:मूढ झाले. त्यांनी ऋषींचे पाय धरले व ते ऋषींना म्हणाले,
"उ:शाप द्यावा मुनीवर, उःशाप द्यावा. जे काही घडले ती आमची चूक होती. आमच्या चुकीचे खापर त्या निष्पाप जीवांना का? त्यांना पुन्हा जीवदान द्यावे गुरूवर्य." हे ऐकून आपण काय करून बसलो याचा च्यवन ऋषींना पश्चात्ताप झाला, पण आता तीर हातातून निसटून गेला होता. कोण होता हा राजा कृतवीर्य?

कृतयुगात राजा कृतवीर्य हा सोमवंशी हैहय कुळातील राजा अतिशय शूरवीर होता. तो समाधानाने आपला राज्यकारभार चालवत होता. शीलधरा ही त्याची राणी त्याच्यासारखीच सात्विक व धार्मिक मनोवृत्तीची होती.
राजाला शंभर पुत्र होते. त्या शंभर पुत्रांना च्यवन ऋषींच्या शापाला बळी पडावे लागले होते. त्यानंतर राजा कृतवीर्य आणि राणी शीलधरा अतिशय व्याकुळ झाले. आपल्या शंभर पुत्रांचा वियोग दोघांनाही सहन झाला नाही. आपल्या जगण्यात त्यांना राम वाटेना.

राजवाड्यात त्यांना आपल्या पुत्रांच्या आठवणी क्षणोक्षणी येत होत्या. आपल्या माघारी या राज्याकडे कोण लक्ष देणार? हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. राजाचे राज्यकारभारातून लक्ष उडाले. राणीची अवस्था वेगळी नव्हती. उदासीन वृत्तीने राज्य सोडून दोघे वनात रहायला गेले. त्यावेळी राजा कृतवीर्य बृहस्पतींना शरण गेला.
बृहस्पतीने राजा कृतवीर्यास उपदेश केला.
"तुझ्या शंभर पुत्रांना एकाच वेळी मरण येणे हे त्यांच्या दैवात लिहिलेले होते. त्यामुळे तू विरक्त होऊन आपल्या कर्तव्यापासून दूर होणे योग्य नव्हे. राजाचे कर्तव्य आहे, प्रजेचे रक्षण करणे. स्वतःचे दुःख कुरवाळत बसून राज्याकडे दुर्लक्ष करणे हे तुला शोभत नाही. राज्याला वारस असावा यासाठी प्रयत्न करणे हे तुझे कर्तव्य आहे." महाराज कृतवीर्य यांना बृहस्पतीचे बोल पटले.

बृहस्पतीने राजाला पुत्रप्राप्तीसाठी सप्तमी व्रत करायला सांगितले. बृहस्पतीने जसे सांगितले होते, तशाच प्रकारे राजाने व्रत केले. सप्तमी व्रतामुळे राजाला पुत्रप्राप्ती होते का?

सुधिन्वा राजा व राजा कृतवीर्य यांचा नेमका काय संबंध आहे? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

कथेसाठी संदर्भ - श्रीदत्तपुराणमंत्रतंत्ररहस्यभेद( कवी राधागोविंदसुत)

कथेला नुकतीच सुरूवात झाली आहे. कथा आवडली तर नक्की प्रतिक्रिया नोंदवा ही विनंती.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."