Login

अज्ञानातून गैरसमज

काही वर्षांपूर्वी गाव सोडून गेलेला विनोद गावात पुन्हा का आला हे जाणून घेण्यासाठी वाचा लघुकथा - अज्ञानातून गैरसमज.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा
संघ - सोनल
कथा लेखन - अपर्णा परदेशी


अज्ञानातून गैरसमज

सिमेंटच्या जंगलाचे लोण गावातही पसरले, म्हणून सर्व मंडळी नाराज होती. शहरातून एक अधिकारी आपला लवाजमा घेऊन गावात आला होता. प्रथमदर्शनी पाहता कसल्या तरी बांधकामाची पूर्वतयारी दिसून येत होती. खुद्द सरपंचाची परवानगी असल्याने गावच्या लोकांना त्या अधिकाऱ्याला जाब विचारण्याचे धाडस होईना. पण ते दगड, विटा, सिमेंट पाहूनच त्यांचे टाळके सरकत होते. एकतर डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या गावाला सिमेंट-काँक्रीटची काय गरज? हे शहरी लोक आपल्या शेण-मातीच्या गावाला सिमेंटचा बट्टा लावणार; म्हणून लोकांमध्ये नकारात्मक चर्चेला उधाण आले होते.

पेशाने अभियंता असलेल्या विनोदकडे त्या संपूर्ण कार्याचा कार्यभार होता. तो दिसला, की लोक दातओठ खायचे. तोंडातल्या तोंडात पुटपुटत त्याला शिव्या द्यायचे. पाचशे-सहाशे वस्ती असलेल्या गावात याच्यामुळे प्रदूषण होणार, तसेच लहान मुलांच्या नाकातोंडात धूळ जाऊन त्यांना श्वसनाचे आजार होणार असे त्यांना वाटायचे.

त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना गावातून पळवून लावण्यासाठी लोकांनी नाना युक्त्या योजल्या. त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ व्हावी म्हणून गावकऱ्यांनी असहकार्य पुकारले. गावकऱ्यांमुळे विनोद आणि त्याच्या सहकाऱ्यांना रोज कोणत्या ना कोणत्या मार्गे अडचणींना सामोरे जावे लागत होते. तरीही विनोद बधला नाही. त्याने त्याचे काम सुरू ठेवले.

एका शुभ मुहूर्तावर सरपंचाच्या हस्ते उद्घाटन होऊन पाया खणला गेला होता. मशीनच्या घरघर आवाजाने लोक वैतागू लागले. तसेच, वातावरणातील धुलीकण पाहून त्यांच्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. एकदा तर विरोध करण्यासाठी सर्वांनी मिळून बांधकामाच्या ठिकाणी मोर्चाच आणला.

विनोदने मात्र सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कारवाईचे संकेत देत सर्वांना तिथून पिटाळून लावले. गावकरी विरुद्ध विनोद असा संघर्ष उभा राहिला होता.

यावर लवकरात लवकर उपाय शोधणे भाग होते. गावकऱ्यांनी मिळून मास्तरांचा सल्ला घ्यायचे ठरवले. वार्धक्याकडे झुकलेले प्रकाश मास्तर म्हणजे सर्वांच्या आदरस्थानी असलेली एकमेव व्यक्ती. फार पूर्वी तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना प्रकाश मास्तर त्या पाड्यावर शिक्षक म्हणून रुजू झाले होते.

तो पाडा म्हणजे अगदी पाच-पन्नास लोकांची वस्ती. कुठून तरी फिरत फिरत त्यांचा तांडा त्या भागात दाखल झाला होता. नंतर ते लोक तिथेच वस्ती करून राहू लागले. पुढे काही वर्षांनी पाड्याचे रूपांतर छोट्याशा गावात झाले. या संपूर्ण कायापालटचा साक्षीदार म्हणजे एक मात्र प्रकाश मास्तर.

एखाद्या अविकसित स्थळी जाऊन समाज सेवा करावी या हेतूने पाड्यावर दाखल झालेले प्रकाश मास्तर कायमचे तिथेच स्थायिक होऊन गेले. डोक्यावर छप्पर असावे; म्हणून त्यांनी स्वतः पुरती एक झोपडी बांधून घेतली होती. त्या झोपडीच्या समोरच मोठ्या झाडाखाली ते पाड्यातल्या मुलांना गोळा करून शाळा भरवायचे. नंतर ऊन-वाऱ्यापासून संरक्षण व्हावे; म्हणून त्यांच्या झोपडीचे रूपांतर मातीच्या घरात झाले. त्याच मातीच्या घरात पुढे त्यांची शाळा भरू लागली.

शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी हळूहळू त्या पाड्याचा विकास करायला सुरुवात केली. निस्वार्थ सेवाभाव आणि प्रयत्नांनी पुढे जाऊन त्या पाड्याचे रूपांतर एका छोट्याशा गावात झाले. बस एवढीच काय ती प्रगती तिथे झाली होती. शहराचा वाराही नसणाऱ्या गावकऱ्यांची आर्थिक बाजू तशी कमकुवतच, पण तरीही जगण्यासाठी दोन वेळचे जेवण मिळाले तरी भरपूर.. या तत्त्वावर सर्व ठाम होते. शहरीकरणाची धूळ गावाला लागू नये; म्हणून गावकरी प्रयत्नशील असायचे.

मात्र अचानक कुठून कसा हा विनोद उगवला होता? हे देवच जाणे. गावकऱ्यांनी विनोदचा काही बंदोबस्त करता येईल का? म्हणून मास्तरांकडे धाव घेतली.

सगळ्यांचं सगळं ऐकून झाल्यानंतर मास्तरांनी विनोदची भेट घेण्याचे ठरवले. विनोदला तसा निरोप पाठवून ते त्याला भेटायला गेले.

निरोप मिळाल्यापासून विनोद त्यांचीच वाट बघत होता. संध्याकाळच्या वेळी ते लांबून येताना दिसले.

डोक्यावर पांढरी टोपी, अंगात विरलेला सदरा, एका हातात धोतरचे टोक आणि दुसऱ्या हातात आधाराची काठी घेऊन ते मंद पावले टाकत त्याच्या दिशेने येत होते. त्यांच्या मागून काही गावकरी देखील येत होते. तो लगबगीने त्यांच्या स्वागतासाठी पुढे गेला.

कोण आहे हा विनोद? म्हणून ते त्याला डोळे बारीक करून निरखून बघू लागले. वयोमानानुसार त्यांची दृष्टी देखील कमी झाली होती.

त्यांना पाहून तो सद्गतीत झाला होता. त्याच्या डोळ्यात कृतज्ञता होती. क्षणाचाही विलंब न करता तो त्यांच्या पायांपुढे झुकला. त्याच्या पाठीवर मायेने हात फिरवत त्यांनी त्याला उठवले.

"गुरुजी, ओळखलं का मला? खरंतर, मीच तुम्हाला भेटायला येणार होतो."

"कोण रे बाळा तू? मी नाही ओळखले तुला?" मास्तरांनी उत्सुकतेने विचारले.

"गुरुजी, मी तुमचा विन्या. लहानपणी तुमच्या हातून खूप मार खाल्ला आहे." तो हसून म्हणाला.

"विन्या, तू तर खूप मोठा माणूस झाला रे! पण मग गावाची तोडफोड करायला कशाला आलास? आहे तसेच राहू दे की गाव? शाळेत पण उनाडक्या करायचा. आता पण तेच करतो की काय?" मास्तरांनी दम देत विचारले.

"गुरुजी, मी तुमचाच विद्यार्थी आहे. निसर्गाला हानी पोहोचेल असे काहीच करणार नाही."

"मग हा सर्व लवाजमा घेऊन गावाची शांती भंग करायला कशाला आलास? गावातून पळून गेला होता, तर तिकडेच राहायला पाहिजे होते ना?" मास्तर अजूनही रागात होते.

"गुरुजी, तेव्हा पळून गेलो त्याला कारण वेगळे होते. आता परत आलो त्याचे पण कारण वेगळे आहे."

"दोन्ही कारणे सांग. शिकण्याची तुझी इच्छा नव्हती; म्हणून तुला मारावे लागायचे. रोज छडीने मार खावा लागू नये; म्हणून तेव्हा पळून गेला होतास. त्यानंतर आत्ता उगवला." मास्तर त्याला जाब विचारत होते.

"सांगतो.. सगळं सांगतो. मी लहान असताना माझ्या आईला कसला तरी आजार झाला त्यातच ती वारली. त्यावेळी वैद्य आईला शहरातल्या दवाखान्यात घेऊन जा म्हणाले होते, पण त्यावेळी डोंगरातून रस्ता काढत कित्येक मैल चालून शहरात जावे लागायचे. माझ्या वडिलांनी दुर्लक्ष करून गावातच आयुर्वेदिक उपचार सुरू ठेवले. आजार उशिरा कळला. उपचारांनाही विलंब झाला. वेळेवर शहरात जाता आले नाही; त्यामुळे मी माझ्या आईला कायमचे गमावून बसलो." भूतकाळातल्या आठवणीत हरवून विनोद बोलत होता.

"अरेरे, ऐकून वाईट वाटलं. पण तुला तर आई होती ना?"

"होती पण सावत्र. माझ्या सख्ख्या आईची राख थंड होत नाही तोच वडिलांनी दुसरी आई घरात आणली. नवीन आई माझ्याकडून घरची, बाहेरची सर्व कामे करून घ्यायची. खूप काम करून घेतल्यानंतरही उपाशी ठेवायची. मी काही ऐकले नाही, की खूप मारायची. शाळेत येऊ द्यायची नाही. मी तिच्या जाचाला खूप कंटाळलो होतो."

"तू त्यावेळी हे सर्व सांगितलं असतं, तर कदाचित मी तुझी थोडीफार मदत करू शकलो असतो."

"गुरुजी, एकदा मी तुम्हाला सांगायला आलो होतो. तेव्हा तुम्ही म्हणाले, की तुझ्यासारखी मुले भुईला भार आहेत. तू आयुष्यात काहीतरी चांगलं करून दाखवलं तरच मला तुझे तोंड दाखव. त्याचवेळी मनाशी एक ध्येय निश्चित करून या गावाला मी राम राम ठोकला. परत आल्यावर तुम्हाला मी मुद्दाम भेटायला आलो नाही. काहीतरी करून दाखवल्याशिवाय तुमच्यासमोर यायचे नव्हते."

"त्यावेळी खरंच चुकलं. तुला समजून घेण्यात मी कमी पडलो. तुझा सगळा इतिहास समजला आहे. परंतु, आता परत येण्याचे कारण समजत नाहीये. शहरात चांगलं चालू असेल ना तुझं?"

"गुरुजी, या गावाला आणि शहराला जोडणारा रस्ता तयार करण्याचे काम मी घेतले आहे. इथून पळून गेल्यानंतर शहरात उदरनिर्वाह करण्यासाठी मी एका हॉटेलचा आसरा घेतला. तिथे उष्टी भांडी धुण्यापासून तर वेटरचे काम करण्यापर्यंत मी सर्व कामे केली. हॉटेलचा मालक चांगला होता. त्याने मला त्याच्याकडे कायमचे ठेवून घेतले. त्यानंतर मोठ्या कष्टाने मी माझे शिक्षण पूर्ण केले. माझ्या ध्येयाला दिशा मिळवण्यासाठी बांधकाम व्यवसायात मी माझा जम बसवला. ज्या कारणाने माझी आई गेली त्या कारणाने दुसऱ्या कुणाची आई जाऊ देणार नाही. आयुष्यात प्रत्येक क्षणी पाऊल टाकताना आई पाहिजे असते हो. माझ्याकडे आईच नव्हती." असे म्हणून तो रडू लागला.

त्याची कहाणी आणि त्याचे येण्याचे प्रयोजन ऐकून प्रकाश मास्तरांचे डोळे पाणावले. तो गावाला इजा पोहोचवण्यासाठी आला नव्हता, तर अजून कुणी पोरके होऊ नये; म्हणून गावाला शहर जोडण्यासाठी आला होता.

त्याचा स्वच्छ हेतू समजल्यानंतर गावकऱ्यांचा विरोध मावळला. गावकऱ्यांनी त्याला सर्व परीने साथ देण्याचे आश्वासन दिले.