Login

अदृश्य दोरी

अदृश्य दोरी भाग १
अदृश्य दोरी भाग १

" संजू, अरे हे काय ? आज निळा शर्ट घातलास.? त्यापेक्षा तो पांढरा लिननचा शर्ट घाल ना, तुला तो जास्त उठून दिसतो. आणि ईश्वरी, अगं आज टिफिनला फ्लॉवरची भाजी का दिलीस त्याला ? गुरुवारी त्याला कडधान्य आवडतं ना ? जा, पटकन मुगाची डाळ कर, अजून पंधरा मिनिटं आहेत त्याच्याकडे. " सुलोचनाबाईंनी हॉलमधूनच एका दमात दोन आदेश सोडले.

ईश्वरी, जी आधीच ऑफिसला जाण्याच्या घाईत डबा भरत होती, तिचे हात क्षणभर थबकले. तिने संजूकडे पाहिले. संजूने निमूटपणे कपाटातून पांढरा शर्ट काढला आणि तो घालू लागला.

" मम्मी, त्याला फ्लॉवर आवडतो म्हणून मी केली होती भाजी... आणि मुगाची डाळ व्हायला आता वेळ लागेल. "
ईश्वरीने स्वयंपाकघरातून शांत आवाजात सांगण्याचा प्रयत्न केला.
सुलोचनाबाई किचनच्या दारात येऊन उभ्या राहिल्या.

" वेळ लागेल म्हणजे काय ? संजूच्या आवडीसाठी पाच मिनिटं जास्त लागली तर काय बिघडलं ? आणि ईश्वरी, हे बघ, मी मगाशी ऑनलाइन बघून तुझ्यासाठी आणि संजूसाठी महाबळेश्वरचं बुकिंग करून टाकलंय पुढच्या महिन्याचं. तुमचं लग्नानंतरचं पहिलं वर्ष आहे, फिरायला हवं तुम्ही."
ईश्वरीने डब्याचे झाकण जोरात लावले.

" मम्मी, पण पुढच्या महिन्यात माझ्या ऑफिसचं ऑडिट आहे, मी रजा घेऊ शकत नाही. आणि आम्ही ठरवलं होतं की यावेळी सुट्टीत आम्ही माझ्या माहेरी जाऊ, कारण माझ्या भावाचं लग्न ठरतंय."

सुलोचना बाईंच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले.

" माहेरी ? अगं, माहेरी तर तू कधीही जाऊ शकतेस. पण हे बुकिंग मी मोठ्या आशेने केलंय. संजू, तू तरी सांग हिला. आईचं मन मोडणार का तुम्ही ? "

संजूने घड्याळाकडे पाहिले. त्याला या वादात पडायचं नव्हतं.

" आई, बघू आपण... मी ईश्वरीशी बोलतो संध्याकाळी. आता निघतो मी, उशीर होतोय." संजूने पळ काढला.

ईश्वरी तशीच उभी राहिली. तिला वाटलं होतं संजू तिच्या बाजूने बोलेल, किंवा किमान आम्ही ठरवू तरी म्हणेल. पण संजूने नेहमी प्रमाणे आईच्या शब्दाला मान देऊन विषयाला बगल दिली होती.
दुपारी ऑफिसमध्ये असतानाही ईश्वरीचं लक्ष कामात लागत नव्हतं.

तिला आठवलं, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून हे असंच सुरू होतं. सुरुवातीला तिला वाटलं की सासूबाईंना काळजी वाटते, पण हळूहळू तिला उमजलं की ही काळजी नसून ताबा आहे. संजूला काय आवडतं, त्याने पैसे कुठे गुंतवावेत, ईश्वरीने कोणत्या सणाला कोणती साडी नेसावी, इथपर्यंत सुलोचनाबाईंचा हस्तक्षेप असायचा.

सर्वात जास्त त्रास तिला संजूच्या वागण्याचा व्हायचा. संजू सुलोचनाबाईंचा एकुलता एक मुलगा होता. वडिलांच्या निधनानंतर आईने त्याला खूप कष्टाने वाढवलं होतं, याची जाणीव ईश्वरीला होती. पण त्या कृतज्ञतेपोटी संजूने स्वतःच्या संसाराचे लगाम आईच्या हातात देणं तिला पटत नव्हतं.
संध्याकाळी ईश्वरी घरी आली, तेव्हा सुलोचनाबाई फोनवर कोणाशी तरी बोलत होत्या.

" हो गं, मुलाचा संसार म्हणजे आपलंच घर ना.! मी लक्ष नाही दिलं तर यांचं कसं होणार ? आज तर मी त्यांच्यासाठी बेडरूमचे नवीन पडदे सुद्धा मागवून घेतलेत, जुने फारच गडद वाटत होते..."

ईश्वरी आपल्या खोलीत गेली. तिथे बेडवर नवीन पोपटी रंगाचे पडदे पडले होते. तिने ते पडदे पाहिले आणि तिची सहनशक्ती संपली. हे पडदे तिने आणि संजूने मिळून गेल्याच महिन्यात आवडीने घेतले होते. सासूबाईंनी साध्या सुचवण्या पेक्षाही पुढे जाऊन तिची पसंतीच बदलून टाकली होती.
संजू रात्री घरी आला तेव्हा ईश्वरी शांत होती.

" काय झालं ईश्वरी ? खूप थकली आहेस का ? " संजूने विचारले.

" थकले नाहीये संजू, संपले आहे."  ईश्वरी म्हणाली. तिने पडद्यांकडे बोट दाखवले.

" हे काय आहे संजू ? आपल्या बेडरूममध्ये काय असावं हे सुद्धा आता मम्मी ठरवणार का ? आपल्या खाण्या पिण्या पासून ते सुट्ट्यांच्या प्लॅन पर्यंत सगळं मम्मी ठरवतात. तुझा या संसारात काही शब्द आहे की नाही ? की मी फक्त या घराची एक सुपर व्हाझर म्हणून आले आहे ? "

" अगं, तिचं प्रेम आहे आपल्यावर. तिला वाटतं आपलं चांगलं व्हावं. आईने केलं तर त्यात एवढं चिडायला काय झालं ? " संजूने नेहमीचं उत्तर दिलं.

"Nसंजू, प्रेम आणि हस्तक्षेप यात एक पुसटशी रेषा असते. मम्मी ती रेषा रोज ओलांडतात आणि तू ती रेषा आखायला तयार नाहीस. जोपर्यंत तू त्यांना सांगत नाहीस की हा आपला वैयक्तिक अवकाश आहे, तोपर्यंत आपली घुसमट थांबणार नाही." ईश्वरीच्या डोळ्यात पाणी होतं.
तेवढ्यात दारावर टॅप टॅप आवाज झाला.

सुलोचनाबाई दारात उभ्या होत्या.

" काय झालं ? का भांडताय तुम्ही?  माझ्या पडद्यांमुळे तुमचं भांडण होतंय का ? संजू, मी म्हातारी झाले आता, माझं वागणं तुम्हाला ओझं वाटायला लागलंय का ? " सुलोचनाबाईंनी भावनिक अस्त्र बाहेर काढलं.

संजूने ईश्वरीकडे रागाने पाहिलं आणि आईला जवळ घेतलं.

" नाही आई, असं काही नाहीये. तुला जे आवडतं तेच होईल या घरात."

ईश्वरीला जाणवलं की, संजूच्या या आईला जपण्याच्या स्वभावामुळे तिचं स्वतःचं घर तिच्यासाठी परकं होत चाललं आहे. एका अदृश्य दोरीने संजू आणि सुलोचनाबाई बांधले गेले होते आणि त्या दोरीचा फास ईश्वरीच्या गळ्याभोवती आवळला जात होता.