Login

अदृश्य उपस्थिती... भाग - २ (अंतिम भाग)

अंधारात सान्वीला दिसलेली उपस्थिती शेवटी फक्त तिच्या भीतीचा भास निघतो.
अदृश्य उपस्थिती... भाग - २ (अंतिम भाग)


सान्वी खिडकीकडे पाहत थिजून गेली. काळ्या हुडीतील आकृती तिथे शांत उभी होती, जणू सावली जिवंत झाली होती. पण त्या सावलीकडून कोणताही जोराचा आवाज, धडधड, श्वासही येत नव्हता…फक्त उपस्थिती.

ती हलकेच मागे सरकली. फोन तिच्या हातातून निसटला आणि बेडवर पडला.

“हे खरे आहे का… की पुन्हा माझाच मेंदू खेळतोय?”
ती स्वतःलाच विचारू लागली.

आकृती हललीही नाही. ना जवळ आली, ना मागे गेली. फक्त तिला पाहत होती.

सान्वीने भीतीने ओरडायचा प्रयत्न केला, पण आवाजच बाहेर पडला नाही. तिने दाराकडे धाव घेतली आणि ते उघडले.

आई-बाबा हॉलमध्येच होते. ती त्यांच्याकडे धावत जाऊन म्हणाली, “खिडकीजवळ कुणीतरी आहे! खरंच आहे!”

या वेळेस बाबांनी तिला थांबवलं नाही. ते ताबडतोब तिच्यासोबत खोलीत आले. सान्वीच्या मागे उभी राहून त्यांनी खिडकीकडे पाहिलं.

पडद्यास हलका वारा लागत होता. वारा थंड होता.
पण खिडकीच्या बाहेर…कोणीच नव्हतं.

सान्वीचा चेहरा उतरला. तिला स्वतःलाच शंका यायला लागली. “मी खोटं तर पाहिलं नाही ना?” ती पुटपुटली.

आईने तिचा हात धरला. “तू खूप घाबरली आहेस. थोडा श्वास घे. आम्ही आहोत ना.”

बाबांनी खिडकीचा ग्रील नीट तपासला. कोणत्याही फूटप्रिंट्स नाहीत, कोणतेही खुणा नाहीत.‌ सगळं अगदी सामान्य.

सान्वी थोडी शांत झाल्यावर बाबा म्हणाले, “तुला एक गोष्ट सांगायची आहे. कदाचित तुझी भीती कमी होईल.”
ते तिला हॉलमध्ये घेऊन गेले आणि स्टडी रूममधून ती लाल फाईल परत काढली.

“ही केस माझ्यासाठी कठीण होती. कबीर शाह मानसिक ताणाने खूप त्रस्त होता. त्याला वारंवार वाटायचं की कुणीतरी त्याच्यामागे आहे. त्याला सावल्या दिसत, आवाज ऐकू यायचे.”

सान्वी थिजली. “म्हणजे…?”

“हो. त्याला जे दिसायचं ते खऱ्या व्यक्ती नसायच्या.
वैद्यकीय भाषेत याला ‘भ्रम’ म्हणतात.” सान्वी शांतपणे ऐकत होती.

“कबीर तीन वर्षांपूर्वी गायब झाला. कदाचित त्याच्या मानसिक स्थितीमुळे तो कुठेतरी भटकताना हरवला असेल.”

सान्वीचे मन धडधडत होते. “पण मला मेसेज आले… आवाज आला… मी त्याला पाहिलं…”

बाबांचा आवाज सौम्य होता. “भीती कधी कधी मेंदूला फक्त दिसणार्‍यापेक्षा जास्त गोष्टी दाखवते.
शरीर थकलेलं, मन अस्वस्थ, तेव्हा खिडकीच्या सावल्याही आपल्याला माणूस भासतात.”

सान्वी हळूहळू विचार करू लागली. आजचा तिचा दिवस खूप थकवणारा होता. रात्रीचा अंधार, शांत रस्ता, ती पांढरी कार, तो आवाज, सगळं एकत्र तिच्या मनाशी खेळ करत होतं का…?

आई म्हणाली, “तुला आत्ता फक्त आराम हवा आहे. उद्या सगळं स्पष्ट वाटेल.”

त्या रात्री सान्वी आई–बाबांसोबतच त्यांच्याच खोलीत झोपली. तीला सुरक्षित वाटलं.

रात्र शांत गेली. ना मेसेज, ना सावल्या, ना आवाज.
सकाळ झाली तेव्हा सूर्याच्या प्रकाशाने खोली उजळली.
सान्वी जागी झाली तेव्हा कालची भीती थोड्याफार प्रमाणात ओसरली होती.

आईने तिच्यासाठी नाश्ता केला. बाबा तिच्याशी हलक्या आवाजात बोलले, “मनाला वेळ दे. भीती जाईल.”

सान्वीने हसण्याचा प्रयत्न केला. वास्तव हळूहळू तिला समजू लागलं होतं.

दिवस जात होते. सान्वीला भास, आवाज किंवा मेसेज काहीही पुन्हा जाणवले नाही. मात्र एक दिवस बाबांनी कार ड्राईव्हसाठी गाडी काढली. सान्वीही त्यांच्यासोबत गेली.

गाडी पार्क करताना बाबांना काहीतरी दिसलं,
बॅकस्टेपच्या कोपऱ्यात ती फाईल थोडी बाहेर पडलेली होती.

सान्वीने ड्रॉवरमध्ये हात घातला आणि फाईल नीट ठेवली.
तेव्हा तिच्या नजरेस एक छोटासा पांढरा कागद दिसला.

कागदावर फक्त एकच ओळ होती, “Fear is louder in the dark.”

सान्वीने तो कागद बाबांना दाखवला. ते शांत हसले.

“तो मीच ठेवला होता. तुला आठवण यावी म्हणून,
भीती किती फसवू शकते ते.”

सान्वीने खोल श्वास घेतला. पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर खरा शांतपणा दिसत होता.